म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Saturday, June 26, 2021

 लवकर संपू नये म्हणून गेले दोन अडीच महिने पुरवून पुरवून वाचलं आरण्यक. वाचताना जीव अक्षरशः मुरला होता त्यात. शेवटी आज संपलंच. अपेक्षित चीडचीड होतेयच. स्वैपाक, घरकाम, ऑफिसकाम, माती न् मसणं एकदाची उरकायची अन् फक्त दोन-तीन पानं चवीनं सावकाश वाचायची असं करत लांबवत आणलं. मंदार काळे एकदा म्हणाले होते, की आरण्यक वाचून संपल्यावर त्यांना 'कट्यार’मध्ये खॉंसाहेब म्हणतात तसे 'दिलमें प्यास जगाना और अधूरी छोडकर...’ असं विभूतीभूषणना वर जाऊन ऐकवायची इच्छा झाली होती. आज मला पण ती इच्छा तंतोतंत पटली. हे वनोपनिषद आपल्यावर पुरती मोहिनी घालतं, ह्यात शंका नाही.

बिहार, बंगाल, थोडं ओरिसा, थोडं झारखंड असा पूर्व भारतातला एक भलामोठा समृद्ध हिरवागार पट्टा हे ह्या कादंबरीतलं मुख्य पात्र आहे. हा छोटा नागपूर परिसर आजवर फक्त भुगोलाच्या पुस्तकात वाचून माहिती होता. तर त्या पट्ट्याचं रितसर मनुष्याच्या रहिवासात झालेलं रुपांतर आणि तिथल्या पवित्र अधिवासाचा अपरिहार्य बकालपणाकडे झालेला प्रवास म्हणजे आरण्यक. मैलोगणती पसरलेली अफाट अस्पर्श वनं, त्यातलं प्राणीपक्षीवृक्षजीवन, त्यांच्याशी निगडित अनेक आख्यायिका आणि त्या सगळ्याचं क्रमानं बदलत गेलेलं स्वरूप, नायकाची सभोवतालाकडे बघण्याची संवेदनशील नजर, सरसकट सगळ्यांसाठी सहानुभूती, त्यानं वेळीअवेळी घोड्यावरून सातत्यानं केलेली मुक्त मनसोक्त भटकंती हे सगळं फार प्रत्ययकारी आहे. पानांमागून पानं फक्त वर्णनंच्या वर्णनं आहेत. अरण्यातल्या सगळ्या दिशांच्या वेगवेगळ्या विभागातली वेगवेगळ्या मौसमातली, ऋतूतली. पण ते वाचताना कंटाळा येत नाही. ये सब बंगाली बाबू क्या खाके लिखने बैठते है की असे दमदार मजकूर उमटतात, असा प्रश्न पडतो. आरण्यकात काहीही अचानक घडत नाही, नाट्यमय घडामोडी नाहीत, मात्र सगळं चित्र यथावकाश अमुलाग्र बदलतं. वाचता वाचता असंच तडक उठावं आणि त्या जंगलांमध्ये दिशाहीन होऊन भटकत सुटावं अशी भावना वरचेवर होत रहाते. नायकासारखीच आपलीही नागरी जीवनाबद्दलची आसक्ती आतल्या आत आटत चालल्यासारखं वाटतं.
फुलकिया किंवा नाढा बईहर, लबटुलिया, धनझरी-महालिखापूरची घनदाट जंगलं, वरच्या हिमालयाला चिकटायला जाऊ पहाणा-या भोवतालच्या पर्वतरांगा, सरस्वती कुंडाचा प-या अवतरणारा अद्भुत परिसर, ग्रॅंटसाहेबाचा वड, पूर्णिया-मुंगेरचे उल्लेख, तत्वनिष्ठ कुंता, चंचल मंझी, हिरव्या हातांचा झाडवेडा युगुलप्रसाद, गनोरी तिवारी, परोपकारी सावकार धाओताल साहू, नर्तक बालक धातुरीया, राजू पांडे, नाममात्र राजा दोबरू पन्ना, त्याचं राज्य असलेल्या चकमकी टोल्याबाहेरचं जग माहित नसणारी निरागस भानुमती, नकछेदी, सुरतिया, चिवट मटुकनाथ पंडित, वर्षानुवर्षं निव्वळ बसून असलेला तरीही चांगला मजेत असणारा एकलकोंडा जयपाल, छाती गोठवणारं हसणारी तरसं, रानम्हशींचा तगडा रक्षक देव टांडबारो. हे नाना परींचे नमुनेदार काल्पनिक लोक आपल्याही घट्ट ओळखीचे होतात. त्यांची परिस्थिती, बिहारी प्रभाव आणि संदर्भ असलेले संवाद, खानपान, वावर, चित्तवृत्ती, शेतीभाती, पीकपाणी, सणवार, कष्ट, गावगाडा, सामाजिक फरक असे अनेक तपशील वरकरणी फारसं कथासूत्रच नसणा-या ह्या आरण्यकथेला गच्च लिंपत पक्कं बंदिस्त करतात.
आणि भाषेबद्दल काय बोलावं! हा अनुवाद तसा ब-यापैकी वजनदार भाषेत आहे. मूळ वर्णन अशा जडजवाहिरी शब्दांतच असावं बहुतेक. पण हे मराठीचं रुपडं खूप देखणं वाटलं, आवडलंच. मराठीतल्या चांगल्या अनुवादांमध्ये आरण्यकाचं नाव ऐकलं नाही कधी. ते का कोण जाणे. राजघराण्यातले भारदस्त खानदानी दागिने ल्यायलेली विशेष मराठी वाटली ही. ह्याआधी शंकर बाळाजी शास्त्रींचं नावही माहिती नव्हतं मला. आता त्यांचं आणखी काय काय आहे ते शोधणं आलं.
कधीही उघडावं, कुठूनही सुरुवात करावी आणि हरवून जावं असं आणखी एक रत्न सापडलं हे.

No comments:

Post a Comment