गंजी गल्लीतल्या अज़ीज शेजाऱ्यांना पंचवीस तीस वर्षांनी भेटून आधीच जीव सुपाएवढा झाला होता. तो घेऊन पालिकेच्या चौकात येऊन खत्रींच्या दुकानाजवळ गाडी लावली. काहीतरी हवं होतं, पण इतक्या उशिरा मिळण्याची शक्यता नगण्य होती. तरीही एकदा बघू या म्हणून चर्च मागे टाकत पानलाईनकडे वळले. रोजे सुरू असल्यामुळं साडेनऊचा सुमार असूनही परिसरात चांगलीच जाग आहे. दोन्ही बाजूंच्या किराणा मालाच्या दुकानांबाहेर खजूर, खाऊच्या पानांचे कुंडे खास मांडून ठेवलेत. शिवाजी मार्केटच्या तळमजल्यावरची तुरळक दुकानं उघडी दिसतायत.
डावीकडच्या बॅगा-पिशव्यांच्या दुकानात लाकडी दांड्याच्या झटकणीनं बाहेर दर्शनी भागात ठेवलेल्या वस्तूंवरची धूळ झटकून त्या एकेक आत आणून ठेवत दिवस संपवायची लगबग सुरू दिसली. रस्त्यावरूनच मी हव्या असलेल्या वस्तूची चौकशी केली. तरुण मालकांनी अनपेक्षितपणे 'किती पाहिजेत?' विचारलं. मी सांगितल्यावर त्यांनी आत बोलावलं. सुखद धक्का बसून आत शिरते तो दुसरा आणखी सुखद धक्का माझी वाट बघत होता. 'मनावेगळी लाट व्यापे मनाला, जसा डोंगरी चंद्र हा मावळे' ही लकेरसदृश ओळ सुरू होती. वाडकर आणि फडक्यांची व्हर्जन्स आवडतात. हे राहूल देशपांडे गात होते, वहातुकीच्या आवाजात मला चटकन ओळखता आलं नाही. पण आवडीचं गाणं कानावर पडल्यावर माझ्या तोंडून नकळतच 'अरे वा' गेलं. माझी दाद ऐकून वस्तू काढायला खाली वाकलेल्या मालकांनी वर बघून काउंटरवरच्या मोबाईलचा आवाज वाढवला. एकीकडे वस्तू मोजून देताना मला म्हणाले, माझी आवडती गाणी आहेत ही. मी हसून मान डोलावली. पैसे देऊन वस्तू घेऊन आनंदात दुकानातून बाहेर पडले आणि मागे वळून दुकानाची पाटी वाचली, वर्णे बॅग्ज. आजुबाजुला एकदोन कुलुपांची दुकानंही उघडी आहेत आणि दोन तीन कुलुपांची खरंतर आवश्यकताही आहे. मगर ऐसे खुश मिजाज और तालें खरीदूं! छे! उद्या परवाकडे येईन पुन्हा.
वनवेच्या भानगडीमुळे मटण मार्केटातल्या चहलपहलीतून बिंदू चौकाकडे आले. सरळ पुढे जाणार एवढ्यात एक लांबलचक ऑडी झोकात माझ्या डावीकडून मागून येऊन उजवीकडे शिवाजी रोडकडे जायसाठी आडवी आली. मला चाक थोडं उजवीकडे वळवावं लागलं. तर समोर बिंदू चौकाच्या चौथऱ्यावर पाच सात बायका वाऱ्याला निवांत बसलेल्या दिसल्या. कित्येक वर्षं इथे जवळच रहाताना मोठ्या शिवाजी पुतळ्याच्या चौथऱ्यावर जितक्यांदा बसलो, त्या मानाने इथे बसल्याचं फार आठवत नाही. ओझरतं घड्याळात बघितलं, मोजून दहा मिनिटांची परवानगी दिली स्वतःला आणि चौथऱ्याजवळ गाडी लावली. ह्यावेळी इथे एकटं बसण्याची कल्पनाही केली नव्हती कधी. घरगुती गप्पा मारत थोडावेळ टेकलेल्या त्या बायकांमुळेच सुचलं केवळ. जे जे काही वाटलं, त्यात 'उठूच नये' हा विचार प्रबळ होता. गार वारे आणि वाहता चौक. दहाव्या मिनिटाला मात्र उठलेच.
आजचा दिवस मावळताना उजळ झाला. एक कोणतं तरी टोक बरोबर ओढल्यासरशी खूप गुंतलेल्या दोऱ्याचं जंजाळ विनासायास सुटत जावं, तसं काहीसं चालू असतं मनाचं. धमाल. जिंदगी हसीन है|
https://www.youtube.com/watch?v=P7l1rNJD8IU
No comments:
Post a Comment