म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Saturday, October 15, 2022

 #मार्क्सइनसोहो #सुसंवाद #Parenting #पालकत्व #नाटक

रविवारी 'मार्क्स इन‌ सोहो' बघितलं. नाटक उत्तम आहे, अवश्य बघा. नील आणि मी गेलो होतो बघायला. आम्हां दोघांनाही प्रयोग आवडला म्हणजे नक्कीच अपिलींग आहे, असा माझ्यापुरता सोयिस्कर अर्थही मी काढलेला आहे. नाटकामुळे एक छानशी संध्याकाळ हातात गवसली.
नीलला आता कुठेही बरोबर यायचं नसतं, तरी मी टिच्चून विचारत रहाते. कोणती नस दाबायची ते त्या त्या वेळी ठरवायचं. कोल्हापूरच्या ग्रुपचं नाटक आहे रे, येतोयस का म्हणल्याबरोबर होकार आलाच. उत्साहानं पोचलो. भोवतालच्या गर्दीतले अतिरथी महारथी दाखवले तेव्हा कानात कुजबुजला, अगं मला हिटलर आवडतो हे या कम्युनिस्ट मंडळींना कळलं तर? त्याच्या या विचाराची जाम गंमत वाटली. नाटक आम्ही दोघांनीही चढत्या भाजणीनं एंजॉय केलं. जॉन लेनन ऐकून आणि त्याचा वापर बघून तो चकित झाला. त्याला तो आवडतो आणि मी कधी ऐकलेलाच नाही. महत्वाच्या दीर्घ मोनोलॉगनंतर हा शेवट चेरी ऑन द केक आहे. डॉ. भुताडिया आणि रसिया भाव खाऊन जातात. विशेष म्हणजे नील पुन्हा जाणार आहे नाटकाला. मी तर कॉमर्सचीच विद्यार्थिनी आहे आणि अशा प्रकारच्या नाटकाचा प्रेक्षकवर्ग एकंदरच फिल्टर्ड असणार. पण पंधराव्यातल्या मुलानं रमावं अशा चुरचुरीत संवादातून गंभीर आशयाला जराही धक्का न लावता एक अपेक्षित परिणाम गाठणं ही खायची गोष्ट नव्हे. संहिता, अभिनय, संगीत, वेशभूषा, नेपथ्य, प्रकाशयोजना, सगळं आवडलं. ज्योत्स्ना भोळे सभागृहामुळे हा अनुभव आणखी चांगला झाला, असंही नक्की म्हणेन. सेल्फीला नीलकडून खुशीनं आणि कोणत्याही अटींशिवाय परवानगी मिळाली, हे नाटक आणि एकंदरीत अनुभव आवडण्यावर झालेलं शिक्कामोर्तब. तर हा झाला पूर्वार्ध.
आधीच ठरल्याप्रमाणे नाटकानंतर मॅकडोनाल्ड्सला जायचं होतं. नाटकाबद्दलच बोलत पंधरा मिनिटांत कम्युनिझमकडून थेट सणसणीत कॅपिटॅलिझमकडे पोर्ट झालो. तब्बल साडेचार वर्षांनंतर आलो. बर्गर खाता खाता आम्ही खूपच गप्पा मारल्या. एरवीही आम्ही बोलत असतो, पण हा ओघ निराळा होता. तो त्याच्या कोल्हापूरच्या मित्रांना फार मिस करतो. मग त्यांना घेऊन येऊ या, त्याच्या कोणकोणत्या मित्रांना मॅकडीचा बर्गर परवडू शकतो, आपल्याला परवडतोय का, स्टारबक्सची कॉफी आपण किती दिवस प्लॅन करतोय, मी किंवा हर्षुची आई (ह्या एका रिसॉर्टमध्ये रोजंदारी करतात) किंवा रमेशचे आई-बाबा (हे सोसायटीचे वॉचमन आहेत आणि त्या अनुषंगाने येणारी सगळी कामं दोघांचीही दिवसभर चालतात) तेवढाच वेळ काम करतो, पण आम्हाला मिळणारा मोबदला असमान का आहे, श्रमांना आपल्याकडे बौद्धिक कामाहून कमी पगार का मिळतो, हर्षुच्या आईला