म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Friday, December 19, 2014

"चार नगरातील माझे विश्व"

Book Thumbnail

डॉ. जयंत नारळीकरांच्या 'चार नगरातील माझे विश्व'ला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला ही आनंदाची बातमी आज क्रांतीताईमुळे समजली. हे एक नितांतसुंदर, ओघवतं, निर्भेळ आत्मचरित्र आहे. अगदीच प्रामाणिक, कसलाच मोठेपणाचा तोरा नसलेलं, साधंसुधं, आजपर्यंतच्या आयुष्याची गोष्ट कसला आडपडदा न ठेवता सांगणारं. यातली भाषा आपुलकीची आहे.
बनारस हिंदू विद्यापीठामधे वाढलेल्या शिकलेल्या माणसाची असूनही मराठी मात्र पुण्यामुंबईची, म्हणजे रोजच्या ओळखीची. वाराणसी, केंब्रिज, मुंबई आणि पुणे या चारी शहरातली वास्तव्यं हा खरंतर अनुक्रमे त्यांच्या प्रगतीचाच आलेख, पण त्रयस्थपणे, अत्यंत संयतपणे मांडलेला. ही रूढार्थाने आत्मकथा असली तरी तिला एक उच्च साहित्यिक मूल्य आहे.
उच्च विद्याविभूषित आई-वडिलांमुळे या दोघा भावांना बालपण फार समृद्ध लाभलं. डॉक्टरांनी बनारस युनिव्हर्सिटीतलं वातावरण खुप सुरेख चितारलंय. वडील रँग्लर आणि मुलगाही रँग्लर अशा दुर्मिळातील दुर्मिळ घटनेचे, केंब्रिज परिसर, तिथल्या इमारती, परंपरा, देशोदेशीचे विद्यार्थी, प्राध्यापकांचे नमुने, ऑक्स्फर्डशी सततच्या निरोगी स्पर्धात्मक वातावरणाचं, त्यांनी केलेल्या सहलींचं सुंदर वर्णन मंत्रमुग्ध करतं.
त्या पती पत्नींचा अभ्यास, संशोधन, नोक-या, इंग्लंडातली जीवलग भारतीय मित्रमंडळी, नारळीकरांचे गाईड फ्रेड हॉईल आणि डॉक्टरांपेक्षा वयाने कितीतरी ज्येष्ठ असलेले 'ए पॆसेज टू इंडिया'चे लेखक इ. एम्. फॉर्स्टर या दोघांशी निर्माण झालेले दृढ मैत्र, टीआयएफआरमधली कारकीर्द आणि नंतर आयुका उभारणी हेदेखिल वाचनीय अनुभव आहेत.
मंगलाताईंसारखी तोडीस तोड बुद्धिमान पत्नी लाभल्यामुळे त्यांना त्यांच्या संशोधनावर लक्ष केंद्रित करता आले. एरवी इतर कुणाबाबतीत हे चित्र वेगळं दिसू शकलं असतं. पण ही दोघंही पाय जमिनीवर असणारी माणसं आहेत. त्यांना मुंबईत स्थलांतर केल्यावर आलेल्या अडचणी वाचताना आश्चर्य वाटत रहातं. तिन्ही मुलीही पुढे त्यांचा वारसा चालवणा-या आहेत.
तसं बघायला गेलं तर एका संशोधकाचं एक सरळसोट आयुष्य आहे पण त्या आयुष्याने मला मात्र खिळवून ठेवलं आणि मनावर कायमचा एक सुखद आदरणीय पगडा निर्माण केला हे सत्य. योगायोगाने दोन वर्षांपूर्वी ख्रिसमसच्याच काळात पंधरा दिवस या ठोकळ्यात अगदी रमून गेले होते. वाचल्यावर वाटलं, त्यांनी ही गोष्ट लिहीली ते बरं झालं, अशीही माणसं असतात ह्यावर विश्वास बसला. पुरस्कार अगदी योग्य पुस्तकाला मिळाला, डॉ. नारळीकरांचे मन:पुर्वक अभिनंदन.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------

मी घेतलेला डॉ. नारळीकरांच्या पुस्तकाचा छोटासा आढावा साहित्य संस्कृतीवर पुनर्प्रकाशित..
मेनी थँक्स टू सोनाली जोशी Sonali smile emoticon

Monday, November 17, 2014

माझ्या घरची आकाशनिंबाची फुलं..

एरवी सप्टेंबरअखेरीसच क्षीण होत होत निरोप घेणारी बुचाची फुले यंदा मध्यंतरात घेतलेल्या थोड्या विश्रांतीनंतर नोव्हेंबरच्या मध्यावरही पुनश्च जोमाने फुलारलीयेत! खुप महिन्यांनी घराच्या परिसरात फिरकले आणि अनपेक्षितपणे माझं घमघमीत प्रसन्न सड्यानं स्वागत झालं.. जीव हरखूनच गेला. मी म्हणलं, तुम्ही, आत्ता यावेळी कसे.. फुलं म्हणाली, बाई तुझ्या अंगणात होत असलेला हवामानबदल जाणवत नाही का तुला.. नेहमी हवामानबदल हा चिंतेचा विषय असतो, पण त्यामुळे मिळालेला हा सुखद धक्का मात्र हवाहवासा आहे..
काहीही असो, पण स्वत:च्या हातांनी लावलेल्या झाडांचा बहर वेचण्याचा आनंद निराळाच..





Monday, November 10, 2014

सर्वात आवडती १० हिंदी मिश्र गीते -

मला माणूसजातीच्या भुतांची भिती वाटत नाही.. पण शैलजा रेगेमुळं आवडत्या गाण्यांची, मी त्यांच्यावर साफ अन्याय केल्यामुळं संतापून जी भुतं मनावर नाचणारेत, त्यांची जाम भिती वाटतेय.. आत्ता मघापासून बसलेय तर कुणी सारखी 'आणि मी?', 'मी गं!', 'आता माझा नंबर ना?', 'कसली वाईट आहेस गं!! नुसतीच माझं आवडतं, माझं खुप आवडतं म्हणत असतेस होय..', असा आरडाओरडा करतायत, तर कुणी फक्त शांतपणे आपला नंबर नक्की कधी म्हणत माझी तारांबळ बघतायत. खाली पहिली 10 गाणी लिहीण्यापूर्वी ही चुळबूळ करणारी, रांगेत शांत उभी राहिलेली गाणीही नमूद करायला पाहिजेत.. त्यात 'अभी ना जाओ छोडकर', लताचं 'आज की रात न जा', कुमारांचं 'निक्के निक्के तारनहारी', मुकेशचं 'आंसूभरी है ये जीवन की राहें', कैलास खेरचं सैंया, रेहमानचं हायवेतलं 'माही वे', नव्या अग्निपथमधलं सोनू निगमचं 'अभी मुझमें कहीं' आणि रूपकुमार राठोडांचं 'ओ सैंया'.. बाप रे! आणखी खुप आहेत.. असो.. ही माझी आवडती पहिली 10 गाणी -
1. मिला है किसीका झुमका - परख - लता
2. ऎसे तो ना देखो - महंमद रफी
3. नन्ही कली सोने चली - गीता दत्त
4. अवधूता - कुमार गंधर्व
5. सलौनासा सजन है - आशा
6. कून फाया कून - मोहीत चौहान, रेहमान
7. तूही रे - हरीहरन
8. ये तनहाई हाए रे हाए - लता
9. सीनें में सुलगते है अरमां - तलत, लता
10. बाजे मुरलीया बाजे - लता आणि भीमसेन जोशी

Sunday, November 2, 2014

कोबी-पालक दडपे पोहे
थोडे गरम केलेले पातळ पोहे, कोबी, पालक, ओलं खोबरं, दोन चमचे टोमॆटो सॉस, मीठ, साखर आणि मोहरी-जीरे-हळद-हिंग-तिखटाच्या खमंग फोडणीत खरपूस तळलेले दाणे. मऊ हातानं छान कालवून लगेच खायला घ्यायचे. 
सोबत रविवार स्पेशल पुरवण्या असतील तर क्या कहने!
किमान प्रयत्नात कमाल चवीची, ओट्याशी मुळीच रेंगाळायला न लावणारी, वाटेल ते ढकलायला स्कोप असणारी कृती. दडपे पोहे जिंदाबाद  :-)
le emoticon

Sunday, October 26, 2014




एकंदरीतच सुबक रंग भरणं हे पेशन्सचं काम आहे.. मग रांगोळीत असो की आयुष्यात.. रांगोळीत जमले म्हणुन आयुष्यात जमतीलच असं नाही आणि उलट अर्थीही खरं.. असो!
दिवाळी संपली पण रांगोळीची हौस काही संपेना.. smile emoticon




Sunday, October 19, 2014

मला शिकव, मी करतो म्हणत हळूहळू सगळं करत लेकाने आज स्वत:च पणत्या लावल्या.दिवाळी छानपैकी समजून घेऊन साजरी करणं चालू आहे. कोणत्या मजल्यावर कुणाकडून कसले वास येतायत तेही सध्या येऊन येऊन सांगतोय. तुपात भाजलेल्या खमंग बेसनाचा वास मात्र त्याला जामच अस्वस्थ करतो, साखर मिसळेपर्यंतही दम निघत नाही अजून.. smile emoticonबिनसाखरेचं बेसन चवीनं मिटक्या मारत खाणारा हा मी पाहिलेला पहिलाच! हा अळणी नैवेद्य घरातल्या हसत्याखेळत्या देवाच्या कायमच्या आवडीचा, मागून मागून घेतलेला, हे मनसोक्त झालं की मगच देव्हा-यातले देव आनंदाने गोड लाडवावर ताव मारतात

 



smile emoticon

Friday, September 5, 2014

या मोसमातली बुचाची ताजी ताजी फुले.. आता किमान महिनाभर तरी सुगंधाचा उत्सव.. सगळी झाडे मोत्यांच्या फुलांनी नटून थटून घमघमतायत नुसती.. या दिवसांमधलं बुचाचं झाड कसं देखणं दिसतं.. आणि मैलभरावरूनही सुगावा लागतो तिथं कुठंतरी ते असल्याचा.. उंच आभाळाला टेकलेली नाजूक पानांची हिरवीगार पानं, लांब देठांची मधे बारकुसा तुरा असलेली सुबक मोतिया फुलं, हळूवारपणे नुसत्या झुळूकीच्याही धक्क्याने डहाळीचा हात सुटून हेलकावे खात अलगद जमिनीवर टपटपणा-या त्या फुलांचा झाडाखाली पसरलेला मोहक सडा आणि आसमंतात दूरपर्यंत पोचलेला त्यांचा सुंदर सुवास.. मला फार आवडतात.. मागच्या मोसमात फुलांनी लगडलेल्या अख्ख्या झाडाचा फोटो काढायचा राहून गेला होता.. आता जमवता येईल.

https://scontent-a-sea.xx.fbcdn.net/hphotos-xpa1/v/t1.0-9/1979896_10202897010895194_760630156120745388_n.jpg?oh=e1c32cc19a902ea8f27fde1bec78c85f&oe=556AAE73

Monday, September 1, 2014

मी एक पुणे पर्यटक..

