म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Thursday, March 26, 2020

 #कोरोना 
#लॉकडाऊन

येणे सुखे रूचे एकांताचा वास l

नाही गुण दोष अंगा येत l

तुका म्हणे होय मनाशी संवाद l
आपुलाची वाद आपणाशी।
🌼🌼🌳🌼🌳🌼🌳🌼🌼


Saturday, March 21, 2020

 ते बाकी सगळं खरं, पण

जागतिक कविता दिवस,
जागतिक बाहुली दिवस आणि
जागतिक वन दिन
आज आहेत.
सौजन्य - आकाशवाणी कोल्हापूर केंद्र
तर आपापली आवडती कविता शेअर करा आज सगळेजण. तेवढंच विषयांतर होईल जरा.
ही माझी एक आवडती-
पुष्कळा~ पु. शि.रेगे
..
पुष्कळ अंग तुझं ,
पुष्कळ पुष्कळ मन ,
पुष्कळातली पुष्कळ तू,
पुष्कळ पुष्कळ माझ्यासाठी
बघताना किती डोळे पुष्कळ तुझे,
देतानां पुष-पुष्कळ ओठ,
बाहू गळ्यात पुष्कळ पुष्कळ,
पुष्कळ उर
पुष्कळाच तू, पुष-कळावंती,
पुष्कळ पुष्कळ पुष्कळणारी

Thursday, March 19, 2020

 

🙂Hakuna Matata🙂
मंडळी, आज आनंदी रहाण्याचा, असण्याचा आंतरराष्ट्रीय दिवस! International Happiness Day.
आनंद हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे, पण तो आपण बजावतच नाही.
असं म्हणतात की, bad memory is the key to happiness. And I am happy to be blessed with that😊 वाईट सगळं सोडून देऊन मजेत जगणं सोपं नाही, पण शक्य नक्की आहे. Be rational and just move on.
So be happy always! तुम्हा सगळ्यांना भरपूर शुभेच्छा 🤗





 

🌼आपले नेहमीचे दहीपोहे🌼

 १०२ राष्ट्रांमधल्या शाळा आणि महाविद्यालयं सध्या बंद आहेत, अशी बातमी सकाळी एआयआरनं दिली. काही दिवस सगळे घरी असणार आहेत, तर इतर अनेक उपक्रमांप्रमाणेच 'उदरम् भरणम् विचार आणि कृती' ही एक बाबालोकं आणि मुलांनी एकत्रित करता येईल अशी वेळेचा सदुपयोग असणारी चांगली आणि महत्त्वाची अॅक्टिव्हिटी आहे. दिवसातून एक पदार्थ करायला हरकत नसावी. आईआजीलोकांनी कटकट न करता निवांत बसावं, विचारलं तर मार्गदर्शन करावं, आनंदानं आयतं खावं आणि ओट्यांवरचे पसारेही थोडे दिवस नजरेआड करावेत, हे खास सजेशन. ते पसारे काय, तुम्ही एका फटका-यात स्वच्छ करू शकता. त्यानिमित्ताने तुमचेही मेडिटेशनचे वास्तविक धडे गिरवून होतील

🙂
घरी करत असलेल्या रोजच्या साध्याच नाश्त्यांची ही मालिका सर्वांसोबत पुन्हा शेअर करतेय.
🌼तिखटामीठाच्या मेथीपु-या🌼

Monday, March 16, 2020

 खेळ.

खतरों के खिलाडीचा ब्रेक.

अवकाळीसुट्टी.

कोरोनाच्याअवकृपेनेमुलंखुश.








Friday, March 13, 2020

 माझे एक अत्यंत आवडते लेखक. रविंद्र पिंगे.

