गेल्या आठवड्यात कोल्हापुरात ग्रंथ पुस्तक दालनात एका कोपऱ्यात निरंजन घाटेंचं 'वाचत सुटलो त्याची गोष्ट' दिसलं. एकच प्रत होती बहुदा. चटकन उचललं, कारण विशलिस्टमध्ये होतंच. झपाट्यानं वाचत निघाले, पण त्यात उल्लेख असणाऱ्या एवढ्या पुस्तकांच्या बंबांर्डिंगनं गरगरायला झालं. मात्र ते गरगरणं मजेचं आहे. पुस्तक खाली म्हणून ठेववेना. आजवर वाचलेल्या पुस्तकांची अफाट दुनिया घाटेंनी यथाशक्ती विषयवार उलगडून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या वाचनाचा आणि त्याहीपेक्षा स्मरणशक्तीचा आवाका विस्मयकारक आहे. किती लेखक, केवढे विषय, एकाच विषयाचे केवढे पापुद्रे, अबब झालं वाचताना.
म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...
Tuesday, August 9, 2022
#अक्षरांच्यावाटेवर #डीडीसह्याद्री
डी डी सह्याद्रीवरून अक्षरांच्या वाटेवर हा साहित्यिकांच्या मुलाखतीचा तासाभराचा कार्यक्रम आठवड्यातून एकदा प्रसारित होतो. अलिकडेच ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिकांची श्रवणीय मुलाखत झाली. दहावी की बारावीच्या सुट्टीत माझी माहिमच्या खाडीतून कर्णिकांशी ओळख झालीये, तेव्हापासून ते आवडत आलेत, म्हणजे मुरलेली ओळख म्हणता येईल. माझा एकंदर वाचनाचा पिंड बघता आणि तेव्हाचं माझं अगदीच छोटं जग, लहान वय बघता मला खाडी आवडायला नको होतं, पण आश्चर्यकारकरीत्या तसं झालं मात्र नाही. म्हणजे खरंतर कर्णिकांनी मला मोठं केलं, माझा इनोसन्स घालवला, असं म्हणायला पाहिजे. त्यामुळे त्यांच्याबद्दल जास्त आत्मियता आपोआपच आहे. लेखनाबरोबरच मोठी कामंही केलेला मोठा माणूस आहे. मराठीच्या अभिजाततेबद्दल, एकंदर भाषेबद्दलही त्यांचं म्हणणं पटलं आणि ९१व्या वर्षी असा दृष्टिकोन असण्याबद्दल विशेष दादही दिली गेली.
प्रसन्न व्यक्तिमत्त्व आहे त्यांचं. उगीच रडका सूर न लावता, पण भूतकाळाचं बोट न सोडता, समकालीनांचं भरभरून कौतुक करत, आजच्या जगाबरोबर आनंदानं, उत्सुकतेनं चालत रहाण्याचा स्वागतशील स्वभाव त्यांच्या लेखनासारखाच ताजा वाटला. ठसठशीत स्मरणशक्ती फक्त चंदन उगाळते. खळखळून हसणं टिकून आहे. सध्याही लिहिणं सुरू आहे. डॉ. समीरा गुजर चांगलं बोलते, चांगले प्रश्न विचारते, चांगली दिसते. मुख्य म्हणजे, फोकस तिच्यावर नसतो आणि जाहिरातींचाही उपद्रव कमी असतो. कार्यक्रमाच्या प्रसारणाचा नक्की दिवस नीटसा सांगता येणार नाही, कारण माझं पहाणं फार अनियमित असतं. पण पुन:प्रसारण वरचेवर होत असतं, त्यामुळे हुकत नाही. ही मुलाखत आणि कार्यक्रमात आत्तापर्यंत झालेल्या सगळ्याच साहित्यिकांच्या मुलाखती युट्युबवर उपलब्ध आहेत. कर्णिकांच्या मुलाखतीची लिंक खाली चिकटवतेय.
सरकारी वाहिन्यांना बिल्कुल तोड नाहीये.
