म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Tuesday, September 5, 2017

पंचामृतातलं फ्रुट सॅलड

पूर्वी अनंताची पूजा असायची घरी. दर वर्षी एक ह्या चढत्या क्रमानं चौदा दांपत्यं, चौदा भाज्या, चटण्या-कोशिंबिरी, पक्वान्नं, तळण, पु-या वगैरे असं केवढं तरी काकु सोवळ्यात सगळं एकटी तडाख्यानं करायची. बाकी घरात बाईमाणूस कुणी नाहीच. तिच्या मदतीला आणि मार्गदर्शनाला आजोबा. पुजेला काका बसायचे. आम्हाला सकाळीच तुडुंब खाऊ घालून पलिकडच्या खोलीत पिटाळलेलं असे. सगळी मेहुणं ब-यापैकी वेळेत हजर असायची. त्यापैकी बरेचजणं नेहमीचे ठरलेलेच असत. आम्ही मुलं पहिल्या पंगतीला, मग सगळ्या पंगती होऊन पहाटेपासून ताबडत असलेल्या काकुला जेवायला चार तरी सहज होत. काका आणि आजोबा तिच्या बरोबरीनं वाढू लागायचे. दरवर्षी अनंत चतुर्दशीला ते सगळे पुजेचे, घाट घातलेल्या स्वैपाकाचे, पंचामृत आणि अनंताच्या फुलांचे संमिश्र वास, रांधून वाढून उष्टी काढून कंबरेचा काटा ढिला झालेली तरीही समाधानी काकु आणि अगदीच मुख्य रस्त्यावर घर असल्यामुळं त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीला मिरवणुकींचे ढणाढण आवाज असं एकदमच मनात उचंबळत रहातं.

आता कसलीच पुजा वगैरे तर काही केली जात नाही, पण पंचामृत मात्र प्रचंड प्रिय आहे. त्यामुळं निमित्तं शोधत न बसता केलं जातं. शिवाय पुजेला वगैरे उगीच चमचाभरावर समाधान मानावं लागतं, त्यापेक्षा असं एरवी करून कुंडे भरून हापसता येतं (लेकाचा शब्द). लेक पोटात असताना असेच कुंडेच्या कुंडे पंचामृत उडवल्याचा हा परिणाम. त्यातूनच ह्या चवींच्या व्हॅल्यू अॅडिशन्सही होत जातात. मागे एकदा शुभांगी गोखल्यांनी दाखवलेली पंचामृतातली धिरडी पाहिली होती, तीही वरचेवर केली जातात आणि फस्त होतात. फ्रुट सॅलड पंचामृतातलं करण्यामागे आणखी एक फायदा म्हणजे छान घट्टपणा येतो आणि कस्टर्ड करण्याचा वेळ वाचतो. दह्यामुळं जाता जाता आयुर्वेदाचा विरुद्धान्न टाळण्याचा नियमही पाळला जातो. सुरेख गार करून खाताना मधेमधे थिजलेलं रवाळ तूप जिभेवर येतं तेव्हा मजा येते.

No comments:

Post a Comment