म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Sunday, August 29, 2021

 पद्माराजे हायस्कूलची संगीत नाटक परंपरा

आमच्या शाळेत एक वर्ष आडानं संगीत नाटक बसवलं जायचं हे सर्वश्रुत असावं. ह्यापूर्वी ह्या आठवणींच्या ग्रुपवर शेअर झालेली शाळेच्या संगीत नाटकाची आठवण १९५६-५७ सालीची आहे, तर मी सांगणार आहे ती १९८८ सालची. म्हणजे २०वर्षं तरी थेट होतीच. ही संगीत नाटक बसवण्याची प्रथा संस्थेत कशी सुरु झाली ह्याबद्दल अधिक जाणून घ्यायची उत्सुकता आहे. कृपया जाणकारांनी प्रकाश टाकावा.
८८ साली मी आठवीत असताना संगीत स्वयंवर बसवलं होतं. त्याआधी ८६ साली झालेल्या संगीत सौभद्रचा प्रयोग मी विद्यार्थिनी म्हणून बघितला होता. आमचे संगीतशिक्षक पं. वसंतराव खाडीलकर सर अत्यंत जाणकार गायक होते. शास्त्रीय गायनाचा त्यांचा अभ्यास बैठक आणि मेहनत जबरदस्त होती. ते शिक्षक म्हणूनही फार उत्तम होते. विद्यार्थिनींना प्रचंड तळमळीने गायन शिकवत. तर नाटकाच्या सांगितिक बाजूची जबाबदारी त्यांच्यावर तर स. म. लोहिया ज्यु. कॉलेजचे अर्थशास्त्राचे प्रा. सुरेश डवरेसर नाटकाचे दिग्दर्शक होते.
प्रा. डवरे आणि खाडीलकर सरांनी मिळून स्वयंवरच्या संचासाठी मुलींच्या आवाजाच्या चाचण्या घेऊन निवड केली. तेजस्विनी शेवडे - रुक्मिणी, अमिता वझे Amita Dandage - रुक्मी, मीना पोतदार Meena Potdar - राजा भीष्मक, कविता जोशी Kavita Mandar Shende बलराम, प्रिया हिरकण्णावर - महाराणी आणि मी कृष्ण अशी मुख्य आणि इतर बरीच पात्ररचना होती. नायकाची भूमिका मला निव्वळ कुरळे केस, जरा बरी उंची आणि बरा सूर एवढ्याच पात्रतेवर मिळाली. रुक्मिणीला १६, मला ८, महाराणी आणि भीष्मकाला बहुतेक एकेक अशी नाट्यपदं होती. डवरेसरांनी संहितेत बरीच काटछाट करून एकंदर कालावधी साडेतीन तासांचा ठेवला होता. वेळप्रसंगी कुणालाही कोणतीही भूमिका करता आली पाहिजे ह्या तयारीने आम्हा सगळ्यांकडून त्यांनी आधी पदांसकट संपूर्ण संहिता तोंडपाठ करून घेतली. मग शाळेच्या दुस-या मजल्यावर कोप-यातल्या संगीत वर्गात दररोज मधल्या सुट्टीनंतर शाळा संपेपर्यंत चार तासांच्या तालमी सुरू झाल्या.
जवळपास चारेक महिने रोज ह्या तालमी चालल्या. सुरुवातीलाच प्रयोगांच्या अंदाजे तारखा ठरवलेल्या होत्या. आधी पदांची तालीम, मग भुमिकांची. तालमींना सगळ्या मुली रोज हजर असणं सक्तीचं होतं. पहिल्यांदा पेटीवर सगळी पदं शिकवून मग आलाप घोटवून घेतले. पहिल्या दिवसापासून तबल्यावर साथीला जमदाडेसर होते. आम्ही आलापांसकट पदं उचलायला लागल्यानंतर खाडीलकर सर थेट ऑर्गनवर बसून साथ करायला लागले. प्रवेशातल्या भूमिकांनुसार नव्या तालमींना डवरेसर वर्गात खडूंनी रेघा मारून प्रत्येकाच्या