पद्माराजे हायस्कूलची संगीत नाटक परंपरा
आमच्या शाळेत एक वर्ष आडानं संगीत नाटक बसवलं जायचं हे सर्वश्रुत असावं. ह्यापूर्वी ह्या आठवणींच्या ग्रुपवर शेअर झालेली शाळेच्या संगीत नाटकाची आठवण १९५६-५७ सालीची आहे, तर मी सांगणार आहे ती १९८८ सालची. म्हणजे २०वर्षं तरी थेट होतीच. ही संगीत नाटक बसवण्याची प्रथा संस्थेत कशी सुरु झाली ह्याबद्दल अधिक जाणून घ्यायची उत्सुकता आहे. कृपया जाणकारांनी प्रकाश टाकावा.
८८ साली मी आठवीत असताना संगीत स्वयंवर बसवलं होतं. त्याआधी ८६ साली झालेल्या संगीत सौभद्रचा प्रयोग मी विद्यार्थिनी म्हणून बघितला होता. आमचे संगीतशिक्षक पं. वसंतराव खाडीलकर सर अत्यंत जाणकार गायक होते. शास्त्रीय गायनाचा त्यांचा अभ्यास बैठक आणि मेहनत जबरदस्त होती. ते शिक्षक म्हणूनही फार उत्तम होते. विद्यार्थिनींना प्रचंड तळमळीने गायन शिकवत. तर नाटकाच्या सांगितिक बाजूची जबाबदारी त्यांच्यावर तर स. म. लोहिया ज्यु. कॉलेजचे अर्थशास्त्राचे प्रा. सुरेश डवरेसर नाटकाचे दिग्दर्शक होते.
प्रा. डवरे आणि खाडीलकर सरांनी मिळून स्वयंवरच्या संचासाठी मुलींच्या आवाजाच्या चाचण्या घेऊन निवड केली. तेजस्विनी शेवडे - रुक्मिणी, अमिता वझे Amita Dandage - रुक्मी, मीना पोतदार Meena Potdar - राजा भीष्मक, कविता जोशी Kavita Mandar Shende बलराम, प्रिया हिरकण्णावर - महाराणी आणि मी कृष्ण अशी मुख्य आणि इतर बरीच पात्ररचना होती. नायकाची भूमिका मला निव्वळ कुरळे केस, जरा बरी उंची आणि बरा सूर एवढ्याच पात्रतेवर मिळाली. रुक्मिणीला १६, मला ८, महाराणी आणि भीष्मकाला बहुतेक एकेक अशी नाट्यपदं होती. डवरेसरांनी संहितेत बरीच काटछाट करून एकंदर कालावधी साडेतीन तासांचा ठेवला होता. वेळप्रसंगी कुणालाही कोणतीही भूमिका करता आली पाहिजे ह्या तयारीने आम्हा सगळ्यांकडून त्यांनी आधी पदांसकट संपूर्ण संहिता तोंडपाठ करून घेतली. मग शाळेच्या दुस-या मजल्यावर कोप-यातल्या संगीत वर्गात दररोज मधल्या सुट्टीनंतर शाळा संपेपर्यंत चार तासांच्या तालमी सुरू झाल्या.
