म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Saturday, February 27, 2021

 कर्नाटकात असणारे आमचे समस्त नातेवाईक, ओळखीचे लोक, माझ्याकडे मदतीला येणारी कानडी ताई, हे सगळे व्यवस्थित मराठी बोलतात. भले आपल्याइतकं ओघवतं नसेल, पण तेवढं अपेक्षित नाहीच. कर्नाटक सहलीत अगदी होस्पेटपर्यंत तोडकंमोडकं का असेना, मराठी बोलणारे लोक भेटत गेले. ते तसे पार पुढेपर्यंत असतील खात्रीनं. पण ऐन सीमाभागात असूनही मला किंवा माझ्या भोवतालच्या बहुतेक मराठी भाषकांना दोन चार चुकार कानडी शब्द वा वाक्यं वगळता कानडीचा गंध नाही. महाराष्ट्रातल्या इतर सीमाभागातलं चित्र मला माहिती नाही. ह्याबद्दल प्रतिक्रिया अपेक्षित आहेत. ह्या भागातलं हे चित्र पूर्वीच्या मुंबई इलाख्यामुळे असेल असं वाटतंय.

पुण्यातून कोल्हापुरात आल्यावर पहिल्या आठवड्यातच नील इथलं खास मराठी बोलायला लागला. शुद्ध मराठीबद्दल आवर्जून दक्ष असणा-या अनेक हितचिंतकांनी त्यावरून मला अनेकदा सावध केलं. खरोखरच कळकळीनं. खोटं कशाला बोलू, नीलच्या बोलण्यामुळं पहिल्यांदा माझ्याही कानाला खरचटलं होतंच! पण मला त्याचं ते खास बोलणं पटलं आणि म्हणून नंतर आवडलं. त्याची भाषा आता माझ्यापेक्षा समृद्ध आहे आणि तशी कायम होत रहाणार आहे. मी त्यामानाने कुढलेलं, संकोचलेलं आणि ठराविक साच्यातलं मराठी बोलते. त्याच्या माझ्या बोलण्यातल्या फरकाचं जरा वाईटही वाटलंच. मी इथेच वाढले असूनही कोल्हापुरी बोलत नसल्याचं एवढ्या वर्षात कधीही वाईट असं वाटलं नव्हतं. पण नीलमुळे लक्षात आलं की तुमची परिसर भाषा तुमच्या बोलण्यात प्रतिबिंबित व्हायला पाहिजे. तुम्ही तोंड उघडल्याबरोबर तुमचा प्रदेश कळला पाहिजे, त्यात तर खरी मजा. सगळे एकसारखंच बोलायला लागले तर संपलंच मग. परिसर भाषा बोलणं म्हणजे भवतालात मिसळून जाणं आहे, स्विकारणं, आपलंसं करणं, प्रवाही होणं, वाहत रहाणं, असं बरंच काही आहे. शुद्ध, प्रमाण, अशुद्ध, चूक, बरोबर, अलाहिदा.
आज खूप खवचट पोस्टससुद्धा दिसतायत. त्या वाचताना गंमत वाटतेय. त्यावरून मनातलं इथं भिंतीवर डकवलं इतकंच. हे केवळ एक निरीक्षण नोंदवलं आहे. #मराठीभाषादिवस

No comments:

Post a Comment