हालचालींचे अवकाश समजावून सांगायचे. त्यांनी असे भाव दाखवा, हातवारे करा असं काही सांगितल्याचं आठवत नाही, नाटक पाठ करून वाचून घेतानाच त्यांनी ब-यापैकी अभिनयाची तयारी करून घेतली. एकीकडे खाडीलकर सरांनी मला, तेजस्विनीला आणि बहुतेक प्रियालाही अभिरुची स्पर्धेत नाट्यगीतं गायला लावून आमची स्टेजची भिती थोडी कमी केली. त्यात आमचा नंबर आल्यावर हुरुपही वाढला. आयुष्यात पहिल्यांदाच स्पर्धेत सहभाग, तोही अभिरुचीसारख्या, त्यामुळे आमच्या आत्मविश्वासात खूप वाढ झाली. मी स्पर्धेत 'स्वकुलतारकसुता' गायलं होतं. मला आठवतंय, आजची सुप्रसिद्ध गायिका मंजुषा पाटील तेव्हा सांगलीहून येऊन उपशास्त्रीय गायनात नंबरात आली होती आणि तेव्हासुद्धा ती लक्षणीय गायली होती.
दोनेक महिने झाल्यानंतर एकदा शिंपी येऊन प्रत्येकीच्या कपड्यांची, पायातल्या मोजड्यांची मापे घेऊन गेले. हे बहुतेक ठरलेले शिंपी असावेत असं आता वाटतंय. डवरेसर आणि खाडीलकर सर दोघेही प्रसंगानुरूप कडक आणि मऊ व्हायचे. आम्ही ना धड लहान ना धड मोठ्या. आम्हाला त्या भव्य नाटकांचं गांभीर्यही नीट कळलं होतं असं वाटत नाही. आम्ही कधी कधी फार दंगा करायचो. एका अंकाचा शेवट कृष्ण-रुक्मीच्या तलवारीच्या खणखणाटानं होणार होता. पडदा सरकून पूर्ण बंद होईपर्यंत आम्ही दोघींनी तलवारी उपसून एकमेकींवर हवेत खणकवून तसंच त्वेषानं एकमेकींकडे बघत रहायचं. साधारण एक ते दीड मिनिट फार तर‌. पण मला आणि अमिताला प्रत्येक वेळी ती अॅक्शन करताना जाम हसू कोसळायचं. काही केल्या आमचं दोघींचं हसणंच आवरेना. आधी आधी सर आणि वर्गात उपस्थित इतर मुली आणि शिक्षक वगैरेसुद्धा हसायला लागले. पण फारच वेळ जायला लागल्यावर मग सरांनी आम्हाला चांगलं तासलं. त्यांची संतापलेली मुद्रा अजून आठवतेय. अशा त-हेनं आमच्यासाठी ती सगळी धमाल होती. बाकीच्या मुली वर्गात अभ्यासाचे धडे शिकत बसल्या असताना आम्हाला मजा करायला मिळत होती, हे आमच्या वयानुरूप आनंदाचं होतं. आता नुसतं आठवतानाही भारी वाटतंय ते वातावरण.
प्रयोग जवळ येऊ लागले आणि नाटक साधारण बसत आल्यावर ज्यु. कॉलेजच्या इमारतीत तिसऱ्या मजल्यावर तालमी व्हायला लागल्या. मग मोठे मोठे कलाकार येऊन थोडा वेळ तालमी बघून, पदं ऐकून जाऊ लागले. त्या सुमारास शिलेदार कंपनी कोल्हापूर दौ-यावर होती. तेव्हा पोटेकाका Sudheer Pote , जयराम शिलेदार, जयमालाबाई, किर्ती शिलेदार, दीप्ती आणि किरण भोगले, शरद गोखले ही दिग्गज मंडळी तीन दिवस रोज थोडा वेळ येऊन आम्हाला मार्गदर्शन करून जात होती. आम्ही सर्वार्थाने किती चिमुरड्या ह्या सर्वांपुढे, पण त्यांनी कुणी तसा विचार केला नाही, हे त्यांचं थोरपण आता जाणवतंय.