पुण्यात येऊन, स्थायिक होऊन, बरीच वर्षं झाली आता. कोल्हापुरात जितकी वर्षं राहिले त्याहीपेक्षा जास्त. म्हणजे मी आता पुणेकरच खरंतर. तरीही इतक्या वर्षांत नेहमीची ८-१० यशस्वी ठिकाणं सोडल्यास मी पुणं मुद्दाम वेळ काढून पाहिलंच नाही कधी. तो विचार मात्र होता, मनातल्या कुठल्यातरी सांदी-कोप-यात मुटकुळं करून पडून.

सध्या भारताबाहेर वास्तव्य असणारी मैत्रिण पुण्यात आल्यावर म्हणाली, एक पूर्ण दिवस सोबत घालवू या आपण. तेव्हा मग पर्यायांचा विचार करताना हा 'पुणे दर्शना'चा विचार उसळी मारून पृष्ठभागावर आला आणि आनंदाने एकमताने मंजूरही झाला. लगेच सोयीचा दिवस ठरवून बुकिंगही करून टाकलं.
खुप उत्सुकता होती या एकंदर सहलीची. काय काय दाखवतील, वेळ कसा पुरेल, कसा अनुभव असेल, दगदग होईल का.. वगैरे उगीचच वायफळ शंकाही होत्या. सहलीहून परतताना ह्याच शंकेचा फोलपणा जाणवून हसू आलं खुप.

पूर्ण दिवसभराची, अत्यंत उत्तम सहल आहे ही. स्थळांनुसार मार्गांचे आणि वेळेचे योग्य नियोजन, स्थलदर्शनासाठी पुरेसा अवधी, वेळेचे काटेकोर पालन, प्रत्येक ठिकाणाची नियमांसकट उत्तम माहिती देणारे गाईड, उत्तम स्थितीतली, माफक सजावट केलेली स्वच्छ हवेशीर बस, गाईड आणि वाहकाचं पर्यटकांप्रती सुहास्य वदने आदबीचं वर्तन, हे सगळं खुप सुखावणारं चित्र होतं.

केसरीवाडा, सावरकर स्मारक (बाह्यदर्शन), शनिवारवाडा, लाल महाल, आगाखान पॅलेस, शिंदे छत्री, युद्ध स्मारक, कात्रज प्राणी संग्रहालय, बागुल उद्यानाशेजारचं महालक्ष्मी मंदिर, सारसबाग, पु.ल. देशपांडे उद्यान, राजा केळकर संग्रहालय, चतु:शृंगी मंदिर, डॉ. आंबेडकर संग्रहालय.. ही स्थळं आम्ही पाहू शकलो. काही पार्किंगच्या अडचणीमुळे तर काही रविवारच्या सुट्टीमुळे पाहता आली नाहीत. उदा. महात्मा फुले वाडा, जोशी रेल्वे संग्रहालय, आदिवासी वस्तू संग्रहालय, श्रीमंत दगडूशेठ गणेश मंदिर, पुणे विद्यापीठ (बाह्यदर्शन) वगैरे. पाहिलेल्या स्थळांकडे नजर टाकल्यास मार्गाच्या आखणीची साधारण कल्पना येऊ शकेल. हे सगळं पाहताना, बसमधून जाता-जाताच डेक्कन जिमखाना, कर्वे रस्ता, बाजीराव रस्ता, चितळेंचं दुकान, विश्रामबाग वाडा, तुळशीबाग, लक्ष्मी रस्ता, सिंहगड रस्ताही आपसुकच कव्हर केले गेले, त्यांचीही महत्वाचे रस्ते, पुण्याची ओळख असलेली ठिकाणं म्हणुन विशेष माहिती देण्यात आली. मला हे खुप महत्वाचं वाटलं आणि आवडलं. या वेळापत्रकात वेळेअभावी पर्वती, खडकवासला, सिंहगड ही महत्वाची ठिकाणं समाविष्ट होऊ शकत नाहीत. पुढेमागे मुदत वाढवून एका मुक्कामाची सहल झाली तर पुण्याची ओळख अगदी परिपूर्ण होईल.

सहलीचा पहिला भाग थोडा निवांत तरीही खुप सारी स्थळं सामावलेला आहे. जेवणानंतर भेट द्यायची स्थळं मात्र जरा वेळखाऊ आणि तुलनेने किंचीत जास्त पायपीटीची आहेत. पण मार्गानुसार पाहिल्यास ते होणं क्रमप्राप्त आहे. सगळी ठिकाणं तुम्ही पाह्यलाच हवीत असं अर्थातच नाही, त्यामुळे दगदग होईल असं वाटल्यास एखादं स्थळ न बघता ती टाळता येऊ शकते. दिलेल्या अवधीत प्रत्येक स्थळ बघून होईलच असेही नाही, पण त्या स्थळाचं स्वरूप आणि महत्व समजण्याइतका तो नक्कीच पुरेसा असतो, जेणे करून आपण पुन्हा जाऊन निवांतपणे ते पाहू शकतो. एक बाब आवर्जून नमुद करावीशी वाटते की भेट दिलेली सर्वच स्थळं उत्तम देखरेख असलेली, तिकिटांची सोय असलेली, प्रभाव पाडणारी आहेत. बहुतेक सर्व ठिकाणी उत्तम स्वच्छतागृहांचीही सोय आहे.

आम्ही तिघी मैत्रिणी, त्यापैकी दोघी आपापल्या मुलांसकट, असे पाच जण होतो. आम्ही आणि मुलांनीही सर्व स्थळे पाहिली. दमणूक मुळीच झाली नाही कारण स्थळ-भेटींदरम्यान बसमधे आपल्याला आरामच मिळतो. अतिशय आल्हाददायक हवेमुळे प्रसन्न वातावरण होते. योगायोगाने आमच्यासोबत आमच्यासारखेच पुणं बघायच्या इच्छेने आलेले पुणेकर खुप होते, अख्खी मिनीबस मराठी लोकांनीच भरली होती. "पुणे दर्शन कसलं करताय, रविवार आहे तर गप घरात पडून रहा.. हेहे पुण्यात काय आहे बघण्यासारखं.. काहीही करतात लोकं.." अशा न विचारताही आगाऊपणे आलेल्या हेटाळणीयुक्त अभिप्रायांच्या पार्श्वभूमीवर तर ही बाब मला आनंदाची वाटली, की आहेत बाबा आमच्यासारखे आणखी काही वेडपट लोकं! विशेष आनंद ह्याचा झाला की दैनंदीन सेवा असूनही बसचे आगाऊ आरक्षण करावे लागते. पूर्ण पैसे भरून आरक्षण केलेले असूनही कुणी येवो अगर न येवो, बस वेळेवरच सुटते, ही आणखी एक कौतुकाची गोष्ट.

आम्ही सगळ्यांनी या सहलीचा पुरेपूर आनंद घेतला. जेवणाच्या डब्यांसोबत भरपूर खाऊही नेला होता, वाटेत खिडकीतून बाहेर बघत तो खाऊ खायला खुप मजा आली. स्थलदर्शनासाठी उतरताना ओझी बसमधेच ठेऊन सुटं, मोकळं फिरत होतो. सारसबागेजवळ जेवायला बस थांबल्यावर बाकी सगळे हॉटेलमधे जेवायला गेले तेव्हा आम्ही मात्र बागेतल्या हिरवळीवर वर्तमानपत्रे पसरून डबे उघडून मस्त पिकनिक लंच घेतलं. मुले तेवढ्याच वेळात तिथे भरपूर खेळलीही. मला व्यक्तिशः बाजीराव रोडवर, लक्ष्मी रोडवर असं बसमधून फिरताना, आपली बस इथे थांबणार नाही आणि त्यात धक्काबुक्की होणार नाही या प्रत्यक्षातल्या कल्पनेने खुपच गंमत वाटली.

मला पुणं आवडतं. मला आणि माझ्या मुलाला सार्वजनिक वाहनांनी फिरायला भयंकर आवडतं. त्यामुळे सहल आवडणार हे गृहीत होतं. पुण्यातून असं एका दिवसभरासाठी नवं, अनोळखी होऊन फिरताना मनात अनेक विचार येत होते. पुण्याबाहेरून आलेल्यांना काय काय दाखवायला हवं ते लक्षात आलं. मी त्यांना पुणं फिरवताना मुळात मी पुण्याकडे कसं पाह्यला हवं हे समजलं. प्रशासन ज्या चांगल्या गोष्टी करतंय, त्याची दखल घेऊन त्याबद्दल कौतुकाची थापही पुणेकर नागरीक या नात्याने मी द्यायला हवी, हे जाणवलं. वाहतुकीच्या कोंडीत अडकलेलं असताना दिसणारं पुणं, अव्यवस्था असणारं पुणं ओलांडून त्यापलिकडच्या पुण्याकडे बघायला मला या सहलीची अतिशय मदत झाली. कारण अशी अव्यवस्थेची बाजू ही प्रत्येक शहराला असते, ती काही एकट्या पुण्यालाच नाही. इतिहास-वर्तमानाशी एकाच वेळी घट्ट नाळ असलेली अभिमानास्पद स्थळं, २५० शाळा, १८० कॉलेजेस, ४० सिनेमागृहे, १० नाट्य्गृहे, ४० आयटी पार्क्स, अगणित बागा आणि नदी-ओढ्यांवरचे पूल, रस्त्यांचं आणि आता उड्डाणपूलांचं जाळं, हर एक वस्तूची जुनी-नवी बाजारपेठ, सणावारांची खासियत, पारंपरीक आणि आधुनिकतेचा उत्कृष्ट मिलाफ असलेलं खाद्यजीवन.. हो, इथे काहीच उणं नाही.

