म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Wednesday, November 4, 2020

 काय लिहिलंय! याड!

❤️ सध्या मौसम सुरू आहे.
बुचानं झपाटलेल्यांचा एक क्लब करायला हवा.
कोल्हापुरात जाता येता शोधत असते, मोजून दोन सापडलीयेत, तशी शहरभर खूप असतील पण आमची गाठ पडली नाही अजून.
सुदैवानं पुण्यात घराच्या इमारतीत दोन झाडं लावून मी थोडा तरी आस्वाद घेऊ शकलेय. तिस-या मजल्यावर एक स्वैपाकघराच्या खिडकीशी येतं तर एक गच्ची आणि बैठकीच्या खिडकीशी. लावतानाच तशी लावली आहेत. मौसमात गच्चीत सडा पडतो आणि फुलं हातांनी खुडता येतात. फांदी आणि लटकणारी झुंबरं थेट नाकाशी असतात. पोट आणि मन भरत नाहीच. पण तुका म्हणे त्यातल्या त्यात. माझी ही झाडंसुद्धा परिसरातला लॅंडमार्क आहेत. पुढेमागे उडणारेत. त्याला काही नाइलाज नसणारे.
https://www.facebook.com/share/p/1BEMxCSegY/ (कौस्तुभ केळकर नगरवालांची पोस्ट - वाट्टेल ते
"बूच".
बूच.
हे काय झाडाचं नाव असू शकतं ?
आहे खरं.
बूचाच्या झाडानं 'ऊंची वाढवा'चं औषध,
बोर्नव्हिटासारखं ,
लहान असताना रोज घेतलं असावं बहुतेक.
पटाटा वाढत जातं.
ऊंचच ऊंच.
वही तों....
प्यारसे लोग ईसे 'गगनजाई' केहते है !
आकाशनिंब नाहीतर गगनजाई.
बूचाच्या झाडाला सगळं काही शोभून दिसतं.
अगदी ही देशी नावं सुद्धा.
तेच तर सांगतोय.
आपल्या ईथलं नाहीये हे झाडं.
ब्रह्मदेश आणि मलेशियातून ईथं आलं.
आलं , त्यानं जिंकलं आणि या मातीत ते आनंदानं रूजलं.
सडपातळ बांधा,सरळ स्वभाव, ताडमाड ऊंची.
दुसर्यांना भरभरून देण्याची वृत्ती.
माझ्यासारखी साधी सरळसोट माणसं आणि बूचाचं झाड.
म्हणूनच 'स्पेशल' असतात.
हं....
याच्या नावाच्याही दंतकथा आहेत.
झाडाचं खोड खवल्या मांजरासारखं.
सहज ढलप्या निघतात.
या ढलप्यांपासून बाटलीची लाकडी बूचं बनवतात.
म्हणून या झाडाचं नाव बूच ठेवलंय म्हणे.
फार फार ईयर्स अॅगो पुण्यात एक ईंग्रज अधिकारी होता.
त्याचं नाव बूच.
पुण्यात येण्याआधीचं त्याचं पोस्टींग ब्रह्मदेशात होतं.
तिथनं त्यानं हे झाड ईथं आणलं.
खडकीच्या परिसरात लावलं.
म्हणून या झाडाचं नाव बूच.
काही का असेना....
हे झाड माझ्या प्रचंड आवडीचं होतं.
या झाडानं मला अगदी 'झपाटलं' होतं.
नगरला फारसं दृष्टीस पडायचं नाही.
कराड मात्र खरंच श्रीमंत होतं.
घाटावरच्या बागेत, टाऊन हाॅलपाशी भरपूर बूचाची झाडं.
मन करा रे प्रसन्न !
करायला कशाला हवंय ?
तिथं गेलं की आपोआप प्रसन्न वाटायचं.
कहर म्हणजे आमचं काॅलेज...
मेन बिल्डींगच्या मागे आणि ईलेक्ट्रीकल बिल्डींगच्या पुढे.
