म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Sunday, April 4, 2021

 मार्चमध्ये आयुष्यात पहिल्यांदाच प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले. तोवर फक्त सरकारी जाहिराती आणि सरकारी वाहिन्यांवरच्या बातम्यांमधून ऐकूनच माहिती होतं हे प्रकरण. 'मध्यम मध्यमवर्गीय' ह्या त्रिशंकू वर्गात मोडणा-या माझी ही कथा काही जगावेगळी नसावी. पण तिथे गेल्यावर ही काय चीज आहे ते बघून थक्क झाले आणि कौतुक वाटलं.

बाबांची आणि माझी असे दोन्ही लसग्रहण कार्यक्रम झाल्यावर हे लिहितेय. दोन्ही अनुभव उत्तम. दोन्ही वेळा तास सव्वा तासात घरी परतलो. बाबांसाठी आधी नंबर लावून आले होते तर माझ्यावेळी सकाळी पावणेनवालाच जाऊन हजर झाले. आरोग्य सेतू वर नोंदणी केल्यानंतर योग्य ती सगळी माहिती मिळाली आणि लस घेतल्यानंतर तशी पोचही आली. मी केंद्रातच स्वॅब देऊन ऐच्छिक टेस्ट करून घेतली, तिथे सांगितले गेल्याप्रमाणे दोन दिवसांनी मोबाईलवर रिपोर्ट आला. कसलीही यातायात करावी लागली नाही. इंजेक्शन्स नंतर प्रत्येकाला खबरदारी म्हणून प्रत्येकी दोन पॅरासिटॅमॉल्स आणि आवश्यक सूचना मिळाल्या. लसीकरणानंतर कोणकोणते त्रास होण्याची शक्यता आणि त्यावरच्या उपाययोजनांचे फलक केंद्रात ठळक लावले आहेत, शिवाय तोंडी सांगितलं जात आहे. प्रत्येक नागरीक चार जणांच्या साखळीतून योग्य त्या नोंदी होऊन पुढे जात रहातो. प्रत्येकाचे काम ठरवून दिलेल्या पद्धतीने नेटके होत आहे. दोन्ही वेळा कर्मचारी संयम पाळताना दिसले.
ह्याच रणधुमाळीत बाकीची नेहमीची कामेसुद्धा केली जात आहेत. उदा. जवळच्या ठिकाणी दुसरी तितकीच सक्षम व्यवस्था करून बालकांसाठी आरोग्य योजना आणि नियमित लसीकरण, गर्भधारणा आणि प्रसुतीसंदर्भात वैद्यकीय मार्गदर्शन, जनतेसाठी इतर आजारपणांबद्दल माहिती, औषधोपचार व योजनांचे प्रसारण वगैरे. बाबांचे लसीकरण झाले तो दिवस जागतिक क्षयरोग दिन होता, त्यादिवशी आरोग्य सेविकेने आम्हां सगळ्यांना संपूर्ण माहिती देऊन मिळणाऱ्या सरकारी मदतीबद्दल विस्तारानं सांगितलं. ते सगळे फलक त्यादिवशी ठळक अक्षरात लावले होते.
माझ्या ओळखीतल्या आणि नात्यातल्या जवळपास सगळ्यांनी - कोल्हापूर आणि पुणे - प्राथमिक आरोग्य केंद्रात लस घेतली आहे. सर्वांचे अनुभव समाधानकारक आहेत. भरपूर गर्दी आणि अशक्य कोटीतला ताण असूनही तिथे अतिशय नियोजनबद्ध कार्यक्रम सुरू आहे. सरकारी यंत्रणेचं कौतुक करावं तितकं कमी आहे. पण लोक तिथेही कर्मचा-यांशी भांडण-तंटे करत असतात. रांग आणि नियम पाळायचे नाहीत, लस घेतल्यानंतर अर्धा तास थांबायचं नाही, मास्कचा तर आनंदीआनंद. लस घेतोय म्हणजे कुणावर उपकार करतोय असाही एक भाव सर्रास दिसला. लस घेणार नसलेल्यांची पण तिथे येऊन अंदाज घेणारीही एक श्रेणी दिसली. लस घेऊन कोरोना होणार नाही ह्याची खात्री काय असं विचारणारे हे लोक धोकादायक आहेत. आरोग्य सेतू वगैरे वट्टात माहिती नसलेले, अति माहिती असलेले, फोनवरून नंबर लावून घ्या म्हणणारे, ऐंशीनव्वदीच्या पुढचे निम्नस्तरातले, स्वत:ला सर्वज्ञ समजणारे मध्यमवर्गीय अतिशहाणे अशा सगळ्या प्रकारच्या शेकडो लोकांना प्राथमिक आरोग्य केंद्रातले कर्मचारी रोज हाताळतायत. कोणताही गोंधळ न माजवता, प्रपोगंडा न करता, जास्तीत जास्त बिनचूक काम करत रहाणे ही चेष्टा नाही. हे काम अखंड चालू आहे आणि कोरोना संपला तरी चालू राहिल.
ही यंत्रणा आधीपासून अस्तित्वात होतीच, आता फ्रंटवर आली. सरकार कोणतेही असो, त्यांच्या कार्यक्रमात, दिनक्रमात बदल नाही. खाजगी क्षेत्रात आपल्याला नेहमीपेक्षा थोडं जास्त काम केलं की स्पॉट इंसेंटीव्हज्, सर्व्हिस/ परफॉर्मन्स अवॉर्ड्स् मिळत असतात. इथे तशा काय सुविधा असतात, कल्पना नाही.
कोणत्याही प्रकारची तयारी करण्यासाठी फारशी संधी न मिळताही हे काम आरोग्य विभाग आज पूर्ण क्षमतेने आणि समर्थपणे पेलतो आहे, ह्याची दखल घेऊ या. संपूर्ण आरोग्य खाते आणि विभागाच्या सर्व कर्मचा-यांचे मनापासून अभिनंदन आणि खूप आभार.

No comments:

Post a Comment