वाचक म्हणून आपापला असा एक विशिष्ट पिंड असतो. त्या जॉनरचं लेखन वाचताना तुम्ही त्या लेखनाचा जास्तीत जास्त आनंद घेता, ताणात असाल तर हे लेखन वाचता वाचता ताण हलकेच उतरत जातो, कधीही कुठेही कोणत्याही मन:स्थितीत तुम्ही तुमच्या पठडीचं लिखाण वाचायला मनानं तयार असता, ते पुन्हा पुन्हा वाचतानाही तुम्हाला कंटाळा येत नाही.
माझा पिंड जरासा बाळबोध प्रकारात मोडतो. सकारात्मक, मन प्रसन्न करणारंच लेखन/गाणी/कविता/चित्रपट मला जास्त आवडतात. फार बुद्धिमान, तर्कावर घासलेलं, कोणत्याही प्रकारचा मानसिक ताण देणारं लेखन मी एका मर्यादेपलिकडे सलग वाचू शकत नाही, मधे हलकीफुलकी विश्रांती घ्यावी लागते. जड मजकुराचं कोणतंही पुस्तक मी अनेकदा थांबत, रवंथ करत, मधेच ना सी फडके, योगिनी जोगळेकर, चांदोबा असं काहीही वाचत पूर्ण करते. अशानं माझा टेंपो जात नाही. जड चित्रपट/ कवितांच्या वाटेला जात नाही. तसंही जगातलं यच्चयावत सगळं तुम्ही पाहिलं/ऐकलं/वाचलेलं असावं असं मुळीच नाही, ठरवलं तरी ते शक्यही नाही. अर्थात, आपण आपल्यासाठी वाचत/ऐकत/पहात असलो तर, हे सगळं. अभ्यास, छंद म्हणून वाचन करणा-यांचे निकष वेगळे.
तर गोनीदा, पिंगे, राजाध्यक्ष, दळवी, माडगुळकर, कर्णिक, ही चटकन डोळ्यासमोर येणारी नावं. गौरीही आवडते. हे कुणीही तसे बाळबोध पठडीत बसत नसले तरी. रविंद्र पिंगे वाचून खूप बरं, हलकं वाटतं. त्यांनी दुस-या रांगेतले लेखक म्हणून स्वत:च स्वत:ला मान्यता देऊन टाकलीये. त्यांच्या लेखनासाठी त्यांनी त्यांच्या मानाने घेतलेले कष्ट जाणवतात. अफाट वाचन जाणवतं. इंटरनेट अस्तित्वात नसलेल्या काळातलं संशोधन आणि संकलन कौतुकास्पद आहे. हे सगळेच लोक पोटार्थी राहून कडेकडेने लेखनव्यवसाय करणारे होते, त्यामुळे त्यांच्या कष्टाचं मोल वाटतं. अनेकांना सर्वोत्तम पिंगे माझ्या आवडीखातर भेट दिलंय. अर्थात अनेकांच्या पुस्तकांच्या कपाटात अशी भेट दिलेली पुस्तकं न उघडता धूळ खात, निव्वळ शोभा वाढवण्यासाठी सजवलेली दिसतात, हा अनेकांचा अनुभव असेल. हा पिंग्यांच्या मुलीनं लिहिलेला लेख आवडला. व्यक्तिमत्वावरून पिंगे कुटुंबवत्सल दिसतात आणि ही कुटुंबवत्सलता त्यांच्या लेखनात झिरपते, हे पिंगे वाचलेल्यांना वेगळं सांगायला नको.


Sunday, March 8, 2020

 #आंतरराष्ट्रीयमहिलादिन

मु. पो. कोल्हापूर. आमची इमारत. मजले पाच. घरं दहा. बहुतांश बि-हाडं आजुबाजूच्या पंचक्रोशीतून नोकरीव्यवसायानिमित्तं येऊन इथे स्थायिक, मुळं गावाकडे घट्ट. इमारतीत मुलंमुली सगळी मिळून दहा. सर्व बारा वर्षांखालील. नील वगळता सगळी इंग्रजी माध्यमात, सर्व मुलंमुली एकत्र शिकणा-या शाळांमध्ये.
इमारतीत खेळताना मुलांनी आणि मुलींनी एकत्र खेळायचं नाही, असा नियम आहे. आयामाणसांनी ठरवला आहे. वडीलमाणसांनी ह्यात लक्ष घालणं निषिद्ध आहे.
**************************************
(काहीजण हसताहेत ह्या पोस्टला, कारण कळू शकेल का? हे अत्यंत गांभिर्यानं मांडलेलं आहे आणि ते खरोखरच गंभीर आहे.)

