म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Wednesday, November 4, 2020

 Happy Birthday @ 55 Man!

ठोका अजूनही न चुकता चुकतोच आणि कायमच चुकत रहाणार, 'काही माणसां'बाबतीत मीच राम म्हणेपर्यंत तरी ते काही चुकत नाही आता. ह्या 'काही माणसां'त सोमणांच्या मिलिंदइतकाच तो इंगळेंचा मिलिंदही आहे. 'काही माणसे' हे वाचतील अशी बारीक आशा. नोंद घेतली तर दुधात साखर.
जब कभी मैंने तेरा चॉंदसा चेहरा देखा, ईद हो या के ना हो मेरे लिये ईद हुई, वो जलवा जो ओझल भी है, है सामने भी.. वगैरे वगैरे. जौदे. निव्वळ त्रास.
रविवारी 'विविभा'वर अभिनेत्री तनुजा बहिणीबद्दल बोलताना हे गाणं आपसुकच येणार होतं. काल फॅमिली ग्रुपवर काकानं वहात्या प्रवाहातून गाळून घेतलेला हौशी गायकांनी गायलेल्या यमन चित्रपटगीतांचा एक चिमुकला मेडले पाठवला. त्यात आपसुकच ह्याची वाट बघितली आणि ते योग्य तितक्या फुटेजनिशी आलंच. दोन रसरशीत ललना रोशनच्या आणि साहिरच्या तालावर नाचतात, एक गळ्यानं आणि एक प्रत्यक्ष पडद्यावर, आणि आपला जीवही थुईथुई करतो.
आपल्याही नकळत तयार झालेली आपल्या अनंत इच्छांची एक हनुमानाची लांबुडकी शेपटी फक्त वाढता वाढता वाढे स्वरुपाचीच असते बघा. आणि ती यादी पूर्ण व्हावीच असा काही अट्टाहासही नसतो. माणूस म्हटलं की वाटतंच की हो असं काही काही. त्या शेषला आई कधी कधी रागावते आणि तो लगेच मनाला लावून घेतो, त्याबद्दल ती 'देवराई'तली सीना आईला आणि भावाला एकाच वेळी सांभाळून घेत डॉ ना कशी सांगते, 'रागावल्यावर बोलतं की हो माणूस असं काहीतरी, इतकं काय त्यात', तसल्या प्रकारच्या ह्या याद्या. मनावर घ्यायच्या नसायच्या. तर तसल्या यादीतली माझी एक इच्छा म्हणजे 'निगाहें मिलाने'च्या त्या पहिल्या अठ्ठेचाळीस सेकंदांवर भान हरपून लयबद्ध थिरकता आलं पाहिजे. तेवढं झालं की मग ओघानं अख्खं गाणं जमतंय आपसुकच.
ह्या थिरकण्याची एक निराळी यादी, त्यात 'यार बिना चैन कहां रे' पण आहे. खूपच आहेत खरं म्हणजे. धरणाच्या फुगवट्यासारख्या वाट मिळेल तिकडे वाटेल तशा फांद्या फुटून वाटेल तितक्या याद्या तयार होत रहातात अशा. लंप्याच्या डोक्यासारखं न थांबणारं चक्र आहे तेही. पण थिरकण्यात एक नंबर माशी शिंकणार ती आमच्या आणि नाचाच्या विळ्याभोपळ्यासारख्या मैत्रीमुळे. एक पाऊल धड ठेक्यावर सरळ पडेल तर शपथ!
पण ह्या सोमणकुलदिपकामुळं किंवा 'काही माणसां'मुळे ते जरा मनातल्या मनात का होईना, वाकडं पडतं अधेमधे. म्हणजे अस्मादिक आहेत अजून शाबूत. हाही दिलासा नसे थोडका 🌹
वरच्या मजकुरात कशाचा कशाला काही पायपोस म्हणून असलेला दिसतोय? पण कोल्हापुरात म्हणतात तसं 'इरून फिरून गंगावेश' करत सोमणसमेवर आलेच की नाही शेवटी? मनाचं तरी काय असतं मग दुसरं! येडंय, फार मनावर घेऊ नये ते ❤️

No comments:

Post a Comment