एखादं कितीतरी जुनंच गाणं पहिल्यांदा ऐकलं की ऐकण्याच्या बाबतीत आपण अजून फारच बच्चे आहोत, हा आधीच कुरतडणारा न्यूनगंड आणखी वाढीला लागतो. माझ्याबाबतीत हे नेहमीचंच आहे.
बॉम्बे टू गोवा ही एक शालेय आयुष्यात बघण्याची चीज आहे. बाल शिवाजी, चलती का नाम गाडी, साधू और शैतानसारखे सिनेमे किंवा स्मृतिचित्रे, मृत्युंजय, श्रीमान योगी, ययाती, स्वामी वगैरे पुस्तकं (माझी यादी मोठी होईल, पुढची भर तुम्हीसुद्धा घाला, खूपच सामायिक बाबी निघतील) अशा दहावीतून बाहेर पडण्यापूर्वी करायच्या गोष्टी असतात, त्यापैकी एक. एकदा बघा नाही तर कितीहीदा बघा, तो माझ्यासारख्या आठवणींच्या खंदकाच्याही फ्रेम टू फ्रेम डायलॉगसकट लक्षात रहातोच. असं असूनही हे गाणं कसं कोण जाणे एवढी भली मोठी वर्षं स्कीप झालं होतं. तेव्हा बाकीच्या धमालीत गाणं रजिस्टर झालं नसेल किंवा झालं असतं तरी आरडीची ही आणखी एक कलाकुसर समजण्याएवढी आपल्या अकलेची ऐपतही नव्हती अशी स्वतःचीच थोडी समजूत घातली. पण नंतरही ते एकदाही कधी कुठं ऐकण्याचा योग कसा आला नाही ना कळे. त्यामुळं खरंतर स्वतःवरच चिडचीड होऊन जोरदार आदळआपट कराविशी वाटली. पुन्हा पुन्हा दिवसभर कानांना रतीब घालतच बसलेय. तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. मला आजच ताजं ऐकल्यामुळे अप्रुप.
शब्द काही वेगळे नाहीत, पण चाल मात्र वेगळी आहे. त्यातल्या गोडवा आणि थोड्या संथ लयीनं ऐकताना जीव सुखावतो. अख्ख्या गाण्याला एक विशिष्ट ठहराव आहे आणि ठहराव ही व्यक्तिशः मला अत्यंत मोहात पाडणारी गोष्ट आहे. आपण घरी कामंधामं उरकताना आपल्याच नादात असेच शांततेनं गुणगुणत असतो, जसे लता किशोर गुणगुणतात. अंतऱ्याच्या दुसऱ्या ओळीच्या अवरोही सुरावटीवर दुसऱ्या आवर्तनावर थोडकंच लक्षवेधी नक्षीकाम केलेलं आहे. ह्या गाण्यातला लता आणि किशोरचा भारदस्तपणा विशेष (द्विरुक्तीबद्दल क्षमस्व) आहेच, पण कोरसनं बहारच बहार आणली आहे. बघायला गेलं तर निव्वळ भरणा करण्यासाठी निरर्थक पालुपदं कोरसच्या तोंडी घातली जातात, पण त्या सुरांच्या भरण्यानं गाणं भलतंच वजनदार होतं. हा वरचेवर चर्चेला घेण्याचा विषय आहे आणि त्यासाठी अनंत उदाहरणं घेता येतील. गाण्याचा वाद्यमेळ टिपिकल आरडी छापाचा आहे, त्याबद्दल नवं बोलण्यासारखं काही माझ्याकडे नाहीच. टिपिकल अशासाठी की एखाद्या नवख्यालाही हे आरडीचं गाणं आहे हे चटकन लक्षात येईल.
गाणं पडद्यावर बघायला गेले नाही. अमिताभ अरुणा इराणी काही आवर्जून बघावं असे नाहीत, मात्र गाण्याच्या ह्या ऑडिओ व्हर्जनमध्ये जे फोटोज आलेत, ती ऐकण्याचा आनंद वाढवणारी मेजवानी आहे. मराठी गाण्यांच्या ऑडिओ व्हर्जनमध्ये खुपदा परकीय चेहरे आणि सदोष शब्दकाव्यं वाचणं ही शिक्षा दिली जाते, त्या पार्श्वभूमीवर हे बघणं फारच सुखावह होतंय.
https://www.youtube.com/watch?v=iktnLC_zlW0&list=RDiktnLC_zlW0&start_radio=1
No comments:
Post a Comment