नवं वर्ष सर्वांसाठी आनंदाचं होऊ दे!
असं केवळ मी म्हणत नाहीये, तो बाहेर नटलेला बहरलेला निसर्ग म्हणतोय. आज सकाळपासून तिघा-चौघांकडून माझा विश्वास नाही गं, मी काही हे मानत नाही गं ऐकलं. ओके, अॅग्रीड. अगदी मनापासून आदर आहे. पण प्रत्येक गोष्ट इतकी तर्का-विश्वासाच्या कसोट्यांवर का तासायची आहे? तुमची मतं, तुमचा धर्म, तुमच्या विश्वासानं त्या निसर्गाला काडीचाही फरक पडत नाही, माणसांनो! तुम्ही सण साजरे करा, नका करू, जुळवून आपल्याला त्याच्याशी घ्यायचंय, त्याला कवडीमात्र देणंघेणं नाही. तसंही आता गेल्या काही वर्षांपासून तो 'तडफडा तिकडे' म्हणतोचंय. अरे, बाहेर बहावे, काटेसावर, पळस, अगदी बोगनवेलीही झडझडून उठतात, नव्या कोवळ्या पालव्या फुटतात, त्या केवळ राम वनवासातून परतला किंवा बळीनं दानशूरपणा दाखवला म्हणुन नाही, ना तो केवळ हिंदूंसाठी फुलतो, ना इतर कुणासाठी. आपण मात्र सगळं कोष्टकात बसवतो.
आज कडूनिंब अख्ख्या उष्ण कटीबंधीय लोकांनी खायला हवाय, आजच नाही, आजपासून. नुसता खावा किंवा पाण्यात घालून आंघोळी करायला हव्यात. उष्मा नियंत्रित ठेवण्यासाठी, परंपरा पुढे रेटण्यासाठी नाही. घाम उत्सर्जित होत राहून उर्जा कमी होते, साखरेच्या सेवनाने ती पातळी वाढवू. पन्ह्यानं उन्हाळा बाधत नाही. पटत नाही ना, मग सण म्हणुन नका ना बघू तिकडे. होळी आता हानीकारक म्हणुन पेटवू नये, पण इतकी शतकं होळीनं थंडी काय फक्त हिंदूंसाठी पळवली का, शेवटी ती एक पोर्णिमेचा मुहूर्त साधून पेटवलेली साधी शेकोटीच ना? सुगी झाली म्हणुन त्या निमित्तानं पुरणाच्या पोळ्या होतात. रंगपंचमीला तुम्ही नका हवंतर रंग खेळू, पण बाहेर वसंत जिकडंतिकडं रंगांची उधळण करतोय. ती केवळ हिंदूंसाठी नाही. मार्चएंडला अकौंटींग इयर संपतं तेव्हा करतो का आरडाओरडा? ते आपण सोयीसाठी सर्वमान्यतेनं स्विकारलेलं आहे, पण तेही कुणीतरी कधीतरी म्हणालेलंच आहे ना? शिशिरात पानगळ करून निसर्गाचं वर्ष संपतं. तुम्ही कीर्द खतावण्या नव्या घाला, नका घालू, बाहेर पालव्या फूटून खरोखरचं नवीन वर्षं सुरू झालंय. ते कुणीही कधी सांगितलेलं नाही त्या निसर्गाला. श्रावणात निसर्गातल्या पत्री गोळा करून घरादाराचे कानेकोपरे सजवा ना, इकेबाना करा, कुणी सांगितलं, फक्त मंगळागौरीलाच वहा म्हणुन? अशी निमित्तं इतरेजन कसे साजरे करतात तेही समजून घेता येईल. गुढी उभारली, अगदी एखादी गौर झोपाळ्यात झुलवत दिवाणखान्यात बसवल्यास झकास इंटिरीयर डेकोरेशन होतंय. वर पन्हं, कैरीची डाळ म्हणजे तर दुधात साखर आणि गारेगार! हवेत एखादी हलकी सनईची धून तरंगत ठेवावी. छानपैकी जमेल त्या जीवाभावाच्या सग्यासोय-यांना बोलवावं त्यानिमित्तानं. केवळ बायकांनाच का हा लाभ? असं अधूनमधून निसर्गाशी समन्वय साधून काही केलं तर आपल्या नेहमीच्या रटाळ रुटीनमधून ब्रेक मिळाल्यासारखं वाटत नाही का आपल्याला? का इतके तर्ककर्कश्श होतो आपण?
