तारकर्लीला घडलेली घटना भयंकर आहे. त्यावरून पंधरा सोळा वर्षांपूर्वीची एक आठवण झाली.
गुहागरला निवांत मुक्कामासाठी गेलो असताना त्याच संध्याकाळी एकाच कुटुंबातल्या पाच पर्यटकांना जलसमाधी मिळाल्याची भयानक दुर्घटना घडली. गेले ते पर्यटक बेजबाबदारीनं वागले नव्हते, त्यांच्या पायाखालची वाळू खचली असे प्राथमिक कारण समजले. गुहागरचा किनारा अतिशय सुरक्षित, त्यामुळे ह्या घटनेने पंचक्रोशी हादरली. अवघ्या गावावर पसरलेली शोककळा म्हणजे काय हे त्यादिवशी कळलं. मुक्काम आवरता घेऊन आम्ही वेळणेश्वरला गेलो. देवळासमोरच्या टपरीत एक ट्रोलरमालक गाठ पडले. झकपक कपडे, गोल्डमॅनसारखे सोन्याच्या जड दागिन्यांनी मढलेले आणि घड्याळही सोन्याचं घातलं होतं, त्यामुळे ठळक लक्षात राहिलेत.
सगळे सुन्न बसलो होतो. देवळाबाहेरच्या कुंडाकडे बोट दाखवून म्हणाले, 'तीन मोठे ट्रोलर्स आहेत माझ्या मालकीचे आणि मासेमारीसाठी शेकडो मैल आत जातो, उत्तम पोहतो, पण ह्या कुंडात चुकूनही कधी उतरणार नाही. त्याची खोली, रुंदी काही माहित नाही मला. ज्या ठिकाणचा अंदाज नाही, तिथे हुशारी दाखवू नये. पण पर्यटकांना आम्ही असं काही सांगायला गेलो तर आम्हाला किंमत देत नाहीत. आम्हाला काय कळतंय, असा एकंदर नूर असतो. आमचं आयुष्य इथे गेलं, आम्ही दिलेल्या सावधगिरीच्या सूचना जेन्युईन असतात. पण त्यांना पटत नाही.'
कालच्या घटनेच्या तपशीलात गेलेले नाही, पण हा महत्त्वाचा प्रसंग आठवला.
No comments:
Post a Comment