नाटक संपूर्ण बसल्यावर रंगीत तालमीपूर्वी कपडे, मेकप, दागिने आणि इतर आभुषणं घालून प्रत्यक्ष पडदे आणि विंगा लावून काही तालमी झाल्या. पुरुष भुमिकांना वरती सॅटीनच्या कापडांचे अर्धे झगे आणि खाली सोवळी, मखमलींचे जरी काम केलेले कंबरपट्टे, हातादंडात मनगट्या-वाक्या, म्यानांसकट तलवारी, मुकुट, टपो-या मोत्यांचे दागिने, पायात पुठ्ठे लावलेल्या मखमलीच्याच मोजड्या वगैरे. एका प्रवेशात मला वेश बदलून केसांचा विग घालून गुराखी व्हायचं होतं. स्त्री भुमिकांमध्ये सर्वात महत्त्वाच्या रुक्मिणी आणि महाराणींना खरोखरचे भरजरी शालू आणि शेले, झगमगणारे अमेरीकन डायमंडस्चे अप्रतिम नखशिखांत दागिने आणि टियारा होते तर बाकीच्या स्त्रियांना सिल्कच्या नऊवारी साड्या. नेपथ्य सांभाळणारी स्वतंत्र माणसं होती. न्यू एज्युकेशन सोसायटीकडं संपूर्ण नेपथ्य तयार होतं. प्रवेशातल्या वर्णनानुसार प्रचंड पडदे लावले ओढले जायचे. सरांनी आमचे प्रवेश आणि त्यानुसार एंट्री-एक्झिट ठरवून दिल्या. साथीदार कुठे बसणार, प्रकाशयोजना कशी ते सांगितलं. नवीन माणसांच्या ओळखी करून दिल्या. प्रत्येकीला मेकपसकट तयार व्हायला लागणारा वेळ ठरवून दिला. प्रयोगांपूर्वी पंधरा दिवस सर्वांना खाण्यापिण्याच्या सूचना आणि पथ्य दिलं. त्यानंतर मग गडकरी सभागृहात रंगीत तालीम झाली.
केशवराव भोसले नाट्यगृहात आमच्या नाटकाचे तीन प्रयोग झाले. पहिल्या प्रयोगाला विद्यार्थिनींबरोबरच न्यू एज्युकेशन सोसायटीचे समस्त आदरणीय गुरुजन, इतर ज्येष्ठ माननीय व्यक्तींबरोबरच माझ्या आठवणीप्रमाणे ती. मदनमोहन लोहिया साहेबदेखिल प्रयोगाला उपस्थित होते. दोन्ही सरांनी उत्कृष्ट तयारी करून घेतल्यामुळे तीनही प्रयोग अत्यंत उत्तम पार पडले. नांदीपासून शेवटचा पडदा पडेपर्यंत प्रत्येकीकडून सगळं बिनचूक झालं. सर्वांनी, विशेष करून आमच्या लाडक्या खाडीलकर बाईंनी तर आमचं खूप कौतुक केलं. नाटक संपल्यावर एका मुलीच्या आईने आम्हा सगळ्यांची दृष्ट काढलेली आठवते. आम्ही सगळ्या मुली एकदम आभाळात होतो. प्रयोगांनंतर आम्हाला अख्खी शाळा ओळखायला लागली आणि मग आपण काही तरी विशेष केल्यासारखं वाटायला लागलं. नाटकाचा तो चढलेला ताप उतरायला पुढे बरेच दिवस लागले. केवळ शाळेमुळे आम्हाला हा समृद्ध अनुभव मिळाला. आजही त्याची फार अपुर्वाई वाटते.
अशा प्रकारे दर दुस-या वर्षी इतकी जीवापाड मेहनत घेऊन शाळकरी मुलींकडून पूर्णपणे व्यावसायिक तयारीने संगीत नाटक बसवून घेणं आणि त्यासाठी आवश्यक तो खर्च करून ती सादर करणं ही सांस्कृतिक परंपरा इतर कोणत्याही शाळेत असल्याचं माझ्या तरी ऐकीवात नाही. म्हणून सगळं तपशीलवार लिहिलं. इतर अनेक उत्तम गोष्टींबरोबर ह्या वेगळेपणासाठीही पद्माराजेचा काकणभर जास्तच अभिमान आहे.

