केवळ एक दिवस वेगळा काढल्यामुळे मला पुण्याकडे बघण्याचा असा सुंदर नजरिया मिळाला. बाहेरून आलेल्या पर्यटकालाही तोच मिळत असणार. हा दृष्टिकोन पुढे पास करणं मला आवश्यक वाटलं. पुणे दर्शनाच्या या आढाव्याचा तोच मुख्य हेतू. त्यासाठीच स्थळांचं वर्णन कटाक्षाने टाळलं, जे अतिशय मोलाचं आहे, ज्यावेळी तुम्ही पुणे सहलीला जाल, आणि मी तर सुचवेन नक्की जाच, मुलाबाळांसकट, कुटुंबिय, मित्रमंडळींसह, तेव्हा प्रत्यक्ष त्या स्थळीच गाईडकडून ऐकताना काय वाटतं ते अनुभवण्यासारखं आहे...

तुमचा अनुभव माझ्याशी शेअर करायला विसरू नका, मला ऐकायला खुप आवडेल.

Monday, August 25, 2014

माधुरीआज्जी.....



amadhuri.jpg
"आई, छोट्या मुलांसाठी गोष्टी लिहीते म्हणुन माधुरीआज्जीला खूप मोठी शाबासकी मिळाली.. " नीलनं रात्री मला आनंदानं हरखून सांगितलं. मला ही आनंदाची बातमी आधीच समजली होती पण त्याच्या तोंडून त्याच्या खास विभ्रमांसकट बातमी ख-या अर्थाने पोचली नीलला अजून बक्षीस, पुरस्कार हे काही माहिती नाही, त्यामुळे बाबाने सांगितलेली मोठी शाबासकी त्याला बरोबर समजली. ही शाबासकी नीलपर्यंत पोचणं आवश्यकच होतं कारण समजायला लागल्यापासून तो तिच्याच गोष्टी सगळ्यात जास्त वाचत आलाय. वाचायला यायला लागण्यापूर्वी गोष्टीच्या नावाच्या वेगवेगळ्या चित्रांखालची 'माधुरी' 'पुरंदरे' ही दोन चित्रे मात्र बहुतेक सर्व पुस्तकांवर नेहमी दिसायची. वाचता यायला लागल्यावर तर इतर लेखकांआधी हेच नाव एकदम जास्त ओळखीचे झाले. आपल्याला या आजीने लिहीलेल्या गोष्टी आणि चित्रे खूप आवडतात हेही समजायला लागलं. शिवाय इतर पुस्तकांवर असतं तसं लेखक आणि चित्रकार अशी दोन वेगवेगळी नावे तिच्या पुस्तकावर नसतात, माधुरीआजी नुसती गोष्टी लिहीत नाही, त्यांची चित्रे पण तीच काढते. आपल्याला खुप आवडणारी.

खरंच, त्या सगळ्या गोष्टी आणि चित्रे फक्त नीललाच नाही, आम्हालाही आवडतात. रोज झोपण्यापूर्वी एकतरी माधुरीआजीचं पुस्तक वाचल्याशिवाय झोप जशी काही येतच नाही. "राधाचं घर" मधले सगळे कुटुंबिय आमच्याही घरचेच झालेत. 'बाबा', 'नाना', 'आई', 'भाऊ', 'आजी', 'काका'.. यातला शिदूकाका जाम लाडका. राधाच्या खोड्याच काय काढतो, दार लावून एकटाच ढांगचिक ढांगचिक काय नाचतो, दहा तास नुसता भांगच काय पाडतो! आजोबांचं बाबाला 'धांदरटच आहे' म्हणणं, बाबाचं पाडापाडी करणं, आई-बाबांची रुसारुशी, भावांचा दंगा.. हे सगळं या मुलांनाच काय, आम्हा पालकांनाही हवंहवंसं आहे. या नुसत्या चित्रगोष्टी नाहीत, ही जाताजाता मुलांना करून दिलेली "घर" या संस्थेची सुंदर ओळख आहे, तर ते घर कसं असावं, "कुटुंब" म्हणजे काय याच्या आम्हा पालकांसाठीही घ्यावासा धडा आहे, गोड आवरणातून दिलेल्या कानपिचक्या आहेत. यातले पालकही आपल्या सर्वांसारखेच नोकरी-धंद्याची धावपळ असलेले, तरीही मुलांसाठी जमेल तसा वेळ देणारे, मुलंही दंगेखोर पण घरपण अनुभवणारी, आगाऊपणे न बोलणारी, महागडी खेळणी/गॉजेट्स पासून दूर असलेली, खरंतर ठेवली गेलेली.

या सर्व गोष्टी नीलला इतक्या तोंडपाठ आणि हावभावांसह येतात की बस्स. अत्यंत आनंदाची करमणूक असते ती.

'हात मोडला' तर आम्ही चक्क लिहून काढली होती. नील रोज थोडी थोडी सांगत गेला आणि मी दुरेघी वहीत लिहीत गेले. छान अनुभव होता तो. मुळात हात मोडणे या घटनेची इतकी सुंदर चित्रमय गोष्ट होऊ शकते, ह्याचंच मला खुप कौतुक वाचलं होतं. ते आजही तसंच कायम आहे. पण हीच तर माधुरीताईंची खासियत आहे. 'राजा शहाणा झाला' मधून दात घासणे, हात धुणे, अंघोळ करणे, ह्या दैनंदिन बाबींचं महत्व गोष्टीरूपातून काय सुरेख रंगवलंय! मुलांच्या विशिष्ट वयात ह्या बाबी किती डोकेदुखीच्या असतात ते प्रत्येक पालक जाणतो. त्यातही माधुरीताई अशा मदतीला धावून येतात. 'पाहुणा', 'कंटाळा', 'मामाचा गाव', 'शाळा', 'किकीनाक'.. किती पुस्तकं, रोजच्या विषयांची, मुलांच्या हमखास आवडीची, वाचताना पालकांचाही दिवसभराचा शिणवटा दूर करणारी, मुलांना विचार करायला लावणारी पण पालकांच्या मागे नस्त्या अवघड-अगम्य प्रश्नांचा ससेमिरा न लावणारी!

नीलची थोडी समजण्याची पातळी वाढल्यावर त्यांचं 'सिल्व्हर स्टार'ही खूप दिवस सुरू राहिलं होतं रात्री. ते तसं निराळ्या विषयाचं, मजकुरानंही मोठं आणि आतापर्यंतच्या कौटुंबिक परिघापेक्षा वेगळा, मोठा कॆनव्हास असलेलं. तेव्हापासून जहाज हाही एक जिव्हाळ्याचा विषय झालाय. चित्रांमधूनही किती दिवस जहाजंच उमटतायत, बोलतायत.

पण नीलचं माधुरीआजीशी तो जन्माला येण्यापूर्वीपासूनच नातं जुळलेलं आहे. तो पोटात असताना बाकीच्या पुस्तकांबरोबर 'आई होताना' ही माझ्या सोबत होतं. शिवाय 'वाचू आनंदे'ही जवळ ठेवलेली असायची, मन छान रमून जायचं तेव्हा त्या चारी पुस्तकांत. नील थोडा मोठा झाल्यावर आलेल्या सुटेपणात त्यांच्या 'लिहावे नेटके'नंही मला चांगलं कामाला लावलं होतं. दोन मोठे ठोकळे हाताळत मराठी नव्याने शिकताना गणितं सोडवल्याचा सुंदर आनंद मिळाला होता आणि एखादं कोडं डोकं खाजवूनही सोडवता नाही आलं तर हळूच सोबत पुरवलेल्या उत्तरपुस्तकात चोरून उत्तर बघायलाही खुप मजा आली होती. मी ती पुस्तकं पहिल्यांदा बघितली तेव्हा मनोमन माधुरीताईंना कडक सलाम ठोकला होता!

त्यांच्याबद्दल जितकं बोलता-लिहीता येईल, तितकं कमीच आहे खरंतर. कारण त्यांचं लेखन भरपूर आहे, मी फक्त बालसाहित्याचा छोटासा आढावा घ्यायचा माझ्या परिने प्रयत्न केला. त्यांनी सर्वांनाच आयुष्यभर पुरेल इतका आनंद दिलाय, माझ्या आणि सगळ्याच अलिकडच्या लेकरांच बालपण समृद्ध केलंय. चिमुकल्यांच्या वाढदिवसासाठी तर मला ही पुस्तके देताना खुप समाधान मिळतं. कोणालाही काही भेट देताना, आधी घेणा-यापेक्षा जास्त मला ती भेट आवडली पाहिजे असा माझा हट्ट असतो, माधुरीताईंमुळे तो हट्ट मी मनसोक्त पूर्ण करू शकतेय.

नीलतर्फे आणि आम्हा सर्वांतर्फे 'साहित्य अकादमी पुरस्कार' मिळाल्याबद्दल माधुरीताईंचे मन:पुर्वक अभिनंदन.. असे अगणित पुरस्कार आणि पावत्या तुमच्यापुढे नतमस्तक होऊन उभे राहोत ही शुभेच्छा.. तुम्ही हा आनंदाचा झरा आमच्यासाठी असाच यापुढेही अखंड वाहता ठेवणार आहात याबद्दल आम्ही नि:शंक आहोत

Tuesday, July 1, 2014

'भोळ्या सांबाचा हरफनमौला पीर..'

आई-वडिल, दोन भाऊ, पाच बहिणी, वडिलांच्या बहिणीचं त्याच आकाराचं कुटुंब. सगळे जेवायला बसलेत. कशावरून तरी विषय निघतो आणि कुटुंबातला ८ वर्षे वयाचा मुलगा उठून उभा रहातो. 'प्रेम हीच जगातली एकमेव श्रेष्ठ भावना आहे' यावर जवळपास अर्धा तास एकटा बोलत रहातो आणि अख्खं कुटुंब मंत्रमुग्ध होऊन चिडीचुप्प ऐकत रहातं. मुलाचं बोलणं ऐकून वडिलांना भरून येतं, त्याला जवळ घेऊन सगळ्यांना म्हणतात, बघा बघा, माझं पोरगं कसं बोलतंय.. प्रसंग १९५२-५३सालच्या सुमाराचा. कुटुंब मुस्लिम.