मधल्या कोपच्यात पंधरावीस बूचाची झाडं.
त्याखाली कडप्प्याची दोन चार बाकं.
तिथं बसायला मला प्रचंडच आवडायचं.
बूचाच्या फुलांचा पांढरा सडा पडलेला असायचा.
मंद धुंद अॅमाॅस्फीयर.
लेक्चर हाॅलपेक्षा ईथंच छान वाटायचं.
मी समाधी साधनमय होऊन तिथंच पडीक असायचो.
अशा ठिकाणी ईलेक्ट्रीकलचं पुस्तक कसं पचणार ?
मस्त कादंबर्या वाचत बसायचो.
कुठं तरी वाचलेलं.
मादक स्त्रीच्या शरीराला एक विशिष्ट वास असतो म्हणे.
मी तिथंच ईमॅजीन केलेलं.
नक्की तो वास बूचाच्या फूलांसारखा असणार.
दुसरा आॅप्शनच नाही.
काॅलेजमधनं रूमवर जाताना,
बोटाच्या अंगठीत बूचाची फूलं खोवून जायचो.
सायकल चालवत मधनं मधनं हुंगायचो.
भारी वाटायचं.
मी कुठला तरी नवाब.
लखनऊच्या कुठल्या तरी कोठीवर.
मुजरा, कजरा, गजरा...
"ईन्ही लोगोंने...."
छम छम...
हाताला मोगरीचा टप्पोरी गजरा.
कऽऽऽट.
मोगरीचा नाही बूचाच्या फुलांचा भरघोस गजरा.
आफ्टरआॅल ईटस् माय लाईफ.
ईटस् माय स्वप्न.
हं...
ठरलं तर मग.
यावेळी राहिलं.
पुढच्या जन्मी.
फिकर नाॅट.
सात जन्म आहेत आपल्याकडे.
पुढच्या जन्मीचं प्रीवेडींग शूट बूचाच्या झाडाखाली.
मी आणि ती.
म्हणजे हीच.
ती पांढरा शुभ्र झगा आणि मी पांढर्या सुटात.
वरनं पांढर्या बूचाच्या फूलांचा पाऊस...
कही नजर ना लग जाये..
साला रोमांटी आरोमा फोटोत सुद्धा जाणवायला हवा.
बेधुंद मनाच्या लहरी...
मी म्हणलेलं.
या झाडानं मला झपाटलेलं.
त्याची झुंबरासारखी ऊलटी फुलं.
सरळसोट .
अत्तराची बाटली ऊलटी केल्यासारखा सुगंध सांडणारी.
ओसंडून वाहणारी श्रीमंती.
जितकी फुलं खाली तितकीच झाडावरती.
सुगंधाचा न आटणारा धबधबा.
नगरला नवीन घरी हट्टानं बुचाचं झाड लावलं.
भराभरा वाढलं.
त्याचा वास लॅन्डमार्क झालेला.
जिथं बुचाच्या फुलांचा वास येईल ते घर माझं...
नंतर ते कंपाऊड वाॅलला ढुशा मारायला लागलं.
शेवटी..
लागी करेजवा कट्यार.
काळजावर करवत फिरवून ऊडवलं त्याला.
चलता है !
मागच्या वर्षी लेकींना घेऊन आगाखान पॅलेसमधे गेलेलो..
येता जाता बूचाची झाडं.
हात धरून भोंडला खेळणारी.
सुंगंधगाणी गाणारी.
आम्ही सगळे मॅडसारखी फुलं गोळा करतोय..
पोरी एकदम मॅड झालेल्या.
मनात आलं..
हे झाड म्हणजे राजा माणूस आहे.
पॅलेसच हवा त्याला.
धाकटीनं अनाऊन्सलं.
मी मोठ्ठं घर बांधणार..
आणि त्यात शंभर बूचाची झाडं लावणार.
मी डबलमॅड झालेलो.
आनंदानं तिचा गोड पापा घेतला.
काय सांगू ?
हार्टच्या नाकाला बूचाच्या फुलांचा वास आला !
.....कौस्तुभ केळकर नगरवाला.
*माझी पोस्ट नावासकट शेअर करायला माझी ना नाही.)

No comments:

Post a Comment