म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Monday, December 20, 2021

 कोणतीही बातमी समजल्यानंतर लगेच व्हॉट्स अप स्टेटसला लावायची घाई का असते आपल्याला! आधी पूर्ण खात्री करून घेऊ या की. कधी कधी खातरजमा करून घेतलेली बातमीसुद्धा खोटी असू शकते. अगदी वर्तमानपत्रं आणि वाहिन्यासुद्धा चुकीचं सांगू शकतात. जरा थांबू, खात्री करू, मग व्यक्त होऊ. पण निदान अफवा पसरवण्यासाठी आपला हातभार लागणार नाही, एवढी तरी काळजी घेऊ.

देव करो आणि अफवा उठलेल्या बातमीबद्दल खडखडीत बरं झाल्यावर ते खुद्द येऊन स्वतः सर्वांची शाळा घेवोत!
हा संदर्भ आज तरी केवळ कोल्हापूरसाठी आहे, पण सर्वांना कायमस्वरूपी ही कळकळीची विनंती आहे.
आई अंबाबाई सगळं बरे करो.
#CDJoshiSir

Saturday, December 18, 2021

 आज गायिका कृष्णा कल्लेंचा जन्मदिवस आहे असं कोल्हापूर आकाशवाणीनं आठवणीनं सांगितलं. अगदी परवा दिवशीच मी खूप शोधत असलेलं 'तू अनश्वरातील अमरेश्वर अविनाशी' हे अवीट गोडीचं गाणं चैतन्यनं Chaitanya चटकन त्याच्या पोतडीतनं काढून दिलं. मन पिसाट माझे अडले रे, रामप्रहरी रामगाथा, श्रीरंग सावळा तू मी गौरकाय राधा, तुझ्याचसाठी कितीदा, अशी रत्नं ऐकताना डोलवतात. आठवणीतली गाणीवर हे सगळे आनंद एकत्र करून ठेवलेली सोय म्हणजे वरदान आहे.

कृष्णा कल्ले, पुष्पा पागधरे, रंजना पेठे, अपर्णा मयेकर, ज्योत्स्ना हर्डीकर, अनुपमा देशपांडे, ह्या सगळ्या गुणी गायिका फार फार आवडत्या आहेत.
https://www.youtube.com/watch?v=JU82MP9z0Zg

Tuesday, December 14, 2021

 मांजरांना, पाळीव प्राण्यांना किंवा खरं म्हणजे सगळ्यालाच (बाहेरच्या किंवा शेजारच्या मुलांनी खेळायला यायचं नाही, कुणीही कोणताही व्यवसाय करायचा नाही, पाय आपटत जिने चढायचे नाहीत, शिवण मशीन चालवायचं नाही, मुलांनी आरडाओरडा करायचा नाही, वगैरे अनेक. पुण्याला नावं ठेवणा-यांनी ह्याची खास दखल घ्यावी) विरोध करणा-या कि-यानिष्ट शेजा-यांना तुम्ही योग्य मार्गानं आणि त्रास करून न घेता कसं तोंड देता? आमच्या शेजा-यांचा सध्या आम्हाला कडाडून विरोध सुरू आहे. त्यातही जे दोन अतीकजाग शेजारी आहेत त्यांच्याच दारात शी करणे, उंदराचं पिटुकलं मारून आणून टाकणे असे उपद्व्याप जेव्हा (मर्फी'ज लॉ!) आपली पोरं करतात, तेव्हा मग आगीत साग्रसंगीत तेल आणि मज्जा. स्वच्छता करून, वास राहू नये म्हणून फिनेल आणि ओझोन भरपूर वापरून पुसून घेतलं. नवी पायपुसणी आणून दोन्ही दारात घातली, दिलगिरी व्यक्त करायला विसरले नाही. मी एक कन्व्हर्टेड मांजर प्रेमी आहे. तरी हे सगळं लिहितेय. सहवास असणाऱ्या सजीवांचा लळा आपोआप लागतोच.