Saturday, August 28, 2021

 आज तात्यांचा स्मृतिदिन. मला अगदी जवळच्या माणसांनासुद्धा अशी सलगीनं हाक मारायची सवय नाही. पण काही आपापले म्हणून अपवाद असतातच. व्यंकटेश माडगूळकर त्या अपवादांपैकी एक. तात्यांवरचा खुद्द तात्यांचा सहभाग असलेला आणि पुणे आकाशवाणीनं केलेला एक सुंदर कार्यक्रम सकाळी रेडिओवर ऐकला आणि मन प्रसन्न झालं.

माझी बहिण, बाबा, आत्या, सगळ्यांचे हे लाडके लेखक. १८साली कोल्हापुरात येताना जवळची बहुतेक जवळपास सगळीच पुस्तकं वाटून टाकली. त्याआधी दोन वर्षं पुस्तकं विकत घेणं बंद केलं होतं, ते आता अलिकडे थोडं पुन्हा सुरू केलंय. त्यामुळे घरी आता मुदलात फार पुस्तकंच नाहीत. मात्र जेवढी आहेत त्यात पुलं आणि गोनिदांबरोबरीनं तात्या माडगुळकरांची सापडतील. शिवाय कुणाला भेट द्यायलासुद्धा तात्यांची पुस्तकं फार आवडतात.
मला बाळबोध, रोजच्या जगण्याशी निगडित, सुलभ साहित्य मानवतं. गंभीर, डोकं तासणारी किंवा तर्काला कामाला लावणारी पुस्तकंच काय, आता तर माणसं पण नको असतात. आपापला पिंड. कधीकाळी योगिनी जोगळेकर, शैलजा राजे, ज्योत्स्ना देवधर वगैरेंच्या कादंब-यांचा सलग फडशा पाडलेला आहे. आजही खूप ताण किंवा चिंताजनक मन:स्थितीत अशी पुस्तकं माझी स्ट्रेसबस्टर्स असतात. तात्यांच्या साहित्याला ह्या पंगतीत बसवता येणार नाही, पण माझ्यासाठी बसल्या जागी टोटली पळून जाण्याचा ते हमखास मार्ग आहेत एवढं खरं. केव्हाही काहीही उघडावं आणि स्वत:बरोबरच रोजच्या आयुष्यालाही थोडा वेळ सुखानं होल्डवर टाकावं.
करुणाष्टकं मी तात्यांमुळं वाचायला, म्हणायला सुरुवात केली. त्यांनी केलेलं आईचं वर्णन वाचताना मला गुंगी येते. त्यांचे दिघंचीचे काका म्हणजे बरंचसं आमच्या मोठ्या प्रभाकरकाकांचंच रुप आहे. माणदेशी माणसं आमचं आवडतं बेडटाईम वाचन आहे. जंगल वाचायला चितमपल्लींच्या कितीतरी आधी तात्यांनी शिकवलं. त्यांचं बालपण वाचताना त्या घटना आपल्याच कुणाकुणाच्या आयुष्यातला वाटतात. हाल आणि झट्या भरपूर, पण त्यांची मांडणी रिलेटेबल आहे. अलिकडेच सोलापूर कोल्हापूर एस टी प्रवासात तात्यांनी वारंवार उल्लेख केलेली आटपाडी, दिघंची, खटाव ही गावं, माण परिसराचा मैलोनमैल सपाट आणि रखरखीत प्रदेश, कोपरी-मुंडाशातली माणसं, सावळ्या तरतरीत चटचट लवलवणा-या बायका वगैरे बघून जुन्या ओळखीची भावना झाली. हा कनेक्टच तर तुमच्या आवडींचे कप्पे व्यापत असतो.
ब-याच वर्षांपूर्वी एकदा किशोर मासिकाच्या काही कामासंदर्भात राजु पंडितबरोबर ज्ञानदा नाईकांकडे गेले होते. अक्षर बंगल्यात. तेव्हा त्यांना विचारून भक्तीभावानं तात्यांच्या खोलीत गेले. त्यांचं लिखाणाचं टेबल, त्यांचा पुस्तकांचा संग्रह, भिंतीवर लावलेली त्यांची चित्रं आणि रेखाटनं, टेबलासमोरची खिडकी आणि त्यातून दिसणा-या गुलमोहराची जागा असं सगळं थांबून बघितलं. आता तो बंगला नाही. पण माझं मात्र एक तीर्थाटन झालं हे समाधान आहे. तेव्हा फोटोंची चलती नव्हती ही एक चांगली गोष्ट घडली. कारण एरवी क्षीण असणा-या माझ्या स्मरणात त्या खोलीचं तेव्हा उमटलेलं चित्र आजही जसंच्या तसं इंटॅक्ट आहे. फोटो घेतला असता तर कदाचित तसं झालं नसतं.
तात्यांना सादर अभिवादन.




