म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Tuesday, January 19, 2021

 मी फारशी फुडी नाही. त्यात सौम्य, घरगुती आणि नॉन ग्लॅमरस पदार्थ जरा जास्त आवडत असल्यामुळे मिसळ आवर्जून बाहेर जाऊन फार कमी वेळा खाल्ली जाते. पण आज एक चवदार मिसळ खाल्ली म्हणून मुद्दाम सांगायला आले.

'मिसळ MH09 कोल्हापुरी' हे उपाहारगृह कोल्हापुरात ताराबाई रोडवर नवीन सुरू झालं आहे. तिथं आज मी, पुण्याहून धावत्या दौऱ्यावर आलेली माझी मैत्रीण आणि आमचे बाबा नाश्त्यासाठी गेलो होतो. आम्ही मिसळ, पोहे आणि शिरा घेतला तर बाबांनी साबुदाण्याची खिचडी मागवली होती. टेराकोटाच्या सेटमध्ये वाढलेली मिसळ छान दिसत होती आणि तेवढीच चवही चांगली होती. मिसळीबरोबर सेंद्रिय गुळाचा खडा आणि भाजलेले दाणे पण देतात, ते जरा नवं काहीतरी. सगळे पदार्थ आवडले.
नंतर इथली खासियत ठरेल असा गुळाचा चहा घेतला. गुळामुळे चहाला एक विशिष्ट खमंग चव येते, ती नेहमीच्या चहापेक्षा खास लागते. इथे सेंद्रिय गुळाचे तीन प्रकारचे चहा मिळतात. आज आम्ही एकच प्रकार ट्राय केला.
इथे 'बॉयकॉट अजिनोमोटो' ह्या अभियानाबद्दल वाचलं. अजिनोमोटोच्या सेवनामुळे तब्येतीवर होणा-या घातक परिणामांची दखल घेऊन हे अभियान सुनीलनं स्वतः सुरू केलं आहे, त्याला आपण भरपूर पाठिंबा दिला पाहिजे. इथल्या पदार्थात कोणतेही कृत्रिम रंग वापरले जात नाहीत, सैंधव मीठ, घाण्यावरचं तेल वापरतात, अशा ब-याच बाबी लक्षात घेण्यासारख्या वाटल्या.
तर फुडी लोकांनी जाऊन चव घेऊन पहा आणि मला नक्की सांगा. म्हणजे माझा अभिप्राय बरोबर आहे की नाही ते मला कळेल.




No comments:

Post a Comment