आम्ही पाचव्या मजल्यावर आहोत. विली आणि चिली-मिली आता स्वतंत्रपणे बाहेर भटकत असतात. जिना आणि आमच्याबरोबर लिफ्ट, दोन्ही वापरतात. थेट खाली, थेट वर. जिना वापरताना कुणाच्याही घरी एकदाही शिरलेली नाहीत. त्यांचा कोणताही उपद्रव आजपर्यंत कुणालाही झालेला नाही. आमची मुलं म्हणून कौतुक आहे असं नाही, तर त्यांच्या ह्या सवयींबद्दल सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. कालपासून लिफ्ट बंद आहे म्हणून आमचं उतरणं कमी झालंय. त्यांचं रुटीन चालू आहे. भटकणारी मुलं कशाला घरात बसतील, नाही का? नेमकी आज सोसायटीची मिटिंग आणि बाकी सगळं, अगदी बंद पडलेल्या लिफ्टचाही मुद्दा बाजूला पडून आमची मुलं आणि त्यामुळे होणारा तथाकथित त्रास हाच अजेंडा झाला! अशावेळी एरवी जे गोडीत असतात आणि ज्यांची मुलं आमच्या ह्या तिन्ही मुलांशी मनसोक्त खेळतात, तेही लोक सोयीस्करपणे विरोधाच्या गंगेत यथेच्छ हात धुऊन घेतात. आमची इमारत अजून रजिस्टर्ड अपार्टमेंट नाही. शिवाय कायद्यानं कुणीही रहिवासी पाळीव प्राण्यांना विरोध करू शकत नाहीत वगैरे सगळं माहीती आहे. पण ते बडगे रोज शेजारी रहाताना उपयोगाचे नसतात, सातत्यानं वाकड्यात शिरून रहाता येत नाही आणि मनस्ताप होतो. दोन्ही मुलं अडॉप्शनसाठी द्यायची आहेत, त्यांनाही मदत करायला सांगितलंय.
अशा परिस्थितीत तुम्ही कसा तोडगा काढता?

 My version of a Greek God.

सपशेल क्लिन बोल्ड. देखणेपण, वावर आणि अभिनय, सग्गळं बिनतोड. नजर हटूच नये असं खूप खूप दिवसांनी होतंय. ऑसिजचे फेस कट्स हा एक स्वतंत्र चर्चेचा विषय आहे.

Sunday, December 12, 2021

 साधलेली निमित्तं आणि त्यानिमित्तानं!

साबुदाण्याची खिचडी हा बाबांचा वीकेस्ट पॉईंट आहे. इतकी, की ती खायला घालून तुम्ही त्यांच्याकडून त्यांची अख्खी मालमत्ता खिशात घालू शकाल. पण त्यांना ती स्वतःच्या हातचीच सर्वात जास्त आवडते. (कळलं ना, माझे सर्व प्रयत्न विफल असण्याचं कारण 😜) एरवी हल्ली त्यांना घरच्या साखर कारखान्यामुळे जरा गिल्ट असतो खिचडी खाताना. पण मागच्या आठवड्यात पुपो वगैरे आस्वादूनही कालची रिडिंग्ज अनपेक्षितपणे झक्कास आल्यामुळे आज ऑफिशियल सेलिब्रेशन आहे. त्यात रविवार. डिसेंबरातला. हिवाळा संबोधता येईलसा उगा पोटापुरता गारवा आहे. सक्काळ सक्काळ असं आयतं, वाफाळतं खाणं मायेनं हातात मिळण्यासाठी मी नक्की किमान काही तरी पुण्य केलं असणार आहे. खिचडी चवदार होतेच कारण त्यांच्या हातालाच चव आहे. ते भाकरी वगळता सर्व स्वैपाक करतात आणि पदार्थ कधी बिघडत म्हणून नाही. आज खिचडी झाल्यावर लक्षात आलं की बटाटे राहिले. पण मला आवडतात म्हणून लगेच काच-या तेलमीठावर वाफवून वरून मिसळल्या आणि वाढली! हा सुगरणपणा नव्हे?
स्वैपाकघरात बागडणे हा बाबांचा विरंगुळा आहे. एरवी त्यांना माझ्यामुळे हे बागडणं तितक्या मनसोक्तपणे करता येत नाही. शिवाय माझा स्वैपाक सपक, टिपिकल गुळमाट आणि त्यांना झणझणीत लागतं. त्यांना वय कितीही मान्य नसलं तरी आता अधेमधे वय स्वतःच तिखटाविरुद्ध उठाव करतं. मग जेवताना पानात तेलात कालवलेला कांदा लसूण मसाला घेऊन तुका म्हणे त्यातल्या त्यात करत बिचारे परिस्थितीशी जुळवून घेतात झालं. हे असं फारच झालं की कधीतरी तडकून मला 'तू हो बाजूला, माझं मी करतो' असं सरसावून ते स्वैपाकघर ताब्यात घेतात. म्हणून मग मी आठवड्यातून एकदा त्यांनी आणि नातवानं मिळून सगळ्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था करायचा उपाय सुचवला. हवं ते, हवं तसं करा. मी आपली त्यांच्या हाताखाली (लिंबूटिंबू मदत, मागचं ओट्यावरचं ब्रह्मांड आवरणे वगैरे) पूर्वीच्या सासवांना कशा सुना लागायच्या तशी माफक लुडबुड करते.
मला तशीही स्वैपाकाची नावड आहे. पुढेमागे स्वत:चं स्वतंत्र घर बांधलं तर स्वैपाकघर नसेल त्यात, इतकी. म्हणजे करणं झटपट होऊन जातं, पण ते विचार नको असतात. ह्या आठवड्याच्या एका ब्रेकमुळे तेवढा एक दिवस स्वैपाकाचा विचार करावा लागत नाही हा सर्वात मोठा आनंद. नेमकं त्यातच बाबा रमत असल्यामुळे मी आणि ते हा ब्रेक एंजॉय करतो. लहरी महंमद नातू ह्यात कधी असतो, कधी नसतो. अर्थातच मग ते ओट्याशी आहेत किंवा खाली बसून काही चिराचिरी करतायत आणि मी त्यांच्या आरामखुर्चीत हातात चविष्ट ठोकळे घेऊन निवांत लोळतेय असं चित्र सर्रास असतं.
पण ही गंमत एवढीशीच नाही. मी साधारण ज्या वातावरणात रहाते तिथं पाचवी-आठवीतल्या पुरुषांच्याही पाणी-चहा हातात ठेवणं, आंघोळीसाठी कपडे काढून देणं किंवा आई घरात नसेल तर त्याच वयाच्या बहिणीनं किंवा थकलेल्या वयाच्या आजीनं रांधून जेवायला घालून ह्यांनी जेवून ताटातच हात धुवून बाजूला होणं ही प्रथा आहे. अशावेळी ऐंशीच्या घरातला एक पुरुष आठवीतल्या नातवाबरोबर पोटापाण्याची शब्दशः सोय बघत स्वैपाकघरात राबतोय आणि त्याची ढमाली, घोडी पोरगीबाई ऐतखाऊसारखी दात काढत फर्माईशी करत वाचत पडलीये हे किती घोर खटकणारं आहे हे तुम क्या जानो! मी भयंकर चित्रविचित्र कटाक्षांंची, गॉसिपची धनीण आहे.
मी भले हे गंमतीच्या सुरात लिहिलं असेल, पण मी उल्लेख केलेलं माझ्या भोवतालचं वातावरण गंमतीत घेण्यासारखं नाही. ह्याहून अधिक काही बोलावं, लिहावं ही आवश्यकता आहेही आणि नाहीही. कारण इथे कुणी काही लिहिलेलं वाचणारे वेगळे आणि भोवतालच्या वातावरणातले वेगळे असू शकतात, दोन्ही एकच असू शकतात किंवा दोन्हींचा मेळ असणारेही असतील. मी काही लिहून बोलून परिस्थिती बदलणार आहे, असाही भाबडा आशावाद नाही. प्रामाणिकपणे, ह्या सगळ्यात उडणारा माझा गोंधळ मात्र खरा आहे.
नेहमीप्रमाणे भरकटलेल्या विचारांचा आवरण्यापलिकडचा पसारा.