सणवाराचे दिवस आले की विश्वास नसणारे तथाकथित निधर्मी लोक बेंबीच्या देठापासून कसा सगळा चळीष्टपणा आहे ते सांगत शब्दश: कोकलत सुटतात, विश्वास असणा-यांची यथेच्छ टर उडवत. आहे नाही ते सगळं बुद्धीचातुर्य तिथे खर्ची घालायची जणू अहमहमिका लागते. जे नकोसं आहे ते मान्यच आहे. टाकलंच पाहिजे. पण जिथे डावं आहे तिथे उजवंही आहेच. ते का दिसत नाही? उलट त्यानिमित्तानं पक्वान्नं चापू, मिळालेल्या सुट्टीचा सानंद उपभोग घेऊ, लोळू, फिरू, भेटू, जे हवं ते करू ना. मी निसर्गधर्मी आहे. तो सांगतो ते मनापासून ऐकावंसं वाटतं. आणि मला माझ्या कुवतीनुसार जितकं झेपतं ते मी ऐकते.
इतक्यात एक अफगाणी मित्र गोतावळ्यात सामील झालाय, इस्लामाबादला दोन वर्षं दूतावासात काम करून आलाय. त्याला पाडवा म्हणजे ते हवंय. त्याला कडूनिंबाची चटणी खाऊ घालायचं आणि त्याच्या गोष्टी ऐकायचं ठरलंय. त्याचं जग आम्हा बाकीच्यांच्या जगापेक्षा सर्वस्वी निराळं आहे. गुगल आणि सोशल मिडीयाचा जमाना असूनही, प्रत्यक्ष माणसानं सांगितलेल्या गोष्टी डोळे विस्फारत ऐकण्याची मजा आजही जशीच्या तशी टिकून आहे.
मला आपल्यापेक्षाही आपल्या मुलांबद्दल जास्त विचार येतो. आपण ही निमित्तं, क्षण नाकारतोय आणि त्यांना निसर्गचक्र, पर्यायाने जीवनचक्रही याची देही, याची डोळा सोदाहरण समजावण्याची संधी डावलतोय. कुणीतरी, पूर्वी कधीतरी, ह्या ह्या दिवशी हे हे करा असं सांगितलं असेल, ते आज तसंच्या तसंच केलं पाहिजे असं कुठाय? ज्यांना सांगितलंय त्यांनीच फक्त केलं पाहिजे असं तरी कुठे लिहीलंय? बिहू, ओणम आवडेल मला साजरं करायला. मला शीरखुर्मा तुफान आवडतो, लहानपणच्या माझ्या कितीतरी आठवणी ईदशी निगडीत आहेत. मी वाढले त्या परिसरात पाच मशिदी आहेत आणि आमचं घर मधोमध. आजही ईदला बिलाल मुल्लांचा फोन आला नाही तर मी फोन करते आणि शीरखुर्मा ओरपून येते. जेव्हा जाणं जमत नाही, तेव्हा घरी बनवायचा प्रयत्न करते. पण तशी चव येत नाही म्हणा.
आपण आज सर्वार्थाने इतक्या भयंकर वातावरणात जगतोय की मिळतील त्या प्रत्येक बारक्या सारक्या, छोट्या मोठ्या निमित्तांनी आनंद ओढून घेतला पाहिजे. तर तरू. ते करत नाही म्हणुन या भांडाभांड्या, लढाया अन् डोकेफोड्या. प्रत्यक्षही अन् व्हर्चुअलीही. बरं, तुम्हाला नाही करायचं तर नका करू, इतरांच्या आनंदाला कशाला कडवटपणाची विरजणं लावताय? तेही कडूनिंब न खाताच! उलट तो खाल्लात तर गोड व्हाल जरा. उगीच आपलं कायतरी!
असो. अगदीच रहावलं नाही, म्हणुन बोलत सुटले. आधी वाटलं, नको, कशाला बोलून दाखवायचं, आपलं आपल्याकडं. पण जिथं तिथं नकाराचे गळे काढणारे विचार करत नाहीत, आपण मात्र नको, राहू दे, म्हणत बसतो. मतं प्रत्येकालाच असतात. आणि गप्प बसणारेही विचार करतच असतात. आज त्या 'न'कारकारांनी हे एक व्यक्त होण्याचं निमित्त (की कोलीत?) आयतं पुरवलं. ज्यांना ही मतं पटत नसतील, त्यांनी स्वत:ची मतं कृपया स्वत:पाशीच ठेवावीत. कोणत्याही युक्तीवादात स्वारस्य नाही, तेव्हा क्षमस्व.
पुनश्च सर्वांना मन:पुर्वक शुभेच्छा!
No comments:
Post a Comment