This video is currently unavailable.
Sunday, August 7, 2022
सुरेश वाडकरांचा आज वाढदिवस आहे. फार आवडतात. गाणं तर वैविध्यपूर्ण आणि दर्जेदार आहेच, पण मिश्किल बोलणं, मजेत हसणं, दिसणं- विशेष करून जिवणी, दातांची ठेवण, पातळ ओठ आणि पाणीदार डोळे, त्यांची विनोदबुद्धी, त्यांनी चालवलेली शिष्य परंपरा, सगळंच आवडतं आहे. त्यांच्या मुलाखती छान असतात. रंगात आले की रसाळ कोल्हापुरी बोलतात. माधुरीबद्दलची प्रसिद्ध अफवा तर त्यांच्याच तोंडून ऐकायला पाहिजे.
हिंदीतल्या त्यांच्या कारकिर्दीबद्दल खूप बोलता येईल, पण मराठीतली तगडी कामगिरी त्यामानानं दुर्लक्षित आहे. चित्रपट गीतांइतकेच गैरफिल्मी अल्बम्स आणि भावगीतं निव्वळ उत्कृष्ट आहेत. 'तेच स्वप्न लोचनात रोज रोज अंकुरे, पाहतो नभात मी धुंद दोन पाखरे' हे त्यांच्या मला आवडणाऱ्या गाण्यांच्या यादीत टॉप पाचात आहे. 'काळ देहासी आला खाऊ' हे रत्न सारेगमपमध्ये प्रथमेश लघाटेनं एकदम प्रकाशझोतात आणलं. 'कोटी कोटी रुपे तुझी'नं शाळेत असतानाच्या शनिवार सकाळी स्मरणीय केल्यात. सोलोंइतकीच डुएट्स जबरदस्त आहेत. 'झनझननन छेडिल्या तारा', 'अगं नाच नाच राधे उडवू या रंग', 'दे साद दे हृदया', 'तळव्यावर मेंदीचा अजून रंग ओला', अनेक. 'ये अबोली लाज गाली रंग माझा वेगळा'च्या 'जे हवे ते सर्व लाभे' किंवा 'पाकळीच्या पावलांचा गंध गहिरा चाहूली', ह्या किंवा अशा ओळींवर त्यांचा टीपेला लागणारा आवाज विशेष आवडतो. गाण्यांची माळ लावणं अनावश्यक होईल. खळेअण्णा, आरडी, पं. मंगेशकर, बाबुजी आणि श्रीधर फडके, जयदेव, रविंद्र जैन, विशाल भारद्वाज, शिव हरी, अशी अवाक करणारी, प्रत्येकाच्या मनाजोगती डिलिव्हरी देणारी रेंज. अवखळ, गंभीर, रोमॅंटीक, गझल, भक्तीगीतं, उपशास्त्रीय, वाडकर म्हणजे मॉल आहे, हवं ते ऐकण्यासाठी उपलब्ध आहे. असं असूनही उगीच भारंभार, खोऱ्यानं सापडणार नाहीत, लिमिटेड एडीशनवाला मामला आहे.
पक्की शास्त्रीय बैठक असूनही भावसंगीतावर कुठेही त्याची छाया पडत नाही, हे त्यांचं कौशल्य आहे. वाडकर ती शब्दप्रधान गायकी म्हणूनच आपल्यासमोर सादर करतात. पं. दीनानाथांच्या स्मृतीप्रित्यर्थच्या एका कार्यक्रमात स्वराधीश भरत बलवल्ली आणि वाडकर एकत्र गाताना, कानावर खरचटणारं गाणं आणि लगेच त्यावर मलमपट्टी असे दोन नमुने एकाच वेळी श्रोत्यांना अनुभवायला मिळाले. वाडकर मला कायमच आवडत आलेत, पण ह्या श्रवणानंतर ते आवडण्याचं आणखी एक कारण अधोरेखित झालं. गायक म्हणून वाडकर मुळीच न आवडणारेही भरपूर लोक आहेत आणि असे मतांचे भेद असायला हवेत. गायकाला किंवा कोणत्याही कलाकाराला धडपडत ठेवण्यासाठी ती आवश्यक गोष्ट आहे.
