म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Tuesday, November 14, 2023

 #thenandnow

दिवाळीतली रांगोळी
२०१४ टेंपो, २०२० एसटी, २०२३ RM लोगो.
रिक्षावरचं प्रेम पार आटलं.
रिअल माद्रिद चालू प्रेम.
मात्र, एसटी है सदा के लिए💞










Friday, October 13, 2023

 नवरात्रीच्या रंगांवरची मतमतांतरं बाजूला सरकवून बघितलं तर भवताल सुखद दिसतो. सजलेला, फेस्टीव्ह. प्रत्येकीनं रोजच्या रटाळ रहाटगाडग्यातून जमेल तसा वेळ काढून मिळवलेली खुशी. ती हवेत पसरते आणि मनाला बरं वाटतं. विरोध करणाऱ्यांनासुद्धा विरोधासाठी चांगलं निमित्त मिळाल्यामुळं बरंच वाटत असेल. एकुणात विन-विन.

रीळमधली विद्या बालन बघून असंच प्रसन्न वाटलं. साड्यांची हौस तर तिला आहेच, आणि भारतीय तोंडवळा आणि ठसठशीत बांध्यानं त्या अगदी शोभूनही दिसतात तिला. बघा तरी.
साड्या इतक्या सुरेख कॅरी करणाऱ्या माझ्या मैत्रिणी, बहिणी, भाच्या आठवल्या. मला नवरात्रभर फोटो पाठवा गं सगळ्या जणींनी💖

