नील: कशाबद्दल चालल्या आहेत ह्या इतक्या दंगली? इतके का चिडलेत लोक?
मी: सरकार नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणतंय. आपल्या सर्वांना आपण भारतीयच आहोत हे कदाचित सिद्ध करावं लागेल. त्यामुळे लोकांना वाईट वाटतंय, म्हणून वेगवेगळ्या मार्गांनी नागरिकांचा विरोध चालू आहे.
नील: मग करायचं ना सिद्ध, इतका दंगा का करतायत?
मी: बरं. समज, आज आजोबांनी आपल्याला सांगितलं, की कशावरून तुम्ही कोडोलीकर आहात? मला हे सिद्ध करून दाखवा, तर काय करशील?
नील: त्यात काय, मी शांतपणे सांगीन त्यांना, मी नील कोडोलीकर आहे असं.
मी: तू काहीही सांगशील रे, त्यावर ते असाच कसा विश्वास ठेवतील? तुझ्या म्हणण्याला काही पुरावा नको का? तुझा शेरलॉक कसा काम करतो? पुरेसे पुरावे हातात असल्याशिवाय काही बोलतो का?
नील: बरोबर. मी माझी कागदं दाखवीन आजोबांना. मग तर त्यांना मान्य करावंच लागेल मी कोडोलीकर असल्याचं.
मी: बरोबर. पण हे आत्ता बोलतोयस इतक्या शांतपणे खरंच बोलशील त्यांच्याशी?
नील: हो, म्हणजे काय?
मी: बरं. घराच्या पाटीवर तुझं नाव लिहीलं नव्हतं तेव्हा तू जो थयथयाट केला होतास, तो आठवतोय का रे तुला? मीही रहातो ह्या घरात, मग फक्त तुमची दोघांचीच नावं का पाटीवर? हे माझं पण घर आहे, माझे मित्र आल्यावर पाटीवर माझं नाव नाही, त्यांना कसं वाटेल, वगैरे रागावून किती दिवस काय काय बोलत होतास मला. अजूनही कधीतरी कशाचाही राग आला की ओरडत रडत म्हणतोसच की नाही, मी सांगितल्यावर माझं नाव घातलं, आधीपासून नव्हतं घातलं असं.
नील: (ओशाळत हसत) हो मग, मला किती वाईट वाटत होतं तेव्हा.
मी: तसंच लोकांनाही भयंकर वाईट वाटतंय आत्ता. आणि तू किती दिवस थयथयाट करत होतास, तसाच तेही हा वेगवेगळ्या मार्गांनी थयथयाटच करतायत. पण तू आधी म्हणालास तसं हे शांतपणे करता येऊ शकतं. मी चिडून ओरडून सांगितलेल्या गोष्टींपेक्षा गोड बोलून सहज जेव्हा काही तरी सांगते, तेव्हा तू वाद न घालता चुटकीसरशी ऐकतोस, बरोबर आहे का?
नील: होच मग! तू ओरडून बोललीस की तू मालकीण आहेस आणि मी तुझा नोकर असल्यासारखी मला वागवतेयस असं वाटतं, मग मला खूप राग येतो. म्हणून मी ऐकत नाही. एकीकडे म्हणायचं हे घर सगळ्यांचं आहे आणि दुसरीकडे फक्त तू सांगणार तेच होणार घरात, असं का? वा गं, हे बरंय की!
मी: (ओशाळत हसत) हो की रे, माझ्या लक्षातच आली नाही ही गोष्ट. पण बघितलंस का, आत्ता आपल्या देशातही हेच सगळं घडतंय. त्यामुळे खूप नुकसान होतंय.
नीलला ह्यावर काही बोलता आलं नाही. ते अपेक्षितही नाही. हे सगळं जसं बोललं गेलं तसंच्या तसं लिहीलंय. काल सकाळी सव्वा सातला शाळेत जाताना तो पायात मोजे आणि बूट चढवत एकीकडे आकाशवाणीच्या ठळक बातम्या कानावर पडत असताना जिन्यात बसून झालेला निव्वळ दोन ते तीन मिनिटांचा हा ताजा संवाद. रोज वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावरही हिंसाचाराच्या बातम्या तो वाचतोच आहे, पण त्यांचं गांभीर्य झिरपण्याइतकं अजून त्याचं वय नाही. ते समजावण्याइतका माझाही आवाका नाही. पण राहून राहून ९२ साली बाबरी मशिद पाडल्यानंतर उसळलेल्या हिंसाचाराच्या बातम्या वाचताना उडालेला माझा गोंधळ आठवतो. तरी मी बारावीत होते, म्हणजे काही लहान नव्हे. त्यामानाने ह्या मुलांना बरंच समजतंय. ते नीट मार्गाने पोचवण्याची जबाबदारी मात्र न पेलवणारी वाटते.
उघड स्वगत:
लहानपणी शाळेत जाताना येताना दोन्ही वेळेस गाभाऱ्यात जाऊन अंबाबाईचं दर्शन घेणारे आम्ही सगळे, जेव्हापासून देवळात सरसकट आमच्यासाठीही चौक्या पहारे बसले, नियम लागू झाले, तेव्हापासून एकाएकी उपरंच वाटायला लागलं. पण त्याला काही इलाज आहे का? पूर्वी लोकांकडे स्वतःची वाहनं इतकी नव्हती, सुट्ट्या वगळता सगळीकडचीच गर्दी आटोक्यात असे. आता सगळं सामाजिक चित्रच बदललं, जे होतंय ते सर्वांच्या सुरक्षिततेसाठी अपरिहार्य आहे. पण हे बुद्धीला कितीही पटत असलं तरी अंबाबाईच्या देवळात गेल्यावर मनानं पचवताना जडच जातं. ह्या क्षुल्लक बाबीची ही कथा, तिथे भारतीयत्वाबद्दल काय बोलावं! ह्यानिमित्ताने फाळणीच्या वेळी सीमाभागातील लोकांची काय मनःस्थिती असेल ह्याची मात्र एक बारीकशी चुणूक जाणवून जातेय. किरण देसाईंची The Inheritance of Loss आणि अमिताभ घोषांची The Shadow Lines अभ्यासाला होत्या, त्या वाचतानाही असेच अनेक उलटेसुलटे, कधी विषण्ण तर कधी निरुत्तर करणारे प्रश्न पडलेले आठवतात. आणि अशा कादंब-या अभ्यासाला का, ही तेव्हा आकलन न झालेली बाब आज लक्षात येतेय, पटतेय!
No comments:
Post a Comment