Friday, December 10, 2021

 गुरू तो गुरू. जसं हजार पाकक्रिया उलथ्यापालथ्या करून शेवटी ओगलेआजींनाच साकडं घालणं जात्याच पिंडात आहे, तसं निशा, आदित्य, गौतम महर्षी, रणबीर, नायजेला, अर्चना आर्ते, वरूण, स्मिता देव, मधुरा, अर्चना हेब्बार, झरीन खान सगळ्यांबरोबर जगभर उंडारून पुनश्च संजीव कपूरकडे. ह्या त्यांच्या दोन चार मिनिटांच्या क्लिप्स पार्श्वसंगीतासकट मस्त असतात.

#SanjeevKapoor

Monday, November 29, 2021

 निव्वळ राजन ताम्हाणे, लीना भागवत, शरद पोंक्षे प्रभृतींपायी खूप दिवसांनी मालिका बघायला घेतली आहे, ज्यात आधीच भयंकर आनंदीआनंद आहे. पण ब्रेकमध्ये ओंकार गोवर्धनबरोबर मधुराणी प्रभुलकरला बघून त्रास खरा वाढतो. पार 'घो मला असला हवा'पासून विकेट घेतलेला हा बाबा दिवसेंदिवस आणखीन हॅंडसम दिसत चाललाय आणि जोडी अशी विजोड. भरीला चेह-याइतकेच मख्ख, बोजड आणि पोक्त संवाद. अगं मार की बये चार उड्या, बोलाव की त्याला एकेरी, मोड की चेह-याची इस्त्री, हास की खळखळून, हाण की जरा ऐसपैस गप्पा! पण आमच्याकडे चॅनल्सना असल्या सांस्कृतिक धक्कावाल्या कहानी में ट्विस्टचं भलतंच वावडं आहे. असलं काही दाखवलं तर टीआरपी रसातळाला जाईल नव्हे? हे म्हणे कॉलेज बॅचमेट्स, नेमके कोणत्या कोनातनं बॅचमेट्स दिसतात तेच जाणे. एकुणात काहीतरीच!

