म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Friday, June 18, 2021

 अविच्या खजिन्यातून Avinash Chavan काही वर्षांपूर्वी हकलबेरी फिनचा ठोकळा मिळाला. नीलला तेवढं इंग्रजी वाचणं किंवा मी त्याला समजावत वाचून दाखवणं शक्य नव्हतं. तेव्हाच अविनं भटकबहाद्दर शोधायला सांगितलं होतं. पण ते सहजी सापडत नव्हतं. नंतर एक दोन वर्षांनी रद्दीच्या दुकानात त्या ठोकळ्याची १०-१२ वयोगटासाठीची संक्षिप्त आवृत्ती मिळाली. पण ते वाचण्याइतकाही त्याचा इंग्रजी शब्दसंग्रह अजून पुरेसा नाही. मुळात त्याला इंग्रजीची गोडीच लागलेली नाही आणि ती जबरदस्तीनं त्याच्यावर थोपवण्याचा कारभार मला जमण्यातला नाही. पुस्तक वाचल्याशिवाय आम्ही त्यावरचे चित्रपट बघत नाही. अशावेळी अनुवाद मदतीला येतात. परवा अचानक शशिकांत सावंतांच्या पुस्तकांमध्ये भटकबहाद्दर दिसलं, चौकशी केली, त्यांनी तत्परतेनं त्याची कॉपी पाठवलीसुद्धा. आता दोन-चार दिवस तरी हा खाऊ पुरेल. खाऊ पुरवून खाणं ही हल्ली नीलनं स्वत:च स्वतःसाठी लावून घेतलेली सवय आहे. निव्वळ नाईलाज. नाही तर संध्याकाळीच 'आता काय' ह्या प्रश्नावर त्यालाही माझ्या डोक्याला डोकं लावून बसावं लागतं.

साधारण १०-१६ ह्या वयोगटातल्या, आवडीनं वाचणा-या आणि मराठी माध्यमात शिकणा-या मुलांसाठी, मराठीतून वाचता येईल आणि मुख्य म्हणजे गुंतवून ठेवेल असं फारसं काही सापडत नाही. असेल तर माझा शोध कमी पडत असेल. पण उदाहरणार्थ लंपन, निवडक पुलं, माधुरी पुरंदरे, व्यंकटेश माडगूळकर, निवडक गोनिदा, नारळीकर, फेलुदा, शेरलॉक, हॅरी वगैरे गिळून बसलेल्या बुकासुरांना खायला काय घालायचं असा प्रश्न पडतो. उपलब्ध असलेले बरेच अनुवाद आणून झालेत. नील तसा बरं वाचतो. तो लहान असताना बाबानं केलेल्या आणि तो साक्षर झाल्यावर त्यानं स्वतः नोंदवलेल्या यादीत आताच शेकडो पुस्तकं आहेत. त्या तुलनेत मी अगदीच साधारण वाचक आहे. माझ्या वाचनाला विशिष्ट अशी शिस्त नाही. एका वेळी दोन-तीन आणि एकमेकांशी काडीचा संबंध नसणाऱ्या विषयांची पुस्तकं तीही रमतगमत चाललेली असतात. पण ह्या मुलांचं तसं नाही. पुस्तक हातात घेतलं की त्याचा फडशा पाडल्याशिवाय थांबायचं नाही आणि फडशा असा पाडायचा की कधी खायला मिळालंय की नाही असा प्रश्न पडावा. खाऊची उपलब्धता कमी झाल्यामुळे मग हल्ली पुरवून वाचणं चालू आहे. तरी खूप पुस्तकं पुन्हा पुन्हा वाचणंही चाललेलं असतं. असं असूनही खड्डा आहेच आणि आता स्क्रीनटाईमचा डोंगर तो खड्डा भरून काढतोय. ते जरा त्रासदायक होतंय. इंग्रजी वाचन अगदी कुर्मगतीनं चालू आहे, तो वेग वाढेल तेव्हा वाढो. तोवर अनुवाद जिंदाबाद.

No comments:

Post a Comment