म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Thursday, July 30, 2020

 #आपलीआवड #कोनाड्यातसरकलेलीगाणी

गाणे १ 'नाते जुळले मनाशी मनाचे'
आकाशवाणीवरचा आपली आवड कार्यक्रम सर्वांच्या ओळखीचा, ब-याच जणांच्या आवडीचाही. आता आवर्जून आकाशवाणी ऐकली जात नसेल, तरीही पूर्वी केव्हा ना केव्हातरी तो प्रत्येकाच्या आयुष्यातला एक अविभाज्य भाग होताच. नागरी माणूस असो किंवा ग्रामीण. आताही खाजगी वाहिन्यांमुळे का होईना, स्वरूप बदललेलं का असेना, रेडिओ ऐकण्याचं प्रमाण बरंच जास्त आहे. तर ते असो.
आपली आवड कार्यक्रम आजही सुरू आहे, नियमित प्रसारीत होतो. तर मी चारेक वर्षांपूर्वी अशी 'आपली आवड' कार्यक्रमात वाजवली जाणारी पण वरचेवर न ऐकली जाणारी गाणी एकेक नोंदवायला घेतली होती. चार-पाच गाण्यांनंतर कशी कोण जाणे, ती माळ गुंफणं मागे पडलं. आता दर बुधवार-शनिवारी ते पुन्हा सुरू करावं आणि स्मरणरंजन म्हणून नव्हे, तर पुन:श्रवण म्हणून खजिन्यातली ही रत्नं काढून ऐकावीत असं म्हणतेय. शक्य असतं तर प्रत्येक गाण्याआधी ते तबल्याच्या द्रुत गतीतल्या तुकड्यानं सुरू होणारं शीर्षक संगीत वाजवलं असतं🙂
आजचं पहिलं, जयवंत कुलकर्णींचं 'नाते जुळले मनाशी मनाचे' हे वंदना विटणकरांनी लिहिलेलं आणि डी. एस. रुबेन ह्यांनी अतिशय आनंदी, उत्फुल्ल चालीनं स्वरबद्ध केलेलं अप्रतिम गाणं. वंदना विटणकरांची गीतकार म्हणून झालेली विशेष ओळख म्हणजे त्यांची गाणी श्रीकांत ठाकरेंनी संगीतबद्ध केली आहेत आणि महंमद रफींनी गायलीत, अशी. तेव्हा ते विशेष वाटलं होतं. तर जयवंत कुलकर्णींची ओळख म्हणजे प्रसन्न मूडस् असलेली गाणी. दादा कोंडकेंचा दुसरा आवाज. आजच्या गाण्याइतकंच त्यांचं 'अंधाराची खंत तू कशाला करीशी रे, गा प्रकाशगीत' जरा जास्त आवडतं आहे.
हे गाणं आपली आवडमध्ये वरचेवर वाजवलं जायचं, कारण श्रोत्यांची फर्माईशच तेवढी असायची.

No comments:

Post a Comment