म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Thursday, September 28, 2017

जीवेत शरद: शतम्! :-)

भाकरीभाजी, पाणी आणि तू, जीने को और क्या चाहिये?

Wednesday, September 27, 2017

सोयी कली सोया चमन
पीपल तले सोयी हवा (काय कल्पना आहे :-) )
सब रंग गए एक रंग में
तूने ये क्या जादू किया
आजा री आ निंदिया तू आ

'धीरेसे आजा री अखियन में'च्या तुलनेत हे किंचित कमी ऐकलं जातं, पण गायलंय कणभर त्याहून लडिवाळ. लता अंगाईगीतं खूप मायेनं गाते. 'गुणी बाळ असा' किंवा 'नीज माझ्या नंदलाला', अगदी 'निजल्या तान्ह्यावरी'ही फार जीव लावणारी आहेत.

खरंतर आज 'ए मेरे दिले नादान, तू गम से ना घबराना' होतं रांगेत. देखणं दु:खी गाणं आहे ते. कधीही कानावर पडो, बराच काळ पिच्छा सोडत नाही. नुकत्याच गेलेल्या शकीलावर आफताभ परभनवींचा लेख आलाय, तिच्यावर चित्रित झालेल्या एकसेएक गाण्यांवर खरंतर. आणि हे गाणं तिचंच. पण लताची वेगवेगळी रुपं घ्यावीत ह्या विचारानं ते मागे सरकवलं.

Tuesday, September 26, 2017

तूने तो किनारा पाही लिया
उलझें है मगर तुफान में हम

Avinash, लता महोत्सव करू या आठवडाभर?

गाण्यांची आवड असलेल्या सगळ्यांनी सहभागी व्हा :-)
टॅग नाही करत कुणाला. लताची कोणतीही गाणी, ज्यात तुम्हाला ती विशेष भावली असेल अशी. थोडकं त्यावर लिहीलंत तर दुधात साखर.

'फिर तेरी कहानी'बद्दल काही लिहीणं आवाक्याबाहेरचं आहे, पण ते ऐकताना कायम मी स्तब्ध होते. काळजाचा ठाव घेते ह्यात ती. त्यासाठी नौशादांनाही सलाम. हे गाणं बघणंसुद्धा ट्रीट आहे. लता जरी प्रामुख्यानं नूतनचं नाव घेत असली तरी वहिदानंही तिच्या गाण्यांना पुरेपूर न्याय दिला आहे. काही गाण्यांसाठी मला नीरव शांततेची पार्श्वभूमी लागते, त्यामुळे सहसा कोलाहल शांत झाल्यावर दाट रात्रीच ती ऐकली जातात. ह्याची कारणमिमांसा शब्दात देणं खटाटोप होईल. त्यापेक्षा गाणं ऐकणं सोपं.
भेटी लागी जीवा लागलीसे आस
पाहे रात्रंदिवस वाट तुझी

व्याकूळ होतो जीव.

इतक्या टिपेची लता नुसती ऐकतानासुद्धा दम निघतो. चार दोन जोर बैठका काढाव्या त्यापेक्षा! पण ती मात्र नेहमीच निश्चिंतपणे अढळ असते.

Sunday, September 24, 2017

कोल्हापुरात पाऊस दणकतोय. पावसानं सगळ्यांना स्थानबद्ध केलंय जणू!
आज ललितापंचमी आहे, टेंबलाईच्या यात्रेचं काय झालं असेल एक टेंबलाई जाणे. सगळ्या दुकानांचा, मालाचा पार बोजवारा उडाला असेल.

डबलडेकर, बिंदू चौकातल्या लंब्याचौड्या रांगा, तो माणसांनी फुललेला भलामोठा माळ, देवळाच्या वाटेवरची हारीनं लागलेली दुकानं, मातीची चित्रं, रंगीत गॉगल, चावीची खेळणी, गाड्या, बाहुल्या, पिपाण्या, पिसांच्या टोप्या, भोवरे, चक्रं, फिरते घोडे, मेरी गो राऊंड, म्हातारीचा कापूस, भेंडबत्तासे, चणेदाणेचिरमुरे, दोर ताणलेल्या तंबूतली बाकडी टाकलेली हाटीलं, उकळत्या चहांचे आणि कढलेल्या तेलांचे वास, भकाभक ढणढणणा-या गॅसबत्त्या, पिपाण्यांचा गोंगाट, घरी परततानाचे पायांचे तुकडे आणि पेंगुळलेले डोळे.

