म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Wednesday, September 27, 2023

 ध्रुवतारका.

काळीज.
जानेमन.
१९२९ साली आजचा दिवस उजाडला नसता तर अवघड झालं असतं, गड्या!
देवाक काळजी म्हणून 'आमच्या कल्याणा लताची विभूती'🌳

Tuesday, September 26, 2023

 छान बातमी आली ही.

अगदी खरं खरं सांगायचं तर आशा पारेखना फाळके पुरस्कार जाहीर झाला तेव्हा वहिदाच्या आधी? अशी एक आठी पडली होती कपाळावर. नाकही मुरडलं होतं मी, मला चांगलं आठवतंय. म्हणजे त्या दोघींना नसेल अडचण, पण मलाच होती. आज मात्र बरं वाटलं, देर आए दुरुस्त आए.
फार ग्रेसफूल बाई आहे ही. करिअरच्या सुरुवातीपासून स्वतःच्या अटींवर काम करणं खायची गोष्ट नाही. बहुतेक सगळ्या भूमिका दमदार केल्या. वाट्याला आलेल्या एकूण एक गाण्यांचं सोनं केलंय. मागे कधीतरी मी 'कल के सपने आज भी आना' वर काही तरी खरडलं होतं. माझ्या एका मोठ्या आजारपणात मी वहिदाचे बरेच सिनेमे सलग बघून काढले होते. वहिदा महोत्सवच साजरा केला. ऐन उमेदीतल्या सिनेमांबरोबरच चांदनी, लम्हें, कभी कभी, रंग दे बसंती, दिल्ली ६, हे सुद्धा खास वहिदासाठी पुन्हा बघितलेले. त्रिशूल सारखे तुरळक अपवाद वगळता प्रफुल्लित वावर असतो तिचा. अलीकडे खूप इंटरव्ह्यू येतात. तल्लख बुद्धिमत्ता, उर्दूमिश्रित गोड इंग्रजी-हिंदी, मस्त विनोदबुद्धी, मनापासून हसणं, व्यक्तिमत्वातला अंतर्बाह्य रुबाब असं काय काय असतं त्यात. रेश्मा और शेराच्या आठवणी, लग्नाचे आणि पोरांच्या शाळेबद्दलचे किस्से तर विशेष मजेदार आहेत.
डिझर्व्हिंग व्यक्तीला पुरस्कार मिळाला.


Monday, September 25, 2023

 देव नावाच्या चार्मचा शंभरावा जन्मदिवस

❤
घरातल्या समस्त आजोबा आज्यांपासून ते माझ्याकडून त्याच्यासारखा कोंबडा पाडून घेऊन शाळेला जाणाऱ्या नातवापर्यंत सगळ्यांना आवडणारा देव.
अशा खास दिवसांना विविध भारती बहार उडवत असते.