Wednesday, November 24, 2021

 कार्तिकातला आषाढ!

Thursday, November 18, 2021

 कॉटन किंगचं नळ स्टॉपला एकच दुकान होतं त्यावेळेस त्यांची विमेन प्रॉडक्ट्स रेंज होती. माझ्याकडे एक नेव्ही ब्लू कॉड्रा हाफ स्लीव्ह्ड शर्ट आणि सुपरसॉफ्ट धाग्याचा पांढरा गोल गळ्याचा टी शर्ट होता. उत्कृष्ट दर्जा, उत्तम स्पर्श आणि आत्यंतिक कंफर्ट. शर्टचं फिटिंग परफेक्ट टक्समुळे अल्टिमेट होतं. हे कपडे खूप वर्षं वापरले. नेव्ही ब्लू हा रंग खरंतर फेड होणारा, पण तो किंचितही बदलला नाही की जुनाट वाटला नाही. व्यवसाय वाढवताना त्यांनी प्रथम ही विमेन रेंजच बंद केली.

कॅंटबीलच्या दोन कॉटन ट्राऊजर्स आणि दोन कॉटन शर्ट्स होते. त्यात एक बिस्कीटी रंगाचा चेकर्ड, दोन खिशांचा आणि प्रेस बटणांचा शर्ट होता. फिटिंग आणि लूक फक्त लाजवाब. हे कपडेसुद्धा भरपूर वापरले. लक्ष्मी रोडवर गोखले हॉलशेजारी बॉम्बे डाईंगची शोरुम आहे, त्यातच वरच्या मजल्यावर कॅंटॅबीलचं आउटलेट होतं. आता त्यांनी क्रोझो नावानं ब्रॅंड आणला आहे.
पहिल्या दिवाळसणाला मी मला एक धनियाखली घेतली होती. प्रतिभा साडी सेंटरमधून. वापरून कंटाळले, आता फक्त तिचे काठ कापून ठेवले आहेत. मावसजाऊबाईंनी मला भेट दिलेल्या आजरा बाजारपेठेतून घेतलेल्या दोन कॉटनच्या साड्या आहेत. सिल्क म्युझियममधून दहाव्या मिनिटाला खरेदी करून बाहेर पडले ती चिंतामणी प्युअर सिल्क कांथा आहे. ह्या साड्या नेसल्यावर एकदम रिच, जमिनीवरून दोन बोटं वर तरंगल्यासारखं वाटतं. शाळेत असताना बाबांनी आम्हाला दोघींना आग्रा मथुरा सहलीहून येताना सॅटीनवर सुंदर भरतकाम असलेली अबोली-पिस्ता, कॉफी-मोतिया अशा रंगांची कापडं आणली होती आणि त्यांचे सलवार सुट्स सुंदर झाले होते. सिंथेटिक वगैरे धाग्यांनी शाळेत फरक पडत नव्हता. नंतर मीच माझ्यासाठी शिवलेले काही कपडे होते, मला आणि बहिणीला दोघींना घालायला आवडणारे. चॉइसेसबद्दल वेगळं बोलायचं झालं तर ती आणि मी खूपदा वेगवेगळ्या जाऊन सेमच पीस उचलून आणतो, आणल्यावर कळतं की दोघींना एकच कपडा आवडला. असं बरंच निघेल आवडत्या कपड्यांबद्दल.
आपल्याकडे भारंभार कपडे असतात, बरेचसे आपल्याच आवडीनं घेतलेले असतात, पण काही कायमचे आवडते असतात, मनात बसतात. तुमच्याकडच्या आवडत्या कपड्यांच्या कोणकोणत्या आठवणी आहेत?

Saturday, November 13, 2021

 एसटीचा संप अपेक्षेपेक्षा लांबला आहे. काय आणि कसा तोडगा निघतोय, ह्याबद्दल उत्सुकता आहे. काय होतंय ह्याकडे सुरुवातीपासून आम्ही घरचे लक्ष ठेवून आहोत. मी कुणी अभ्यासक नाही, पण एसटीची अगदी नियमित प्रवासी आहे. त्यामुळे कर्मचारीवर्गाबद्दल सहानुभूती आहे. तुटपुंजे पगार आणि पुरेशा सोयी-सवलती नाहीत, भरती पुरेशी नसल्यामुळे सणावाराला दोन-तीन दिवस सलग प्रवास करावे लागतात. प्रवाशांच्या गैरसोयीची जाणीव आणि निलंबनाची भिती असूनही ऐन मौसमात हा संप त्यांनी सुरू ठेवला आहे. मात्र शासनाच्याही काही अडचणी आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना सध्या असलेल्या इतर सुविधा समान हक्क न्यायानुसार सरसकट सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना देणे शासनाला परवडणारे नाही आणि डिपार्टमेंटवाईज नियम बदलले जात नसतात. ह्या सगळ्या पलिकडे खाजगीकरण करून हा लोण्याचा गोळा खायला टपलेले एसटीचे हितशत्रू आहेतच. पण एसटीचे खाजगीकरण सर्वसामान्यांसाठी कदापीही हिताचे होणार नाही. आज ज्याप्रमाणे एसटी खेडोपाडी, राज्याच्या कानाकोपऱ्यात प्रवासीसंख्येचा विचार न करता सेवेत असते, तशी सेवा खाजगीकरणानंतर उपलब्ध होणार नाही. एकंदर सर्व प्रकारच्या उलाढालींवर आणि सामाजिक प्रगतीवर ह्याचा दूरगामी परिणाम होऊ शकतो, इतकी एसटी सेवा ग्रामीण भागात रोजच्या जीवनाशी निगडित आहे.