Wednesday, October 11, 2023

 #मदतनीससख्या #friends #मैतरणी #कृतज्ञता

रविवारच्या रणरणत्या दुपारची गोष्ट. मी फ्रिज साफ करत बसले होते. रतन मावशी आल्या आणि एक हात कंबरेवर आणि एक हात गालावर ठेवून पाच मिनिटं नुसत्या माझ्याकडं बघत उभ्या राहिल्या. "××× कडं जाऊन आल्या का?" मी भुवई वाकडी करून त्यांच्याकडं बघितल्यावर चेटकीणीसारख्या हसल्या आणि म्हणाल्या, "त्याशिवाय तुमच्या अंगात येणार नाही!" मी चिडचिडत माझ्या हातातली गारेगार काकडी त्यांच्या दिशेनं फेकली आणि त्यांनी ती झेलून नळाखाली धुऊन तोंडात धरून व्हॅंपसारखा तिचा तुकडा मोडला आणि मुद्दाम दात विचकत हसणं पुढं चालू ठेवलं.
रतन आणि मंगल मावशी या दोघी जावा गेली कित्येक वर्षं अशाच माझा छळ मांडत आल्या आहेत. मला कोळून प्यायल्या आहेत. पण तेवढाच जीवही लावला आहे. मला फ्रिज साफ करताना बघून म्हणूनच त्यांना पार्श्वभूमी कळली. माझे एक नातलग आहेत. साधारण दोन ते तीन वर्षं स्वयंपाकाच्या ओट्याला किंवा गॅसच्या शेगडीला पाणी म्हणून दाखवलेलं नाही त्यांनी. कारण मला नाही माहित. मी तशी जवळच राहते, त्यामुळे सहसा त्यांच्याकडे काही खाय-प्यायची वेळ येत नाही. आणि मला इतरांच्या घरच्या पसाऱ्याचा, अस्वच्छतेचा जोवर मला तिथं रहायचीच वेळ येत नाही, तोवर विनाकारण त्रास होत नाही. त्या त्या घरचे लोक मजेत असतात तशी मीही असू शकते. गप्पा मारल्या, निघालं. बसायला जागा असावी, बास. लोक छान असतात, त्यांच्या घराच्या भिंती कशा का असेनात. फक्त खिडक्या सताड उघड्या असाव्यात आणि कोंदट वास असू नये, एवढंच. चुकून रहायबिहायची वेळ कुठं गेल्यावर आलीच तर तेव्हाचं तेव्हा बघता येईल.
तर त्यांना रतन मावशीही चांगल्या ओळखतात. एरवी मी मॉडरेटली स्वच्छता करते. माझ्या आईसारखा किंवा धाकट्या बहिणी सारखा ओसीडीही नाही आणि घाण म्हणावं इतकाही गलथानपणा नाही. पण साधारण त्या नातेवाईकांकडं फेरी झाली की मला तिरमिरी येते आणि मी घरी येऊन स्वच्छतेचा सपाटा लावते. मग मावशी जाम वैतागतात आणि म्हणतात, एवढा तुमचा वेळ जात नसला तर माझ्याकडं चला आणि मला मदत करू लागा.
या दोघी अशाच एक नंबर नाकझाड्या आहेत. कुणाच्या घरी जेवायचं-खायचं, कुणाच्या घरी नुसतं पाणी प्यायचं, कुणाच्या घरी स्वच्छता गृह वापरायचं, कुणाला त्यांच्या घरी बोलवायचं अन् कुणाला नाही, याचे त्यांचे ठोकताळे ठरलेले असतात. त्यांची स्वतःची घरं लख्ख असतात. तुमच्याकडे येणाऱ्या मावशींचीही असतील बघा. धमाल गंमती जमती असतात. बहुतेकदा रविवारी दुपारी आमची ही गॉसिप सत्रं जोरदार चालतात. कारण रविवारी मी सहसा त्यांच्यासाठी काही कामं ठेवत नाही. कारण रविवारी इतर घरांमध्ये साहजिकच नेहमीपेक्षा जास्त लोड असतं, त्याला त्या त्या घरांचाही इलाज नसतो. मग माझ्याकडं शक्यतो ब्रेक. जोरात पंखा सोडायचा, हातात थंड ताकाचा किंवा मिल्कशेकचा पेला आणि निर्विष मापं काढत तुफान हसणं.
मंगल मावशींचं स्वयंपाकाचं काम माझ्याकडेच पहिलं होतं. त्यात तो बामणी स्वयंपाक. मग आमची जी काही युद्धं झाली आहेत, ते काय विचारू नका. कशात गोडा मसाला, कशात हिरवी मिरची, कशात तिखट, कशात गूळ, कशात साखर, कशात पाणी, कशाला नुसतीच वाफ. कांदा-लसूण मी जवळजवळ वापरत नसल्यासारखं आहे. सुरुवात तर आच मंद, तेल नुसतं दाखवायचं इथूनच. तेलाचा आणि चवीचा संबंध नाही, हे कसं पटणार त्यांना! त्यांचं बिचाऱ्यांचं डोकंच फिरायचं. त्यात त्या स्वभावानं जाम तापट. साधारण दर आठवड्याला 'मी उद्यापासून येत नाही' किंवा 'तुम्ही उद्यापासून अजिबात येऊ नका' हे वरच्या पट्टीतले संवाद झालेच पाहिजेत. तरीही दुसऱ्याच महिन्यात आमच्या केर-फरशीच्या मावशी दुसरीकडे रहायला गेल्यावर आपल्या धाकट्या जावेला घेऊन आल्या आणि मग दोघी मिळून माझ्या डोक्यावर बसल्या. आमचे चिरंजीव मोठे होऊ लागले तसा तिघांनी मिळून सासुरवास सुरू केला मला. तो त्यांच्या अंगाखांद्यावर वाढलेला असल्यामुळे चकमकीत माझी बाजू घेतच नाही. सगळी मजा असते.
मंगलमावशींना साधारण वर्षभर लागलं स्वयंपाकावर कमांड यायला. वाटणघाटण नाही, मांस-मच्छी नाही, मला अस्सा जाता जाता तुमचा स्वयंपाक येईल म्हणणाऱ्या मावशींना सोपा वाटणारा हा साधा स्वयंपाक प्रत्यक्षात तेवढा सोपा नाही हे लक्षात यायला लागलं. त्यांनी हळूहळू मला नाकं मुरडणं कमी करून नेटानं मनापासून सगळं शिकून घेतलं आणि मग मात्र मी केलंय की त्यांनी ते ओळखूही येईना. भरीला त्या त्यांच्या घरीही कोशिंबिरी, ताक वगैरे सर्रास करायला लागल्या. त्यांच्या घरचं तेलाचं प्रमाणही महिन्याला जवळपास दोन लिटरनं कमी आलं. मोकळं तिखट, तांबड्या भोपळ्याचं भरीत, सांज्याच्या पोळ्या, चिंच गुळाची आमटी, बटाटे पोहे, पीठ पेरलेल्या कोरड्या भाज्या हे त्यांना करायला आवडणारे विशेष पदार्थ. हाताला चव अफाट. मेमरी जबरदस्त. तोंड मुलखाचं फटकळ पण मायेनं करणार. पोळ्या मऊसूत, पदर सुटलेल्या. डब्यात नेलेला त्यांनी तूप घालून कालवून वाफ घालवून दिलेला भरपूर आमटी-भात लंचटाईमपर्यंत मुरायचा आणि टेबलवर प्रत्येक जण आधी स्वतःला वाढून घेऊन माझ्यासाठी जेमतेम दोन घास उरायचा. तव्यावरची गरमागरम पोळी, पहिल्या वाफेची भाजी आणि दुधाचा कप हा नाश्ता किती वर्षं त्यांच्या कृपेनं हाणला. माझी आणि लेकाची किती आजारपणं या दोघींनी काढली, मोजदाद नाही. त्यांनीच वेळोवेळी पाठीवर हात फिरवून हेही दिवस जातील हे दिलासे दिलेले आहेत आणि खरोखरच तसे दिवस ढकलून सुखरूप पुढं आल्यावर आम्ही मिळून त्या दिवसांकडे मागं वळून बघितलंही आहे.
अविध्वा नवमीला काकू आणि आईचा मान या दोघींना नाही देणार तर आणखी कुणाला! त्यांच्या आवडीच्या साड्या, एखादी त्यांच्या हौसेची वस्तू घ्यायची हे कृतज्ञतेचं एक निमित्त. गौरीच्या जेवणाला संध्याकाळी साग्रसंगीत किंवा खरंतर एरवी केव्हाही संध्याकाळी उठायचं आणि त्यांच्याकडे जाऊन जे असेल ते जेऊन यायचं ही सवय आहे आम्हाला. त्यांची घरं म्हणजे सुना-जावयांनी नातवंडांनी भरलेली गोकुळं आहेत. आणि त्याहीपेक्षा, अक्षर ओळखही नसणाऱ्या या बायकांची ती कष्टाळू, धोरणी वृत्तीची उत्कृष्ट आर्थिक मॅनेजमेंट केलेली अफाट कर्तबगारी आहे. यांच्या जीवावर तर आपण उड्या मारतो, नाही का! जगावं कसं हे यांच्याकडून मी सप्रात्यक्षिक जास्त शिकत आलेय.