Saturday, March 7, 2020

 #आंतरराष्ट्रीयमहिलादिन

नील तासंतास भातुकली खेळतो. त्या खेळात त्याचे शाळेतले सवंगडी (इतका सुरेख शब्द वापरायलाच मिळत नाही) पण मनापासून रमतात. इथे शेरलॉक-वॉटसन, बन्या फेणे, लंप्या, हॅरी, झॉंबीज्, आणखीही कुणी कुणी मिळून सुखेनैव बागडतात आणि गुण्यागोविंदाने भांडीकुंडी खेळतात. स्वैपाक करता करता एकीकडे केसेसही सोडवतात. नील वगळता ह्यातल्या एकालाही हे एकही पात्र ठाऊक नाही, पण त्यामुळे त्यांच्या कोणत्याही मजेत बाधा येत नाही. एकदाच कधीतरी दिवसभर खपून कुटून ठेवलेला विटकरीचा डबाभर चुरा ह्यांना चहा करण्यापासून ते प्रसंग पडल्यास शत्रूच्या डोळ्यात धूळ फेकण्यापर्यंत सर्व बाबतीत उपयोगी पडतो. हा खेळ कित्येक तास श्रद्धेनं आणि विनावादविवाद चालतो. श्रद्धा तरी केवढी, एकदा तो तंतोतंत दिसणारा चहा एकजण खोटा आहे हे माहीत असून विनाशंका गटकन प्यायला, तेव्हा एकदाच जरा लक्ष घालावं लागलं होतं.
सांगण्याचा मुद्दा असा की ह्या मुलांचे रंगलेले खेळ बघून क्वचित कधीतरी मुलीही सामील होतात त्यांच्यात. त्यात शाळेच्या वेगवेगळ्या वेळा, शिकवण्या, घरचे अभ्यास, ह्यातून वेळ उरलाच तर आयांच्या मर्जीनुसार परवानग्या, कुणी एक नाही आली तर दुसरी इच्छा असूनही येऊ शकत नाही, अशा अनेक कारणांनी सातत्य नसल्यामुळे हर्मायनी, सुमी वगैरेंच्या जागा अजून रिकाम्याच आहेत. त्यातून जेव्हा येतात तेव्हा एकदा तरी चिडाचिडी होतेच आणि इतका वेळ खेळताना कसलीही अडचण नसलेल्या मुली जाता जाता 'अव्वा, मुलं असून भांडीकुंडी खेळतायसा होय' अशी मुलांना भडकवणारी टिप्पणी करून जातात. मग खरंच भडकून 'पुन्हा कधी त्यांना खेळायला घेणार नाही, तू मधे पडायचं नाही' असा सज्जड दम मला मिळतो.
मुलांच्या रोजच्या आयुष्याचा भाग नसलेल्या ब-याच गोष्टी मुलांना लक्षातही ठेवाव्या लागतात, जे साहजिकच त्यांना जड जातं. ताटात हात धुवायचे नाहीत, ताट स्वत:च उचलून ठेवायचं, कप आणि पेले वापरले की धुऊन टाकायचे वगैरे. हे सगळं त्यांनी त्यांच्या घरी केलं तर चालणार नाहीये. घरातल्या आयाआज्यांना ते पसंत पडणार नाहीये. भातुकली खेळतात हे घरी सांगतात का ही चौकशी कधी केली नाही. उगीच विरस नको त्यांचा. पण अगदी हळूहळू ह्या गोष्टी निदान त्यांच्या भातुकलीत तरी डोकावतायत.

