म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Thursday, October 12, 2017

काही दिवस पेलता येत नाहीत, अवजड असतात. कालचा दिवस तसा होता.
तसा उजाडला प्रसन्नच होता काल. सकाळी ऑफिसला जायला घाईघाईत खाली उतरले, तर माझ्या गाडीच्या सीटवर कुणीतरी बुचाच्या फुलांची सुबक वेणी गुंफून ठेवली होती. मी उडालेच! फारच प्लेझंट सरप्राइज होतं ते.
आमच्या इमारतीबाहेर बस स्टॉप आहे. मला रोज फुलं वेचताना बघून बससाठी थांबलेल्या खूप जणी आता आत येऊन फुलं वेचतात. त्यांच्यापैकीच कुणीतरी वेणी येणारं बसची वाट बघता बघता फुलं गुंफत बसलं असेल आणि बस आली म्हणून घाईत निघून गेलं असेल. कारण काही सुटी फुलं वेणीशेजारी तशीच होती.
अरे पण ही वेणी का नाही नेली सोबत? की माझ्यासाठीच ठेवली? ती उचलून पळत वर जाऊन सर्वांना विचारून आले, कुणी बघितलं का कुणाला विणताना. खालच्या काकु म्हणाल्या, तुझ्यासाठीच ठेवली असेल कदाचित :-) खरं सांगते, खूप आनंद झाला होता ती वेणी बघून. मग काय, चटकन डोक्यात अडकवली आणि सुटले. कुणी विणली असेल तिला दुवा देत. मी कितीदा ती विणायला शिकायचा प्रयत्न केलाय, पण छे, जमत नाही. कौशल्य आहे ते. अजून तरी साधलं नाहीये.
हा आनंद फार टिकला नाही. एकामागोमाग एक काळोख्या बातम्या येत गेल्या आणि दिवस कडू होऊन गेला. पण असे काही चुकार क्षण यावेत न सांगता. बोजड आयुष्याला खारीचे टेकू देणारे. खूप हलकं वाटतं मग.

No comments:

Post a Comment