Thursday, October 5, 2023

 World Smile Day today

😊
शाळेतली बालभारतीची आणि त्यातही गणिताची पाठ्यपुस्तकं आठवतात आणि चेहऱ्यावर हसू उमटतं.
फडणीसांची पुस्तकं म्हणजे भेट देणाऱ्या आणि घेणाऱ्या कोणत्याही वयोगटाला कोणत्याही निमित्तासाठी खुशीच.






Wednesday, September 27, 2023

 ध्रुवतारका.

काळीज.
जानेमन.
१९२९ साली आजचा दिवस उजाडला नसता तर अवघड झालं असतं, गड्या!
देवाक काळजी म्हणून 'आमच्या कल्याणा लताची विभूती'🌳

Tuesday, September 26, 2023

 छान बातमी आली ही.

अगदी खरं खरं सांगायचं तर आशा पारेखना फाळके पुरस्कार जाहीर झाला तेव्हा वहिदाच्या आधी? अशी एक आठी पडली होती कपाळावर. नाकही मुरडलं होतं मी, मला चांगलं आठवतंय. म्हणजे त्या दोघींना नसेल अडचण, पण मलाच होती. आज मात्र बरं वाटलं, देर आए दुरुस्त आए.
फार ग्रेसफूल बाई आहे ही. करिअरच्या सुरुवातीपासून स्वतःच्या अटींवर काम करणं खायची गोष्ट नाही. बहुतेक सगळ्या भूमिका दमदार केल्या. वाट्याला आलेल्या एकूण एक गाण्यांचं सोनं केलंय. मागे कधीतरी मी 'कल के सपने आज भी आना' वर काही तरी खरडलं होतं. माझ्या एका मोठ्या आजारपणात मी वहिदाचे बरेच सिनेमे सलग बघून काढले होते. वहिदा महोत्सवच साजरा केला. ऐन उमेदीतल्या सिनेमांबरोबरच चांदनी, लम्हें, कभी कभी, रंग दे बसंती, दिल्ली ६, हे सुद्धा खास वहिदासाठी पुन्हा बघितलेले. त्रिशूल सारखे तुरळक अपवाद वगळता प्रफुल्लित वावर असतो तिचा. अलीकडे खूप इंटरव्ह्यू येतात. तल्लख बुद्धिमत्ता, उर्दूमिश्रित गोड इंग्रजी-हिंदी, मस्त विनोदबुद्धी, मनापासून हसणं, व्यक्तिमत्वातला अंतर्बाह्य रुबाब असं काय काय असतं त्यात. रेश्मा और शेराच्या आठवणी, लग्नाचे आणि पोरांच्या शाळेबद्दलचे किस्से तर विशेष मजेदार आहेत.
डिझर्व्हिंग व्यक्तीला पुरस्कार मिळाला.


Monday, September 25, 2023

 देव नावाच्या चार्मचा शंभरावा जन्मदिवस

❤
घरातल्या समस्त आजोबा आज्यांपासून ते माझ्याकडून त्याच्यासारखा कोंबडा पाडून घेऊन शाळेला जाणाऱ्या नातवापर्यंत सगळ्यांना आवडणारा देव.
अशा खास दिवसांना विविध भारती बहार उडवत असते.




