म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Tuesday, April 27, 2021

 लसीकरणाचा दुसरा डोस घेण्यासाठी सुरू असलेली तारांबळ बघताना कोणत्याही समारंभात लागणा-या बुफे/बफेच्या रांगा आठवतायत.

पहिलं वाढप घेऊन ते संपवून दुसऱ्या वाढपासाठी जावं तर पहिल्यांदा वाढून घेण्यासाठी रांगेत उभे असलेले समारंभार्थी सहज घुसू देत नाहीत. एकदा घेऊन झालंय ना, मग जरा थांबा की, अशी साधारणपणे नजर असते. बरं, रांग तर संपणार नसते पण रांगेचा आणि आपला काही संबंधही नसतो. चार लोकांच्यात हातात खरकटं, अर्धवट संपवलेल्या अन्नाचं ताट घेऊन ताटकळत किती वेळ थांबावं ते समजत नाही. रांगेत उभ्या असलेल्यांच्या मधे घुसणं पटत नाही आणि खरंतर बरंही दिसत नाही. एकाच वेळी वाढून घेणं सोयीचं असतंच असं नाही. आधी सगळं चवीपुरतं थोडंसं वाढून घेऊन आवडलेला पदार्थ पुन्हा वाढून घेण्याची मनसोक्त चैन खूप गर्दी असेल तर करता येत नाही, पण तेवढंच संपवून उठावं म्हटलं तर पोट धड भरलेलं नसतं. (हाच तो क्षण असतो, जेव्हा आयतं सुग्रास जेवायला मिळण्याच्या सुखाचा केलेला नसता लोभ आणि घरातला थंड मुदपाकखाना, दोन्ही हमखास आठवतात) एकंदरीत पंचाईत मुलखाची होते.
कोणत्याही समारंभात जेवायला येणा-यांची गर्दी एकाच वेळी होऊ नये म्हणून अनेक काउंटर्स तयार ठेवलेले असतात, पण दुस-यांदा वाढून घेणा-यांसाठी कधीही कुठेही वेगळी सोय केलेली नसते. तद्वतच लसीचा दुसरा डोस घेणा-यांसाठी स्वतंत्र सोय आणि तजवीज उपलब्ध नाही. एकाच वेळी वाढून घेण्याच्या सोयीचा तर इथे प्रश्नच उद्भवत नाही. तस्मात् पहिल्यांदा वाढून घेणा-यांच्या आणि वयोगट क्रमशः खाली उतरलेला असल्याने नव्या मनुंतील नव्या दमाच्या शूर शिपायांच्या रांगेत घुसण्याची मानसिक तयारी ह्या खेपेला अधिकची करावी लागणार आहे.
तर गड्यांनो, सावध ऐका पुढल्या हाका.

No comments:

Post a Comment