मी अभ्यासक नसल्याने हे फार मोघम आणि वरवरचे मुद्दे मांडलेत. फेसबुकीय अभ्यासकांचं लक्ष वेधून घेण्याइतका हा संप महत्त्वाचा नाही असं दिसतंय. इतक्या दिवसात ह्या संपासंदर्भात एकही पोस्ट वाचनात आली नाही. परिणामी कुणाची मतमतांतरंही कळली नाहीत. ऐन सुट्टीचा कालावधी होऊन गेला. इथे सगळेजण खाजगी बसेस किंवा स्वतःच्या चारचाकी वापरणारेच असतील असं नक्कीच नाही.
आपला फारसा किंवा काहीही संबंध नसलेल्या विषयांवर केवढं बोललं जातं, पण एसटी ह्या ब-यापैकी सर्वसामान्य नागरिकांशी निगडित असलेल्या विषयाबद्दल कुणाला काहीच स्वारस्य का असू नये, हा प्रश्न पडला.


Wednesday, November 10, 2021

 एतद्देशीय नाश्ता.

रव्याची सुंठ-जायफळीची खीर आणि ओलं खोबरं कोथिंबीरीत लपलेला पापोचि.
आमच्याकडे पारा आज १७° दाखवतोय. शिरशिरी, त्वचा, शिंका, उन्हं खात बसलेले चिली-मिली, सगळे पा-याशी सहमत दिसतायत. फोटोच्या नसत्या सोसात खीरीची वाफ गेली, पुन्हा गरम करून घ्यावी लागली. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात रव्याची गरमागरम खीर चहा-कॉफीऐवजी वरचेवर केली जाते. कपातून बशीत ओतून प्यावी किंवा चमच्यानं घोट घोट घ्यावी, करायला सोयीची आणि चवीला मधुर.

Thursday, November 4, 2021

 दीपावली मनायी सुहानी

💞
फोटो क्रेडिट - मंदा🙂
माणसं जेव्हा मला आतून प्रसन्न वाटवतात, तेव्हा माझा चेहरा ते लपवू शकत नाही, खुलून सांगतोच. काल संध्याकाळी असा एक फोटो घ्यायचा राहिला, आज मात्र वेंधळेपणा केला नाही, आठवणीने घेतला. ही माझ्याबरोबर बसलेली मुलगी अशीच आहे!


Wednesday, November 3, 2021

 || तमसो मा ज्योतिर्गमय ||

जगत्शांतता, मन:स्वास्थ्य आणि निरामय आनंदास्तव अभिष्टचिंतन 🪔🏮
🌼शुभ दीपावली सुजन हो 🌼

 


Sunday, October 31, 2021

 सगळ्या वस्तुस्थितीसकटही बाजारातली गर्दी उत्साहवर्धक आहे. सणावाराला हवेत अशी जाग असली की प्रसन्न वाटतं. दिवाळीची घरादारातली ही लगबग सुखद असते, फार आवडते. यंदा असं वातावरण आहे, असंच कायम राहू देत.