Friday, September 22, 2023

 #मोहघालणारीगाणी

काही गाणी तुमच्या डोक्यावर बसतात आणि पिच्छा पुरवतात. 'सपना जहां दस्तक न दें' हे ब्रदर्स नामक सिनेमातलं गाणं असंच किती काळ माझा गळा पकडून बसलंय. ऐकायला बघायला, दोन्ही तेवढंच आवडतं.
गाण्याची सुरुवात फारशी लक्षवेधक नाही. किंबहुना ती चाल फारशी रजिस्टरच होत नाही. पण कंटाळवाण्या सभेत एखादी तडफदार व्यक्ती अनपेक्षितपणे उठून उभी राहून भारदस्त आवाजात बोलू लागते आणि सगळे एकदम मेस्मराईज होऊन ताठ बसतात, तसा 'मेरे दिलमें जगह खुदा की खाली थी' म्हणत तगडा सोनू निगम उठून उभा राहतो आणि तुमचा झेल जातो. टेक ऑफ घेऊन टर्ब्युलन्स नंतर विमान एका वेगावर स्थिरावतं तसा फील आहे त्या ओळीला.
मेरे दिल में जगह खुदा की खाली थी
देखा वहां पे आज तेरा चेहरा है
मैं भटकता हुआ सा एक बादल हूं
जो तेरे आसमां पे आके ठहरा है
या चार ओळी बहुतेक सोनूला स्वत:लाही आवडत असाव्यात. ती ओळ छानपैकी थांबत थांबत पुढे जाते. नो घाई. मग वाळलेलं पान जसं झाडाच्या शेंड्यावरून डाईव्ह घेत हलके हेलकावे घेत बराच वेळ हवेतच उडत रहातं पण खाली येत नाही, तशी 'देखा वहां पे आज तेरा चेहरा है' येते. याही ओळीला थांबे आहेत.
या गाण्यामुळं अमिताभ भट्टाचार्य चांगलं लिहितो हेही कळलं. 'जबसे पडे तेरे कदम चलने लगी दुनिया मेरी' हे मस्त सुचलंय. तो चांगलं गातो. 'लुटेरा'तलं अनकही चांगलं गायलंय त्यानं.
वरच्या चार ओळी आणि 'तू रूह है तो मैं काया बनूं, ता-उम्र तेरा साया बनूं' हो दोन वेगवेगळे सेगमेंट केलेत अजय अतुलनी. लोक हौसेनं गाताना दोन्हीपैकी काहीही निवडतात आणि तरी ते तुकडे परीपूर्ण वाटतात.
दिग्दर्शन विचारपूर्वक केल्यासारखं वाटतं. एकाच गाण्यात कथा पटापट पुढं नेलीये. जॅकलिन मला एनीवे आवडते, पण या गाण्यात आणखी प्रसन्न दिसते हसते. ती पोनी उडवत बेकरीत उगीचच थिरथिर करते ते कृत्रिम वाटत नाही. पेस्ट्री समोर आल्यावर अक्षयचं पहिल्यांदा जॅकलिनकडे लक्ष जातं तेव्हा फ्रेम रंगीत होते. अक्षयसुद्धा चांगला दिसलाय. त्याची जिवणी पार या कानापासून त्या कानापर्यंत असूनही धीरगंभीर नकळतसं हसू बरं हसलाय. तो 'दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी कसा' याचा अंदाज घेत तिकडं बेकरीत बघत असताना इकडं शेजारी ती अलगदपणे येऊन बसते तेव्हा ते जाणवून हललेली त्याची नजर, तिचा भलताच देखणा पिवळा प्रिंटेड शर्ट, खाली बसता बसता तिनं रोखून सोडलेला श्वास, आणि मुरलेलं नातं असल्यासारखं त्यानं सहजपणे केक खाणं हे छान वाटतं बघताना. असला अबोल सुखद रोमान्स आताशा दिसतच नाही फारसा. सुखाच्या परमावधी नंतर हातात थेट दुपट्यात गुंडाळलेलं बाळच, हे एकाच फ्रेममधलं सुपरफास्ट फॉरवर्ड तर मला जाम आवडतं. गाण्यातले एकंदर शब्द आणि समोर उमटणाऱ्या चित्रांत काही तरी संगती वाटते.
सहसा रोमॅंटिक गाण्यात आवश्यक रागिनी चांदनी इथंही हजर आहेत. पण वैराग्य, माया, तादाद, ता-उम्र, चौखट असले एरवी गाण्यात फारशी हजेरी न लावणारे शब्द, त्यांची धार नीट बोथट करून सभेत बसवलेत. एकुणच सुरांची नक्षी मोहक आहे, पण खास करून सायाच्या आधीचं 'तेरा' आणि त्याच नोटमधलं मायाच्या आधीचं 'तेरी' वरचं बारीक भरतकाम फार सुरेल आहे. नीती मोहनच्या आवाजात एक सेन्सुअस हस्क आणि गोडव्याचं मिश्रण आहे. हे गाणं सोडून मी तिचं दुसरं काही ऐकलेलं नाही. त्यामुळे केवळ या गाण्यासाठी तिनं ठेवणीतला आवाज काढलाय की तिचा आवाजच तसा आहे, कल्पना नाही. पण जे आहे ते अतिशय ऐकत रहाण्यासारखं झालंय. अजय अतुलनी धिंगाणे कमी करून अशी स्वस्थ चित्त, उसंतीची गाणी जास्त करायला हवीत. पुरेसे एस्टॅब्लिश झालेत आता ते. आणि सोनूला अशीच वेचक गाणी द्यावीत.
याची कैक कव्हर्स ऐकत असते, पण कंटाळा येत नाही. एकानं सॅक्सोफोनवर रीळ केलंय दोनच ओळींचं. सुंदर आहे. सोनूही कुठे ना कुठे गातच असतो हे. तो हल्ली बाळासाहेब मंगेशकरांसारखा स्वतःच्या गाण्यांत अतोनात व्हेरीएशन्स घेत रहातो. चालायचंच. प्रतिभा आहे आणि ती सांगेल तस्सं वळणारा गळा आहे, आम्ही कोण आक्षेप घेणारे. अनेकदा मीही म्हणून बघत असते. पण खळेकाकांच्या गाण्यांसारखं आधी टिपेच्या ओळी गाठून आपली उंच उडी साधारण कुठपर्यंत जातेय हा अंदाज घ्यावा लागतो, मग धडपडत घसरत खालच्या ओळी सापडतात कशा तरी.
पुष्कळच लांबलं हे आख्यान. हा वेळ गाणं ऐकण्यात घालवायला हवा होता. पण माझ्यासारखंच आणखी कुणाच्या डोक्यावर बसलंय का ते कळेल म्हणून खरडलं.
https://www.youtube.com/watch?v=lHJp_3g2MAI

Friday, September 15, 2023

 गणपतीला सर्रास बाप्पा म्हणण्यातलं नावीन्य आता पूर्ण ओसरलं आहे. अतिरेक झाला की नकोसं होतं.