Friday, August 20, 2021

 प्रतिभावंत प्रतिभाताईंचं ८४व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन. आजही संशोधनामध्ये, लेखनामध्ये अखंड बुडून गेलेल्या ह्या विदुषीला माझा सप्रेम दंडवत. सध्या अफगाणिस्तानातल्या घडामोडींनी त्यांची व्यग्रता खात्रीनं आणखीनच वाढवली असणार आहे. अनेकांना ह्यासंबंधी ताईंशी बातचीत करायची, त्यांचं मत ऐकण्याची उत्सुकता असेल. ह्या ज्वलंत विषयावर त्यांच्याइतकं अधिकारानं, किंबहुना अभ्यास आणि अनुभवानं बोलू शकेल असं आणखी कोण आहे!

त्यांची माझी पहिली ओळख अर्थात त्यांच्या दुर्गाबाईंबरोबरच्या सुप्रसिद्ध आणि अल्टिमेट 'ऐसपैस गप्पां'मुळे. मला Shobhana Tirthali ताईंनी दिलेल्या गप्पा मी भरपूर दिवस घेऊन चवीनं वाचल्या होत्या, अजूनही केव्हाही वाचत असते. मग आणखी पुढची काही पुस्तकं वाचल्यानंतर बालशिक्षणच्या सभागृहात डॉ. आनंद नाडकर्णींनी घेतलेल्या प्रतिभाताई, वीणाताई आणि उमाताईंच्या अप्रतिम एकत्र मुलाखतीचा 'संपूर्ण शारदा' हा कार्यक्रम ऐकला. एवढं होईतोवर ताईंनी पुरेसं भारावून टाकलेलं होतं. ह्या तिघीही आवडत्या लेखिकांनी मिळून खरोखरच बहार आणली होती त्या कार्यक्रमात.
गेल्या वर्षी चौफेर समाचारच्या दिवाळी अंकासाठी ताईंची मुलाखत घेणं हा माझ्यासाठी आणि यशोधनसाठी संस्मरणीय अनुभव होता. अरुणदादांनी सांगितल्यावर (खरंतर सौम्य शब्दातला आणि विचारण्याचा फक्त आविर्भाव असलेला प्रत्यक्षातला आदेशच होता तो, असं आता नक्की म्हणू शकते) मी हो म्हणाले खरी, पण प्रामाणिकपणे, त्यांच्याशी बोलण्याचंही फार दडपण आलं होतं सुरुवातीला. त्या नादात थोडी किचकटही झाले होते मी. पण मोठी माणसं अशीच मोठी होत नसतात. त्यांनी ज्या निखळपणे, सहजपणे गप्पा मारल्या, त्याला तोड नाही. लिहिणं, बोलणं, हसणं हे सगळं त्या मनापासून करतात. लेखन विषय अवघड असूनही ताईंची मांडणी जशी सुलभ असते तशाच त्याही आपल्याबरोबर असतात. समोरच्याला अवघडलेपण वाटत नाही, न्यूनगंड येत नाही. त्यामुळे मुलाखतीचं काम पूर्ण होत आल्यावर जरा वाईटच वाटलं. त्यांच्याशी बोलताना आपण समृद्ध होत जातो. इतकं लेखन केल्यानंतरही शिल्लक असलेले प्रचंड आणि सुरस अनुभव आहेत त्यांच्या पोतडीत आणि तल्लख स्मरणशक्तीमुळे ते हरेक संदर्भानुसार त्यांना सांगता येतात. त्यामुळे त्यांच्याशी बोलणं संपूच नये असं वाटतं. ह्या आनंदाचं श्रेय थेट अरुणदादांना आहे, त्यांनी भरीला घातलं म्हणून हे सगळं साधलं. यशोधनच्या रसरशीत सहभागानं एकंदर खटाटोपाला रंगत आली.
ताईंना त्यांच्या सर्व संकल्पांसाठी, दीर्घायुरारोग्यासाठी, निरामय स्वास्थ्यासाठी अनंत अनंत शुभेच्छा!




