म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Sunday, August 7, 2022

 सुरेश वाडकरांचा आज वाढदिवस आहे. फार आवडतात. गाणं तर वैविध्यपूर्ण आणि दर्जेदार आहेच, पण मिश्किल बोलणं, मजेत हसणं, दिसणं- विशेष करून जिवणी, दातांची ठेवण, पातळ ओठ आणि पाणीदार डोळे, त्यांची विनोदबुद्धी, त्यांनी चालवलेली शिष्य परंपरा, सगळंच आवडतं आहे. त्यांच्या मुलाखती छान असतात. रंगात आले की रसाळ कोल्हापुरी बोलतात. माधुरीबद्दलची प्रसिद्ध अफवा तर त्यांच्याच तोंडून ऐकायला पाहिजे.

हिंदीतल्या त्यांच्या कारकिर्दीबद्दल खूप बोलता येईल, पण मराठीतली तगडी कामगिरी त्यामानानं दुर्लक्षित आहे. चित्रपट गीतांइतकेच गैरफिल्मी अल्बम्स आणि भावगीतं निव्वळ उत्कृष्ट आहेत. 'तेच स्वप्न लोचनात रोज रोज अंकुरे, पाहतो नभात मी धुंद दोन पाखरे' हे त्यांच्या मला आवडणाऱ्या गाण्यांच्या यादीत टॉप पाचात आहे. 'काळ देहासी आला खाऊ' हे रत्न सारेगमपमध्ये प्रथमेश लघाटेनं एकदम प्रकाशझोतात आणलं. 'कोटी कोटी रुपे तुझी'नं शाळेत असतानाच्या शनिवार सकाळी स्मरणीय केल्यात. सोलोंइतकीच डुएट्स जबरदस्त आहेत. 'झनझननन छेडिल्या तारा', 'अगं नाच नाच राधे उडवू या रंग', 'दे साद दे हृदया', 'तळव्यावर मेंदीचा अजून रंग ओला', अनेक. 'ये अबोली लाज गाली रंग माझा वेगळा'च्या 'जे हवे ते सर्व लाभे' किंवा 'पाकळीच्या पावलांचा गंध गहिरा चाहूली', ह्या किंवा अशा ओळींवर त्यांचा टीपेला लागणारा आवाज विशेष आवडतो. गाण्यांची माळ लावणं अनावश्यक होईल. खळेअण्णा, आरडी, पं. मंगेशकर, बाबुजी आणि श्रीधर फडके, जयदेव, रविंद्र जैन, विशाल भारद्वाज, शिव हरी, अशी अवाक करणारी, प्रत्येकाच्या मनाजोगती डिलिव्हरी देणारी रेंज. अवखळ, गंभीर, रोमॅंटीक, गझल, भक्तीगीतं, उपशास्त्रीय, वाडकर म्हणजे मॉल आहे, हवं ते ऐकण्यासाठी उपलब्ध आहे. असं असूनही उगीच भारंभार, खोऱ्यानं सापडणार नाहीत, लिमिटेड एडीशनवाला मामला आहे.
पक्की शास्त्रीय बैठक असूनही भावसंगीतावर कुठेही त्याची छाया पडत नाही, हे त्यांचं कौशल्य आहे. वाडकर ती शब्दप्रधान गायकी म्हणूनच आपल्यासमोर सादर करतात. पं. दीनानाथांच्या स्मृतीप्रित्यर्थच्या एका कार्यक्रमात स्वराधीश भरत बलवल्ली आणि वाडकर एकत्र गाताना, कानावर खरचटणारं गाणं आणि लगेच त्यावर मलमपट्टी असे दोन नमुने एकाच वेळी श्रोत्यांना अनुभवायला मिळाले. वाडकर मला कायमच आवडत आलेत, पण ह्या श्रवणानंतर ते आवडण्याचं आणखी एक कारण अधोरेखित झालं. गायक म्हणून वाडकर मुळीच न आवडणारेही भरपूर लोक आहेत आणि असे मतांचे भेद असायला हवेत. गायकाला किंवा कोणत्याही कलाकाराला धडपडत ठेवण्यासाठी ती आवश्यक गोष्ट आहे.
वाडकरांना मनापासून शुभेच्छा 🌳 दमकते रहिये!


No comments:

Post a Comment