'जित्याSSS, कुत्तरड्या, टिवल्या बावल्या करायला येतोस काय इथं? मी काय सक्काळी सक्काळी टाईमपास करायला बोलावलंय काय रे इथं तुला? बसायचं तर बस नाईतर ऊठ आणि ज्जा!' या तार स्वरातल्या, दात-ओठ खाऊन आणि डोळे फिरवत फेकलेल्या प्रसिद्ध वाक्याच्या आधी, मुलिंच्या रांगांच्या मागे मुलांच्या रांगेत बसलेल्या, खरोखरच शेजारच्याशी कुजबुजत, सदासर्वदा चुळबुळत असलेल्या जितेंद्र पुळेकरच्या अंगावर अचूकपणे भिरकावलेला खडू नेमकाच पोचलेला असतो. वेळ सकाळची, ७-९ मधली, साधारण १९८७ ते ८९ दरम्यानचं एखादं वर्ष.. दोन-तीन वर्षे हेच प्रसंग आणि हेच संवाद.. फक्त 'जित्या'च्या जागी 'चैत्री', 'संत्याSS लंब्या', 'राजा', 'मधे', 'पश्या', 'दिपडे-खापडे' यायचे, कुत्तरडी मात्र फक्त मुलंच, मुलींच्या नावांची नुसती चिरफाड... बाकी शेम टू शेम! इतकं होऊनही पुढच्या १५ मिनिटांनी पुळेकरची खुसपुस आणि चुळबुळ पुन्हा चालूच!

हसिनाच्या लग्नाचा स्वागतसमारंभ. वार सोमवार. रात्रीचे दहा-साडेदहा वाजून गेलेले. पै-पाहुणे, मित्रमंडळी, अगणित स्नेही, सगळे सामिष-निरामिषाचा मनसोक्त आस्वाद घेऊन तृप्त होऊन परतीच्या वाटेवर. हसीनाचे पपा मात्र फक्त एका चहाच्या कपावर. सगळ्यांचे यथायोग्य आदरातिथ्य उरकून घरी परतल्यावर हसीनाच्या मम्मीनं बनवलेला वरण-भात खाऊन पपांनी उपास सोडला..

कोल्हापुरातली न्यु हायस्कुलची स्टाफरूम. दोन शिक्षक नित्याच्या काहीतरी कामात. शाळेतल्या एका विद्यार्थ्याला अचानक कसंतरी व्हायला लागलंय. शिपाई त्याला धरून स्टाफरूममधे आणतो आणि तिथल्या गादीवर बसवतो. मुलाला भयंकर मळमळ सुटलीये आणि कोणत्याही क्षणी उमळून येईल अशी अवस्था आहे. अशा वेळी त्या दोघांमधला एक शिक्षक चटकन उठून त्या विद्यार्थ्यापाशी जातो आणि उमाळा येता क्षणी त्याच्या तोंडाशी आपली ओंजळ धरतो. हात स्वच्छ धुऊन मुलाच्या पाठीवरून हात फिरवतो आणि त्याला पाणी प्यायला देतो. तिथे उपस्थित दुसरे शिक्षक म्हणतात, च्यायला, मदन्या, मी तर माझ्या पोटच्या पोराचीही उलटी धरली नसती रे!

इयत्ता पहिलीच्या निकालाचा दिवस. मिरजकर तिकटीची नुतन मराठी शाळा. छोटा मदन पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याच्या आनंदात निकाल सांगायला उड्या मारत घरी आला. काही वेळातच शाळेचा शिपाई घरी निरोप घेऊन आला, हेडसरांनी बोलावलंय. वडिल मदनसोबत शाळेत पोचले. हेडमास्तर म्हणाले, गुणांच्या बेरजेत काहितरी घोळ झालाय, तुमच्या मुलाचा दुसरा नंबर आहे, किंकरांच्या मुलाचा पहिला आहे. वडिलांनी हरकत न घेता शांतपणे मुसमुसणा-या मुलाला घरी नेलं. त्यांना वस्तुस्थितीची कल्पना असते. निकाल पाहून किंकर शाळेत येऊन शंख करून गेले होते.. एवढी ब्राह्मणांची पोरं सोडून एका मुस्लिम मुलाला पहिला क्रमांक देताच कसा तुम्ही, काही धर्माची चाड आहे की नाही तुम्हाला, वगैरे वगैरे बरंच काही.. त्यानंतर मदनला पहिला क्रमांक सोडाच, पण कधीच साधं पासही केलं गेलं नाही. इयत्ता सातवीपर्यंत मदन वरच्या वर्गात 'चढवला' गेला. वडिल व्यथित होत पण हातात फारसं काही नसे. एके दिवशी शाहू दयानंद शाळेतल्या मित्राला जरा माझ्या लेकाकडे बघ रे म्हणाल्यावर मित्राने सोड त्याला माझ्याकडे असं सांगितलं. शाहू दयानंद जयप्रभा स्टूडिओमागे भरायची. तिथे गेल्यावर मग मदनने ८वी ते १०वी पहिला क्रमांक सोडला नाही! वडिलांचे मित्र थक्क झाले, कालपर्यंत 'चढवला'गेलेल्या मुलाची ही हुशारी पाहून!

मात्र आजुबाजूला सगळीच किंकरांसारखी मंडळी होती असं नाही. शेजारच्या सडोलीकरकाकु संध्याकाळी त्यांच्या घरच्या मुलांसोबत मदनलाही शुभं करोती म्हणायला बसवायच्या. मदन तिकडून येऊन घरी नमाज पढायचा. अशी मजा असायची.

वरचा ८ वर्षांचा मुलगा, जीव खाऊन पोरांवर ओरडणारे मास्तर, आधी दाबला गेलेला आणि नंतर झळकलेला मदन, घरी येऊन उपास सोडणारे पपा आणि विद्यार्थ्यापुढे अकृत्रिमपणे ओंजळ धरणारा शिक्षक, ही सगळी ज्या एकाच माणसाची बहूरुपं आहेत, त्या अवलियाचं नाव मदन उर्फ मेहबूब बाबूराव संकेश्वरकर ! माझ्या बाबांचे मित्र आणि न्यु हायस्कुलमधले सहकारी, माझे आणि माझ्या धाकट्या बहिणीचे इंग्रजी-गणिताचे ट्युटर, कोल्हापुरच्या स.म. लोहिया आणि न्यु हायस्कुलच्या विद्यार्थ्यांचे इंग्रजी-गणित-संगित तिन्ही विषयांवर प्रभुत्व असलेले लाडके प्रिय सर, हसिना आणि शकीलचे बाबा, एक अत्यंत उत्कृष्ट हार्मोनियमवादक आणि संगीताचे दर्दी...

गो-यात मोडणारा वर्ण, मध्यम उंची आणि बांधा, तोंडात पान, तोंडभर हसत स्वतःवरच खुश होत आनंदाने बोलण्याची लकब.. घरी असले तर चौकड्याची लूंगी आणि बाह्यांचा बनियन, शाळेत किंवा बाहेर हाफ शर्ट आणि गडद रंगाची पँट असा पेहराव. बोलणं मोठ्या आवाजात, दिलखुलास. अगदी मोकळंढाकळं. समोर लहान-मोठं कुणीही असो, सारख्याच आपुलकीने, हसतमुखाने, हक्काने.

या सगळ्याला शोभणारा अगदी उमदा स्वभाव. प्रेमळ आणि हळवाही. अनेकांकडून फसगत झालेला, होणारा आणि तरीही त्याची फिकीरही नसणारा. वेळ पडली तर अंगचे कपडेही देऊन टाकतील ही बाईंना पडणारी भ्रांत सहज खरी होईल असा. डोळ्यात तेल घालून व्यवहार आणि संसार समर्थपणे सांभाळणा-या बाई. शहनाझ संकेश्वरकर. मुलखाच्या देखण्या आणि सुगरण. सरांना शोभणा-या.

सर शंकराचे नि:स्सीम उपासक आणि गारगोटीजवळच्या बाळूमामांचे अनुयायी. जन्माने मुस्लिम असूनही सर्व धर्मांबद्दल मनात आत्यंतिक आदर असणारे आणि सर्व धर्मांपेक्षाही मानवधर्म हाच सर्वश्रेष्ठ ही ठाम विचारसरणी आपल्या बोलण्या-आचरणातून नैसर्गिकपणे आजीवन व्यक्त करणारे आमचे संकेश्वरकरसर....
आत्मा स्त्रीच्या पोटात ही ब्राह्मण, ती ख्रिस्त, ती मुस्लिम असं बघून शिरत नाही, मग जन्मानंतर त्या अर्भकाला ब्राह्मण, ख्रिस्त, मुस्लिम धर्म लावणारे तुम्ही कोण.. हा त्यांचा परखड सवाल. त्यांच्या वयाच्याच काय माझ्या वयाच्याही कोण्या व्यक्तीला मी अशा त-हेचं आयुष्य जगताना पाहिलेलं नाही..

त्यांच्या घरात गाण्याचं वातावरण होतं. सरांचा संगिताचा ओढा घरातूनच आलेला, पोसलाही गेलेला. हार्मोनियमवर त्यांची बोटं जादूसारखी फिरतात. एक काळ असा होता की कोल्हापुरातल्या त्यावेळच्या मोजक्या ३-४ कॉलेजेसची स्नेहसंमेलनं सरांवरती अवलंबून असत. तारखा सरांना विचारूनच ठरवल्या जात आणि सर ती सारी संमेलनं गाजवत. मुलांची स्केल्स बघून गाणी निवडून मुलांकडून बसवून घेत, त्यामुळे मुलं स्वतःही ती गाणी एन्जॉय करत आणि कार्यक्रम उठावदार होत. स. म. लोहिया आणि न्यु हायस्कुलला वर्षानुवर्षे सरांनी बसवलेलं 'जयोस्तुते श्री महन्मंगले' गायलं जात होतं, आज म्हणतात की नाही कल्पना नाही. मला मात्र आजही तो अख्ख्या शाळेचा कोरसचा सुरेल, धीरगंभीर आवाज आठवतो आणि अंगावर काटा येतो.