नाटक बघावंसं वाटत नसेल का, मला असते तशी त्यांना आठवड्याची सुट्टी नसते. हा भेदभाव असता नये, सगळ्यांचं समान वेतन, समान रहाणीमान होऊ शकत नाही का. मग घरी केलेल्या बर्गरची कॉस्ट काढली. सुदैवानं त्याला मी केलेली पॅटी आवडते आणि आम्ही बऱ्याचदा बर्गर करतो. अगदी लेट्यूस, रंगीत कोबी आणि वाट्टेल तेवढ्या पॅट्या कोंबून, मेयोची अख्खी बरणी रिकामी करूनही घरचा बर्गर स्वस्त पडेल, असं असताना आपण निव्वळ ब्रॅंडची किंमत अव्वाच्या सव्वा मोजतो, ती एवढी कचकावून का घेतात, अशा लाटा पाठोपाठ येत गेल्या.
पण बहुतेक आया हावरट असतात, मी त्याला अपवाद नाही. गडी बर्गर संपवता संपवता ढेपाळला होता आणि सध्या अनायसे तो गारांचा पाऊस वाचतोय, त्या संदर्भानं, आपण एकदा आठवडाभर रोज बर्गर खाऊ असा प्रस्ताव मी मांडला. त्यावर जोरात उसळला, 'ए, गप गं, रोज कोण खाणार हे, मला वरणभात पोळी भाजी पाहिजे बघ. हाच संपेना झालाय आणि रोज कुठं येतीस!' मनातल्या मनात जोराची पिपाणी वाजवत धांगडधिंगा घालून नाचले आणि शोभा भागवतांनाही मनातच साष्टांग दंडवत घातला. पण साळसूदपणा अशावेळी नाही तर केव्हा येणार मदतीला? गप्पांच्या गाडीचं पुढचं स्टेशन आलं. रोज बर्गर नको, पोळी भाजी वरण भात पाहिजे, असं का होत असेल आपल्याला? आपल्या जीन्सची आणि ह्या अन्नाची ओळखच नाही, कारण आपल्या पुर्वजांनी बर्गर पिझ्झे खाल्ले नाहीत. मग ते आपलं कंफर्ट फूडच नाही. वाटीभर तूपगुळ द्या कालवून, मटामटा संपवतो, पण तसं मेयो नाही खाल्लं जाणार. आपण बर्गर पिझ्झे न खाता पोळी भाकरी भात भाजीच का खातो, उष्णकटीबंधातले बाकीचे लोक काय काय खातात, शीत कटीबंधातल्या लोकांच्या अन्नात ब्रॅंडी का असते, अबबबबबब, नाटकाच्या एका दगडानं केवढे पक्षी मारले जावेत, त्याला काही सुमार! भूगोल, अर्थशास्त्र, नाटक, विज्ञान, समाजवाद, पाश्चात्य संगीत, खाद्यसंस्कृती अशी किती स्टेशन्स घेतली आम्ही. शिवाय माझी उजळणी झाली ती निराळीच. आधी डवरेसर आणि नंतर भानूशालीसरांच्या कृपेनं इकॉनॉमिक्स कधी कंटाळवाणं झालं नव्हतं, पण आपणही शिकताना अगदीच पाट्या टाकल्या नाहीत ह्या एवढ्या वर्षांनंतरच्या साक्षात्कारानं जीव नुसता गार गार झाला. हा उत्तरार्ध.
कधीतरी एखादा ट्रिगर बसतो आणि गाड्या भरधाव सुटतात, त्यातलीच गत झाली आमची. तो ट्रिगर नाटकानं दाबला. संध्याकाळचा सबंध सूरच दणकून लागला. लेखकाला आवर्जून हा अभिप्राय कळवला. आता पुढच्या वेळी नाटकाला नील एकटाच जायचाय आणि त्याबद्दल आत्तापर्यंत दोन तीन वेळा विचारूनही झालंय. आपली आईस आपल्याला अगदीच फॅऽ कुठंतरी चल म्हणत नाही, एवढं जरी त्याला वाटलं असेल, तरी मोठा तीर मारला मी. कुणाच्या का कोंबड्यानं, उजाडल्याशी मतलब.




No comments:

Post a Comment