प्रसन्न बातमी. यंदाचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ लेखक मधू मंगेश कर्णिकांना जाहीर झाला आहे. फार आवडते लेखक.
साहित्य आणि कोमसाप दोन्हीसाठी मोठं योगदान असलेला माणूस आहे.
दहावीच्या सुट्टीत पोक्त करून टाकणारी दोन पुस्तकं अचानकपणे वाचली होती. पहिला पेंडशांचा तुंबाडचे दोन्ही खंड एकत्र असलेला ठोकळा आणि नंतर कर्णिकांचं माहिमची खाडी. त्या पुस्तकांनी माझ्यातला इनोसन्स मोठ्या प्रमाणात कमी केला. झटका बसला होता. फारच छोटं आणि कोप-यातलं जग होतं तोवर, ते एकदम बरंच विस्फारलं. तेव्हा तुंबाडचे खोत आवडीनं मानगुटीवर बसलं होतं, पण खाडी आवडलं नव्हतं. झेपलं नव्हतं म्हणणं जास्त बरोबर होईल.
पण कर्णिक आवडले. नंतर पाठोपाठ वाचत गेले म्हणूनही असेल. गंमत म्हणजे नंतर कोकणाच्या पार्श्वभूमीसकटचे लेखक आणि त्यांच्या शैली असा एक रंजक मागोवा घेत वाचत गेले. पेंडसे, दांडेकर, दळवी, कर्णिक, हे चटकन आठवणारे ठळक. एकजात सगळे वेगळे आणि खूप आवडते.
बातमी वाचल्यावर हे मजेदार वाचनही ओघानं आठवलं.
No comments:
Post a Comment