वाडकरांना मनापासून शुभेच्छा
दमकते रहिये!
Friday, August 5, 2022
आपल्या हेकेखोरपणाबद्दल फक्त घरच्यांकडून ऐकून भागत नसतं, स्वतःचे स्वतःलाही वरचेवर दाखले मिळत असतातच. अलिकडचीच गोष्ट.
लॉस्ट रेसिपीजचा कोल्हापूर एपिसोड बघताना डॉ. कुरुष दलालांकडून कोल्हापूरबद्दल ऐकताना कारण नसताना मला उपऱ्यासारखं वाटलं. अगदी तेवढी टोकाची नसली, तरी थोडीशी तीच गत सई कोरान्ने-खांडेकरांना ऐकताना झाली. कारण, मला हव्या होत्या मोहसिना मुकादम! आहे की नाही, गंमत? दोघंही उत्तम आणि बरोबर सांगत होते बरं का, पण मोहसिना मुकादम असत्या तर मला जास्त बरं वाटलं असतं ही खरी गोष्ट. उगीच आपलं काहीतरी. एरवी बऱ्याचदा असतात, मात्र नेमक्या ह्या भागात नव्हत्या. आपल्याही नकळत मनात किती गाठी, निरगाठी दबा धरून बसलेल्या असतात आणि त्या कधी उसळी मारून वर येतील, हे ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही. मजाच वाटली मला.
आदित्य बाळचं तोंड त्या ताज्या झणझणीत कांदा लसूण चटणीनं पोळलं, पण पठ्ठ्या मान्य करेल तर शपथ. कॅमेऱ्याला जाणवणार नाही असं हायहुई करत 'थोडा तिखा है, पर बहुत अच्छा है, टेस्टी है' म्हणत राहिला बापडा. ती कोल्हापुरी चटणी बिनकांद्याची होती. रोजच्या ओळखीतल्या पदार्थांची अशी वेगवेगळी व्हर्जन्स बघणं इंटरेस्टिंग असतं. ह्याच भागात उडदाचं माडगं दाखवलं, जे मी अजून कधीच चाखलेलं नाही. भलतंच पौष्टिक. भाजलेल्या काळ्या उडदाचं पीठ खळखळ उकळणाऱ्या गुळाच्या पाण्याला लावून, स्वादापुरती वेलदोड्याची पूड भुरभुरलेली किंचित दाटसर लापशी असते, जी खास करून पैलवान पितात. चुलीवर माडगं रांधणाऱ्या त्या हसऱ्या बाई फार देखण्या आहेत, शिवाय चुलीच्या आचेनं त्यांना डोळे उघडे ठेवणं मुश्किल झाल्यामुळे त्यांचे अर्धोन्मिलीत डोळे सुरेखशा लालसर छटेचं आयशॅडो लावल्यासारखे वाटले. कोल्हापुरातच कुठेतरी रहात असणारेत त्या. आपल्यातलं कुणी ओळखत असेल तर माझा अभिप्राय अवश्य पोचवा त्यांना.
हेक्यावरून कुठल्या कुठे आले! पण मोहसिना मुकादमांच्या ऋजू बोलण्यातून तांबड्या-पांढऱ्या रश्शाबद्दल किंवा केशरी मटनाबद्दल ऐकणं कानांना जास्त चविष्ट लागलं असतं, हा माझा अडेलतट्टूपणा, एपिसोड जुना व्हायला आला तरी अजून जसाच्या तसाच आहे. असं गोल घुमत ये रे माझ्या मागल्या आणि ताककण्या चांगल्या करण्यालाच कोल्हापुरात इरून फिरून गंगावेश म्हणतात, हे वेगळं सांगायला नकोच.
Subscribe to:
Comments (Atom)