म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Saturday, November 26, 2022

 पोलिस आणि मी

आजवर पोलिसांकडे जाण्याची बऱ्याच कारणांनी वेळ आलेली आहे. निघालेली किंवा उद्भवलेली ती सगळी कामं अत्यंत उत्तम पद्धतीनं पार पडली, सर्व पोलीस ठाण्यांमध्ये उत्कृष्ट सहकार्य मिळत आलं आहे. कधी कुणाची ओळख वापरावी लागली नाही. त्यांची नजर आणि कान इतके तयार असतात, की तुमच्या लिखित/तोंडी कथनातल्या प्रामाणिकपणाचा किंवा खोटेपणाचा त्यांना अचूक वास येतो आणि त्यातून तुमच्या कामाचं बरंचसं भवितव्य ठरत जातं. हे अनुमान केवळ वैयक्तिक अनुभवावर आधारित आहे. ह्याला अपवाद असतीलच. आता पुष्कळ ओळखी झाल्या आहेत, पण त्यांची कधी कामासाठी गरज पडेल असं आजही वाटत नाही.
काही महिन्यांपूर्वी, कोल्हापुरातल्या उपद्रवी शेजाऱ्याविषयी इथे पोस्ट लिहिली होती. त्या अनुषंगाने शिव्या आणि त्यांचा योग्य वेळेवर वापर या आवश्यक कलेबाबतही लिहिलं होतं. ऐन गंजी गल्लीशेजारी वाढलेली असल्यामुळे सगळा दारूगोळा आणि तोफखाना जणू बाळगुटीसारखा मिळालाय, पण तो वापरण्याच्या वेळा सुदैवानं कधी आल्या नाहीत. त्यामुळे यावेळी तो जालिम उपाय तर केलाच, पण त्यापूर्वी नागरिक म्हणून सर्वप्रथम करवीर पोलिस ठाण्यात एक सविस्तर तक्रार दाखल केली होती. त्यानंतर मग केलेला साग्रसंगीत उद्धार आणि पोलिसांकडे केलेल्या अर्जावरच्या पोचपावतीच्या नुसत्या फोटोनं अपेक्षित परिणाम साधला गेला. शिवाय सोयिस्करपणे भूमिका बदलत दोन्ही गोटांमध्ये साळसूदपणे लुडबुडणाऱ्या पक्षांनाही आपोआप योग्य ते निरोप पोचले, हा आणखी एक लाभ. मवाळ म्हणून गृहीत धरलेले लोक जहाल होऊ शकतात, मवाळपणा ही त्यांची एक निवड असते, ही शक्यता त्रास देणाऱ्या लोकांनी विचारात घेतलेली नसते. हा गाफीलपणा आपल्यासाठी फार पथ्यावर पडतो. शस्त्रक्रिया लागत असेल तिथे मलमपट्टी करून भागत नाही. सुरुवात आपल्या भाषेपासून करायची, पण प्रसंगी ज्याला जी भाषा समजते, त्या भाषेतही बोलता आलं पाहिजे. आता सगळं आलबेल आहे.
आज हे उलगडून पुन्हा सांगण्याचं कारण म्हणजे आज सकाळी करवीर पोलिस ठाण्यातून तिथल्या अधिकाऱ्यांचा चौकशीसाठी फोन आला होता. रोज ढिगारा लागणाऱ्या इतक्या अगणित अर्जांची छाननी करून त्यावर कारवाई करत आज माझ्या अर्जाचा नंबर लागला. त्या अधिकारी ज्या पद्धतीनं बोलत होत्या, जो दिलासा त्यांनी नुसत्या फोनवरून बोलतानाही दिला, त्याला तोड नाही. प्रश्न सुटलेला आहे, मी तो माझ्या पातळीवर माझ्या पद्धतीनं सोडवलेला आहे हे समजल्यानंतरही त्यांनी पुढे पूर्ण विचारपूस केली. वैयक्तिक नंबर देऊन कोणत्याही वेळी फोन करा, कोल्हापुरात कधीही त्रास वाटला तर ताबडतोब कळवा, आम्ही आहोत, हे ठामपणे, त्या विशिष्ट कमावलेल्या आवाजात सांगितलं. माझी त्यांची मुळीच ओळख नाही. पोलिस मुख्यालयात असलेल्या माझ्या ओळखीचा माझ्या कामासाठी वापर केला नाही. त्यामुळे एक सामान्य नागरिक या नात्यानं समाजात सुरक्षित वाटण्यासाठी त्या अधिकाऱ्यांचा हा आश्वासक सूर केवढा मोलाचा आहे, हे मी वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही.