पदवीनंतर एक वर्षं वेंगुर्ल्याला नोकरी करून तिथल्या प्रशस्तीपत्राच्या बळावर सर ६६ साली स. म. लोहियाला शिक्षक म्हणुन रुजू झाले. नेमणूक पद्माराजेला झाली होती पण मुलिंच्या शाळेत हा १९-२० वर्षांचा पोरगेला शिक्षक कसा ठेवायचा म्हणुन ऐनवेळी स. म. ला रवानगी केली गेली. या सगळ्या गंमतीजमती सरांच्या तोंडून ऐकण्यात आणखी चम्मतग आहे. मजा म्हणजे वेंगुर्ल्याच्या शाळेत त्या वर्षीचं स्नेहसंमेलन बघायला अख्खं वेगुर्ले लोटलेलं.. तीच कथा इस्लामपूरची. केवळ एक वर्ष सर बदलीवर गेलेले, परत कोल्हापुरला परतायच्या वेळी निरोप समारंभात मुलं रडली. मुलांनी इतक्या भेटवस्तु दिल्या की त्या न्यायला खास गाडी करावी लागली.

सर घरी ट्युशन्स घेत. मलग हायस्कुलसमोरच्या गल्लीत रहायचे ते तेव्हा.. मी ७वी ते ९वी सरांकडे इंग्रजी गणितासाठी जात असे त्यांच्याकडे. नंतर काही वर्षांनी माझी बहिण दीप्तीही. सरांची मुलगी हसिना आणि मी बरोबरीच्या. माझ्या ब-याच मैत्रिणी आणि हसिनाही ट्युशनला असे. स्वतःच्या मुलीत आणि आमच्यात भेदभाव नसे. तिच्याही नावाने सर आरडाओरड करत. मुलं बहुतेक सगळी न्यु हायस्कुलचीच असत. शिकवणं सहज-सोपं आणि हसत खेळत चाले. मी इंग्रजीत चांगली होते, पण गणितात ढंच्या चँपिअन्सची ढ चँपिअन! बाकी सर्व विषयात चांगली असूनही गणितानं मला गटांगळी खायला लावली असती, केवळ त्यांनी शिकवलं म्हणुन दहावीच्या अडथळ्यातनं पार झाले!

शिकवताना ओरडले तरी मुलांना लागेल असा भाव नसे त्यात. एकदा दीप्ती ट्युशनला गेली नव्हती. त्यादिवशी 'because'चा वापर शिकवला त्यांनी. दुस-या दिवशी दीप्तीला आदल्या दिवशीचं काही माहिती नसल्यामुळे तिनं काहीतरी चुकीचं स्पेलिंग लिहिलं. ते बघितल्यावर म्हणाले, 'तुझ्या बानं केलेलं काय because चं असं स्पेलिंग?' ती म्हणाली, 'मी काल आले नव्हते सर.' त्यावर 'मी सांगितलेलं काय येऊ नकोस म्हणुन?'!! सगळा वर्ग हसून बेजार, जिला बोलतायत तिच्यासकट! आम्ही दोघी अजुनही खो खो हसतो यावर..
वर्गात फक्त अभ्यासाचे विषय नसत. कधीतरी एखाद्या सुंदरशा मराठी कवितेचं रसग्रहण होई तर एखाद्या दिवशी एखादं वाचलेलं सुरेख पुस्तक चर्चेला असे. मीरा नायरचा 'सलाम बॉम्बे' त्याच सुमारास कधीतरी प्रदर्शित झालेला. एका सकाळी आल्या आल्या संतोष देशपांडेनं बघून आलो म्हणुन सांगितलं आणि त्यादिवशी सर फक्त त्या चित्रपटाबद्दलच बोलत राहिले होते. दिग्दर्शिका, विषय, आम्ही तो कसा आणि का पहायला हवा, त्या निमित्ताने काही समांतर चित्रपटांबद्दलही.. मी तो चित्रपट अजूनही पाहिलेला नाही, पण माझ्या मनात सलाम बॉम्बे, सर आणि संतोष देशपांडे ही सांगड आजही घट्टपणे बसलेली आहे. बरोबरीने धर्म, सणवार, परंपरांचीही चर्चा चालेच. आम्ही ज्या वयात होतो त्या वयात असे संवेदनशील विषय आमच्याशी बोलणं सरांना तेव्हा महत्वाचं वाटत असावं, असं आज जेव्हा मी त्या दिवसांबद्दल विचार करते तेव्हा ठळकपणे जाणवतं.

सर फक्त बोलत नसत, जे बोलत ते स्वतः जगत होते. तेव्हाही आणि आजही. लिंगायत मित्राच्या घरी ८ दिवस गेल्यावर रोज सकाळ-संध्याकाळी अंगाला भस्म लावल्याशिवाय जेवायला बसले नाहीत. नुतन मराठीजवळच्या स्त्रिया गुरुजी उपलब्ध नसतील तर सत्यनारायणाच्या किंवा व्रतांच्या कहाण्या सरांकडून वाचून घेत. अलिकडेच एका गणपती मंडळांने सरांना सन्मानाने बोलावून गणपतीत सरांच्या हस्ते आरती करवून घेतली. देवावर असीम श्रद्धा. दर वेळेस मित्रमंडळींच्या अडचणीत शंकरापाशी किंवा बाळूमामांपाशी काही ना काही मागतील. सरांच्या सांगण्यानुसार मागितलेलं सगळं आजवर कायम पूर्ण झालेलं आहे, मग मनोभावे ते संकल्प पूर्णही करतात. आयुष्यभर सोमवारचे उपास करून अलिकडे मोठा यज्ञ करून यथासांग उद्यापन करून ते उपास सोडले. हे सगळं सुरू असताना मशिदीत जाणे, नमाज पढणे, रोजे करणेही सुरू असते. पण त्याचं अवडंबर नाही, कधी मुलांवरही कसली सक्ती केली नाही. गेली काही वर्षे ते कोल्हापुरातल्या २१ महादेवांना २१ दिवस जाण्याचं व्रत करतायत. सगळ्या मारुतीच्या मंदिरांमधे 'भीमरूपी महारुद्रा'च्या ठळक पाट्या लावणारेत, का तर ब-याचशा भाविकांना मारुतीस्तोत्र अख्खं तर येत नाही, पण देवळात आल्यावर म्हणायचं तर असतं, त्यांच्या सोयीसाठी. मी हातच जोडले, अर्थात आदराने.

आज बाई आणि सर कोल्हापुरात निवृत्तीचं जीवन समाधानाने जगत आहेत. मुलगा न्यु जर्सीत तर मुलगी दुबईत स्थिरस्थावर आहेत, वर्षातून एकदा मुलांकडे तर एरवी सहलींसाठी अशी सतत भ्रमंती सुरू असते. रोजची सकाळची अंबाबाईची फेरी चुकत नाही. सोडलेले संकल्प पुरे करणे, मित्रमंडळींच्या भेटी-गाठी, नित्याची कामे यात दिवस व्यस्त असतो. तब्येत सांभाळून आहेत. वृत्ती मुळात आनंदाची, शांतताप्रिय, सहकार्याची असल्यामुळे मित्रांचा गोतावळा मोठा आहे. त्यांच्यात मनापासून रमलेले असतात.
शिक्षक कसे आहेत हे त्यांच्या हाताखालून गेलेल्या विद्यार्थ्यांपेक्षा चांगलं आणखी कोण सांगणार? सरांनी आम्हाला समृद्ध केलं, सर्वार्थाने. इतर शिक्षकांपेक्षा त्यांचा पगडा आमच्यावर जास्त आहे असं आम्ही विद्यार्थी ठामपणे म्हणतो. आमचा अभ्यास तर त्यांनी घेतलाच, पण आम्हाला माणूसकी शिकवली, मानवधर्म ख-या अर्थाने प्रत्यक्ष दाखवला. मी आजवर कधीही सरांना दुर्मुखलेलं, निराश पाहिलं नाही. आयुष्यात अनेक अवघड प्रसंग आले, पण त्यांना तोंड देताना जगण्याचा आनंद झाकोळू दिला नाही त्यांनी, ना विद्यार्थ्यांवरचं प्रेम कमी होऊ दिलं. मी आठवतेय तसा त्यांचा माझ्या बाबांसोबतचा 'जोश्या-मदन्या' स्नेहदेखिल आजही जसाच्या तसा अबाधित आहे. तीच गत इतर मित्रांबद्दलही. त्यांच्या या स्वभावामुळे सगळ्या मित्रांनाही त्यांच्याबद्दल खुप आत्मियता आहे. तुमच्यावर निबंध लिहिणारे म्हणुन सांगितल्यावर माझ्याशी अतिशय उत्साहाने बोलले, मनमोकळ्या गप्पा मारल्या.

आमच्या ह्या प्रेमळ पीराला उदंड आणि निरामय आयुष्य लाभो, ही माझ्यासह त्यांच्या असंख्य विद्यार्थ्यांची त्यांच्या भोळ्या सांबाचरणी मनःपुर्वक प्रार्थना...

Saturday, March 15, 2014

'अमलताश' - डॉ. सुप्रिया दीक्षित




'अमलताश' वाचलं नुकतंच. आवडलं. एक साधंसुधं, सौम्य आणि निर्मळ आत्मकथन आहे. खुप सकारात्मक आणि समाधान देणारं.

प्रामाणिकपणे सांगायचं तर वाचायला घेताना मनात धाकधुक होती की मनातल्या संतांच्या आणि इंदिराबाईंच्या प्रतिमेला तडा जाईल की काय. ही अपेक्षा योग्य नाही याची जाणीव आहे, तरीही ती होतीच. पण संतांबद्दल आणखी जाणून घेण्याची तीव्र उत्सुकता होती. तीच गोष्ट 'मृद्गंध'नंतरच्या इंदिराबाईंबद्दल. शिवाय मायलेकांच्या एकत्रित भावबंधाबद्दलही.

