आभासी जग आणि चांगुलपणा
सातवीत शिकणाऱ्या माझ्या मुलाच्या वर्गमित्राचे आई आणि बाबा दोघेही काही महिन्यांपूर्वी तीन आठवड्यांच्या अंतराने कोरोनाने हिरावून घेतले. घरी त्याचा धाकटा भाऊ आणि म्हातारे आजी आजोबा असतात. झोपडपट्टीत रहाणा-या आणि आजोबा व्यसनाधीन असलेल्या ह्या कुटुंबाचा चरितार्थ आता आजी घरकामं करून चालवते आहे. ह्या दोघा भावांच्या शिक्षणासाठी यथाशक्ती मदतीचं आवाहन मी अगदी मोजक्या मित्रमंडळींना केलं होतं. आणि तशी मदत कोणत्याही विलंबाशिवाय चटकन जमा होत आहे. उमेद वाढवणारं, आशा टिकवून ठेवणारं मला माहिती असणारं काही तरी सगळ्यांपर्यंत पोचवावं असं वाटलं.
ही बातमी कळल्यापासून अस्वस्थ होते. मुख्याध्यापक आणि शिक्षकवर्गाशी बोलून काय करता येईल ह्याबद्दल एकत्रित विचार केला. समंजस मित्रमंडळींची मतं घेतली. आर्थिक मदत उभी करणं आवश्यक होतं. रोख रक्कम कुटुंबाकडे सुपुर्द करणं अव्यवहार्य होतं. म्हणून ही मदत शाळेच्या ऑडिटेबल अकाऊंटमध्ये जमा केली जात आहे. आता जमा होणा-या रकमेचा विनिमय शिक्षकवर्ग गरजेनुसार मुलांसाठी करणार आहे. संपूर्ण शिक्षकवर्ग विश्वासार्ह आणि अतिशय चांगल्या वर्तणुकीचा आहे. लागेल तिथे आम्ही काही पालकही सहभागी होत राहू.
जिल्हा परिषदेच्या शाळेमुळे शिक्षणाचा खर्च अत्यल्प आहे. पण मुले दहावी होईपर्यंत दरमहा पुरेसे किराणा सामान, भाजीपाला आणि दूध, अधेमधे कपडे एवढी सोय होऊ शकेल अशा रकमेची तजवीज करत आहोत. मुलांच्या अभ्यासाची जबाबदारी तर शिक्षकांनी घेतली आहेच, शिवाय पुढे चरितार्थासाठी त्यांनी योग्य तो अभ्यासक्रम घेणे आणि एकंदरीत सक्षम होण्याकडेसुद्धा शिक्षक लक्ष देतील.
मी ज्या मित्रमंडळींना विचारलं त्यातल्या काही जणांना मी एकदाही भेटले नाहीये. ओळख म्हणावी तर तीही फारशी नाही. सगळं इंटरनेट मैत्र. तरीही त्यांनी सढळ मदतीचा हात पुढे केला आणि त्याबद्दल कुठेही वाच्यता नसावी अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यांच्या भावनेबद्दल आणि त्यांच्याबद्दल मनापासून आदर, कौतुक वाटलं. म्हणून ही एक छोटीशी पोच ह्या पोस्टद्वारे देत आहे. निराश करणा-या कितीही घटना घडत असल्या तरी जगाचा समतोल ह्या अशा लोकांमुळे टिकून रहातो. मनाला आश्वस्त वाटत रहातं.
मनापासून आभार, मंडळी
ता. क. - मंडळी, पोस्टमध्ये म्हटल्याप्रमाणे ही निव्वळ पोच आहे. आणखी काही मदत लागणार असेल तर त्याबद्दल मुख्याध्यापकांकडून अंदाज घेऊन ज्याला त्याला कळवेन. तूर्तास मदत देऊ करणा-या हितचिंतकांना मनापासून धन्यवाद
No comments:
Post a Comment