हेच चित्र मी पूर्वी पुण्यातही तब्बल चार वेळा अनुभवलं आहे. एकदा तर फौजदारी गुन्हा दाखल करावा लागला. निव्वळ ब्राह्मण द्वेष हे कारण. पोलिसांकडे जाऊन आल्यावरही तुझ्या पोराचा जीवच घेतो, हात-पाय तोडतो, ही गुंडगिरीची भाषा. हे कुणीच ऐकून घेणार नाही. अशी भाषा ऐकायला मोगलाईत जगत नाही आपण. मग एकतर तू मर नाही तर मी मरते, इथपर्यंत टोकाला गेलं. पोलिसांनीही हात टेकवून शेवटी त्या व्यक्तीला फरासखान्यात नेण्यापर्यंत पाळी आली. तेव्हा माझ्या नवऱ्याला दया येऊन त्यानं पोलिसांना विनंती केली, की 'सोडून द्या त्याला, तो आयुष्यातून उठेल. मुलं लहान आहेत त्याची. त्याच्या आयुष्याचं नुकसान व्हावं अशी काही आमची इच्छा नाही'. त्यावेळी पोलिसांनी आम्हाला समजावलं होतं, की सरळपणे जगणाऱ्या नागरिकांना तसंच निर्धोक जगता यावं म्हणून अशी कीड काढण्याचे उपचार करणं आम्हाला भागच आहे. त्या प्रत्येक प्रसंगी पोलिस त्या माणसाशी आणि आमच्याशी ज्या पद्धतीनं वागत बोलत होते, ते उल्लेखनीय होतं. पोलिस यंत्रणेविषयी आदर होताच, तो वाढीस लागला.
अलीकडे एका मैत्रिणीला काही कटू प्रसंगाला तोंड द्यावं लागतंय आणि आगीतून फुफाट्यात नको म्हणून तिनं पोलिसांकडे जाण्याचं बरंच टाळलं. पण इतका पराकोटीचा मनस्ताप सहन करणं फार अवघड असतं. तेव्हा माझ्या अनुभवावरून तिला पोलिसांची मदत घेण्याबद्दल राजी केलं, हाताशी असावेत म्हणून माझे ओळखीचे सर्व संपर्क दिले. पण ते संपर्क न वापरताही आज तिला आवश्यक ती मदत मिळते आहे. मुख्य म्हणजे आपण हे सगळं निभावून नेऊ शकतो, हा महत्त्वाचा धीर आला आहे. जो आयुष्यात जिथे तिथे फार उपयोगी पडतो.
गेल्या वर्षी काही महत्त्वाच्या कामानिमित्त ऐन गणपतीत वीसेक दिवस एस पी ऑफिसला, प्रत्यक्ष कमिशनर आणि त्यांच्या सबंध सहकाऱ्यांबरोबर बसून काम करण्याची, त्यांचं काम आणि रोजचं रुटीन जवळून बघण्याची संधी मिळाली. हे जग माझ्यासाठी पूर्णपणे नवीन होतं. पण त्याचं अंतरंग बघून स्तिमित झाले. अतोनात जबाबदारी, कल्पनेपलिकडचा ताण, रोज मारुतीच्या शेपटीसारखी वाढणारी कामं योग्य पद्धतीनं हातावेगळी करण्याचा संतत वेग, वेळोवेळी होणारे वरीष्ठांचे आणि मंत्र्यांचे, हाय प्रोफाईल व्यक्तींचे दौरे, सणावाराचे बंदोबस्त, शहराची आणि जिल्ह्याची रोजची सुव्यवस्था, त्यासाठी माणसांची आणि त्यांच्या वैयक्तिक अडचणी लक्षात घेऊन प्रसंग मार्गी लावण्याची व्यवस्था, प्रचंड गोपनीयता, आणि हे सगळं समर्थपणे पार पाडताना हसत रहाणं, नम्रपणे वागणं, समोरच्या नागरीकांची दखल घेणं, हे त्या सगळ्या कार्यालयात वरिष्ठांपासून कनिष्ठांपर्यंत दिसलेलं चित्र खूप सुखद होतं. सरकारी कार्यालयात चकरा मारल्यानंतर (तेही अनुभव सांगण्यासारखे आहेत खरंतर) आणि पोलिस मुख्यालयात वावरल्यापासून मी आता एकंदरीतच अधिक जबाबदारीनं वागते, एवढं खरं. कारण नागरिक म्हणून ते नक्की माझ्या हातात आहे.
एवढं तपशीलवार मुद्दाम लिहिलं. एकतर चांगले अनुभव आवर्जून सगळ्यांपर्यंत पोचवले पाहिजेत. दुसरं म्हणजे, आपल्या नियंत्रणात नसलेल्या अनेक अडचणी येत असतात, तेव्हा तशा अडचणी आलेल्या लोकांचे अनुभव माहित असल्यास निदान विचार करण्यासाठी नव्या दिशा दिसू शकतात, बंद पडलेलं सुन्न झालेलं डोकं थोडं चालू लागू शकतं, आधार वाटू शकतो. अशावेळी हक्कानं आजुबाजुला मदत मागावी आणि त्याचवेळी स्वतःच्या मदतीसाठी स्वतःही उठून उभं रहावं.
समस्त पोलिस यंत्रणेला अभिवादन.


No comments:

Post a Comment