म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Friday, July 31, 2020

 नवा शिवाजी पूल, कोल्हापूर



 जिवतीच्या शुक्रवारानिमित्त

खुसखुशीत, विविधरंगी, सुंदर अनुभव आठवले सगळे.

लहानपणी कुमारीका म्हणून जेवायला जाताना परकर पोलकं आणि मोत्यांची माळ हा टिपीकल अवतार असायचा. माझी एक नऊवारीतली, मूर्तीमंत गरती दिसणारी आक्कुताईआत्या आणि काकुच्या दोघी मैत्रिणींकडे आमंत्रणं असायची. मग कधी इकडे, कधी तिकडे जायचं. पानाभोवती रांगोळी, दरवळणा-या उदबत्त्या, गेल्यावर मिळणारा गजरा, पानासमोर ठेवला जाणारा दक्षिणेचा रुपया, नंतर केला जाणारा नमस्कार, सगळ्यांचं आपुलकीनं आपल्या जेवणाकडे असणारं लक्ष, होणारं कौतुक आणि तेवढ्या दिवसापुरता मिळणारा मान भारी वाटायचा🙂आमच्या घरी मात्र काकु दुस-या कुटुंबातल्या मुलींना बोलवायची. बाबांच्या काकुकडे इन्नीकडेही दोनदा गेल्याचं आठवतंय, पण ते घरचं म्हणूनच, मानाच्या कुमारीका वेगळ्या असायच्या. श्रावण शुक्रवारी शाळा उशिरा भरायची आणि गौरीच्या जेवणादिवशी वगैरे सुट्टीच असायची. त्यामुळे तेव्हा ही मजा पुरेपूर घेता यायची.
पण लग्नानंतर सवाष्ण म्हणून किंवा मेहुण म्हणून जाताना फार धावपळ व्हायची. कारण तेव्हा नोकरी होती. मला आमंत्रित करणारी सगळी घरं एकजात प्रेमळ होती. मला गृहीत धरणारी. आठवडाभर आधी फक्त आठवण करून द्यायला फोन यायचा. आलटून पालटून एके वर्षी ह्या तर पुढच्या वर्षी त्या अशी ही चार घरं. जवळची आणि आनंदाची. मेहुण जायचं असेल तर साहजिकच जास्त आनंद व्हायचा. कारण घरच्या मुदपाकखान्याला सुट्टी मिळे. गौरीच्या जेवणादिवशी एक तासाचं कंसेशन घेऊन लंचटाईममध्ये धावतपळत जायचं. बिचा-या खोळंबलेल्या यजमानांनी अगदी तोंड भरून आपलं स्वागत करायचं. भोजनानंतर पुन्हा ऑफिसला जायचं म्हणून आग्रह होऊनही आणि मुख्य अतिथी असूनही सुग्रास बेतावर कटाक्षाने आडवा हात मारता यायचा नाही. शब्दशः हातावर पाणी पडल्या पडल्या तोंडातलं पान चघळत, कपाळावरचं कुंकू आणि केसातला गजरा ठाकठीक करून, खरोखरचा पदर खोचून गाडी दामटत ऑफिस गाठायचं. मग नंतर भयंकर पेंग येत रहायची. सगळं पुरणवरण डोळ्यांवर येत रहायचं. चहाची वेळ होईतोवरचे दोनेक तास महाअवघड😄दर पंधरा मिनिटांनी डोळ्यांवर पाणी मारून यायचं. सकाळपासून नेसलेली जरीची साडी तोवर नको व्हायला आलेली असायची. पण दिवसभर खूप छान वाटत रहायचं. सगळ्यात आवडलं होतं एकदाच मधल्या आत्याकडे तळेगावला सवाष्ण म्हणून गेले होते ते. खास रजा टाकून तिचा विशेष पाहुणचार घेऊन आले होते.
एरवी ह्या दिवशी कधीही रजा घेता यायची नाही, कारण ब-याच सहकारी मैत्रिणींकडे घरी गौरी असायच्या, त्यामुळे आधीच गैरहजेरी जास्त असायची. जेव्हा रविवार असेल तेव्हाच हे सगळं १००% एंजॉय करता यायचं. पण तरीही कधीही नाही म्हणायचा करंटेपणा मनातही यायचा नाही. कारण ते प्रसन्न सुखद वातावरण, आपली कुणीतरी आवर्जून वाट बघणं, जाऊन आयतं पानावर बसता येणं आणि त्या त्या सुगरणींच्या हाताची चव! अहाहा!🌼🙂🌼

 कृष्णा पंचगंगा संगम, नरसोबा वाडी. फोटो पंचगंगेच्या कुरुंदवाड रस्त्याच्या पुलावरून. ही पंचगंगा पुढे डावीकडून येणाऱ्या कृष्णेला भेटते आणि उजवीकडे पुढे वहाते.



