#अक्षरांच्यावाटेवर #डीडीसह्याद्री
डी डी सह्याद्रीवरून अक्षरांच्या वाटेवर हा साहित्यिकांच्या मुलाखतीचा तासाभराचा कार्यक्रम आठवड्यातून एकदा प्रसारित होतो. अलिकडेच ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिकांची श्रवणीय मुलाखत झाली. दहावी की बारावीच्या सुट्टीत माझी माहिमच्या खाडीतून कर्णिकांशी ओळख झालीये, तेव्हापासून ते आवडत आलेत, म्हणजे मुरलेली ओळख म्हणता येईल. माझा एकंदर वाचनाचा पिंड बघता आणि तेव्हाचं माझं अगदीच छोटं जग, लहान वय बघता मला खाडी आवडायला नको होतं, पण आश्चर्यकारकरीत्या तसं झालं मात्र नाही. म्हणजे खरंतर कर्णिकांनी मला मोठं केलं, माझा इनोसन्स घालवला, असं म्हणायला पाहिजे. त्यामुळे त्यांच्याबद्दल जास्त आत्मियता आपोआपच आहे. लेखनाबरोबरच मोठी कामंही केलेला मोठा माणूस आहे. मराठीच्या अभिजाततेबद्दल, एकंदर भाषेबद्दलही त्यांचं म्हणणं पटलं आणि ९१व्या वर्षी असा दृष्टिकोन असण्याबद्दल विशेष दादही दिली गेली.
प्रसन्न व्यक्तिमत्त्व आहे त्यांचं. उगीच रडका सूर न लावता, पण भूतकाळाचं बोट न सोडता, समकालीनांचं भरभरून कौतुक करत, आजच्या जगाबरोबर आनंदानं, उत्सुकतेनं चालत रहाण्याचा स्वागतशील स्वभाव त्यांच्या लेखनासारखाच ताजा वाटला. ठसठशीत स्मरणशक्ती फक्त चंदन उगाळते. खळखळून हसणं टिकून आहे. सध्याही लिहिणं सुरू आहे. डॉ. समीरा गुजर चांगलं बोलते, चांगले प्रश्न विचारते, चांगली दिसते. मुख्य म्हणजे, फोकस तिच्यावर नसतो आणि जाहिरातींचाही उपद्रव कमी असतो. कार्यक्रमाच्या प्रसारणाचा नक्की दिवस नीटसा सांगता येणार नाही, कारण माझं पहाणं फार अनियमित असतं. पण पुन:प्रसारण वरचेवर होत असतं, त्यामुळे हुकत नाही. ही मुलाखत आणि कार्यक्रमात आत्तापर्यंत झालेल्या सगळ्याच साहित्यिकांच्या मुलाखती युट्युबवर उपलब्ध आहेत. कर्णिकांच्या मुलाखतीची लिंक खाली चिकटवतेय.
सरकारी वाहिन्यांना बिल्कुल तोड नाहीये.
This video is currently unavailable.
No comments:
Post a Comment