प्रतिभावंत प्रतिभाताईंचं ८४व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन. आजही संशोधनामध्ये, लेखनामध्ये अखंड बुडून गेलेल्या ह्या विदुषीला माझा सप्रेम दंडवत. सध्या अफगाणिस्तानातल्या घडामोडींनी त्यांची व्यग्रता खात्रीनं आणखीनच वाढवली असणार आहे. अनेकांना ह्यासंबंधी ताईंशी बातचीत करायची, त्यांचं मत ऐकण्याची उत्सुकता असेल. ह्या ज्वलंत विषयावर त्यांच्याइतकं अधिकारानं, किंबहुना अभ्यास आणि अनुभवानं बोलू शकेल असं आणखी कोण आहे!
त्यांची माझी पहिली ओळख अर्थात त्यांच्या दुर्गाबाईंबरोबरच्या सुप्रसिद्ध आणि अल्टिमेट 'ऐसपैस गप्पां'मुळे. मला Shobhana Tirthali ताईंनी दिलेल्या गप्पा मी भरपूर दिवस घेऊन चवीनं वाचल्या होत्या, अजूनही केव्हाही वाचत असते. मग आणखी पुढची काही पुस्तकं वाचल्यानंतर बालशिक्षणच्या सभागृहात डॉ. आनंद नाडकर्णींनी घेतलेल्या प्रतिभाताई, वीणाताई आणि उमाताईंच्या अप्रतिम एकत्र मुलाखतीचा 'संपूर्ण शारदा' हा कार्यक्रम ऐकला. एवढं होईतोवर ताईंनी पुरेसं भारावून टाकलेलं होतं. ह्या तिघीही आवडत्या लेखिकांनी मिळून खरोखरच बहार आणली होती त्या कार्यक्रमात.
गेल्या वर्षी चौफेर समाचारच्या दिवाळी अंकासाठी ताईंची मुलाखत घेणं हा माझ्यासाठी आणि यशोधनसाठी संस्मरणीय अनुभव होता. अरुणदादांनी सांगितल्यावर (खरंतर सौम्य शब्दातला आणि विचारण्याचा फक्त आविर्भाव असलेला प्रत्यक्षातला आदेशच होता तो, असं आता नक्की म्हणू शकते) मी हो म्हणाले खरी, पण प्रामाणिकपणे, त्यांच्याशी बोलण्याचंही फार दडपण आलं होतं सुरुवातीला. त्या नादात थोडी किचकटही झाले होते मी. पण मोठी माणसं अशीच मोठी होत नसतात. त्यांनी ज्या निखळपणे, सहजपणे गप्पा मारल्या, त्याला तोड नाही. लिहिणं, बोलणं, हसणं हे सगळं त्या मनापासून करतात. लेखन विषय अवघड असूनही ताईंची मांडणी जशी सुलभ असते तशाच त्याही आपल्याबरोबर असतात. समोरच्याला अवघडलेपण वाटत नाही, न्यूनगंड येत नाही. त्यामुळे मुलाखतीचं काम पूर्ण होत आल्यावर जरा वाईटच वाटलं. त्यांच्याशी बोलताना आपण समृद्ध होत जातो. इतकं लेखन केल्यानंतरही शिल्लक असलेले प्रचंड आणि सुरस अनुभव आहेत त्यांच्या पोतडीत आणि तल्लख स्मरणशक्तीमुळे ते हरेक संदर्भानुसार त्यांना सांगता येतात. त्यामुळे त्यांच्याशी बोलणं संपूच नये असं वाटतं. ह्या आनंदाचं श्रेय थेट अरुणदादांना आहे, त्यांनी भरीला घातलं म्हणून हे सगळं साधलं. यशोधनच्या रसरशीत सहभागानं एकंदर खटाटोपाला रंगत आली.
No comments:
Post a Comment