म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Saturday, April 16, 2016

स्मरणरंजन - 'आपली आवड'

जे कुणी ऐंशीच्या दशकात कोल्हापुरात असतील त्यांना सांगली आकाशवाणीच्या 'आपली आवड'बद्दल अवाक्षरही सांगायला नको. इतरांच्या माहितीसाठी, हा कार्यक्रम दर रविवारी दुपारी साडेबाराला आणि दर बुधवारी रात्री दहा वाजता प्रसारित व्हायचा. मी म्हणतेय त्या कालावधीआधी आणि त्या नंतरही तो कार्यक्रम होतच होता, पण ऐंशी ते नव्वद हा काळ मला स्वत:ला तरी सांगली आकाशवाणी किंवा आपली आवड वगळून आठवता येत नाही म्हणुन महत्वाचा. जाता जाता लहानपण समृद्ध केलेला. मराठी मिश्रगीतांचा भलामोठा खजिना उलगडत नेणारा. कित्येक गाणी मी आपली आवडनंतर पुन्हा ऐकलीच नाहीयेत. अगदी क्वचित विविधभारतीवर कानावर पडतात पण आपली आवडनं जसं वैविध्य जपलं तसं विविभावर होत नाही, त्याच त्याच प्रसारणाचं प्रमाण जास्त आहे. पण ते असो.

आम्ही तिस-या मजल्यावर रहायचो. आजुबाजूला बाकी सगळी बैठी घरं, समोर एकही दुसरी उंच इमारत नाही. रेडिओ प्रत्येकच घरात होता. एकावेळी सगळीकडे एकच कार्यक्रम वाजणारी आणि ऐकू येणारी ती एकत्रित लहर अजून माझ्या कानात जशीच्या तशी आहे. एकोची अनुभूती पहिली तिथे मिळाली. मग थोडं मोठं झाल्यावर विजापूरला गोलघुमटात आवाज घुमवल्यानंतर बाबांनी ह्याला एको म्हणतात असं सांगितलं तेव्हा शब्द समजला. प्रत्येक रेडिओचा आवाज मोठाच असायचा. तिथं कंजूसी नाही. चुकून नादात आपण विसरलो तरी बाहेर हवेत तरंगणारे ते लख्ख सूर घरात येऊन रेडिओचं बटण फिरवायची आठवण करून देत. टायटल म्युझिकचा सुरूवातीचा तो तबल्याचा तुकडासुद्धा तेव्हा स्पष्टपणे ऐकू येई. रविवार दुपार आणि आपली आवड ही मर्मबंधातली ठेव आहे.

लावण्या, भावगीतं, समरगीतं, पोवाडे, अभंग, नाट्यगीतं, बालगीतं, लोकगीतं, भक्तिगीतं आणि अर्थात चित्रपटगीतं, सर्व प्रकार मुबलक. समालोचन खणखणीत. पंचक्रोशीतल्या श्रोत्यांची गावं ओळखीची. त्यामुळे तो कार्यक्रम खरोखर 'आपला' वाटायचा. मराठी गाण्यांची आवड लागणं आणि ती जोपासली जाणं हे श्रेय घरच्यांइतकंच आपली आवड आणि सांगली आकाशवाणी केंद्रालाही. आता कोल्हापुरात सांगली केंद्र ऐकू येत नाही हे ऐकून खुपच वाईट वाटतं.

तेव्हा ऐकलेली काही गाणी कुठेतरी गडपच झाली की काय असं वाटतं. युट्युबमुळे त्यांना पुन्हा भेटता येणं सुदैवाने सुकर झालंय. मी ही गाणी तुमच्यासोबत शेअर करणारे, ज्यामुळे माझा आनंद द्विगुणित होईल. तुम्हालाही ती आवडतात का आणि असतील तर का, तेही वाचायला आवडेल.

आजचं गाणं - हे गर्द निळे मेघ
चित्रपट - बन्याबापू
मला स्वत:ला हे गाणं अतिशय आवडतं, मराठीत अशा प्रकारची गाणी खुपच कमी आहेत.

No comments:

Post a Comment