जिवतीच्या शुक्रवारानिमित्त
खुसखुशीत, विविधरंगी, सुंदर अनुभव आठवले सगळे.
लहानपणी कुमारीका म्हणून जेवायला जाताना परकर पोलकं आणि मोत्यांची माळ हा टिपीकल अवतार असायचा. माझी एक नऊवारीतली, मूर्तीमंत गरती दिसणारी आक्कुताईआत्या आणि काकुच्या दोघी मैत्रिणींकडे आमंत्रणं असायची. मग कधी इकडे, कधी तिकडे जायचं. पानाभोवती रांगोळी, दरवळणा-या उदबत्त्या, गेल्यावर मिळणारा गजरा, पानासमोर ठेवला जाणारा दक्षिणेचा रुपया, नंतर केला जाणारा नमस्कार, सगळ्यांचं आपुलकीनं आपल्या जेवणाकडे असणारं लक्ष, होणारं कौतुक आणि तेवढ्या दिवसापुरता मिळणारा मान भारी वाटायचा
आमच्या घरी मात्र काकु दुस-या कुटुंबातल्या मुलींना बोलवायची. बाबांच्या काकुकडे इन्नीकडेही दोनदा गेल्याचं आठवतंय, पण ते घरचं म्हणूनच, मानाच्या कुमारीका वेगळ्या असायच्या. श्रावण शुक्रवारी शाळा उशिरा भरायची आणि गौरीच्या जेवणादिवशी वगैरे सुट्टीच असायची. त्यामुळे तेव्हा ही मजा पुरेपूर घेता यायची.
पण लग्नानंतर सवाष्ण म्हणून किंवा मेहुण म्हणून जाताना फार धावपळ व्हायची. कारण तेव्हा नोकरी होती. मला आमंत्रित करणारी सगळी घरं एकजात प्रेमळ होती. मला गृहीत धरणारी. आठवडाभर आधी फक्त आठवण करून द्यायला फोन यायचा. आलटून पालटून एके वर्षी ह्या तर पुढच्या वर्षी त्या अशी ही चार घरं. जवळची आणि आनंदाची. मेहुण जायचं असेल तर साहजिकच जास्त आनंद व्हायचा. कारण घरच्या मुदपाकखान्याला सुट्टी मिळे. गौरीच्या जेवणादिवशी एक तासाचं कंसेशन घेऊन लंचटाईममध्ये धावतपळत जायचं. बिचा-या खोळंबलेल्या यजमानांनी अगदी तोंड भरून आपलं स्वागत करायचं. भोजनानंतर पुन्हा ऑफिसला जायचं म्हणून आग्रह होऊनही आणि मुख्य अतिथी असूनही सुग्रास बेतावर कटाक्षाने आडवा हात मारता यायचा नाही. शब्दशः हातावर पाणी पडल्या पडल्या तोंडातलं पान चघळत, कपाळावरचं कुंकू आणि केसातला गजरा ठाकठीक करून, खरोखरचा पदर खोचून गाडी दामटत ऑफिस गाठायचं. मग नंतर भयंकर पेंग येत रहायची. सगळं पुरणवरण डोळ्यांवर येत रहायचं. चहाची वेळ होईतोवरचे दोनेक तास महाअवघड
दर पंधरा मिनिटांनी डोळ्यांवर पाणी मारून यायचं. सकाळपासून नेसलेली जरीची साडी तोवर नको व्हायला आलेली असायची. पण दिवसभर खूप छान वाटत रहायचं. सगळ्यात आवडलं होतं एकदाच मधल्या आत्याकडे तळेगावला सवाष्ण म्हणून गेले होते ते. खास रजा टाकून तिचा विशेष पाहुणचार घेऊन आले होते.
एरवी ह्या दिवशी कधीही रजा घेता यायची नाही, कारण ब-याच सहकारी मैत्रिणींकडे घरी गौरी असायच्या, त्यामुळे आधीच गैरहजेरी जास्त असायची. जेव्हा रविवार असेल तेव्हाच हे सगळं १००% एंजॉय करता यायचं. पण तरीही कधीही नाही म्हणायचा करंटेपणा मनातही यायचा नाही. कारण ते प्रसन्न सुखद वातावरण, आपली कुणीतरी आवर्जून वाट बघणं, जाऊन आयतं पानावर बसता येणं आणि त्या त्या सुगरणींच्या हाताची चव! अहाहा!


No comments:
Post a Comment