पुढच्या वर्षी गाठली पाहिजे यात्रा. असं दरवर्षी म्हणायचं.

Tuesday, September 19, 2017

आमच्या मंगलमावशी!
सड्यातली फुलं वेचायची, झाडाची काढायची नाहीत हा संयम खूप दिवस ठेवला, शेवटी आज नाहीच रहावलं :-)
तुम्ही कधी येताय फुलं वेचायला?

Sunday, September 17, 2017

नैराश्य आणि एकटेपणा ही परिस्थिती सध्या इतकी कॉमन असतानाही ह्या विषयावर इतकं प्रामाणिकपणे कुणीच बोलत नाहीत. विविध मानसोपचारतज्ज्ञांचे वारंवार प्रकाशित होणारे लेखही विषयाला उगीच वरवर स्पर्श करून काहीतरी प्रातिनिधिक घटना घेऊन लिहीले जातात. कंटेंट तांदळातल्या खड्यासारखा शोधावा लागतो. पण कुंडलकरांनी मात्र त्यावर कुठलेही वळसे न घेता पद्धतशीरपणे थेट, क्लिष्ट असूनही सोपं आणि संयतपणे लिहायला घेतलंय. सुबक. लेखावरचं निलेश जाधवांचं रेखाटन दचकवणारं आहे. पुढच्या लेखांच्या प्रतिक्षेत.

http://www.loksatta.com/karant-news/articles-in-marathi-on-loneliness-1552123/

Friday, September 15, 2017

खुशबू, सुगंधीझुंबरं, बहर, फुलोरा

Sunday, September 10, 2017

घेई छंद मकरंद प्रिय हा मिलिंद
मधुसेवनानंद स्वच्छंद हा धुंद!

अपुरा प्रकाश, भरपूर वा-यामुळे हेलकावे खाणा-या फांद्या आणि एके जागी बसून जेवण्याची शिस्त नसलेला नाचरा अभिनेता, ही कसरत सांभाळून छायाचित्रण करताना हललेल्या फोकसिंगबद्दल क्षमस्व. (कॅमेरामनचं म्हणजे नाचता येईना..असो!)
पण भुंगेसाहेबांना लाईव्ह कॅच करून "मधुसेवन करताना तुम्हाला कस वाटतंय" विचारायची संधी हुकवायची नव्हती :-)

Tuesday, September 5, 2017

पंचामृतातलं फ्रुट सॅलड

पूर्वी अनंताची पूजा असायची घरी. दर वर्षी एक ह्या चढत्या क्रमानं चौदा दांपत्यं, चौदा भाज्या, चटण्या-कोशिंबिरी, पक्वान्नं, तळण, पु-या वगैरे असं केवढं तरी काकु सोवळ्यात सगळं एकटी तडाख्यानं करायची. बाकी घरात बाईमाणूस कुणी नाहीच. तिच्या मदतीला आणि मार्गदर्शनाला आजोबा. पुजेला काका बसायचे. आम्हाला सकाळीच तुडुंब खाऊ घालून पलिकडच्या खोलीत पिटाळलेलं असे. सगळी मेहुणं ब-यापैकी वेळेत हजर असायची. त्यापैकी बरेचजणं नेहमीचे ठरलेलेच असत. आम्ही मुलं पहिल्या पंगतीला, मग सगळ्या पंगती होऊन पहाटेपासून ताबडत असलेल्या काकुला जेवायला चार तरी सहज होत. काका आणि आजोबा तिच्या बरोबरीनं वाढू लागायचे. दरवर्षी अनंत चतुर्दशीला ते सगळे पुजेचे, घाट घातलेल्या स्वैपाकाचे, पंचामृत आणि अनंताच्या फुलांचे संमिश्र वास, रांधून वाढून उष्टी काढून कंबरेचा काटा ढिला झालेली तरीही समाधानी काकु आणि अगदीच मुख्य रस्त्यावर घर असल्यामुळं त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीला मिरवणुकींचे ढणाढण आवाज असं एकदमच मनात उचंबळत रहातं.

