वेदशास्त्रसंपन्न डॉ. चिं. ग. काशीकर
काशीकर आजोबांचा आज स्मॄतीदिन. सकाळी दिनवैशिष्ट्यात आकाशवाणीवर ऐकलं आणि आजोबांची खूप आठवण आली. आम्ही १९९३ ते ९८ ऐन सदाशिव पेठेत रहात होतो. पुण्याच्या नावाने खपवले जाणारे कोणतेही अनुभव ह्या सहा वर्षांच्या कालावधीत एकदाही आले नाहीत, उलट पुण्याबद्दल आधीच असलेलं प्रेम ह्या काळात घट्ट झालं. शेवटची अडिच वर्षं पिल्ल्यांच्या शाळेच्या गल्लीत डॉ. काशीकरांचा मौल्यवान शेजार लाभला होता. ते मोठे पंडित आहेत हे जाणवायचं, पण आजोबा गेल्यावर बातम्यांमध्ये त्यांची महती ऐकल्यानंतर ते मोठेपण प्रकर्षाने लक्षात आलं.
काशीकर आजोबा आमच्या खालच्या मजल्यावर रहायचे. घराचा दरवाजा कायम उघडा. जिन्यावरुन जाता येताना बाहेरच्या खोलीतच एका कोप-यातल्या टेबलवर ते लिहित वाचत बसलेले दिसायचे. भरपूर लेखन-संशोधन केलेल्या आजोबांची आतल्या खोलीतही एखादी अभ्यासिका असेल कदाचित, आम्ही आत घरात क्वचितच जायचो, कारण ते बाहेरच असायचे.
आजोबा मुलखाचे प्रेमळ, हसरे, मऊ आवाजात आणि मुख्य म्हणजे आमच्या पातळीवर येऊन आपुलकीनं बोलणारे. सावळा वर्ण आणि चष्म्यातूनही हसणारे डोळे. स्वच्छ धोतर आणि सुती बंडी किंवा सदरा हा घरातला वेश आणि बाहेर जाताना वर खादीचा बंद गळ्याचा कोट चढवायचे, हातात काठी असायची. इतकं पांडित्य त्यांचं, पण आम्ही दिसलो की प्रत्येक वेळी जिव्हाळ्याने विचारपूस करणारच. त्यांच्याशी बोलणं, गप्पा मारणं हा समॄद्ध करणारा अनुभव होता. आम्हा दोघी बहिणींना ते फार आवडत. आमचे आजोबा आयुर्वेदाचार्य आणि स्वातंत्रसैनिक होते, गांधीजींचा सहवास लाभलेले. त्यांच्याविषयी आम्ही खूपदा बोलल्याचं आठवतंय, म्हणजे तेच चौकशी करायचे, तेव्हाच्या वातावरणाबद्दल सांगायचे. कारण आमच्यामध्ये सामायिक असे विषय फार कमी होते, पण आजोबांशी संवाद साधताना तो अडथळा कधी आलाच नाही. कोल्हापूरहून आमचे बाबा आले की आवर्जून त्यांना भेटायचे, तेव्हा बाबांशी बोलतानाही तीच सहजता. काशीकरआजोबा गेले तेव्हा आम्ही तिथे रहात नव्हतो, तेव्हाही बाबांचाच कोल्हापूरहून फोन आला कारण दूरदर्शनला बातम्यांमध्ये ते गेल्याचं सांगितलं गेलं. आजोबांकडे सातत्याने माणूस असे, त्यांची मित्रमंडळी आलेली असायची, विद्यार्थी यायचे, मोठमोठ्याने संस्कॄतमध्ये संभाषण, हास्यविनोद चालायचे. अचंबा वाटायचा. टिमवीत ते फार मोठ्या पदावर आहेत इतकंच त्रोटक माहिती होतं, कारण ना आजोबा कधी त्यांचं मोठेपण जाणवून देत ना आम्ही तितके चौकस होतो.
ते अखंड कामात व्यग्र असायचे. तब्येत उत्तम राखून होते. नीटनेटकं, प्रसन्न व्यक्तिमत्व. कामात असले तरी त्यांच्याशी बेधडक केव्हाही बोलता यायचं, किंबहुना जिन्यात कुणाचीही पावलं वाजली तरी ते दाराकडे बघायचे, जाणा-या येणा-याशी दोन शब्द बोलायचे. पीजी म्हणून रहाणा-या विद्यार्थी विद्यार्थिनींबद्दल ज्येष्ठ नागरीकांचे सहसा काही पूर्वग्रह असतात आणि ते मनाते ठेवूनच त्यांच्याशी बोललं जातं, तशी वागणूक आजोबांकडून आम्हाला कधीच मिळाली नाही. त्याउलट आजींचंच जरा दडपण यायचं.