Friday, March 6, 2020

 #आंतरराष्ट्रीयमहिलादिन

इमारतीची लिफ्ट पाच दिवस बंद होती. कारभार बघणारे कुणी लक्ष घालतील म्हणून सुरुवातीचे दोन दिवस वाट पाहिली. हालचालींना फार काही वेग नव्हता. आम्ही पाचव्या मजल्यावर. लक्ष घालणं आलं. वार्षिक करार असणा-या कंपनीच्या मनुष्याला दोष सापडेना, त्याने हात वर केले. (ह्याने सर्वात कमी दर सांगितला, हा करार करण्याचा निकष) म्हणून एका इलेक्ट्रिशिअनला बोलावण्यात आलं(!). त्याला दोष सापडणार नव्हताच, मग आधीच्या वर्षी काम पहाणा-या लिफ्ट तंत्रज्ञाला बोलावणं धाडलं. त्याने अर्धा दिवस खर्चून दोष शोधून एक पार्ट गेल्याचे आणि तो बदलावा लागेल असे सांगितले.
तो पार्ट आणून बसवला तरीही लिफ्ट सुरू झाली नाही. तेव्हा पुढचा पूर्ण दिवस बसून त्याने आणखी एक पार्ट गेल्याचे आणि तो दुस-या दिवशीच आणता येईल असे सांगितले. ह्या पूर्ण दिवसात मी जातीनं त्याच्याबरोबर थांबून तो नेमकं काय करतो आहे हे समजून घेऊन बघत होते. त्याला अधेमधे चहापाणी देत होते. तो काय करतोय ते सहज समजत होतं. पण एक बाई बरोबरीनं उभं राहून प्रश्न विचारत असल्यामुळे तो जरा अवघडल्यासारखा वाटत होता.
जेव्हा उद्या पार्ट आणायचे ठरले तेव्हा मी त्याला माझ्या अधिकारात 'तो उद्या ताबडतोब घेऊन या, काय लागतील ते पैसे मी देते' असे सांगितले. लिफ्ट बंद असल्याने सर्वात मोठी गैरसोय आमचीच होत होती. मात्र त्या बिचा-याने इमारतीतल्या त्याच्या ओळखीच्या गृहस्थांशी माझ्या सांगण्याची खातरजमा करून घेतली आणि मगच दुस-या दिवशी तो पार्ट आणून बसवला. तेव्हा पैसे मात्र माझ्याकडून घेतले😄 ह्या सर्व घडामोडींमध्ये आठवडाभर लिफ्ट बंद असूनही इतर कोणत्याही स्त्री किंवा वयस्कर सदस्याने गैरसोय होण्याबद्दल तक्रार केली नाही, हे नवल.

Tuesday, March 3, 2020

 नाचणीची आंबील

उन्हं चटकायला लागलीत. आमच्यासारख्या प्रकृतीनं आणि माथ्यानंही तापट लोकांना ताबडतोड उपाय सुरू करावे लागतात😊
दोन चमचे नाचणीचं (किंवा ज्वारी, तांदूळ पीठसुद्धा) पीठ पेला दीड पेलाभर पाण्यात चवीपेक्षा दाणाभर जास्त मीठ, ठेचलेला कच्चा लसूण आणि भाजलेल्या जी-यांची पूड घालून शिजवायचं. सतत ढवळत रहायचं. हळूहळू घट्ट होत जातं, एक पूर्ण उकळी आल्यावर आच बंद करायची. कोमट झाल्यावर ताक मिसळून प्यायचं. नंतर अॅड होणा-या ह्या ताकासाठी दाणाभर मीठ जास्त घालायचं. कोथिंबीर वगैरे ऐच्छिक. दोन तीन चमचे पीठाची पाणी आणि ताक धरून पातेलंभर होते आंबील.
पीठ रात्रभर किंवा दिवसभर भिजवून आंबवून केली तर जास्त उत्तम. आंबवून केलेली म्हणून आंबील. कुणी दह्या/ताकातच शिजवतात, कुणी कल्चर तयार करून ठेवून लागेल तसं आणि तेव्हा ताक घालून पितात. फ्रिजमध्ये ठेवल्यास आणखी छान लागते, नाही ठेवली तरी चालते.
ज्वारीच्या आंबिलानं पित्त होऊ शकतं, नाचणीची आंबील मात्र पूर्ण पौष्टिक. थंड, भरपूर कॅल्शिअमयुक्त आणि साखरसम्राट लोकांसाठी अत्युत्तम.
इथले सुगरण सुजन जास्त सांगतील. मी उरकाउरकी पंथाची अनुयायी, त्यामुळे फार कष्टांचं आम्हाला वावडं🙂