म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Sunday, May 8, 2016

स्मरणरंजन - आपली आवड - ३

"माझ्या रे प्रीती फुला"
ह्या गाण्याला श्रोत्यांची फार पसंती असायची. त्यामुळे आपली आवडमधे हे गाणं वारंवार लागायचं. या यादीत अनेक आहेत अशी. पण हे माझं विशेष आवडीचं आहे. मस्त वेगवान लय आहे, प्रसन्न नूर आहे, चाल आणि शब्दाबद्दल तर बोलायलाच नकोय काही. एकंदर शब्दरचनेची शैली पहाता गीतकार गदिमाच असावेत. आशाचा गोडवा एक्स्ट्रास्पेशल आहे आणि फडकेही अक्षरशः डोलवतात. सर्वात महत्वाचं, अनुपमा गाण्याच्या भावांना साजेसा उत्फुल्ल न्याय देतेय. श्रवणीय रोमँटिक गाणं कसं असावं ह्याचा वस्तूपाठ म्हणलं तर वावगं ठरू नये.

मराठीतली चित्रपट युगुलगीतं म्हणलं की आशा आणि सुधीर फडकेच आठवणं अपरिहार्य. निदान ८० साल ओलांडलं जाईपर्यंत तरी दुसरं कुणी दिसतच नाही तिथे. माझा काही फार अभ्यास वगैरे नाही, पण एक आपलं ठळक निरिक्षण. तेव्हाही खरं म्हणजे दाते, मंगेशकर, सरनाईक मंडळी होती, बिचारे चांगले गायचे तेही लोक [!!], तसे त्यांचेसुद्धा त्यावेळच्या नायकाला शोभणारे आवाज होते की. उलट चांगली तरणी होती ही माणसं तेव्हा. तरी मक्तेदारी बाबूजींकडे का राहिली कोण जाणे. वाडकर उदयाला आल्यावर मग कुठे जरा बाबूजींना उसंत मिळाली असेल. बाकी गाडगीळ, साठे वगैरे तुरळक प्रमाणातच.

समहाऊ फडके आणि प्रियकराची गाणी हे समीकरणच माझ्या गळ्याखाली उतरत नाही. फडकेंचा आवाज म्हणजे धीरगंभीर आणि पोक्त. त्यांच्या व्यक्तिमत्वासारखाच. अशा वडिलधा-या आवाजात कुणी गात असताना त्याच्या प्रेमाबिमात पडायला कसं होईल? रोमँटिक गाण्यातला स्वर जवळीक साधणारा, प्रेमात पडायला लावणारा असायला हवा, अॅप्रोचेबल वाटायला हवा की नको? तसा रफी हा मनुष्यही प्रत्यक्ष दिसताना गंभीरच होता की, पण गाताना गळ्यावर जादूची कांडी फिरायची जणू. सिनेमातलं गाणं ऐकताना नायक आणि गायक असा एक मेळ घातला जातो डोक्यात. निदान माझ्या तरी हं. 'ए गुलबदन' ऐकताना मी एकट्या शम्मीच्या प्रेमात पडत नाही, रफीच्या पण पडते. इलाजच नसतो दुसरा. तीच गत 'अरे यार मेरे तुम भी हो गजब' ऐकताना होते. 'ये रात भिगी भिगी'ला तर तडक जाऊन राजला बाजूला सरकवून मन्नादांच्याच गळ्यात पडावंसं वाटतं. तलतच्या बाबतीत तर पडद्यावर कोण आहे ह्याच्याशी काही देणंघेणं असतं का? अशी शेकडो उदाहरणं देता येतील. आहे हे असं आहे, ठरवलं तर कारणंही देईन. मात्र बाबूजींचं गाणं ऐकताना प्रेमापेक्षा त्यांच्याबद्दलचा आदरच मनात येत रहातो. तो प्रत्येकच चांगलं गाणा-याबद्दल असतो, पण प्रेमगीत ऐकताना काय आदरबिदर उगीचच. पंचाईत होते सगळी. असं माझं होतं बाबा, प्रत्येकाचं होतं का, काय माहिती नाही.

आमच्या बाबांना गाण्याचा अतिशय उत्तम सेन्स आहे. आदर वाटण्याजोगा. त्यांना फडके गायक म्हणुन कधीही आवडले नाहीत, ते फडक्यांना केवळ संगितकार म्हणुनच मानतात. माझं मत तसं नाही, मला ते गायक म्हणुनही पसंत आहेत, पण त्यांची द्वंद्वगीतं मात्र मोजकीच आवडतात. त्यापैकी आजचं हे 'माझ्या रे प्रीती फुला' आणि द एव्हरग्रीन 'जे वेड मजला लागले' तर अहाहा'! दुस-या गाण्याला तर केवळ तो~~ड ना~~ही. ते गाणं ऐकताना वेडच लागतं. आणि तिथे प्रियकरच जाणवतो, बाबूजी नाही. ते गाणं ऐकणं आणि बघणंही, मेजवानी आहे. आणखीही काही आहेत, पण ही दोन मुख्य. त्यांचं 'चंद्र आहे साक्षीला' ऐकताना मला अगदी नकोS नकोS वाटतं आणि 'पडदा लाजंचा लाजंचा गं कशाला डोईवर आला' ऐकताना तर अंगावर पाल पडल्यागत शहारा येतो. कश्शाला नसते लाडिक आविर्भाव आणावेत मला कळत नाही! तेच 'एक लाजरा न् साजरा मुखडा चंद्रावानी फुलला गं' ऐकताना जीव हरखतो. काय आवाज आहे सरनाईकांचा! का नाही त्यांना गाणी दिली गेली देव जाणे. कधी कधी मला टाईम मशीनमधून त्या काळात शिरून ह्या सगळ्या मला आवश्यक वाटणा-या दुरुस्त्या करून यावंसं वाटतं. म्हणजे 'पडदा लाजंचा'मधे फडकेंना खोडून सरनाईकांना जोडून आले असते, एकजात सगळ्या भारत भूषणच्या जागी मला हवे ते शम्मी, देव, सुनील दत्त वगैरे फिट करून आले असते. माझा आत्माराम तर थंड होईलच, पण काय की, लोकंही दुवा देतील मला!

एनीवे, हे गाणं जरुर ऐका, पहा. नायक म्हणुन राजा परांजप्यांचं नाव आहे, पण ह्या गाण्यात कोण आहे समजत नाही. जरा जरा वृंदावन गार्डनचा भास देणारी पंचेचाळिस वर्षापूर्वीची सारसबाग, पेशवे पार्काकडचा मोकळा रस्ता, ये जा करणा-या सायकली, वगैरे बरंच बघणेबल आहे. एंजॉय!

No comments:

Post a Comment