आजी सुरेख रंगांच्या काठा पदराच्या जरीच्या नऊवारीत, काचेच्या बांगड्या, साधंसं मंगळसूत्र आणि ठळक कुंकवाच्या टिळ्यात अगदी मूर्तीमंत सवाष्ण असायच्या. वर्ण लख्ख गोरा. आजोबांना अगदी शोभेशा होत्या. मुद्रा जरा त्रासिक, कपाळावर कायम आठी आणि बोलणं थोडं तुसडं. त्यामागे तब्येतीच्या तक्रारी, संसारातले कडूगोड अनुभव, आजोबांची व्यवधानं सांभाळणं, अशी अनेक कारणं असू शकतील. घरचा स्वयंपाक, आलंगेलं सगळं स्वत: सांभाळायच्या. आमच्याशी ब-या बोलायच्या, पण एकंदरीत स्वभाव खाष्ट असावा. अर्थात तेव्हा त्यांचं वयही पुष्कळच होतं, आजोबाच नव्वदीकडे झुकलेले होते. लहर असेल तर गप्पा मारायच्या, एखादा पदार्थ वर पाठवायच्या किंवा वाटीत लाडू वगैरे हातावर ठेवायच्या. पण हे नियमित नाही. संसार मात्र समर्थपणे सांभाळला असावा त्यांनी, तो सूर त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीत जाणवायचा, हे आज आठवताना कळतंय.
आजोबांचं तसं नव्हतं. त्यांचं काम केवढं महत्त्वाचं आणि एकाग्रतेनं करण्याचं होतं, पण कधीही त्याचं त्यांनी अवडंबर माजवलेलं आठवत नाही. ते पहिल्याच मजल्यावर, खरंतर स्टिल्ट मजला होता तो, रहायचे. तीन मजली इमारतीत अखंड वर्दळ, मधे चौक आणि चारी बाजूंनी फ्लॅट्स, पुढे चाळीसारख्या कॉमन गॅल-या अशी रचना असल्यामुळे बायका आपापल्या दारात उभ्या राहून समोर, खाली, वर अशा कशाही कोणत्याही वेळी गप्पा मारायच्या, त्यात आम्हीही आलो. तळमजल्यावरच्या मोठ्या चौकात मुलं खेळत असायची. त्यात आजोबांची गोडुली, चुणचुणीत आणि हुशार आजोबांना शोभणारी नात अमरजाही असायची. एक छोटी इमारत सोडून पलिकडेच अगदी लागून वाहता टिळक रोड आणि टिळक स्मारक चौक. त्यामुळे गाड्यांचे मोठे हॉर्न्स, मिरवणुका वगैरे आत ऐकू यायचं. हे सगळे आवाज सर्व मजल्यांपर्यंत घुमत पोचायचे. पण आजोबांना कधीही त्या दंग्याने कलकल झालीये, त्यांच्या अभ्यासात व्यत्यय आलाय असं झालेलं आम्ही होतो तेवढ्या काळात तरी आठवत नाही. कारण ती मुळात वॄत्तीच नव्हती त्यांची. समाधानी, तॄप्त, शांत मनाचे होते. इतके दिवस शेजारी राहूनही त्यांनी त्यांचं मोठेपण, पद जाणवू दिलं नाही, ह्यातच खरंतर सगळं काही आलं. माणसं मोठी कशी होतात, असतात, ते त्यांच्याकडून समजावं. त्यांची मुलगी आमच्या मजल्यावर समोरच रहायची, तीही हुशार आणि कर्तबगार असावी, मात्र तिचाही चेहरा सदोदित दुर्मुखलेला असायचा. नात मात्र आजोबांवर गेली होती. अगदी प्रसन्न. अमरजा आता काय करते ह्याबद्दल उत्सुकता आहे, काही संपर्क नसल्याने कल्पना नाही.
शोभनाताईंशी बोलताना आजोबांचे टिमवीतले अनुभव, त्यांचे इतर पैलूही कळले. आदर द्विगुणित झाला. पण ताईंशी ओळख होईपर्यंत आजोबा गेले होते, नाही तर भेटता आलं असतं पुन्हा. शोभनाताईंनीच आजोबांच्या हुशार, कर्तॄत्ववान मुलावरही एक लेख लिहीला आहे. काशीकरआजोबा आठवले की पुलंनी रेखाटलेलं त्यांच्या आजोबांचं 'ॠग्वेदीं'चं व्यक्तिचित्र आठवतं. बरंच साधर्म्य होतं दोघांमध्ये. त्यांचा जवळून सहवास मिळाला हे आमचं भाग्य. आजोबांना आज सादर अभिवादन आणि आकाशवाणीचे मनापासून आभार.
No comments:
Post a Comment