साधी नेहमीची गणपती, गजानन, गणेश ही नावं पुन्हा वापरात आणायला हरकत नाही. बाकी शेकडो संबोधनं आहेत तीही वापरल्यास दुधात साखर.
उपरोध आवडत नाही म्हणून स्वच्छपणे व्यक्त केलंय. हे सुचवण्याचाही कुणाला त्रास होऊ शकतो, त्याबद्दल आधीच क्षमस्व. कृपया वाद घालू नयेत.

Thursday, September 7, 2023

 ९०व्या वाढदिवसानिमित्त उदंड शुभेच्छा, बेब!

🌹
आमच्या मातोश्रीही आज ६८ झाल्या असत्या आणि तिलाही अस्संच बेबच म्हटलं असतं, कारण तुमची जगण्याची मिळतीजुळती जातकुळी.
खरं म्हणजे तुझ्या गळ्यात हात टाकून, तुझे दोन्ही गाल ओढून हे सांगायला जास्त आवडलं असतं.
जानम, समझा करो😘

Wednesday, September 6, 2023

 केवढं भरभरून लिहितायत सगळे मालिनीताईंबद्दल!

अजून जेमतेम काही वेळच झालाय बातमी येऊन.
केवळ श्रद्धांजली वाहिली जात नाहिये, मंडळी चार शब्द बोलतायत, दोन ओळी स्वतःच्या लिहितायत, हृद्य आठवणी शेअर करतायत. जवळपास हरेक रसिकानं ताईंचं गाणं प्रत्यक्ष ऐकलं असल्यामुळे प्रत्येकाकडे काही ना काही तरी सांगण्यासारखं आहे आणि त्या सांगण्यातून किंचितसा गहिवर पोचतोय. प्रत्येकाला किती मनापासून वाईट वाटलंय ते जाणवतंय.
खरोखरच एक वीज हरपली आज. आपण उपस्थित बहुतेकांनी प्रत्यक्ष तळपताना पाहिलेली. आपली आत्या, मावशी, काकू असावी तसा घरगुती आपुलकीचा वावर आणि तीच बाई घरचं कार्य उभं राहिल्यावर सळसळत्या विजेसारखी वावरावी तसं लखलखीत गाणं यांचं सुखद मिश्रचित्र अनुभवू शकलो, हे आपलं भाग्य. टप्पा म्हणजे तर आपली ऐकण्याची कुवत कमी पडावी अशी चपळाई. त्या सुहास्य मुद्रेनं येणार, बसणार, गायला सुरुवात, संगतकारांचं दिलखुलास कौतुक, ठरलेल्या वेळेत खणखणीत परफॉर्मन्स, गाऊन झालं की स्निग्ध हसून नमस्कार करून निरोप घेणार. एवढ्या वर्षात फरक एकच, मांडी घालून बसण्याऐवजी पाय खाली सोडून बसणं. बाकी सगळं जसंच्या तसं. निव्वळ गाणं एके गाणं. तेही कसं, तर सगळे खळखळाट शांत करत ठहराव आणणारं. पण प्रवाही. तयारी दाखवणारी मांडामांड नाही. श्रवणानंदाबरोबरच श्रोत्यांचं ग्रुमिंग करणारं गायन.
पी. जी. वुडहाऊस त्याच्या मुलीच्या मृत्युच्या वेळी म्हणाला होता, की ती अमर आहे असं त्याला वाटलं होतं. आपल्याही मनात कितीतरी माणसं अशी अमरच असतात. आणि असं कोण कोण आपल्या ठायी अमर आहे ते ती वेळ आल्यावरच उमगतं. देवाघरची माणसं ही.
मालिनीताई, तुमच्या गाण्यातलं चैतन्यच निराळं होतं. तुम्हाला कधीच तोड नसेल.
मन:पूर्वक आदरांजली.


Saturday, August 19, 2023

 ये सोचना गलत है के तुम पर नजर नहीं

मसरुफ मैं बहुत हूं, पर बेखबर नहीं

शायरला मुजरा!

Friday, August 18, 2023

 वर्ल्ड फोटोग्राफी डे.

आपण काढलेले आपल्यालाच आवडलेले फोटो.
शिखरं आणि गरूड मंडपाच्या या महिरपी एकमेकांना जशा कॉम्प्लिमेंट करतात, त्यांची आधी स्केचेस केली गेली असतील का?
तुपाच्या किंवा दह्याच्या स्थिर स्तरात अनंत काळापर्यंत ढवळाढवळ करू नये असं तुम्हालाही वाटतं का? काळजीपूर्वक सेट केलेल्या लोणकढ्याबद्दलचा तर हा फॉरेव्हर डिलेमा आहे माझा.