जवळपास चारेक महिने रोज ह्या तालमी चालल्या. सुरुवातीलाच प्रयोगांच्या अंदाजे तारखा ठरवलेल्या होत्या. आधी पदांची तालीम, मग भुमिकांची. तालमींना सगळ्या मुली रोज हजर असणं सक्तीचं होतं. पहिल्यांदा पेटीवर सगळी पदं शिकवून मग आलाप घोटवून घेतले. पहिल्या दिवसापासून तबल्यावर साथीला जमदाडेसर होते. आम्ही आलापांसकट पदं उचलायला लागल्यानंतर खाडीलकर सर थेट ऑर्गनवर बसून साथ करायला लागले. प्रवेशातल्या भूमिकांनुसार नव्या तालमींना डवरेसर वर्गात खडूंनी रेघा मारून प्रत्येकाच्या हालचालींचे अवकाश समजावून सांगायचे. त्यांनी असे भाव दाखवा, हातवारे करा असं काही सांगितल्याचं आठवत नाही, नाटक पाठ करून वाचून घेतानाच त्यांनी ब-यापैकी अभिनयाची तयारी करून घेतली. एकीकडे खाडीलकर सरांनी मला, तेजस्विनीला आणि बहुतेक प्रियालाही अभिरुची स्पर्धेत नाट्यगीतं गायला लावून आमची स्टेजची भिती थोडी कमी केली. त्यात आमचा नंबर आल्यावर हुरुपही वाढला. आयुष्यात पहिल्यांदाच स्पर्धेत सहभाग, तोही अभिरुचीसारख्या, त्यामुळे आमच्या आत्मविश्वासात खूप वाढ झाली. मी स्पर्धेत 'स्वकुलतारकसुता' गायलं होतं. मला आठवतंय, आजची सुप्रसिद्ध गायिका मंजुषा पाटील तेव्हा सांगलीहून येऊन उपशास्त्रीय गायनात नंबरात आली होती आणि तेव्हासुद्धा ती लक्षणीय गायली होती.
दोनेक महिने झाल्यानंतर एकदा शिंपी येऊन प्रत्येकीच्या कपड्यांची, पायातल्या मोजड्यांची मापे घेऊन गेले. हे बहुतेक ठरलेले शिंपी असावेत असं आता वाटतंय. डवरेसर आणि खाडीलकर सर दोघेही प्रसंगानुरूप कडक आणि मऊ व्हायचे. आम्ही ना धड लहान ना धड मोठ्या. आम्हाला त्या भव्य नाटकांचं गांभीर्यही नीट कळलं होतं असं वाटत नाही. आम्ही कधी कधी फार दंगा करायचो. एका अंकाचा शेवट कृष्ण-रुक्मीच्या तलवारीच्या खणखणाटानं होणार होता. पडदा सरकून पूर्ण बंद होईपर्यंत आम्ही दोघींनी तलवारी उपसून एकमेकींवर हवेत खणकवून तसंच त्वेषानं एकमेकींकडे बघत रहायचं. साधारण एक ते दीड मिनिट फार तर. पण मला आणि अमिताला प्रत्येक वेळी ती अॅक्शन करताना जाम हसू कोसळायचं. काही केल्या आमचं दोघींचं हसणंच आवरेना. आधी आधी सर आणि वर्गात उपस्थित इतर मुली आणि शिक्षक वगैरेसुद्धा हसायला लागले. पण फारच वेळ जायला लागल्यावर मग सरांनी आम्हाला चांगलं तासलं. त्यांची संतापलेली मुद्रा अजून आठवतेय. अशा त-हेनं आमच्यासाठी ती सगळी धमाल होती. बाकीच्या मुली वर्गात अभ्यासाचे धडे शिकत बसल्या असताना आम्हाला मजा करायला मिळत होती, हे आमच्या वयानुरूप आनंदाचं होतं. आता नुसतं आठवतानाही भारी वाटतंय ते वातावरण.
प्रयोग जवळ येऊ लागले आणि नाटक साधारण बसत आल्यावर ज्यु. कॉलेजच्या इमारतीत तिसऱ्या मजल्यावर तालमी व्हायला लागल्या. मग मोठे मोठे कलाकार येऊन थोडा वेळ तालमी बघून, पदं ऐकून जाऊ लागले. त्या सुमारास शिलेदार कंपनी कोल्हापूर दौ-यावर होती. तेव्हा पोटेकाका Sudheer Pote , जयराम शिलेदार, जयमालाबाई, किर्ती शिलेदार, दीप्ती आणि किरण भोगले, शरद गोखले ही दिग्गज मंडळी तीन दिवस रोज थोडा वेळ येऊन आम्हाला मार्गदर्शन करून जात होती. आम्ही सर्वार्थाने किती चिमुरड्या ह्या सर्वांपुढे, पण त्यांनी कुणी तसा विचार केला नाही, हे त्यांचं थोरपण आता जाणवतंय.