फक्त दोन अपवाद वगळता लेखकांच्या बायकांच्या मनोगतांचा धसका बसलेला आहे. आपल्याला भावलेल्या त्या व्यक्तिमत्वाच्या लेखक ह्या एका कोनाची त्याच्या अख्ख्या माणूसकीशी आपण नकळत सांगड घातलेली असते, ती दर वेळेस इतर अनेक कोनांमुळे सुसंगत ठरतेच असं नाही., काही वेळा कारणं पटणारी असतात, काहीवे़ळा नसतात. यात भर पडते ती कथनाच्या पद्धतीची, सांगणा-यावर झालेले अन्याय आणि त्याच्या मनात दबा धरून बसलेल्या आकसांचीदेखिल. हे सगळं लक्षात घेऊनही दिल्या गेलेल्या दाखल्यांमुळे खुपदा त्या माणसाकडे पहाण्याचा दृष्टिकोन बदलतो, प्रकाश संतांच्या बाबतीत मला हे (टाळणं माझ्या हातात असूनही) सगळं होणं मुळीच नको होतं.

डॉ. सुप्रिया दीक्षितांनी नेमकी ही जाणीव लख्ख ठेऊन लिहिलं आहे, किंबहुना मुळात त्यांच्याच मनातले संत इतके लख्ख आणि उजळ आहेत की असा काही सायास त्यांना करावाच लागलेला नाही. फार सहजपणे आणि प्रवाहीपणे त्या घडलं ते सांगत गेल्या आहेत. संतांसोबतचं सहजीवन, स्वतःवरचा विश्वास आणि कर्तबगारी, स्नेहीपरिवार आणि कौटुंबिक भावविश्व, मुलांचं कौतुक; या सर्वांबद्दल कोणताही आविर्भाव न ठेवता त्या आपल्याशी बोलतात. आयुष्यात कटू प्रसंग कमी आले असं नाही, पण त्या प्रसंगांना पानाच्या डाव्या बाजूइतकंच महत्व आहे. माणसं माणसांसारखीच वागतात, पण त्यांची वैगुण्ये अधोरेखित केली गेलेली नाहीत.

वाचून झाल्यानंतर मला सुप्रियताईंबद्दल कृतज्ञता वाटली. अनेक कारणांनी कित्येक वर्षे दडपल्या गेलेल्या आणि पुनश्च त्याच तीव्रतेने प्रकटलेल्या संतांच्या अभिव्यक्तीला त्यांच्या सशक्त सहकार्यामुळे, ऋजूतेमुळे आणि संतांवरच्या निर्व्याज प्रेमामुळे प्रवाहीपण आलं असं मला वाटतं.

मला जे जे वाटलं ते त्यांनाही मी पत्राद्वारे आवर्जून कळवलं आहे. पुस्तक पुन्हा वाचणार आहे आणि संग्रहीदेखील ठेवणार आहे नक्कीच!
--------------------------------------------------------------------------------------------

दिनांक १८ फेब्रुवारी २०१४, वेळ संध्याकाळी ५ वा ५१ मि.

सुप्रियाताईंचा मला माझं पत्र मिळाल्याचा फोन आला! १५ फेब्रुवारीलाच तर पोस्ट केलं होतं मी पत्र. दुपारी हातात पडल्यावर लगेचच वाचून मला फोन केला त्यांनी. जवळपास २० ते २५ मिनिटे आम्ही फोनवर बोलत होतो. अतिशय मऊ आणि स्निग्ध आवाज, खालच्या पट्टीतला. जसं लिहिणं, तसंच उबदार बोलणंही. त्यांच्याबद्दल माझं जसं इम्प्रेशन झालेलं अगदी त्याला साजेसं.

त्यांनी पुस्तकाबद्दलचा सगळा प्रवास उलगडून सांगितला. श्री. पुं.चे अभिप्राय, त्यांचं आजारपणातलंही अमलताशच्या खर्ड्याचं वाचन, त्यांच्या जाण्यानंतरचं मौजेतलं स्थित्यंतर, या सर्वांत प्रकाशनाला झालेला ७-८ वर्षांचा उशीर.. मुळात आईने आठवणी लिहून काढायला दिलेलं प्रोत्साहन, श्रीनिवास कुलकर्णींनी, सुप्रियाताईंनी आणि त्यांच्या मुलाने केलेलं प्रुफरिडींग वगैरे खुप तपशीलाने बोलल्या. आईला तिच्या आजारपणात कसं वाचून दाखवायच्या, आईने इतकं कसं आठवतं तुला म्हणुन केलेलं कौतुकही सांगितलं.

साहजिकच त्या ओघात त्यांच्या आईचा विषय निघाला. मी म्हटलं तुमची आई काळाच्या केवढी पुढे होती, तर त्याही मग तिच्याविषयी खुप सांगत राहिल्या. मग माझ्या आईबद्दल विचारलं. स्वतः डॉक्टर असल्यामुळे अगदी तपशीलवार चौकशी केली. सासर-माहेर कोल्हापूर म्हटल्यावर क-हाडला ये म्हणाल्या लगेच. फक्त फोन करून आलीस तर बरं होईल, मी घरीच असते, हल्ली कुठे जात नाही तरी तुला हेलपाटा नको म्हणाल्या..

माझं अक्षर आवडलं, कौतुक केलं. पत्र छान लिहिलंय म्हणाल्या. शिवाय इतर अधिकचे अभिप्रायही कळवणारं हे पहिलंच पत्र असल्याचंही त्यांनी आवर्जून सांगितलं.

मला फार आनंद झाला त्यांचा फोन बघून आणि त्यांच्याशी बोलून. हे त्यांना सांगितल्यावर मग छानशा हसल्या पण.

खूपच छान वाटतंय मला.. !!















वसंत ऋतू

रंगांची भरभरून उधळण चालू आहे सगळीकडे… पिवळी धम्मक बहाव्याची झुंबरं, लालेलाल भडक गुलमोहोराचे पसारे, भगवे पळसांचे तुरे, गुलबक्षी काटेसावर, वाटेल तशा हात पाय पसरलेल्या जांभळ्या - गुलाबी - पिवळ्या - पांढ-या बोगनवेली, निळेशार नाजूक नीलमोहोर… 


गजबजलेल्या रस्त्यांवरुनही येता जाता असा फुलोरा दिसला की मन नुसतं प्रसन्न होऊन जातं… 
 
 

Tuesday, March 11, 2014

मनाला भावलेली कविता

 

बांधले मी बांधले, इंद्राचे तोरण बांधले                             

शिंपण घातले, चाफ्याचे शिंपण घातले

उन्हाचे पाटव नेसले, टाकले
वार्‍याचे पैंजण घातले, फेकले
डोळ्यांत काजळ, केवडा, अत्तर
लावले, पुसले

हर्षाचे हिंदोळे सोडले, बांधले
मयूर मनाचे रुसले, हासले
हिंदोळे हर्षाचे, मयूर मनाचे
हासले, नाचले

दिसला, लपला, चकोर मनाचा
फुलला, ढळला, बहर चंद्राचा
लामण सूर्याचा, श्रावण नेत्राचा
विझले, तेवले

मला ही कविता अत्यंत आवडते... मी या कवितेवर भाळलेली आहे असे म्हटले तरी चालेल. प्रचंड आशावाद आणि सकारात्मकता तीत ठासून भरलेली आहे, जी माझ्याही स्वभावात जन्मजात आहे आणि त्यावर माझा नितांत विश्वास आहे.

यामध्ये सगळं भव्यदिव्य स्वप्नरंजन आहे, स्त्रीसुलभ भावनांचं अप्रतिम चित्रण आहे - छान दिसावं, अंगावर चांगलं चुंगलं ल्यावं, या भावनेनं केलेला साज शृंगार - अगदी नट्टाफट्टा आहे, तोरणा-शिंपणात गृहकृत्याचं देखणं रुपक आहे, हे बघु बरं जरा घालून.. उंहू! नाही आवडलं, नाक मुरडून काढून बाजूला फेकलं, दुसरं काहितरी घेतलं आणि ट्राय केलं... किती नैसर्गिक चंचलता किती मोहकपणे व्यक्त होतेय!

भव्यदिव्यपणा म्हणाले त्याला तर सीमाच नाही. थेट चाफ्याचं शिंपण, इंद्राचं तोरण, वा-याचं पैंजण, सुर्याचा लामण, उन्हाचं लुगडं... असलंतसलं, लहानसहान, स्वस्त, नकोचंय काही! बाकी सगळी भावना स्त्रीसुलभ आहे तरी ही जी जगण्याची आस तशीच आसुसून व्यक्त झालीये त्यात मात्र काटकसर, भागवाभागवी असला (अजूनही) टिपीकल  बायकी स्वभावातला कोतेपणा - जो माझ्यातही आहेच - रुढार्थाने हे गुणविशेष मानले जातात खरंतर आपल्याकडे - ह्यालाच टुकीनं संसार करणंही म्हणत असावेत - कुठे चिंधीलाही नाही! मी जेव्हा जेव्हा ही कविता वाचते तेव्हा तेव्हा ही वृती मला भुरळ घालत आलीये... माझा आवाका काय, माझी परिस्थिती काय असली अंथरूण-पांघरूणाची सांगड डोळ्यामागे टाकून, मनोराज्यात काय काय कसं कसं असावं त्याचा विचार करताना, निदान ते कल्पनाचित्र रेखाटताना तरी आपण आपल्यावरचा लगाम स्वैर सोडावा ना...!! तिथे कशाला अडकायचं रोजच्या आयुष्याच्या आखलेल्या मर्यादांत?