Thursday, July 30, 2020

 श्री खंडोबा क्षेत्र- मंगसुळी, महाराष्ट्र कर्नाटक सीमाभाग



 #आपलीआवड #कोनाड्यातसरकलेलीगाणी

गाणे १ 'नाते जुळले मनाशी मनाचे'
आकाशवाणीवरचा आपली आवड कार्यक्रम सर्वांच्या ओळखीचा, ब-याच जणांच्या आवडीचाही. आता आवर्जून आकाशवाणी ऐकली जात नसेल, तरीही पूर्वी केव्हा ना केव्हातरी तो प्रत्येकाच्या आयुष्यातला एक अविभाज्य भाग होताच. नागरी माणूस असो किंवा ग्रामीण. आताही खाजगी वाहिन्यांमुळे का होईना, स्वरूप बदललेलं का असेना, रेडिओ ऐकण्याचं प्रमाण बरंच जास्त आहे. तर ते असो.
आपली आवड कार्यक्रम आजही सुरू आहे, नियमित प्रसारीत होतो. तर मी चारेक वर्षांपूर्वी अशी 'आपली आवड' कार्यक्रमात वाजवली जाणारी पण वरचेवर न ऐकली जाणारी गाणी एकेक नोंदवायला घेतली होती. चार-पाच गाण्यांनंतर कशी कोण जाणे, ती माळ गुंफणं मागे पडलं. आता दर बुधवार-शनिवारी ते पुन्हा सुरू करावं आणि स्मरणरंजन म्हणून नव्हे, तर पुन:श्रवण म्हणून खजिन्यातली ही रत्नं काढून ऐकावीत असं म्हणतेय. शक्य असतं तर प्रत्येक गाण्याआधी ते तबल्याच्या द्रुत गतीतल्या तुकड्यानं सुरू होणारं शीर्षक संगीत वाजवलं असतं🙂
आजचं पहिलं, जयवंत कुलकर्णींचं 'नाते जुळले मनाशी मनाचे' हे वंदना विटणकरांनी लिहिलेलं आणि डी. एस. रुबेन ह्यांनी अतिशय आनंदी, उत्फुल्ल चालीनं स्वरबद्ध केलेलं अप्रतिम गाणं. वंदना विटणकरांची गीतकार म्हणून झालेली विशेष ओळख म्हणजे त्यांची गाणी श्रीकांत ठाकरेंनी संगीतबद्ध केली आहेत आणि महंमद रफींनी गायलीत, अशी. तेव्हा ते विशेष वाटलं होतं. तर जयवंत कुलकर्णींची ओळख म्हणजे प्रसन्न मूडस् असलेली गाणी. दादा कोंडकेंचा दुसरा आवाज. आजच्या गाण्याइतकंच त्यांचं 'अंधाराची खंत तू कशाला करीशी रे, गा प्रकाशगीत' जरा जास्त आवडतं आहे.
हे गाणं आपली आवडमध्ये वरचेवर वाजवलं जायचं, कारण श्रोत्यांची फर्माईशच तेवढी असायची.

Wednesday, July 29, 2020

Saturday, July 25, 2020

 कडबू आणि कटाची आमटी आपले नेहमीचेच यशस्वी कलाकार. नागप्रतिमेची कल्पना मात्र 'मुंबई स्वैपाकघर' आणि Sneha Arvind Chaudhari कडून प्रेरीत. थॅंक्यु स्नेहा!



Friday, July 24, 2020

 मस्त लेख! मा. रतन टाटा आठवले. इंटरेस्टिंग आणि पटणारा विषय आहे. मागे एकदा दिशा डायरेक्ट कंपनीच्या सेकंड होम्स बिल्डरची मुलाखत पाहिली होती, ते म्हणाले होते, माझ्या स्वत:च्या मालकीचं एकही घर नाही. मला लिएॅबिलिटीच नको आहे. आवडेल, सोयीचं पडेल अशा परिसरात मी मोठं घर घेऊन माझ्या आवडीनं सजवून भाडेकरारावर रहातो, संपला की किंवा दुसरी एखादी जागा आवडली तर दुसरीकडे जातो. कधी वाटलं तर मुदत वाढवूनही घेतो. आर्थिक तडजोड फार करावी लागत नाही. अशानं विविध परिसरात, विविध प्रकारच्या घरात, शेजारात, नवीन सजावटी-सोयींसह रहाण्याचा विपुल आनंद मिळतो, जो स्वत:च्या घरात फार घेता येणार नाही. ती कल्पना रुतून बसली डोक्यात, तरीही मराठी मध्यमवर्गीय मानसिकता तसं प्रत्यक्षात करण्याचं साहस करू देईल असं वाटत नाही. मुलानं असं केलं तर फारच आवडेल. अर्थात स्वत:च्या घरातच जन्माला आलेल्या मुलांना भाड्याच्या घरांमध्ये वाढलेल्या पालकांची स्वत:च्या घराबद्दलची इंटेंसिटी असणारही नाही कदाचित

😄 हेच इतर भौतिक गोष्टींबद्दलही लागू होईल. आवडला लेख.
#लोकमत.कॉम - अमेरिकेतली रेटिंग आणि शेअरिंगची नवी संस्कृती

Saturday, July 11, 2020

 #रंग #घरचेरंग #रोजचेरंग 

दुध्या, मक्याचे दाणे, लाल मिरची, ओलं खोबरं, कोथिंबीर.