Sunday, October 10, 2021

 ललिता पंचमी आणि त्र्यंबोली यात्रा

ललिता पंचमीला कोल्हापुरात टेंबलाईची यात्रा असते. अंबाबाई आणि टेंबलाई सख्ख्या बहिणी, दोघींच्यात काहीतरी चकमक झाली आणि टेंबलाई रुसून गावाबाहेरच्या टेकाडावर जाऊन बसली. ललिता पंचमी दिवशी अंबाबाई पालखीतून ह्या बहिणीला भेटायला जाते, त्यांच्या गप्पागोष्टी, आहेरमाहेर होतात आणि त्या आनंदाप्रित्यर्थ ही यात्रा भरते. [@सई]
ही यात्रा म्हणजे समस्त कोल्हापूरकरांसाठी आणि विशेष करून आमच्यासारख्या ऐन शहरातच रहाणा-या नागरीकांसाठी रम्य आठवणी आहेत. टेंबलाईचा हा गावाबाहेरचा भाग अगदी खरोखरचा आणि तेव्हा लांब असलेला ओसाड माळ होता. हे एवढं एक आणि एरवी तसा शुकशुकाटच असणारं एकच देऊळ त्या टेकाडावर. माझ्या आठवणीप्रमाणे झाडंही फारशी नव्हती तिकडे. पहाटेपासून डोक्यावर पाण्याच्या फुलापानांनी सजवलेल्या कळशा वहात एकटेदुकटे किंवा घोळक्यानं, छोट्या मिरवणुकांनी चालत टेंबलाईला निघालेले स्त्री पुरुष रस्त्यावर दिसू लागत. यात्रेसाठी पालिकेने खास जादा डबल डेकर्स सोडलेल्या असत, त्या बिंदू चौकातून सुटत. त्या बसेससाठी प्रचंड लांबच लांब रांगा असायच्या. [@सई] कारण खाजगी वाहनं तेव्हा फार कुणाकडे नसत आणि असली तरी सहकुटुंब सहपरिवार गर्दीबरोबर यात्रेला जाणं हा आनंद मोठाच असणार. दुपारपासून लोक ताटकळत रांगेत थांबायचे. आम्ही दोघी बहिणी, बाबा, आमच्याबरोबर दोघं चुलतभाऊ, काकु, तिच्या मैत्रिणी आणि त्यांची मुलं, शेजारची मुलं असा मोठा गट मिळून यात्रेला जायचो. शिवाय रांगेत थांबलेलं असताना आणि नंतर यात्रेत फिरतानासुद्धा सगळे ओळखीचे लोक, नातेवाईक, इतर शेजारी पाजारी, शाळेतल्या मैत्रिणी, बाई वगैरे भेटायच्या. थोडक्यात अख्खं कोल्हापूर यात्रेला लोटायचं, ह्यावरून गर्दीची कल्पना येईल. ह्या गोंधळातून जर डबल डेकरच्या वरच्या मजल्यावर पुढे बसायला मिळालं तर होणारा आनंद आभाळाएवढा असायचा. [@सई] आम्ही रांगेतली पोरंटोरं त्यासाठी आसुसलेले असायचो आणि आमचा नंबर यायच्या आधीची बस भरल्यावर रांग कुठे तुटली, त्यावरून आपण बसमध्ये वर की खाली, पुढे की मागे हे अंदाज चालायचे. काय काय गंमती!
कोणत्याही यात्रेत असतात तसे टेंबलाईला पण फिरत्या दुकानांचे नाना त-हेच्या वस्तूंनी भरलेले ठेले असायचे. नजर जाईल तिथवर माळ आणि टेकाडाची देवळापर्यंतची चढण गच्च भरलेली दिसायची. आणि कशी कोण जाणे, तेव्हा ती टेकडी उंचही भासायची, जी प्रत्यक्षात बुटकी आहे. पिपाण्या, मातीची चित्रं, पळत जाताना हातात धरायची वा-यानं फिरणारी कागदी चक्रं, पिसाच्या उंच टोप्या, गडद पिवळे दागिने, हवेतले आणि जमिनीवरचे पाळणे, इकडे तिकडे फिरणा-या गारेगारच्या, बर्फाच्या रंगीत गोळ्यांच्या हातगाड्या, पेरीना आईस्क्रिमच्या हॅंडलवाल्या पांढ-या आणि देखण्या सुबक ढकलगाड्या, [@सई] शेवखंडासारखे सहसा घरी न होणारे अन् एरवी उघड्यावरचे माशा, धूळ बसलेले म्हणून फिरत्या गाडीवरून घ्यायला बंदी असणारे म्हणूनच खूप खावेसे वाटणारे आणि फक्त यात्रेतच खायला मिळणारे खाऊ, तिखटमीठ भुरभुरलेल्या वाळकाच्या फोडी, खारे शेंगदाणे-फुटाणे आणि तळलेले लाल-हिरवे-पिवळे वाटाणे (हे आता मिळत नाहीत काय, खूप शोधले, फार कुणी करत नाहीत बहुतेक), गोड रंगीत कापूस, बॉबी नळ्यांचे वगैरे फिरते विक्रेते (आम्ही असले उठवळ आणि बाजारू खाऊ खाऊ नयेत ह्यासाठी आम्हाला बॉबीमध्ये पाल असते अशी भिती घातली जायची आणि आम्ही प्रामाणिकपणे घाबरून ते कधी मागायचो तर नाहीच, पण एरवी शाळेपाशीसुद्धा घ्यायला धजावायचो नाही! असल्या चाणाक्ष पालकनितीत आमची पिढी सपशेल मार खाते आणि करू गेलो तर आमची पोरं आमच्यावरच दात काढून हसतील. आता म्हणजे टोल नाक्यावर थांबल्यावर बॉबीची पाकिटं घेऊन बोटात अडकवून खाणे हा एक बहुतेक लहानथोरांचा महत्त्वाचा उद्योग असतो. असो), भेळशेवपुरीचे गाडे, वडे-भजीच्या गाड्यांवरच्या तेलांचे वास, संध्याकाळी प्रत्येक ठेल्यावर लागणारे पेट्रोमॅक्सचे दिवे. ह्या सगळ्यात पार्श्वभूमीला भयंकर कलकलाट आणि कोलाहल. एकजात सगळी पोरंसोरं पिपाण्या गेंगाणतच फिरत असायची. भटकताना एकीकडे सारखं सटरफटर काही तरी खात आमची तोंडंही चालू असायची. खरेदी फारशी नसायचीच, पण बाबा कोणत्याही गोष्टी घ्यायला कधी नाही म्हणाल्याचंही आठवत नाही. तसंच आम्ही किंवा बाबांनीही [@सई] रांगेत उभे राहून टेंबलाईचं दर्शनही घेतल्याचं आठवत नाही. अगदी वरपर्यंत जायचो, पण ते फिरत फिरत यात्रेच्या आनंदासाठीच.
यात्रेत बाबांचे मित्र वसंत कुंभारकाकांचं मातीच्या चित्रांचं दुकान असायचं. मग चालून चालून पाय दुखायला लागले की थोडा वेळ तिथं त्यांच्यामागे जाऊन बसायचं आणि आजुबाजूची मजा [@सई] निरखायची. परत येताना पुन्हा रांगेत थांबून डबल डेकरनंच यायचं. पण येताना अंगात त्राण नसायचं. बिंदू चौकापासून घर दोन मिनिटंही नाही, पण ते अंतर चालणंही रात्री जीवावर यायचं इतके पाय बोलायचे. मग दुसऱ्या दिवशी शाळेत दिवसभर हाच विषय आणि चर्चा चाललेली असे.
पंचवीसेक वर्षं कोल्हापूरबाहेर असल्याने यात्रा घडली नाही आणि आता इकडे [@सई] आल्यापासून यात्राच होऊ शकलेली नाही. कसे योग असतात! पुढच्या वर्षापर्यंत नव्हे, तर लवकरात लवकर सगळं आलबेल होऊन यात्राच काय, अख्खं जगच सुरळीत नांदायला लागू दे, ही अंबाबाई आणि टेंबलाई ह्या दोघींच्या चरणी मनापासून प्रार्थना. ही यात्रा आमच्यासाठी एक अविस्मरणीय आनंदाची दुपार ते उशिरा संध्याकाळ असायची, एवढं मात्र खरं.





