प्रिय श्रोते हो, सप्रेम नमस्कार! माझं नाव सई कोडोलीकर. तुमच्याप्रमाणेच मीसुद्धा आकाशवाणीची एक निस्सिम श्रोती आणि चाहती आहे. आज माझ्या आवडीची हिंदी चित्रपटातली काही गाणी मी आपल्याला ऐकवणार आहे. ही संधी मला दिल्याबद्दल आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची मी मन:पुर्वक आभारी आहे. खरंतर हिंदी चित्रपट संगीत म्हणजे अरबी समुद्र. ते का हो, प्रशांत महासागर म्हणायला हवं. त्यातल्या सोन्यामोत्यांच्या अनंत राशी उपसून ही काही निवडक रत्नं वेचून आणली आहेत. आशा आहे, तुम्हाला आवडतील.
सध्या आपण सगळेच फार मोठ्या संकटातून जात आहोत. हा अवघड काळातून सुखरूप पार होण्यासाठी बळ आणि सुबुद्धी मिळो, अशी प्रार्थना करू या. आपला साहिर म्हणतो आहे,
इन काली सदियों के सर से जब रात का आंचल ढलकेगा,
जब दुख के बादल पिघलेंगे, जब सुख का सागर छलकेगा
जब अम्बर झूम के नाचेगा, जब धरती नज़्में गायेगी
वो सुबह कभी तो आयेगी ॥
गीतकार शैलेंद्रनं घातलेल्या साकड्यात आपलाही सूर मिसळू या,
ओ सारे जग के रखवाले, निर्बल को बल देनेवाले,
सब को मिले सुख का वरदान..
केवढं बरं वाटलं ना ऐकून! संगितकार जयदेवांनी आपल्या सुरांमधूनही अगदी आर्त हाक घातली आहे. आपल्या लतादिदींच्या आवाजात एक उपजतच जिताजागता दिलासा आहे. त्यांचं गाणं किंवा गायिका म्हणून त्यांची महत्ता ह्याबद्दल बोलण्याची माझी कुवत आणि पात्रता दोन्ही नाही. पण आपल्या सर्वांच्या आयुष्याचा त्या अविभाज्य घटक आहेत हे मात्र नक्की. सुख, दु:ख, प्रेम, करुणा, आशा, निराशा, कोणतीही भावना असो, दिदींचा आवाज आपल्याला सोबत करतो. आनंदाची तीव्रता वाढवतो तर दु:खाची धार बोथट करतो. आता हेच बघा ना, निसर्गाच्या रुपकाला शब्दात गुंफून मनातल्या आशा पल्लवित करणा-या साहिरच्या ह्या काव्याला लतादिदींनी आपल्या आवाजाच्या परिसानं कसं अगदी एव्हरग्रीन करून ठेवलं आहे. सुरावटही सचिनदेव बर्मनांनी अशी काही बांधली आहे, की 'झुला धनक का धीरे धीरे हम झुले, अंबर तो क्या है तारों के भी लब तू लें' ऐकताना आपणही जमिनीवरून आभाळात झेप घेणाऱ्या झोपाळ्यावर हिंदोळतो आहोत अशी भावना होते!
मला प्रसन्न मूडची गाणी ऐकायला, बघायला जरा जास्त आवडतात. गाणं ऐकलं की कसं तरतरीत, ताजंतवानं वाटलं पाहिजे. मनाला उत्साह आला पाहिजे, मरगळ झटकली गेली पाहिजे. अभिनेत्री नूतनला पडद्यावर बघताना अगदी अशी तरतरी येते. देखणं आणि बुद्धिमान व्यक्तिमत्त्व, समर्थ अभिनय आणि मोकळं, स्वच्छ हसू आपलं मन मोहून टाकतं. तिनं साकारलेली दु:खी गाणीसुद्धा उगीच खांदे पाडून येत नाहीत, मग आनंदी गाण्यांबद्दल तर बोलायलाच नको. आता हेच उदाहरण घ्या ना, आधी नायकाची चांगली फिरकी घेऊन मग प्रेम व्यक्त करणारी ही 'तेरे घर के सामने' मधली नूतन आपल्यालाही तहेदिलसे खुश करते!
रात्रीची नीरव शांतता. दिवसभराच्या धकाधकीनं दमून निजेला आलेलं एक चिमुकलं टुमदार गाव. वाद्याच्या साथीनं हळूवार गुणगुणणारी उमद्या वयातली कुणी देखणी तरुणी. गावाला लपेटून घेणारा डेरेदार झाडांनी झाकलेला वळणदार रस्ता, लंबीसी एक डगर. सगळ्या आसमंतावर शुभ्र पांघरूण घातलेलं लख्ख चांदणं. आणि त्या टिपूर चांदण्यांनी सावल्यांची नक्षी रेखलेल्या त्या रस्त्यावरून आपल्या मनालाच एखादी गोष्ट सांगायची आर्जवं करत मोकळ्या गळ्यानं गात निघालेला एक उमदा तरूण. वर्णन ओळखलंत ना? होय, हा किशोरकुमार आणि चित्रपट झुमरू. बाह्यरंग खोडकर असल्याचा देखावा करणारा हा मनस्वी कलाकार अंतरंगात केवढं गांभिर्य बाळगून होता, ते त्याच्या अशा संगितरचनांमधून, त्यानं निर्माण केलेल्या काही चित्रपटांमधून आपल्याला स्पष्टपणे जाणवतं. मजरुह सुलतानपुरींच्या सहजसुंदर शब्दांना किशोरनं तितकीच सहजसुंदर, मनात रुंजी घालत रहाणारी चाल बांधली आहे. फार आवडतं. पुन्हा पुन्हा ऐकायला आणि बघायलासुद्धा.
