म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Thursday, January 6, 2022

 कोविडछायेमुळे खंडीत झालेल्या नित्यभेटी यथावकाश मूळपदावर येत आहेत. आज अविला आठवत नाईलाजाने त्याच्या परोक्ष का असेना त्याची पुरेपूर मापं काढत त्याचा यथेच्छ समाचार घेणे हा मुख्य अजेंडा होता. तो कव्हर करता करता नित्यनेमाने गाड्या व्हाया मुशर्रफ-मोदी फोनकॉल, खोपकरांचं कालकल्लोळ, नराला मारून टाकणारी रंगभरीत मादी कोळीण, मित्रमंडळींबरोबरच्या गोवा-महाबळेश्वर वा-या, नोबेल पारितोषिकं, अलिकडच्या नव्याको-या ओळखी, पुस्तक संग्रह - एक डायलेमा, कार्ला-भाजा लेणी, भगतसिंग-राज-दिलीप-देव ते विकी-सान्या, थोड्या उखाळ्यापाखाळ्या, बरंच गॉसिप, अशी वाटावळणे घेत सुसाट धावत राहिल्या. रस्त्यात ह्यावेळी गुरुराजच्या चहासोबत दीपकच्या सामोसे गुलाबजामांचे थांबे होते. आधी ठरवल्याप्रमाणं दोन किलो कचोऱ्या आणि दोन किलो गुजांचा वायदा झालेला आणि संपवण्याची जबाबदारी माझ्याकडं लागलेली. खरं दीपक फरसाणवाल्यांनी नेमका मोडता घातला आणि मामांना काय वायदा पुरा करता आला नाही. नाही तर आज निम्म्या टिंबर मार्केटची तरी चंगळ कुठं जात नव्हती. मग घेतलं आपलं मी भागवून कसंतरी.

रितीप्रमाणं आधी नेलेली चार पुस्तकं साभिप्राय परत केली, चार खास माझ्यासाठी मामांतर्फे मागवून घेतलेली सोबत आणली, तर थोरो आणि दुर्गाबाई मामांकडून सप्रेम भेट मिळाले आहेत. योगायोग म्हणजे अविनं 14 साली क-हाडच्या वाचनालयातून आणलेला दुर्गाबाईंचा हाच थोरो मला डेडलाईन देऊन माझ्याकडून डोक्यावर बसून वाचून घेतला होता.
तर, फक्त आमचंच असं नाही, तर सगळ्यांचंच हे असंच सुरळीत चालू राहू दे रे देवा महाराजा!






No comments:

Post a Comment