Friday, October 8, 2021

 साहित्यातल्या नोबेल पुरस्कारासाठी टांझानियन लेखक अब्दुल रझाक गुरनाहांचं मन:पुर्वक अभिनंदन.

त्यांच्या लेखनाच्या आउटलाईन्स बघून आवडतील असं वाटलं. ते काही असो, पण लेखकाची ही हसरी, प्रसन्न छबी लेखकाबद्दल मत अनुकूल करते एवढं खरं. वाचून जायच्या पर्वतावर आणखी एक थर चढला आता.
अवांतर- (मत उजवं करते असं लिहिलं होतं, ते तातडीनं खोडलं, इतकी आता बिचा-या डाव्या-उजव्या ह्या नुसत्या शब्दांचीसुद्धा धास्ती बसली आहे.)


Friday, October 1, 2021

 प्रेमात होते, आहे आणि आता अशा वयात आहे की कायमच असणार

🌼 पण तुमच्या प्रेमात असणं आणि रहाणं सोपं मुळीच नसूनही आनंद, समाधान मात्र बक्कळ असतं 😊


Monday, September 27, 2021

 

🌼💞हंस तू हरदम 💖🌼
जुग जुग जिओ, मेरी जान!
साष्टांग प्रणिपात, ध्रुवतारके🌳


 
 



