म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Monday, January 23, 2023

 ही माझी नीलची काही आवडती हस्ताक्षरं आहेत.

त्यापैकी तीन - व्यवसायाच्या पाट्या आहेत, ज्या नीलच्या खेळण्याच्या वेगवेगळ्या फेजेसचा भाग होत्या. हे खेळ खूप गांभीर्यानं चालायचे. सलूनमध्ये व्यवस्थित अॅप्रन लावून केस कापणे, दाढी, मसाज चाले. छोट्या हॉटेलमध्ये घरातली सगळी भांडी आणि ग्राहक असायचे. ऑर्डर्सची धांदल, कच्चा माल कमी पडणे, पैसे आणि अभिप्राय गोळा करणे असायचं. मालिकेच्या एपिसोड्ससाठी आम्ही सगळी पात्रं नीलनं लिहिलेल्या स्क्रीप्टमधले त्याच्याच दिग्दर्शनाखाली संवाद म्हणायचो. ते सगळे रोजच्या दिवसातले नैसर्गिक विषय असायचे, आम्ही आमच्याच भूमिका करायचो. ही मालिका टाळेबंदीत आम्ही गोट्या, प्रपंच, वागळे की दुनिया वगैरे मालिका बघत असताना त्यानं करायला घेतली होती, अगदी टायटल म्युझिकही वेगवेगळे गाण्यांचे तुकडे रेकॉर्ड करून तयार केलं होतं. शुटींगमध्ये फार वेळ जातोय हा साक्षात्कार झाल्यावर त्याचा तो उत्साह कमी झाला. या सगळ्या व्यवसायांमध्ये इमारतीतली आणि वर्गातलीही येऊ शकेल ती सगळी वानरसेना सामील असायची. सगळ्या घराचं सलून, हॉटेल किंवा एसटी, मालिकेचा सेट, जो कोणता व्यवसाय त्या दिवशी चलतीत असेल, ते व्हायचं.
एक पदार्थांची यादी आहे, ज्याखाली माझी सही घेऊन त्याबरहुकूम पदार्थांना नकार दिला तर एखाद्या करारासारखी जाणीव दिली गेली आहे. तर एका फोटोत कुणाशीही वाद न घालण्याच्या माझ्या स्वतःसाठीच्या मुद्द्यात -तू मला विसरली आहेस -ही ठळक आठवण केली आहे मला. तेव्हा नील नुकताच लिहायला शिकत होता, फास्टर फेणे त्याचा फारच लाडका होता आणि मी खरोखरच स्वतःसाठी ते लिहिताना त्याला लक्षात घेतलं नव्हतं. ते नवख्या लिखाणातलं लोभस अडखळणं आणि मला दिलेली आठवण खूपच हृद्य आहे माझ्यासाठी. आताही लिखाण चालू असतं, पण मला दाखवताना तू कुणालाही दाखवायचं नाही, फोटो काढायचा नाही अशा कडक अटी असतात.









No comments:

Post a Comment