World Radio Day today and I am an avid radio listener. Friend of all for pretty 110 years.
रेडिओबद्दल मी इतक्या वरवर काही बोलू शकणार नाही आणि बोलायला बसले तर थोडक्यात आटोपणार नाही. आकाशवाणी ही माझ्यासाठी मर्मबंधातल्या काही मोजक्या ठेवींपैकी एक आहे. समजायला लागल्यापासून आजतागायत रेडिओ सोबत आहे आणि राहिलही.
कुणाचं काय तर कुणाचं काय असं वाटू शकेल, पण पुण्यातून कोल्हापुरात स्थलांतरित होताना माझ्यासाठी एक महत्त्वाचा कन्सर्न आकाशवाणीचा होता. कारण आजपर्यंत रोजच्या जीवनातला हा अविभाज्य भाग आहे. एआयआर अॅपचा पर्याय जरी उपलब्ध असला तरी चटकन बटण ऑन ऑफ करण्याची सोय केव्हाही जास्त वापरली जाते. कोल्हापूर आकाशवाणीनं अर्थात निराश केलं नाही. कारण मुळात आकाशवाणी कंटेंट आणि दर्जाचीच फार काळजी घेते. हे विशेष करून प्रत्येक आकाशवाणी केंद्र, विविध भारती आणि अस्मितासारख्या काही एफ एम वाहिन्यांबद्दल मी जास्त म्हणेन. खाजगी एफ एम वाहिन्यांवरही काही मोजकी उत्तम प्रसारणे होतात, मात्र सर्व्हायव्हलसाठी त्यांना जाहिरातींचा जो भडीमार करावा लागतो त्यानं श्रोते हैराण होतात. कार्यक्रम नको पण जाहिरात आवर अशी परिस्थिती होते.
आकाशवाणीवर प्रत्येक कार्यक्रमात आवर्जून वैविध्य आणि सर्व स्तरातल्या, वयोगटातल्या श्रोत्यांचा विचार असतो. जाहिराती असल्या तरी चालू कार्यक्रमात कोणताही व्यत्यय न आणता लावल्या जातात. स्वतंत्र प्रायोजित कार्यक्रम लावल्यामुळे तेवढे टाळता येण्याचं श्रोत्यांनाही स्वातंत्र्य मिळतं. गोंगाट नसतो. कोणतंही निवेदन संयमित असतं. आकाशवाणी ऐकताना कधी डोकं उठलंय असं होत नाही. भाषा उत्तम असते. उत्कृष्ट निर्मितीमुल्यं असलेले अनेक कार्यक्रम इतर केंद्रांबरोबर सहप्रसारीत केले जातात. जीवनावश्यक सर्व विषयांचे, संगिताचे, साहित्याचे, माहिती-तंत्रज्ञानाचे सर्व प्रकार तज्ज्ञांपासून सामान्य नागरिकांपर्यंत सर्वांकडून ऐकायला मिळतात. कोणतीही आपत्ती असो, आकाशवाणी तत्परतेने सेवेला हजर असते.
गेली तीन ते चार वर्षे मी वर्तमानपत्र बातम्यांसाठी वाचत नाही. फक्त साप्ताहिक पुरवण्या वाचते. किंवा टिव्हीच्या बातम्याही बघत नाही. कोणतीही बातमी आकाशवाणीवर सांगितली तर ती आणि जेवढ्या प्रमाणात सांगितली जाते तितकीच विश्वासार्हता माझ्यासाठी पुरेशी होते. आकाशवाणीवर उल्लेख न झाल्यास ती बातमी आवश्यक नाही. विषय संपला. बाकीही सोशल मिडियावरच्या कोणत्याही बातम्यांकडे लक्ष देत नाही. हे अर्थातच माझ्यापुरतं मी ठरवलेलं आहे. ह्याबाबतीत प्रत्येकाचे निकष वेगवेगळे असतील. पण ह्या नेमामुळे अगदी आपत्तीकाळातही योग्य ती माहिती वेळच्या वेळी मिळत राहिली आणि भयंकर काळातही मन:स्वास्थ्य टिकून राहिलं. हे सगळं श्रेय आकाशवाणी आणि तिथल्या सर्व कर्मचा-यांना आहे. रोजच्या ऐकण्यामुळे सगळे निवेदक कुटुंबातल्या सदस्यांइतके जवळचे वाटतात. आजसुद्धा ठराविक कार्यक्रमांच्या वेळांनुसार रोजचा दिनक्रम पार पडतो. समाजात अमुलाग्र बदल होत आहेत, जे अटळ आहेत. पण आकाशवाणीचा दर्जा बदललेला नाही, हा माझ्यासारख्या आकाशवाणीवर मनापासून प्रेम असणाऱ्या श्रोत्यांसाठी मोठा दिलासा आहे. अनेक समयोचित, खास किंवा माझे आवडते कार्यक्रम, विशिष्ट निवेदक आणि त्यांची शैली, त्यांच्यासाठी अनेकदा मी अॅडजस्ट करत असलेल्या वेळा असं आणखी लिहायचं होतं. पण विस्तारभयास्तव बळंबळं आवरतं घेतेय.
No comments:
Post a Comment