Tuesday, September 21, 2021

 केएमटीच्या डबल डेकर्स

माझ्या लहानपणी कोल्हापूर शहराच्या बाहेरच्या रुट्सवर लेलॅंडच्या डबल डेकर्स धावायच्या. १९८२ च्या सुमारास केएमटीच्या ताफ्यात त्या समाविष्ट केल्या गेल्या असाव्यात असा वडिलांचा अंदाज आहे. जाणकारांनी तपशीलात दुरुस्ती सांगावी.
कळंबा, शुगर मिल, शिरोली, गोकुळ शिरगाव ह्या मार्गांसाठी मोठ्या शिवाजी पुतळा चौकातून ह्या डबल डेकर बसेस सुटायच्या. भवानी मंडप आणि शिवाजी पुतळा हे मोठे बसथांबे होते. त्यातल्या आमच्या आवडीच्या दोन मुख्य बसेस म्हणजे 'अभिजात समयदर्शिका' असा वजनदार मराठी फलक मिरवणारी HMT (Hindustan Machine Tools) कारखान्याला जाणारी एक आणि वैद्यनाथ प्रकल्पाला घेऊन जाणारी दुसरी. आमचे आजोबा वैद्य होते आणि त्यांच्या देखरेखीखाली वैद्यनाथच्या एमआयडीसीत असणा-या प्रकल्पात गुलकंदासाठी गावठी गुलाब, काही औषधी वनस्पतींची लागवड केली जायची तिथे जाताना ते आम्हा नातवंडांना बरोबर न्यायचे. तर सुट्टीच्या दिवशी अभिजात समयदर्शिकेतून बाबा शहराबाहेर म्हणून फेरफटका मारायला नेत असत. ज्या बसनं जायचं, त्याच बसनं परत यायचं. वरच्या मजल्यावर पुढे बसून निवांत भटकायचं. हातात एखादा मेवाड आइस्क्रीमचा कोन, नाही तर खा-या शेंगदाण्याची पुडी. तो फेरफटका म्हणजे जबरदस्त आनंद होता.
ह्या व्यतिरिक्त आणखी तिसरी, महत्त्वाची आणि आवडीची सहल म्हणजे डबल डेकरमधून केली जाणारी वार्षिक टेंबलाईची यात्रा. ह्याबद्दल लिहिण्यासारखं खूपच आहे, ते विषयांतर इथे नको. मात्र बरीच वर्षे केएमटीचा असा प्रघात होता की नवीन डबल डेकर्स बसेसची खरेदी ललिता पंचमीच्या आधी करायची आणि पहिल्या फे-या यात्रेला लावून कोल्हापूरकरांच्या सेवेत हजर करायच्या. ही प्रथा पाच-सहा वर्षं तरी चालली आणि प्रत्येक खरेदीत पाच-सहा तरी नव्या बसेस ताफ्यात आणल्या जायच्या. (जा.त.दु.सां.)
आम्ही शिवाजी रोडला रहायला असल्याने ह्या सगळ्या देखण्या डबल डेकर्स आमच्या रोजच्या आयुष्याचा भाग होत्या. शाळा, मंडई, अंबाबाई, कुठेही जा, दुसरा रस्ता नाहीच. शिवाजी रोड तेव्हा एकमार्गी झाला नव्हता त्यामुळे ह्या ताडमाड प-या आमच्या दारावरून जायच्या. शिवाजी पुतळ्याभोवती गोलाकार रेलिंग आणि चौथ-याला सुंदर दगडी पाय-या होत्या. अनेकदा संध्याकाळी पुतळ्यासमोरच्या आणि तेव्हाच्या युनायटेड वेस्टर्न बँकेबाहेरच्या डेरेदार रेनट्रीखाली असलेल्या प्रकाशचे वडे घ्यायचे, पुतळ्याचं छोटंसं गेट उघडून पाय-यांवर जाऊन बसायचं आणि गार सुखद वा-यात गरमागरम वडे खात आपल्या भोवती गरगरणा-या अखंड वहातुकीचं, पादचाऱ्यांचं निरिक्षण करायचं हा आमचा आवडता विरंगुळा होता. कसली घाई नाहीच. तासनतास बसायचो आम्ही. बाबा, मी आणि धाकटी बहीण. कधीतरी चुलतभाऊ आणि शेजारच्या मुलांपैकी पण कुणीतरी. आपण स्थिर आणि आपल्याभोवती फिरणारं जग. फार म्हणजे फारच मजा वाटायची. त्यावेळी ह्या डबल डेकर्स हे कायमचं विशेष आकर्षण होतं. त्यातही त्या वळताना बघणं तर खूपच कुतुहलजनक. आम्हाला बिंदू चौक पण जवळच त्यामुळे टेंबलाईला जाता येताना पण आम्हाला फार सोयीचं पडायचं.
एकंदरीत आमचं छोटंसं जग ह्या दुमजली लाल सुंद-यांनी खूप रम्य करून ठेवलं होतं एवढं खरं. नेटवर 'अभिजात समयदर्शिका' फलकाची शोधाशोध केली, मिळाला नाही. त्यातल्या त्यात हा 'बेस्ट' चिखलाने फेड झालेला आणि नंबर न दिसेलसा फोटो मिळाला तो नाईलाजास्तव डकवावा लागला, कृपया चालवून घ्यावा.