Sunday, August 13, 2023

 मिटिंग - शंकर पाटील

२००० रुपयांची म्हैस व्यायला आलेली तारा मावशी, चहा बिस्कीटं चिवड्या फिवड्याच्या मिषानं ग्रामपंचायतीत जाऊन घोरणारे बापू लोहार, कर्नाटकाचे घरजावई म्हणून महाराष्ट्रात स्थायिक झालेले आणि दिसेल त्याला कामाला जुंपणारे अंगात मलमलचा बदाम घातलेले देसाईअण्णा, दारूच्या तारेत सपशेल समाधी लागलेला रामा धायगुडे, झोपाळ्यावर झुलणारे शंकरअण्णा आणि हाताचा मुटका गालावर टेकवून पोझ घेतलेली चंपा परटीण, त्यांचा गोडाधोडाचा बेत आणि गुलुगुलू गप्पा, ख्यास मारणारे सरपंच आणि ग्रामपंचायतीच्या मिटिंगचा कोरम भरावा म्हणून रात्री उशिरापर्यंत या सगळ्या नमुनेदार मेंबरांना गोळा करत गावभर पायपीटणारा कधी बापूडवाणा, कधी चतुर, कधी हेलपाटणारा तर कधी जीवाला कावलेला महादू शिपाई.
'का मिटिंगबिटिंगला बलवाय आलता का?', 'आमच्या सायबांची झोपच पाखरावानी हाय', 'अन्ना काय व्यालेल्या म्हशीचा गिन्ना', 'या राजं, कवासं निघालता?', 'येतील नाही तर जातील, जा की मुडद्या, तुला काय करायचं', 'आज रोजी आमच्याकडं जरा घोट्टाळाच हाय', 'आमच्या घराकडनं आला का रं', 'पैसं फेकू, जीपा उडवू, मतदान केलं का नाही कळता कामा नये, तुमचे पाय कुठं हायेत, आमाला दर्शन घ्यायचं आहे', असे प्रत्येकाच्या तोंडचे खुसखुशीत ग्राम्य विनोदी संवाद आपली जोरदार करमणूक करतात.
पिष्टान तापल्यागत तापलेली शंकर अण्णांची बायको, चांद उगीवला का बघायला सटकत 'मिटिंग म्होरं ढकला' म्हणणारे आणि चहाचा धोशा लावत 'आधी चहा करणेत यावा, मग मिटिंग घेणेत यावी' असा ठराव पास करणारे, घोर अन्यायावर एकमत असणारे हे आपापलं स्वतंत्र वैशिष्ट्य असलेले ग्रामपंचायत सदस्य आणि दक्षिण महाराष्ट्राच्या काठावरचं एक गाव, पाटलांनी झक्क रंगवलंय. जेमतेम अर्ध्या तासाची ही कथा वाचण्यापेक्षा ऐकण्यात जास्त गंमत आहे.
त्यांच्या तोंडून 'मिटिंग' ऐकताना तो संपूर्ण हलता देखावा आणि ती हेल काढून बोलणारी इरसाल ग्रामीण पात्रं नजरेसमोर व्यवस्थित दिसत जातात. पाटलांचं अभिवाचन नाट्यपूर्ण आणि भलतंच रसाळ आहे. कथेच्या ओघातली वर्णनं तुम्ही त्या प्रसंगी हजर असल्यागत प्रत्यय देतात.
शंकर पाटलांचं कथाकथन अगणित वेळा ऐकणे हा आमचा फॅमिली फेवरीट टाईमपास आहे. माझ्या बहिणीला जवळपास सगळ्या गोष्टी तोंडपाठ आहेत आणि ती पाटलांच्या बरोबरीनं तर तंतोतंत हावभाव करत म्हणत असतेच, पण एरवीही मी किंवा बाबांनी किल्ली दिली की ती भरधाव सुटते आणि आमची हसून हसून मुरकुंडी वळते. सगळ्याच कथा झकास असल्या तरी मिटिंग पहिल्या नंबरावर, मग 'नाटक' कथेतली अफाट धमाल, त्यानंतर अफलातून रंगवलेली धिंड अशी आमच्यापुरती उतरती भाजणी आहे.
कुणी अद्याप ऐकली नसेल तर जरूर ऐका.
https://www.youtube.com/watch?v=_6fggPs3FSM

Sunday, August 6, 2023

 मैत्री दिनानिमित्त.