जगण्याचा आनंद घ्यायला हवा, तो अनंत प्रकारे घेता येतो, त्यातलाच एक मार्ग स्वतःला खुश ठेऊन... आता स्वतःला आनंदी ठेवण्याचे ज्याचे त्याचे आपापले मार्ग असावेत, ते कुणी दुसरं, त्रयस्थ - मग भले तो जीवाचा सखा का असेना - नाही सांगू / सुचवू / ठरवू शकणार.. स्वतःचा आनंद स्वतःच शोधायला हवा, त्यासाठी स्वतःचा, स्वतःबद्दल तितका विचार करायला हवा, तो पुन्हा कोणत्याही बाह्य बाबींवर अवलंबून नसावा किंवा आयात करून मिळवावा लागू नये.. तो सहजपणे उपलब्ध होईल, जाता जाता मिळवता येईल इतका माझ्या आजूबाजूलाच खच्चून भरलेला असला पाहिजे... उन्हाचं पाटव मी केव्हाही नेसू शकते, वा-याचं पैंजण घालायला मला निराळी फुरसत काढायला नकोय, ना कुणाची परवानगी घ्यायला हवीये.. आनंदाचे झोके मनाला वाटेल तेव्हा वाटेल तिथे बांधावेत, त्यावर हव्वं तितकं हव्वा तितका वेळ झुलावं! थोडक्यात माझा आनंद माझ्या खिशातच. मला त्यासाठी कुणावर-कशावर अवलंबून रहायची आवश्यकता नाही, माझी मी किती स्वावलंबी.. एकदा स्वानंद मिळवला तर जगातली कोणती गोष्ट मिळवायची बाकी रहाते? सगळे आनंद मागोमाग आपोआप विनासायास चालत येतात... मोठमोठे तत्वज्ञानी वेगळं काही सांगतात का?

पण हे तत्वज्ञान सांगायला कोणत्याही जडबंबाळ शब्दांची योजना कुठे शोधून तरी सापडतेय का! काय प्रतिभा आहे.. मला एवढ्या ८-१० ओळीतून मोठंच्या मोठं भांडार मिळालंय, पण तो पसारा मांडायला ईंदिराबाईंना मात्र ८-१० ओळीच पुरे झाल्यायत! हा असा काही काही केवळ मला सापडलेला, भिडलेला आशय, वाचणा-या प्रत्येकाला अजून काही मिळेल आणि स्वतः इंदिराबाईंना तर आणखी निराळंच काही अभिप्रेत असेल... किती गंमत ना? आणि ही प्रत्येक स्त्रीसाठीची कविता आहे हं! नवथर तरुणी असो किंवा एखादी वृद्धा, विवाहीत - अविवाहीत, गृहीणी - नोकरदार, गरिब - श्रीमंत, शिक्षीत - अशिक्षीत, शहरी - ग्रामीण, कुण्णीही कुठलीही असो..

इंदिराबाईंनी कधी स्त्रीवादी मतं मांडली नाहीत, निदान माझ्या तरी वाचनात आली नाहीत. तो मांडायला जी एक हिरीरी लागते (असा प्रवाद तरी आहे, मला स्वतःला असं वाटत नसलं तरी) ती त्यांच्या स्वभावात गैरहजर होती. त्या नेहमीच स्त्रीची एक भावूक प्रतिमा साकारत आल्या. त्या स्वतः जशा होत्या तशीच ही प्रतिमा. स्त्रीच्या स्वभावात जात्याच एक मार्दव, ऋजूता असती, कितीही कर्तव्यकठोर स्त्री असेल तरीही ती असतेच, ते त्यांनी त्यांच्या बहुतेक कवितांमधून अगदी सहजपणे दाखवलिये... अरुणा ढेरेंनी लोकरंगच्या एका अंकात इंदिराबाईंवर लिहिलेल्या एका लेखात ही किनार अगदी अलगद उलगडून दाखवलीये.

हे झालं कवितेबद्दल. किती लिहू अन किती नको असं करणारं. ती अशी आत आत मुरलेली आहे माझ्या. आणि वर्षं जातील तशी नव्याने काहितरी हातात गवसत जातं तिच्यातून.. तिचं गाणंही तितकंच जिव्हाळ्याचं आहे.

कवितेचा योग किती मोठा असावा.. भास्कर चंदावरकरांनी तिला संगीतानं नटवलं, आशानं ते गळ्यावर चढवलं आणि स्मिता पाटील नावाच्या त्याच तोलामोलाच्या मूर्तीमंत प्रतिभेने ते पडद्यावर साकारलं! या चौघातलं कुण्णीकुण्णी जर्रा म्हणुन उणं नाही! आणि याचं श्रेय जब्बार पटेलांना द्यायला विसरलो तर संपलंच मग! खुप सुंदर चाल आहे या गाण्याची, शब्दांना न्याय मिळवून देणारी, त्यातले स्वल्पविरामांचे हेलकावे आणि नेसण्या-टाकण्याची, घालण्या-फेकण्याची, सोडल्या-बांधल्याची, हसण्या-रुसण्याची चंचलता ठळकपणे अधोरेखित करणारी... आशाही तितकीच मन लावून गायलीये. मला असं नेहमी वाटतं की तिला अशा अर्थगर्भित कविता गायला मिळाल्या ना की मनापासून आनंद होत असावा आणि तो  आनंद तिच्या स्वरांमधून, उच्चारलेल्या प्रत्येक शब्दामधून असा मधासारखा ठिबकतो. तिच्या कित्येक कवितांच्या गाण्यांतून तिचे भाव हे स्पष्टपणे आपल्यापर्यंत पोहोचवतात... आणि स्मिताबद्दल मी काय बोलणार? ती जन्मालाच अशा काही विलक्षण गोष्टी  करण्यासाठी आली होती, ते तिनं केलं आणि निघून गेलीसुद्धा...

बाप रे, मी इतकी प्रेमात असते या कवितेच्या की मला भानच रहात नाही... तल्लीन होऊन जाते मी! नाहीतर तसा कविता हा माझा भटकण्यासाठीचा प्रांत नाहीच... अजूनही. पण काही काही गोष्टी, माणसं, त्यांना तुम्हाला भेटावंसं वाटत असतं म्हणुन स्वतःच येऊन भेटतात ना, तशी ही एक.. आली, भेटली आणि कायमच्या मुक्कामालाच राहिली, मी ठेऊनच घेतली तिला!

कविता / गीत - इंदिरा संत
संगीत - भास्कर चंदावरकर
स्वर - आशा भोसले
चित्रपट - सर्वसाक्षी


Friday, March 7, 2014

महिला दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा…

मैत्रिणींनो,
तुम्हा सगळ्यांना उद्याच्या महिला दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा…
अनायासे वीकेंड आलाय, थोडा वेळ स्वत:साठी काढा, स्वत:ला आवडणारी एक तरी गोष्ट करा, ज्यात आपण छान दिसतो ते माहित असलेला आवडता ड्रेस घाला, स्वत:ला आवडणारा पदार्थ बनवा किंवा बाहेर जाउन खा…आवडते पुस्तक निदान ५-१० मिनिटे तरी वाचा… आवडणारा सिनेमा पहा, आवडत्या मैत्रिणीसोबत पोटभर गप्पा मारा, मनसोक्त हसा, आनंदी रहा…
हे सगळं रोजही करू शकतो आपण, पण आपल्यासाठीचा दिवस आणि शनिवार रोज येत नाही ना!!!

Wednesday, February 26, 2014

फँड्री नावाचा स्क्रू...

आयुष्यात एखादं तरी दाहक वास्तव असतं. प्रत्येकाच्या असेलच असं नाही, पण बहुतेकांच्या असतंच. हर प्रकारानं आणि निकरानं त्याला टाळण्याचा, नाकारण्याचा प्रयत्न करावा आणि कल्पनेपेक्षा कितीतरी अधिक तीव्रतेने आयुष्यानं ते वास्तव माणुस गाफील असताना कुणीतरी तोंडावर सणसणून दगड भिरकवावा तसं फेकुन मारावं... काय अवस्था होईल? हेच जर एखाद्या अडनिड्या वयातल्या मुलासोबत घडलं तर? तोही प्रथम भेलकांडून हतबल होईल आणि आवाक्याच्या बाहेर गेल्यावर त्वेषानं चवताळून परिस्थितीवर तुटून पडेल... जमेल त्या मार्गानं!!

पण फँड्री इतकाच नाही... मी माझ्यातला माणुस शोधत जाते, माझ्यातली संवेदनशीलता तपासत जाते, माझ्यामुळे आणि माझ्यापासून सुरू होणा-या समाजाचा एक हिस्सा म्हणुन माझ्या वाट्याला भिरभिरत आलेल्या ह्या दगडाचा मी थिएटरात नेम चुकवला तरी मनावर मात्र तो येऊन आदळतोच! मंजुळेंनी नेमच इतका अचुक धरलाय... तिथे वाल्याच्या बायकोसारखं मी पाप केलं नाही म्हणत बाजूला व्हायला वावच नाही. आजही चहूबाजूंना 'ड्रायव्हर', 'कामवाली बाई' (स्वतः घाण केलेली स्वच्छतागृहं तिच्याकडून साफ करून घेणं वगैरेही आलं त्यात!), 'वॉचमन' अशा प्रकारची असंख्य 'बिरुदं' आणि वर्णभेदही येतात कानांवर.. अर्थात हा फक्त एक दाखला, असे हजारो दाखले. त्यामागे दडलेल्या माणुस नावाच्या प्राण्याचं काय? मी अडवते का कुणाला असं संबोधताना? अशी वागणुक देणा-यांना परावृत्त करते का? म्हणजे काय काय करायला लागेल? मी स्वतः खरंच पूर्णपणे माणुसकीनं वागते का? प्रश्न. अनेक प्रकारचे. नागराज मंजुळे तुम्हाला टोचत रहातात. अनेक प्रसंगांमधून. - हा फॅण्ड्री आहे. पण पुन्हा, एवढाच नाही.

हे सगळं बेमालुमपणे अगदी जाता जाता करत मंजुळे तुमचं मनोरंजनही करतात. त्यांचा चंक्या ज्या सहज आणि लिलया जत्रेच्या जल्लोषात सामील होतो त्याच सहजतेनं. कोणतीच गोष्ट कशाचपासून वेगळी करता येत नाही.

एरवी अडम तडम तडतडबाजा असलेली माझी बहिण चित्रपट पहाताना वरचेवर डोळ्यांना रुमाल लावत होती. म्हणजेच चित्रपट भिडला असं नव्हे, माहिताय. पण नि:शब्द जडत्व घेऊन घरी पोचल्यावर आपोआपच 'माणसानं माणसाशी माणुसकीनं वागणं' यावर माझा आणि तिचा रंगलेला दीर्घ परिसंवाद पार प्रत्येक कुटुंबियाची पाळंमुळं खणत गेला, मागच्या आणि आमच्या पिढीतल्या प्रत्येकाबद्दल ते येणा-या पिढीला काय पोचवायचं इथंपर्यंत. दोघीच्या दोघीच निवांत असताना, वेळेचं बंधन नसताना एरवी स्वतःचीच सालं कशाला काढत बसलो असतो? त्यापेक्षा अनुपस्थित गोतावळ्याबद्दल ही अश्शीच आणि तिचं तस्संच हा मुखवास चघळत बसणं सोप्पं नव्हतं का? वर आणि तो मंजुळेंच्या डोईजड चित्रपटावर रामबाण उताराही तर झाला असता! पण...