Tuesday, July 7, 2020

 ९६ सालच्या वाढदिवशी संजयनं हातात कुणा एकाची भ्रमणगाथा ठेवलं आणि गोनीदांच्या प्रेमात पडले ती मोहिनी आजही तशीच आहे. त्याआधी शाळेत एक दोन धड्यांमधून ओळख झाली होती, पण वाढली नव्हती. मग समग्र गोनिदा सलग वाचून काढले, थॅंक्स टू पुणे मराठी ग्रंथालय. भाषा आणि अनुभव वैविध्य असलेली सरळमार्गी, रसाळ शैली.

गंमत म्हणजे तेव्हाच एकीकडे श्री. ना. पेंडसेही लावून धरले होते, दहावी आणि बारावीच्या सुट्टीत तुंबाड वाचलं होतं, तेव्हापासून पेंडश्यांनी डोकं फिरवलं होतं. पण सलग वाचण्याचं जमलं ते पुमग्रमुळं. पुस्तकांचे नंबर्स देऊन पुस्तकं घेण्यासाठी फार गर्दी असायची तिथे. कोणत्याही मोठ्या वाचनालयात असेल तेच चित्र. कर्मचारी ते चिटोरे घेऊन आत कपाटांमधे गुडुप व्हायचे. लोक एकावेळी चार-पाच नंबर्स द्यायचे, हे नसेल तर ते, ते नसेल तर ते, असं करत खूप थांबावं लागायचं. असं असूनही पुस्तकं झपाट्यानं संपवून आठवड्यातून तीनतीनदा जाऊन बदलण्याइतका निवांत वेळ असायचा. आता बघितलं तर वेळ असतो, तरीही कधी कधी एखादं पुस्तक महिना महिना रखडतं.
तर एकाच वेळी आलटून पालटून गोनिदा-पेंडसे हे दोन सर्वस्वी भिन्न प्रकृतीचे लेखक वाचणं हा एक निराळाच एक्सरसाइज झाला होता, ते आज आठवताना मजा वाटते. काहीही कारण नव्हतं असलं तिरपागडं काहीतरी करण्याचं. पण उगीच. तुलना नाहीच, पण दोघेही अत्यंत आवडत असले तरी माझ्याकडून गोनिदांइतके पेंडसे पुन्हा पुन्हा वाचले जात नाहीत. गोनिदांचा प्रभाव तेव्हा माझ्या रोजच्या काहीबाही लिहिण्यावरही पडला होता. जुन्या मायबोलीवरच्या माझ्या खरडीत ते स्पष्टपणे जाणवायचं. कारण वाचनाबरोबरच 'देव'लोकांची अनेक अभिवाचनं ऐकणंही चालायचं. 'मोगरा फुलला'च्या कॅसेटची पारायणं केली होती. मग एकेक करून बरीचशी पुस्तकं घेत जमवत गेले, भेट म्हणून देत राहिले. वाचनकट्ट्याची सुरुवातही बुधानंच झाली होती.
आपल्याकडे कोकणातले आणि कोकणावर प्रेम करणारे अनेक लेखक आहेत, पण गोनिदांचं कोकणावरचं प्रेम ठळक वेगळं आहे. उत्कट आणि तीव्र भाबडं, जागोजाग येणा-या वर्णनातून निथळणारं. कोकण न पाहिलेल्या माणसाला पहावंसं वाटायला लावणारं. ते असो. स्मरणगाथा वाचताना गरगरलं होतं, बुधानं भारावून टाकलं होतं आणि मोगरा फुललानं विस्मय झाला होता. डावं उजवं करता येणं जरा अवघडच, तरीही दुर्गभ्रमणगाथा, बुधा, रानभुली, पडघवली, त्रिपदी वारंवार वाचली जातात. बाकीची थोड्या जास्त दिवसांनी. टाळेबंदीत आम्ही भगिरथाचे पुत्र होतं. एकांकडे कादंबरीमय शिवकाल असल्याचं कळालं, तेव्हा ते हातात मिळालं असतं तर बरं झालं असतं. पण आता आणणारे. एखाद्या लेखकात अडकून पडायला होतं, तसं थोडंसं माझं गोनिदा आणि काही प्रमाणात व्यंकटेश माडगुळकरांबाबतीत आहे. दरवर्षी आठ जुलैला आठवण होते गोनिदांची. मग मुद्दाम काहीतरी उघडून डोळ्यासमोर धरलं जातंच.



Thursday, July 2, 2020

 Happy birthday!

💞🤗🌼
तुमच्यासाठी बदामांच्या राशीच खरंतर, पण ते देतानाही आपण जुर्रत करतोय ह्या विचारानं बरीक धडधडलंच! असा आदरयुक्त धाक असावासं कुणीच नाही भोवती आणि आवश्यकता तर खूप आहे.


Wednesday, July 1, 2020

 वरीचे तांदुळ, तांबड्या भोपळ्याचं भरीत, दाण्याची आमटी, सोलकढी, साय घालून तोतापुरीच्या फोडी आणि बटाट्याचे पापड.