आमचे बाबा आणि रमजानकाका हे लंगोटीयार. आता बाबांचं वय ८० आणि काका बाबांपेक्षा जरा लहान, ७६ असावेत. म्हणजे या मैत्रीला खरंतर जास्तच, पण किमान साधारण ५०-६० वर्षं तरी सहज उलटून गेलीच म्हणायची. बाबांचं एक घरगुती नाव सुभाष आहे, तर काका बाबांना सुभाष म्हणतात. दोघांनाही एकमेकांबद्दल अतिशय आत्मियता आहे.
आमचे आजोबा सरकारी डॉक्टर म्हणून नोकरीत असताना त्यांच्याकडे आजुबाजूच्या गावांच्या दवाखान्याची जबाबदारी असे. मु.पो. सांगरुळला असताना मणेर कुटुंबाशी परिचय झाला आणि दोन्ही कुटुंबातल्या समवयस्क मुलांमध्ये मैत्री झाली. रमजानकाका नंतर नोकरीसाठी कोल्हापुरात आले आणि बाबांची, त्यांची पहिली खाजगी नोकरी एके ठिकाणीच होती. नोकरीतल्या व्यावहारिक धोरणी बाबी काकांनी बाबांना शिकवल्या. पुढे ते वीज मंडळात चिकटले आणि बाबा न्यू एज्युकेशन सोसायटीत. रहायला मात्र समोरच्या गल्लीतच. त्यामुळे जाणं येणं खंडित झालं नाही.
रमजानकाका नमाजी मुस्लिम. दाढी, डोळ्यात सुरमा, चौकड्याची लुंगी, डोक्यावर क्रोशाची टोपी आणि पठाणी स्वच्छ पांढरा कुडता हा नेहमीचा वेश. ते दोन वेळा हाजला जाऊन आलेत. आम्ही देशस्थ ब्राह्मण. तेव्हाच्या काळाप्रमाणे आमच्याकडे सोवळंओवळं. देव्हाऱ्यात उजव्या सोंडेचा गणपती असल्यामुळे नेहमीपेक्षा जरा अधिकही असणार. पण या कोणत्याही गोष्टीचा मैत्रीवर काही परिणाम आजतागायत दिसलेला नाही. समोरासमोर रहात असताना बाबांची नियमित चक्कर व्हायची, ती आम्ही लांब रहायला गेल्यावर आठ-पंधरा दिवसातून व्हायला लागली, एवढंच.
आमचे आजोबा सक्रिय स्वातंत्र्य सैनिक आणि गांधीजींचा प्रत्यक्ष सहवास लाभलेले होते. आजोबांना खुद्द गांधीजींनी स्वहस्ते पाठवलेलं पोस्टकार्ड आणि भेट दिलेला चरखा घरात होता. त्यांचे पंचक्रोशीतले पेशंटस् सगळ्या जातीधर्मांचे. उपचारांसाठी आल्यावर शहरात इतर कुठं रहाणार, आजोबा आपल्याकडंच ठेवून घ्यायचे त्यांना.
आजी फार लवकर गेली. पण आजोबांची सगळी नऊच्या नऊ मुलं समंजस, अत्यंत गुणी आणि आजीच्या माघारी आजही एकमेकांना घट्ट धरून असलेली. या सगळ्या भावंडांनी दोन खणांच्या मुलखाच्या गैरसोयीच्या घरात आपले अभ्यास आणि घरकामं सांभाळून आजोबांच्या पेशंटस्ची जेवणीखाणी आणि औषधांची बडदास्तही ठेवली. रमजानकाकांचा या भरलेल्या घरात सहज वावर असायचा. बाबा आणि काका भटकंती करायचे. सायकलवरून विशाळगडावर, ट्रकमधून बेंगलोरला अशा रोचक श्टोऱ्या बाबा खुलून सांगतात. असं भटकताना आजोबांनी कधीच त्यांना रोखलं नाही. काहीही निमित्त असलं की आजोबा म्हणायचे, 'त्या बामणाला बोलवा रे कुणीतरी', म्हणजे रमजानकाकांना!
आमच्या घरात तेव्हा तर सगळेच शाकाहारी. आजसुद्धा पुढच्या पिढीतले दोन चार जण वगळता फार कुणी सर्वाहारी नाहीत. पण या गोष्टींचा कधीच कुठं उल्लेखही नसतो. ईदला वेगळा पुलाव आणि खिरीची किटली घरपोच येणार आणि दिवाळीच्या फराळाला ते घरी येणार किंवा फराळ पोचता होणार.
आत्या अडनिड्या वयाच्या होत्या, आजोबा सतत फिरतीवर. बाकी घरात मोठं माणूस कुणी नाही. भोवती सगळा अठरापगड मोहल्ला. पण मोठ्या भावांच्या बरोबरीनं काकांचंही लक्ष असायचं. हे आज रमजानकाका सांगतात म्हणून आम्हाला माहित. त्यांच्याच भाषेत सांगायचं तर मामांनी (आजोबांना सगळे मामा म्हणत) ज्या विश्वासानं वागवलं त्यानं मी आयुष्यात उभा राहिलो. त्यांनी खूप आपुलकीनं मायेनं वागवलं, मला त्यांच्या मुलांतलाच एक समजलं. तुमच्या घरी येऊन येऊन माझी भाषा बदलली, गावंढळपणा निवळला, आहाराच्या सवयी, राहणीमानही बदललं. तिखटजाळ जेवण आणि मांसाहाराचं प्रमाण अगदीच कमी झालं. मामांमुळं बऱ्याच रीतीभाती कळल्या, मी जवळजवळ बामणच झालो.
रझियाकाकी मला सांगतात की काकांना जास्त करून शाकाहारी जेवण पाहिजे असतं, पण काकींना मांसाहार आवडतो म्हणून त्यांना कंपनी देतात.
आमच्या घरातली सगळी स्थित्यंतरं, भावंडांची शिक्षणं, लग्नकार्यं, पुढं मुलंबाळं सगळं त्यांच्यासमोर झालं. बाबा सांगतात, की तुमच्या आईबरोबर कधी कुरबुर झाली की मी घरी न थांबता समोर रमजाकडं जाऊन जेवायचो आणि शाळेत जायचो. मी जेवायला थांबलो की त्या नवरा बायकोला समजायचं आमचं काही तरी बिनसलंय. आम्ही दोघीही शाळेतून येताना किंवा जाताना वरचेवर काकांकडे डोकावायचो. ते घर परकं कधी वाटलंच नाही. आत्ताही कधी गेलो की जे असेल ते खाऊन येतो आम्ही. लखलखीत स्वच्छता आणि केव्हाही गेलं तरी प्रेमानं स्वागत करणारे हसरे प्रसन्न चेहरे हे त्यांच्या घराचं वैशिष्ट्य. मुलांना व्यवसाय सुरू करून देऊन लग्नं झाल्यावर त्यांची त्यांची स्वतंत्र सोय लावून दिली त्यांनी. आता त्यांची नातवंडंही लग्नाला आली आहेत.
बाबा आणि काकांच्या जशा अनेक एकत्र आठवणी आहेत, तशा आत्या आणि काकांच्या पण आहेत. कोल्हापुरात गेल्यावर आत्या रमजानकाकांना आठवणीनं भेटून येतात. रमजानकाकांना डोळ्याला अनेक वर्षं सोडावॉटर काचांचा चष्मा होता. दृष्टी हळूहळू अधू होत काही वर्षांपूर्वी संपूर्ण गेलीये, त्यामुळे बाहेर पडणं जवळपास बंद झालंय. पूर्वी बाहेरगावी जायचे तेव्हा एकदा पुण्यात आल्यावर पोस्टात नोकरी करणाऱ्या धाकट्या आत्याला अचानक ऑफिसात जाऊन भेटले. बाईंना भेटायला हे कोण गृहस्थ आलेत आणि बाई त्यांच्याशी निवांत बोलतायत हे बघून ऑफिसमधले लोक चकित झाले आणि ते बघून आत्याची जाम करमणूक झाली.
काही वर्षांपूर्वी कोल्हापूरच्या घराची वास्तूशांत केली तेव्हा माझी बहिण रमजानकाकांना गाडीत घालून घेऊन आली. त्यांच्या पद्धतीप्रमाणे काकांनी उंबऱ्यात थांबून दारात एक पाऊल ठेवून कुराणातला घरशांतीचा कलमा म्हटला. तेव्हा आतल्या खोलीत बाबा गृहपुजेला बसले होते आणि साग्रसंगीत यज्ञ आणि उच्चरवात मंत्रोच्चार सुरू होते. दोघांच्या पाया पडल्यावर आम्हाला दोघींनाही तोंड भरून आशीर्वाद दिले. आम्हाला लहानपणापासून बघितलं असल्यामुळे आम्ही दोघी भेटलो की काका काकी दोघंही सद्गदित होतात.
वर्ष दीड वर्षापूर्वी बाबांचं कायमचं पुण्याला यायचं ठरल्यावर बाबांनी सगळ्यात आधी रमजानकाकांना सांगितलं. आणि काका काकी दोघंही रडायला लागले. दृष्टी गेल्यापासून काका जरा हळवे झालेत, त्यांची सख्खी भावंडं बहुतेक कुणी उरलेली नाहीत. बाबांना निरोप देणं फार जड गेलं त्यांना. आता फोन वगैरे असतो, बाबा किंवा मी गेले की न विसरता भेटून येतो. पण जग जवळ आलंय असं आपण कितीही म्हटलं तरी या वयस्करांसाठी ते अंतर फार उरतंच.
मैत्री दिन आहे तर काकांना फोन करायची बाबांना आठवण केली. त्यावेळी विचार आला, या मैत्रीबद्दल आपणही दोन शब्द लिहायला हवेत.