Friday, September 22, 2023

 #मोहघालणारीगाणी

काही गाणी तुमच्या डोक्यावर बसतात आणि पिच्छा पुरवतात. 'सपना जहां दस्तक न दें' हे ब्रदर्स नामक सिनेमातलं गाणं असंच किती काळ माझा गळा पकडून बसलंय. ऐकायला बघायला, दोन्ही तेवढंच आवडतं.
गाण्याची सुरुवात फारशी लक्षवेधक नाही. किंबहुना ती चाल फारशी रजिस्टरच होत नाही. पण कंटाळवाण्या सभेत एखादी तडफदार व्यक्ती अनपेक्षितपणे उठून उभी राहून भारदस्त आवाजात बोलू लागते आणि सगळे एकदम मेस्मराईज होऊन ताठ बसतात, तसा 'मेरे दिलमें जगह खुदा की खाली थी' म्हणत तगडा सोनू निगम उठून उभा राहतो आणि तुमचा झेल जातो. टेक ऑफ घेऊन टर्ब्युलन्स नंतर विमान एका वेगावर स्थिरावतं तसा फील आहे त्या ओळीला.
मेरे दिल में जगह खुदा की खाली थी
देखा वहां पे आज तेरा चेहरा है
मैं भटकता हुआ सा एक बादल हूं
जो तेरे आसमां पे आके ठहरा है
या चार ओळी बहुतेक सोनूला स्वत:लाही आवडत असाव्यात. ती ओळ छानपैकी थांबत थांबत पुढे जाते. नो घाई. मग वाळलेलं पान जसं झाडाच्या शेंड्यावरून डाईव्ह घेत हलके हेलकावे घेत बराच वेळ हवेतच उडत रहातं पण खाली येत नाही, तशी 'देखा वहां पे आज तेरा चेहरा है' येते. याही ओळीला थांबे आहेत.
या गाण्यामुळं अमिताभ भट्टाचार्य चांगलं लिहितो हेही कळलं. 'जबसे पडे तेरे कदम चलने लगी दुनिया मेरी' हे मस्त सुचलंय. तो चांगलं गातो. 'लुटेरा'तलं अनकही चांगलं गायलंय त्यानं.
वरच्या चार ओळी आणि 'तू रूह है तो मैं काया बनूं, ता-उम्र तेरा साया बनूं' हो दोन वेगवेगळे सेगमेंट केलेत अजय अतुलनी. लोक हौसेनं गाताना दोन्हीपैकी काहीही निवडतात आणि तरी ते तुकडे परीपूर्ण वाटतात.
दिग्दर्शन विचारपूर्वक केल्यासारखं वाटतं. एकाच गाण्यात कथा पटापट पुढं नेलीये. जॅकलिन मला एनीवे आवडते, पण या गाण्यात आणखी प्रसन्न दिसते हसते. ती पोनी उडवत बेकरीत उगीचच थिरथिर करते ते कृत्रिम वाटत नाही. पेस्ट्री समोर आल्यावर अक्षयचं पहिल्यांदा जॅकलिनकडे लक्ष जातं तेव्हा फ्रेम रंगीत होते. अक्षयसुद्धा चांगला दिसलाय. त्याची जिवणी पार या कानापासून त्या कानापर्यंत असूनही धीरगंभीर नकळतसं हसू बरं हसलाय. तो 'दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी कसा' याचा अंदाज घेत तिकडं बेकरीत बघत असताना इकडं शेजारी ती अलगदपणे येऊन बसते तेव्हा ते जाणवून हललेली त्याची नजर, तिचा भलताच देखणा पिवळा प्रिंटेड शर्ट, खाली बसता बसता तिनं रोखून सोडलेला श्वास, आणि मुरलेलं नातं असल्यासारखं त्यानं सहजपणे केक खाणं हे छान वाटतं बघताना. असला अबोल सुखद रोमान्स आताशा दिसतच नाही फारसा. सुखाच्या परमावधी नंतर हातात थेट दुपट्यात गुंडाळलेलं बाळच, हे एकाच फ्रेममधलं सुपरफास्ट फॉरवर्ड तर मला जाम आवडतं. गाण्यातले एकंदर शब्द आणि समोर उमटणाऱ्या चित्रांत काही तरी संगती वाटते.
सहसा रोमॅंटिक गाण्यात आवश्यक रागिनी चांदनी इथंही हजर आहेत. पण वैराग्य, माया, तादाद, ता-उम्र, चौखट असले एरवी गाण्यात फारशी हजेरी न लावणारे शब्द, त्यांची धार नीट बोथट करून सभेत बसवलेत. एकुणच सुरांची नक्षी मोहक आहे, पण खास करून सायाच्या आधीचं 'तेरा' आणि त्याच नोटमधलं मायाच्या आधीचं 'तेरी' वरचं बारीक भरतकाम फार सुरेल आहे. नीती मोहनच्या आवाजात एक सेन्सुअस हस्क आणि गोडव्याचं मिश्रण आहे. हे गाणं सोडून मी तिचं दुसरं काही ऐकलेलं नाही. त्यामुळे केवळ या गाण्यासाठी तिनं ठेवणीतला आवाज काढलाय की तिचा आवाजच तसा आहे, कल्पना नाही. पण जे आहे ते अतिशय ऐकत रहाण्यासारखं झालंय. अजय अतुलनी धिंगाणे कमी करून अशी स्वस्थ चित्त, उसंतीची गाणी जास्त करायला हवीत. पुरेसे एस्टॅब्लिश झालेत आता ते. आणि सोनूला अशीच वेचक गाणी द्यावीत.
याची कैक कव्हर्स ऐकत असते, पण कंटाळा येत नाही. एकानं सॅक्सोफोनवर रीळ केलंय दोनच ओळींचं. सुंदर आहे. सोनूही कुठे ना कुठे गातच असतो हे. तो हल्ली बाळासाहेब मंगेशकरांसारखा स्वतःच्या गाण्यांत अतोनात व्हेरीएशन्स घेत रहातो. चालायचंच. प्रतिभा आहे आणि ती सांगेल तस्सं वळणारा गळा आहे, आम्ही कोण आक्षेप घेणारे. अनेकदा मीही म्हणून बघत असते. पण खळेकाकांच्या गाण्यांसारखं आधी टिपेच्या ओळी गाठून आपली उंच उडी साधारण कुठपर्यंत जातेय हा अंदाज घ्यावा लागतो, मग धडपडत घसरत खालच्या ओळी सापडतात कशा तरी.
पुष्कळच लांबलं हे आख्यान. हा वेळ गाणं ऐकण्यात घालवायला हवा होता. पण माझ्यासारखंच आणखी कुणाच्या डोक्यावर बसलंय का ते कळेल म्हणून खरडलं.
https://www.youtube.com/watch?v=lHJp_3g2MAI

