म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Monday, September 20, 2021

 फार फार आवडते गायक. पं. अभिषेकीबुवांचा आज जन्मदिवस. तलतला आपण मुलायम, रेशीम वगैरे म्हणतो, अगदी तोच पोत बुवांच्या आवाजाचा आहे. रेंज मात्र केवळ अतुलनीय. मला तलतही अफाट आवडतो, इथे फक्त उदाहरण म्हणून घेतलंय त्याला. अभिषेकीबुवा म्हणजे अतिशय ऋजू गायन आणि बुद्धिमान, आव्हानात्मक संगीत. बुवांची भावगीतं ऐकताना - मग त्यांचं स्वतःचं संगीत असो किंवा नसो - हा माणूस अत्यंत रसिक असला पाहिजे असं सतत वाटत आलंय मला. उदा. 'कशी तुझं समजावू सांग' ऐकताना भामिनीच्या जागी आपण असावं असं गंमतीशीर काही तरी वाटतं. अरे अशी मनधरणी कुणी करणार असेल तर रुसण्यातही भलती मजा आहे ना! पुलंनींही गायनासाठी बुवांनाच निवडावं ह्यात आलं की सगळं. भक्तीगीतांचं तसंच थोडंसं. तंतोतंत भाव, तंद्री लागते. प्रभातवंदनला बुवांचा एकतरी अभंग वाजायचा. मी गाणं शिकायला लागले तेव्हा देवल क्लबात पहिलं 'अबीर गुलाल' शिकवलं होतं डीआरकेंनी. बाबा रोज पूजा करताना कसं कोण जाणे दोनतीन वेळा 'संतभार पंढरीत' गुणगुणतात. ती जी गोडी लागली आहे ती कायमची. त्यांचा शास्त्रीय बाज इतर प्रकार गाताना चुकूनही शिरजोर होताना आढळत नाही हे फार महत्त्वाचं. त्यांची रागदारी ऐकणं हा निव्वळ आनंद असतो. मनात खळबळ माजली असेल, डोकं भणभणलं असेल आणि पसा-यातून बाहेर निघणं शक्य नसेल अशावेळी अभिषेकीबुवा तातडीनं धावून येतात. कोणताही राग असो, बरं वाटतंच. काहीतरी विशेष मेडीकेटींग एलेमेंट आहे त्यांच्या स्वरात. 'सर्वात्मका' तर मेडीटेटींग अनुभूती देतं.

त्यांची मूळ नाट्यगीतं मला नंतरच्या व्हर्जन्सपेक्षा कायमच जास्त आवडत आलेली आहेत. मग ते 'हे सुरांनो चंद्र व्हा' असो किंवा 'घेई छंद मकरंद'. अर्चना कान्हेरे उत्कृष्टच गातात, पण आक्रमक होतात गाताना. तडफ वगैरे सगळं मान्य आहे पण गायनाची तयारी दाखवण्यासाठी योग्य असे ते शब्द नव्हेत. तिथं आर्जव हवंय, सुरांची आळवणी करायची आहे. त्या सुरांना भेटून प्रियकराला सुकून नको का मिळायला की त्यानं दोन हात लांब रहावं अशी अपेक्षा आहे? म्हणून गुरू तो गुरूच. क्रांति ताई, आपण बोललोय ह्यावर. वसंतरावांचं 'घेई छंद' अत्यंत प्रिय आहे, पण मूळ चालही तेवढीच आवडते. कदाचित तुमच्या स्वतःचा कल हे ठरवत असेल, काय की. गंमत म्हणजे बुवांचं असं जराही टोकदार कानेकोपरे नसणारं काहीसं मऊ जातीचं गाणं, तर त्यांचे शिष्य बघा एकेक. दणकेबाज खणखणीत आवाज आणि तयारी दाखवणारे, प्रत्येकजण आपलं स्वतंत्र प्रामाणिकपणे वेगळं वैशिष्ट्य असणारे. खरोखर लखलखणारे हिरे घडवलेत त्यांनी. एकजात सगळे आवडते. बादवे, त्यांची मिशी किती शोभून दिसते त्यांना, हसणं पण देखणं. एकदम हॅंडसम पर्सनॅलिटी होती. एखादं माणूस आवडलं की त्याचं सगळंच आवडतं तशातला वेडेपणा आहे हा.
बुवांना सादर नमन.


No comments:

Post a Comment