आता कसलीच पुजा वगैरे तर काही केली जात नाही, पण पंचामृत मात्र प्रचंड प्रिय आहे. त्यामुळं निमित्तं शोधत न बसता केलं जातं. शिवाय पुजेला वगैरे उगीच चमचाभरावर समाधान मानावं लागतं, त्यापेक्षा असं एरवी करून कुंडे भरून हापसता येतं (लेकाचा शब्द). लेक पोटात असताना असेच कुंडेच्या कुंडे पंचामृत उडवल्याचा हा परिणाम. त्यातूनच ह्या चवींच्या व्हॅल्यू अॅडिशन्सही होत जातात. मागे एकदा शुभांगी गोखल्यांनी दाखवलेली पंचामृतातली धिरडी पाहिली होती, तीही वरचेवर केली जातात आणि फस्त होतात. फ्रुट सॅलड पंचामृतातलं करण्यामागे आणखी एक फायदा म्हणजे छान घट्टपणा येतो आणि कस्टर्ड करण्याचा वेळ वाचतो. दह्यामुळं जाता जाता आयुर्वेदाचा विरुद्धान्न टाळण्याचा नियमही पाळला जातो. सुरेख गार करून खाताना मधेमधे थिजलेलं रवाळ तूप जिभेवर येतं तेव्हा मजा येते.

Sunday, September 3, 2017

रजनी करकरे गेल्या. वाईट वाटलं. आनंदी बालपणाचे एकेक सांधे निखळत आहेत. रजनीताई म्हणलं की 'स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा' ही आठवण पहिली येते. मी शाळेत असताना ह्या नावाला कोल्हापूरात त्यांच्याभोवती आदबशीर वलय होतं. माझी आई आणि त्या समकालीन गायिका, दोघीही सुंदर गायच्या. त्यामुळे आईबद्दलच्या आठवणीत त्या हटकून असतातच. एक दोन स्पर्धांना त्या परिक्षक होत्या आणि त्यांच्या हस्ते पारितोषिकंही घेतली. शालेय जीवनात ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. सगळ्या ऑड्सवर मात करून आयुष्य आनंदानं भरभरून कसं जगावं ह्याचा तर त्या वस्तूपाठ म्हणता येतील. त्यांना मन:पुर्वक आदरांजली.

Saturday, September 2, 2017

गांधीजी उदंड आहेत, अगाध आहेत, प्रत्येकासाठी त्या माणसाकडे काही ना काही आहे. ते एक मोठं कुतूहल आहे. माझ्यासारख्या असंख्य सामान्य व्यक्तींना 'मोहनदास करमचंद गांधी' ह्या व्यक्तिमत्वाचे अनंत धागे उलगडून दाखवण्याचं मोठं काम अक्षरनामावर सध्या सुरू आहे. दर महिन्याच्या दोन तारखेला गांधींवर लेख प्रकाशित होत आहेत. त्या मालिकेतला आजचा हा एक अतिशय सुंदर, विचारप्रवर्तक लेख.

आतापर्यंतचे सर्वच लेख उत्तम आहेत, मात्र आजच्या लेखातून मला सद्यस्थितीतल्या रोजच्या जगण्यात वारंवार सामोरं जाव्या लागणा-या मुद्द्यांचा उहापोह आहे. मी विचारवंत नाही, अभ्यासक नाही की राजकारणी नाही, पण तरीही काही विशिष्ट विचारधारा मला असायला हवीच. अशा सामान्य नागरीकासाठी चांगलं, दर्जेदार जगण्यासाठी जी विचारप्रक्रिया आवश्यक आहे, ती गांधीजी देतात. ते इतर कुठे इतक्या क्लॅरिटीनं आणि इतक्या सुलभपणे क्वचितच उपलब्ध होईल असं वाटतं. ह्या सकस लेखमालिकेसाठी विशेष धन्यवाद अक्षरनामा!