उत्खननालाच बसायचं तर अनेक गोष्टी निघतील. पण ते प्रत्येकानं आपापलं करावं. कारण मला जे सापडलं तेच बाकिच्यांना मिळेल असं नाही शिवाय असंही होऊ शकेल की मलाच शंभर गोष्टी मिळाल्या आणि कुणाला एकही नाही... तेव्हा तो शेवटी ज्याचा त्याचाच प्रश्न रहातो.

अलकनंदा दासगुप्तांचं संगीत आणि विक्रम अमलाडींचा कॅमेरा हे दोन महत्वाचे कलाकार आहेत चित्रपटात. शीर्षकापासूनच दोघंही मनाचा ठाव घेतात आणि ती पकड घट्ट घट्ट होत जाते... एकेक फ्रेम बघत रहावी अशी आणि एकेक तुकडा रिवाईंड करुन मुद्दाम ऐकण्यासारखा. किशोर कदम ह्या माणसाला मला एकदा सेटवर जाऊन निरखायचं आहे. ह्या माणसाला स्वतःला तरी कल्पना असेल का स्वतःच्या रेंजची?? स्विच ऑन्/ऑफ नावाची चीज हा करतो तरी कशी? ह्या माणसाबद्दलचं कुतूहल दिवसेंदिवस वाढतंच चाललंय. 'ल्हान हाये अजून', 'शेण घेऊ का?'तली लाचारी, गल्लीच्या वळणावरच्या त्या बेतशीर झोकांड्या, जिवाच्या आकांतानं केलेली शेवटची पळापळ.. सगळं अचंबीत करणारं.
त्याच्यासमोर त्याच ताकदीनं उभी राहिलेली जब्याची आई. यांचं नाव मला माहिती नाही पण भुमिकेचं सोनं म्हणजे काय याचा वस्तुपाठ आहे तिची भुमिका. मग जब्या आणि पि-या. तीन चतुर्थांश सिनेमा होईतोवर तर माझं ध्यान पि-याकडंच. 'आता खाली कसा उतरू'पासून ते ओशाळवाणं होऊन नवी कापडं कशी आहेत विचारणं असो... 'तुझा झगा गं झगा गं ' करत जिवलग दोस्ताला गाण्यात गुंफणारा लोभस पि-या. मी प्रेमात पडले त्याच्या. 'नायकाचे बेस्ट दोस्त' अशी काही कॅटेगरी केली तर सुरज पवारचा पि-या १००% पहिल्या पाचात!

पि-यापाठोपाठ चंक्या. अफलातून. मंजुळेंचा कलंदर चंक्या मोहवून टाकतो. 'तुझा विश्वास आहे ना, मग होईल' भिडलंच. त्याचं आणि जब्याचं नातं केवळ देखणं आहे. जब्या मात्र मला अधूनमधून आवडला आणि मग शेवटचा. त्याचं ते डोळ्यांच्या कोप-यातून शालूला निरखत रहाणं आणि ओघानंच ओठांवर उमटणारं अस्फुट स्मित लाजबाब. संवादफेक मात्र सोमनाथ अवघडेच्या मुळच्या हस-या जिवणीमुळं थोडीशी सदोष झालीये असं मला वाटलं. पण सायकलच्या आणि पेप्सीच्या प्रसंगात शिवाय जत्रेत बत्ती घेतल्यावरचा त्याचा प्रयत्न चांगला होता. राजेश्वरी खरातची शालू निरागस. ती तशीच अपेक्षितही होती. बामणीण चिमणीच्या गोष्टीसाठी ज्योती सुभाष नावाच्या देखण्या म्हातारीचं अनपेक्षित दर्शन सुखद. खरंतर अगदी एकच वाक्य बोलणा-या सुरखीपासून ते 'वढ पाच'ची म्हणणा-या न्हाव्यापर्यंत, जो तो ज्या त्या ठिकाणी एकदम फिट आहे, चपखल.

बाहेर धुमाकुळ घालणा-या आणि मलाही तेवढीच भुरळ घातलेल्या अजयच्या 'प्रितीच्या विंचू'ची अनुपस्थिती भावली. ते कुठेही आलं असतं तरी टेंपोच गेला असता. 'साजूक पोली अन म्हाव-या 'सारखं त्याचंही ठिगळच झालं असतं. त्या मोहाला बळी न पडण्याबद्दल मंजुळेंचं विशेष कौतुक.

मंजुळेंनी डोक्याला खुराक दिलाय, साखरेत घोळवलेल्या कडू गोळीच्या डोससारखा. हा स्क्रू नवं काही आदळेपर्यंत डोकं पोखरत रहाणार. भविष्यातही जेव्हा जेव्हा फॅण्ड्री बघेन तेव्हा तेव्हा तो स्क्रू पुन्हा लोहचुंबकासारखा येऊन मेंदूला चिकटेल आणि आपलं काम करत राहील हेही आत्ताच माहितीये..

पटकथा, संवाद, दिग्दर्शन, अभिनय.. पहिलाच प्रयत्न (प्रयत्न म्हणायचं का??) इतका खणखणीत... बस्स लगे रहो!! मंजुळेंच्या पुढच्या सगळ्या दमदार वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा..

---------------------------------------------&&&&&&&&-----------------------------------------------
खरंतर हे परिक्षण नाही, चित्रपट पाहून मला जे वाटलं ते फक्त शब्दांत मांडलेलं आहे इतकंच.

तंत्रातलं मला काही कळत नाही. पण पडद्यावर दिसणारं दृष्य आवडतंय हे मात्र नक्कीच सगळ्यांनाच समजू शकतं. आपण लहानपणी खेळताना उन्हाळ्याच्या सुट्यांमधे सुर्यास्ताच्यावेळी ढगांचे वेगवेगळे आकार आणि रंग एका कुणाचं तरी लक्ष जायचं आणि मग सगळेच मुद्दाम खेळ थांबवून थबकून बघायचो, त्यात निरनिराळे आकार शोधायचो. आता मोठं झाल्यावर आपल्याला कोणत्या ऋतुत आभाळ साधारण कसं दिसणार ह्याचा अंदाज असतो, कोणत्या तिथीला चंद्राची कोर कशी असेल त्या अंदाजाने खिडकीतून, गच्चीतून डोकावत असतो... तसंच आहे हे.

चित्रपट ज्यांनी पाहिलाय, त्यांनी माळरानावरची सारी दृष्यं आठवा... देवळाजवळच्या दृश्यात कॅमेरा आपल्या उजव्या बाजूने फिरत त्यांच्या समोर येऊन थांबतो तेव्हा आधी आपल्या थेट समोरचा आणि बराचसा डाव्या बाजूचा अख्खा परिसर कव्हर करून मग जब्य-पि-यावर स्थिर होतो.. एका दृश्यात पानं गळलेल्या झाडावर उजव्या टोकावर अस्ताचा सुर्य टेकलेला आहे... रंगकाम, सारवण संपल्यावर धुरपी सडा घालताना चकाचक झोपडीबाहेर दमूनभागून विसावलेलं कुटुंब... शेवट्च्या दृष्यात भिंतीवरची व्यक्तिचित्रं सरकत रहातात आणि नेमक्या व्यक्तीवर तो स्थिरावतो!! आणखी किती बोललं पाहिजे दिग्दर्शकानं? स्मित चित्रपट आपल्यासारख्या सामान्य प्रेक्षकांसाठीच जास्त बनतात, फक्त जाणकारांसाठी नाही असं माझं स्पष्ट मत. असो.


मनोरंजनाबद्दल मात्र थोडंसं दुमत असू शकेल... कितीतरी प्रसंगांमध्ये निखळ ते खळखळून या पटीत हसू येतं! इथे मला खुप मोह होतोय उदाहरणं द्यायचा पण आवरायला हवा. पण तरीही असंही म्हणेन की शेवटी हा काही १००कोटी क्लबातला चित्रपट नाही.
--------------------------------------------&&&&&&&&&&-----------------------------------------

Monday, February 10, 2014

Dream..

I wish to have a small home like this once... to be only me and also to be with only myself... a home surrounded by all types of natural sit outs...where I can quietly listen to the huge volumes of silence... totally cut off from the so called civilization!!

 Photo: I wish to have a small home like this once... to be only me and also to be with only myself... a home surrounded by all types of natural sit outs...where I can quietly listen to the huge volumes of silence... totally cut off from the so called civilization!!

Monday, January 20, 2014

यशोदा...

ध्यानीमनी नसताना धाडकन अचानक तुमच्या छान मैत्रीणीचा फोन येतो, वेळ काढ, ताबडतोब भेटू या असा… मी रिकामी आणि ही माझ्या शतपट गुंतलेली! अनंत व्यापांत स्वत:हून गुरफटलेली, काही महिने भारतात काही बाहेर असे हेलपाटे घालणारी, त्यातच स्वत:चे छंद - तब्येतीची काळजी हे सगळं नीट सांभाळून असंख्य कार्यक्रमांना हजेरी, प्रचंड अवाढव्य मित्रमंडळ आणि स्वत:चा गोतावळा आणि त्यांच्याशी सतत चाललेला संवाद, तरीही या सगळ्यातून आयुष्य जगायचं मात्र मुळ्ळीच न विसरलेली…

मी किती वेळ काढते स्वत:साठी, माझ्या लोकांसाठी, मित्रमंडळीसाठी? किती दिवस झाले कुणाकुणाशी बोलून, कुणाकुणाला भेटून!! लई दिवस, बक्कळ महिने, युगं?? कदाचित…तिच्या एका फोनने काय काय केलं? मला मस्स्स्स्त सरप्राईज दिलं, खूप आनंद झाला आणि खूप विचारही करायला लावला…
मैत्रिणी अशाच हव्यात, हो की नाही ? श्रीमंत मी !!!!!