नय्यरसाब!
घरी एका कॅसेटमध्ये “रातोंको चोरी चोरी बोले मोरा कंगना”, “बेकसी हदसे जब गुजर जाये”, “मेरा प्यार वो ही के”, “मैं शायद तुम्हारे लिये अजनबी हूं”, “गरीब जानके हमको न तुम भुला देना”, “पिया पिया पिया मोरा जिया पुकारे”, “सच बता तू मुझपे फिदा क्यु हुआ और कैसे हुआ”, “आंखों से जो उतरी है दिल में”, “मेरी जान तुमपे सदके एहसान इतना कर दो”, “हाथ आया है जबसे तेरा हाथ में”, “आज कोई प्यार से दिल की बातें कह गया”, अशी काही गाणी होती. दोन्हीकडच्या बाजू नेमक्या कोणत्या गाण्याच्या कोणत्या जागी अडकून बंद पडायच्या तेसुद्धा आठवतं आणि गंमत म्हणजे आज ती गाणी ऐकताना त्या जागा आल्या की आता ती अडकतील असं मजेशीर काहीतरी वाटतं आणि जाम हसू येतं. त्यातच हे “चांद जर्द जर्द है, रात सर्द सर्द है” गाणंसुद्धा होतं. टोटली गोड, मधुर कॅटेगरीतलं आणि गुंगी आणणारं. जलते है जिसके लियेचं आनंदी व्हर्जन वाटावं अशी सुरुवात. कडव्याला दिलेली वेगळी ट्रीटमेंट कॅची आहे. त्यात पडद्यावर देव-मधुबाला! काय नव्हेच!
ही गाणी कमी जास्त आवडती ठरवता येत नाहीत. कारण सगळीच एकाच वेगानं थेट हव्याहव्याशा काळात मागं नेतात. तिथे आई-बाबा असतातच, पण पार्श्वभूमीवर ही गाणी वाजतानाच एकीकडे काहीतरी घरगुती कामं असतात, आईचं ओरडणं आणि तिच्यावर उलट चिडणं असतं, केलेला किंवा न केलेला अभ्यास असतो, घरात खेळलेले खेळ असतात, घरात बाबांचे कुणीतरी मित्र किंवा आम्ही सगळे मिळून बाबांच्या कुणातरी मित्राच्या किंवा आईच्या कुणा मैत्रिणीच्या घरी असतो आणि ते सगळे मन लावून गाणी ऐकत माना डोलवत त्यावर काहीतरी बोलत असतात. जोरजोरात बोलत असले तरी ते एकमेकांच्या बाजूनंच बोलत असतात, एकमेकांना दुजोरे काय देतात, त्यांना त्या गाण्यांबद्दलचं सगळं तोंडपाठ काय असतं! लंप्यासारखी गत होते तंतोतंत. जादुई दुनियाच वाटायला लागते सगळी. एक जरी गाणं लागलं तरी हे असं सगळं होतं. ओपींचा वाढदिवस हे आपलं एक निमित्त.
नकळत्या वयात सुरू झालेला हा प्रवास व्हाया शुभ्र काही जीवघेणे अजूनही सुरू आहे आणि मोरावळ्यासारखा मुरत चाललाय. आशा प्रिय आहेच, पण राहून राहून प्रश्न पडतो, ह्या माणसानी तयार केली असती तर लताची गाणी कशी असती?
https://www.youtube.com/watch?v=0gz9tZUH82E
No comments:
Post a Comment