नाटक संपूर्ण बसल्यावर रंगीत तालमीपूर्वी कपडे, मेकप, दागिने आणि इतर आभुषणं घालून प्रत्यक्ष पडदे आणि विंगा लावून काही तालमी झाल्या. पुरुष भुमिकांना वरती सॅटीनच्या कापडांचे अर्धे झगे आणि खाली सोवळी, मखमलींचे जरी काम केलेले कंबरपट्टे, हातादंडात मनगट्या-वाक्या, म्यानांसकट तलवारी, मुकुट, टपो-या मोत्यांचे दागिने, पायात पुठ्ठे लावलेल्या मखमलीच्याच मोजड्या वगैरे. एका प्रवेशात मला वेश बदलून केसांचा विग घालून गुराखी व्हायचं होतं. स्त्री भुमिकांमध्ये सर्वात महत्त्वाच्या रुक्मिणी आणि महाराणींना खरोखरचे भरजरी शालू आणि शेले, झगमगणारे अमेरीकन डायमंडस्चे अप्रतिम नखशिखांत दागिने आणि टियारा होते तर बाकीच्या स्त्रियांना सिल्कच्या नऊवारी साड्या. नेपथ्य सांभाळणारी स्वतंत्र माणसं होती. न्यू एज्युकेशन सोसायटीकडं संपूर्ण नेपथ्य तयार होतं. प्रवेशातल्या वर्णनानुसार प्रचंड पडदे लावले ओढले जायचे. सरांनी आमचे प्रवेश आणि त्यानुसार एंट्री-एक्झिट ठरवून दिल्या. साथीदार कुठे बसणार, प्रकाशयोजना कशी ते सांगितलं. नवीन माणसांच्या ओळखी करून दिल्या. प्रत्येकीला मेकपसकट तयार व्हायला लागणारा वेळ ठरवून दिला. प्रयोगांपूर्वी पंधरा दिवस सर्वांना खाण्यापिण्याच्या सूचना आणि पथ्य दिलं. त्यानंतर मग गडकरी सभागृहात रंगीत तालीम झाली.
केशवराव भोसले नाट्यगृहात आमच्या नाटकाचे तीन प्रयोग झाले. पहिल्या प्रयोगाला विद्यार्थिनींबरोबरच न्यू एज्युकेशन सोसायटीचे समस्त आदरणीय गुरुजन, इतर ज्येष्ठ माननीय व्यक्तींबरोबरच माझ्या आठवणीप्रमाणे ती. मदनमोहन लोहिया साहेबदेखिल प्रयोगाला उपस्थित होते. दोन्ही सरांनी उत्कृष्ट तयारी करून घेतल्यामुळे तीनही प्रयोग अत्यंत उत्तम पार पडले. नांदीपासून शेवटचा पडदा पडेपर्यंत प्रत्येकीकडून सगळं बिनचूक झालं. सर्वांनी, विशेष करून आमच्या लाडक्या खाडीलकर बाईंनी तर आमचं खूप कौतुक केलं. नाटक संपल्यावर एका मुलीच्या आईने आम्हा सगळ्यांची दृष्ट काढलेली आठवते. आम्ही सगळ्या मुली एकदम आभाळात होतो. प्रयोगांनंतर आम्हाला अख्खी शाळा ओळखायला लागली आणि मग आपण काही तरी विशेष केल्यासारखं वाटायला लागलं. नाटकाचा तो चढलेला ताप उतरायला पुढे बरेच दिवस लागले. केवळ शाळेमुळे आम्हाला हा समृद्ध अनुभव मिळाला. आजही त्याची फार अपुर्वाई वाटते.
अशा प्रकारे दर दुस-या वर्षी इतकी जीवापाड मेहनत घेऊन शाळकरी मुलींकडून पूर्णपणे व्यावसायिक तयारीने संगीत नाटक बसवून घेणं आणि त्यासाठी आवश्यक तो खर्च करून ती सादर करणं ही सांस्कृतिक परंपरा इतर कोणत्याही शाळेत असल्याचं माझ्या तरी ऐकीवात नाही. म्हणून सगळं तपशीलवार लिहिलं. इतर अनेक उत्तम गोष्टींबरोबर ह्या वेगळेपणासाठीही पद्माराजेचा काकणभर जास्तच अभिमान आहे.
No comments:
Post a Comment