ऐसे में चल रहा हूं पेडों की छांव में
जैसे कोई सितारा बादल के गांव में
परवाच एका मैत्रिणीबरोबर कवी आणि गीतकार ह्या दोघांमध्ये फरक काय अशी चर्चा झाली. निष्कर्ष निघाला तो असा, की कवी हा स्वांत सुखाय लिहितो, जे तुलनेनं सोपं असावं. तर गीतकाराला श्रोत्यांना आवडेल, झेपेलसं लिहावं लागतं, जे फार अवघड आहे. गीताचा विषयसुद्धा स्वतः निवडण्याची मुभा नसते, दिग्दर्शक समोर ठेवेल ती कल्पना शब्दात मांडायची. अनेकदा तर संगितकारानं त्या कल्पनेसाठी धूनही आधीच बांधलेली असते. अशावेळेस केवढी तारेवरची कसरत करावी लागत असेल गीतकार मंडळींना! गीतकार इंदिवर ह्यांनी लिहिलेलं आणि संगितकार रोशन ह्यांनी चपखल सुरांनी सजवलेलं अनोखी रातमधलं हे प्रभावी गाणं ऐकताना नेहमी माझ्या मनात हेच विचार येत असतात. काही म्हणा, आयुष्याचं तत्त्वज्ञान सोप्या भाषेत आणि सुरेल चालीत सर्वसामान्यांपुढे मांडणं म्हणजे खायचं काम नाही गड्या!
हिंदी चित्रपट संगीत आणि हसरा, ताजातवाना मूड असं समीकरण असेल तर शम्मी कपूर आणि महंमद रफी ह्या दोघांना वगळून पुढे जाताच येणार नाही आपल्याला. पण रात्रीची वेळ आहे म्हटल्यावर दंगा तर टाळायला हवा, नाही का? हरकत नाही, आपल्यासाठी त्या दोघांनी भरपूर प्रकारची मेवा मिठाई ठेवली आहे, त्यातली एखादी लज्जतदार चीज चाखू या का? शंकर जयकिशन, हसरत जयपुरी, महंमद रफी आणि शम्मी कपूर ह्या सदाबहार चमूनं तयार करून वाढलेलं हे लाजवाब गाणं ऐकताना आपल्या काही ठेवणीतल्या आठवणी मनाच्या पृष्ठभागावर आल्या नाहीत तरच नवल. देखणा नायक आणि त्याचा भारदस्त आवाज आपल्यावर जादू करतो.
माझ्या वडिलांना आवडणारं एक गाणं आहे. रमैय्या वस्तावैय्या. आपले कान तयार करण्याचं पहिलं काम आई-वडील करत असतात. ते जे काही ऐकतात, त्याचा साहजिकच खूप मोठा प्रभाव आपल्यावर असतो. आपल्या पुढच्या आयुष्यात हा ठेवा पदोपदी आपल्याला सोबत करतो. मग अर्थातच नकळत आपली आवडही त्या ऐकण्याशी सुसंगत होत पुढे जात रहाते. हे असे आई-वडिलांचे आपल्यावर असलेले पडसाद आणि त्यांचे मागोवे घेणं फार रंजक असतं. रफी-मुकेशचे आवाज, शैलैंद्रचे काळजाला हमखास हात घालणारे शब्द, शंकर जयकिशनचं सुमधुर संगीत आणि खूप अप्रतिम कोरस.
रमैय्या वस्तावैय्या
मैनें दिल तुझको दिया
केवळ महाराष्ट्राचंच नव्हे, तर राष्ट्राचंही भूषण असणा-या आशाताई हे एक विलक्षण रसायन आहे. त्यांचं गाणं, त्यांचा स्वयंपाक, वाचन, माणसं जोडण्याची कला सगळं कसं रसरसून असतं. आयुष्यात अनेक संकटं आली, खूप दुःख सहन करावं लागलं, पण आपलं अवखळ मन त्यांनी कधी कोमेजू दिलं नाही. 'अब के बरस भेजो भय्या को बाबूल' असो, की 'कतरा कतरा मिलती है' असो किंवा 'बेचारा दिल क्या करें' असो. मूळच्या शंभर नंबरी गाण्यावर एक प्रसन्न भावनेचा तजेला कायम लखलखत असतो. उस्ताद विलायत खॉंच्या स्वरांनी सजलेले हे कवयित्री लेखिका अमृता प्रीतम ह्यांचे देखणे शब्द ऐका. आशाताईंच्या आवाजानं जणू चारचांद लावलेलं हे कादंबरी चित्रपटातलं गाणं. ऐकायला मंजुळ पण गायला अतिशय अवघड. अशाच गाण्यांना बहुतेक अनवट असंही म्हणतात, हो ना?
अंबर की एक पाक सुराही
बादल का एक जाम उठाकर
घुंट चांदनी पी है हमनें
बात कुफ्र की की है हमनें