Thursday, August 5, 2021

 कवयित्री पद्मा सचदेवांच्या निधनाची बातमी बघून वाईट वाटलं. त्यांच्याशी ओळख विविध भारतीनं पहिल्यांदा करून दिली होती. अन्यथा दूरच्या अंतरावरच्या प्रादेशिक कवयित्रीबद्दल मला माहिती असण्याची शक्यता कमीच.

ब-याच वर्षांपूर्वी आवडत्या 'उजालें उनकी यादों के'मध्ये निवेदक युनुस खाननी त्यांच्या खुमासदार शैलीत मुळच्या दिलखुलास वृत्तीच्या पद्माताईंना आणखी खुलवलं होतं. काश्मिरात घालवलेल्या मोठ्या आनंदाच्या बालपणाबद्दल, मातृभाषा डोगरी आणि त्यातल्या त्यांच्या कविता, त्यांचे पुरस्कार, रेडिओची नोकरी करताना मिळालेल्या अनेक दिग्गजांच्या सहवासाबद्दल, छंद आणि व्यवसायाचा मनाजोगता मेळ घालता येत असल्याबद्दल त्या भरभरून बोलत, मधेच खळखळून हसत खूप आठवणी, अनुभव देखण्या हिंदीतून सांगत होत्या. ती मुलाखत फारच सुंदर, श्रवणीय झाली होती.
त्या कार्यक्रमातच पहिल्यांदा त्यांनी लिहिलेलं आणि जयदेवांनी संगीतबद्ध केलेलं लतादीदींच्या आवाजातलं 'ये नीर कहांसे बरसे है, ये बदरी कहांसे आई है' हे प्रेम पर्बत चित्रपटातलं गाणं ऐकलं आणि पुढे वारंवार ऐकत राहिले, अनेकांना ऐकवत राहिले. फारच कमी ऐकलं जाणारं अप्रतिम गाणं आहे.
मग उत्सुकतेनं त्यांच्या ब-याच कविता मिळतील तशा शोधून वाचल्या. लतादीदींवर त्यांनी लिहिलेलं 'ऐसा कहांसे लाऊं' हे त्यांची गाढ मैत्री विशद करणारं छोटेखानी पुस्तकही लायब्ररीतून हौसेनं आणून वाचलं. आपण म्हणतो ना, की एखाद्या माणसाला ऐकताना आपल्याला तो बोलत असलेल्या विषयापेक्षा ते माणूसच अधिक समजत असतं. तसं ते पुस्तक वाचताना पद्माताईंबद्दल जास्त समजत गेलं. त्या पुस्तकात प्रामुख्यानं लतादीदींबरोबरचा त्यांचा घट्ट घरोबा, लतादीदींबद्दलचा भक्तीभावच ठायी ठायी निथळताना दिसतो.
प्रथितयश कवयित्री आणि रेडिओवरची दीर्घ कारकीर्द ह्याबरोबरच त्यांच्यातलं ते एक मनमिळाऊ, गप्पिष्ट, हसरं आणि घरगुती माणूसही त्यांच्या कविता आणि लेखनातून आपल्यापर्यंत पदोपदी पोचत रहातं. त्यांचं प्रत्यक्ष व्यक्तिमत्त्वसुद्धा असंच घरातल्या एखाद्या कर्तबगार पण मायाळू काकू किंवा मावशीसारखंच घरगुती, डोक्यावरून पदर, कपाळावर मोठं कुंकू आणि प्रेमळ हस-या डोळ्यांचं होतं.
पद्मा सचदेवांना मन:पुर्वक आदरांजली.