Friday, September 15, 2023

 गणपतीला सर्रास बाप्पा म्हणण्यातलं नावीन्य आता पूर्ण ओसरलं आहे. अतिरेक झाला की नकोसं होतं.

साधी नेहमीची गणपती, गजानन, गणेश ही नावं पुन्हा वापरात आणायला हरकत नाही. बाकी शेकडो संबोधनं आहेत तीही वापरल्यास दुधात साखर.
उपरोध आवडत नाही म्हणून स्वच्छपणे व्यक्त केलंय. हे सुचवण्याचाही कुणाला त्रास होऊ शकतो, त्याबद्दल आधीच क्षमस्व. कृपया वाद घालू नयेत.

Thursday, September 7, 2023

 ९०व्या वाढदिवसानिमित्त उदंड शुभेच्छा, बेब!

🌹
आमच्या मातोश्रीही आज ६८ झाल्या असत्या आणि तिलाही अस्संच बेबच म्हटलं असतं, कारण तुमची जगण्याची मिळतीजुळती जातकुळी.
खरं म्हणजे तुझ्या गळ्यात हात टाकून, तुझे दोन्ही गाल ओढून हे सांगायला जास्त आवडलं असतं.
जानम, समझा करो😘

Wednesday, September 6, 2023

 केवढं भरभरून लिहितायत सगळे मालिनीताईंबद्दल!

अजून जेमतेम काही वेळच झालाय बातमी येऊन.
केवळ श्रद्धांजली वाहिली जात नाहिये, मंडळी चार शब्द बोलतायत, दोन ओळी स्वतःच्या लिहितायत, हृद्य आठवणी शेअर करतायत. जवळपास हरेक रसिकानं ताईंचं गाणं प्रत्यक्ष ऐकलं असल्यामुळे प्रत्येकाकडे काही ना काही तरी सांगण्यासारखं आहे आणि त्या सांगण्यातून किंचितसा गहिवर पोचतोय. प्रत्येकाला किती मनापासून वाईट वाटलंय ते जाणवतंय.
खरोखरच एक वीज हरपली आज. आपण उपस्थित बहुतेकांनी प्रत्यक्ष तळपताना पाहिलेली. आपली आत्या, मावशी, काकू असावी तसा घरगुती आपुलकीचा वावर आणि तीच बाई घरचं कार्य उभं राहिल्यावर सळसळत्या विजेसारखी वावरावी तसं लखलखीत गाणं यांचं सुखद मिश्रचित्र अनुभवू शकलो, हे आपलं भाग्य. टप्पा म्हणजे तर आपली ऐकण्याची कुवत कमी पडावी अशी चपळाई. त्या सुहास्य मुद्रेनं येणार, बसणार, गायला सुरुवात, संगतकारांचं दिलखुलास कौतुक, ठरलेल्या वेळेत खणखणीत परफॉर्मन्स, गाऊन झालं की स्निग्ध हसून नमस्कार करून निरोप घेणार. एवढ्या वर्षात फरक एकच, मांडी घालून बसण्याऐवजी पाय खाली सोडून बसणं. बाकी सगळं जसंच्या तसं. निव्वळ गाणं एके गाणं. तेही कसं, तर सगळे खळखळाट शांत करत ठहराव आणणारं. पण प्रवाही. तयारी दाखवणारी मांडामांड नाही. श्रवणानंदाबरोबरच श्रोत्यांचं ग्रुमिंग करणारं गायन.
पी. जी. वुडहाऊस त्याच्या मुलीच्या मृत्युच्या वेळी म्हणाला होता, की ती अमर आहे असं त्याला वाटलं होतं. आपल्याही मनात कितीतरी माणसं अशी अमरच असतात. आणि असं कोण कोण आपल्या ठायी अमर आहे ते ती वेळ आल्यावरच उमगतं. देवाघरची माणसं ही.
मालिनीताई, तुमच्या गाण्यातलं चैतन्यच निराळं होतं. तुम्हाला कधीच तोड नसेल.
मन:पूर्वक आदरांजली.