Thursday, August 3, 2023

 फार वाईट वाटलं. धोधोंना मनापासून आदरांजली.

मी पूर्णपणे शहरातच वाढले आणि राहिलेय. काही ना काही कारणांनी गावांशी, झाडांशी, निसर्गाशी, मातीशी, शेतांशी संबंध येत राहिला असला, तरी त्या सगळ्याची ओळख खऱ्या अर्थानं सगळ्यात आधी शाळेच्या पुस्तकातून चक्क अभ्यास करून, कवीला काय म्हणायचंय ते लिहित शिकलेल्या आणि नंतर आपणहून वाचलेल्या धोधोंच्या कवितांनीच करून दिली. ती गोडी कायमचीच लागली. धोधोंच्याच शब्दांत म्हणायचं तर पिसं लागलं, तशातलाच प्रकार. माझं तरी हे फार कमी कवींच्या बाबत झालंय. शाळेपासून आवड लागण्याचं प्रमाण तर आणखी थोडं. त्यांची पुण्यात एकदा भेट झाली, तेव्हा त्यांना आठवणीनं आणि कृतज्ञतेनं तसं सांगता आलं, हे माझं भाग्य. त्यांच्या कविता तर वाचल्या ऐकल्याच, पण अनेक वर्षांपूर्वी पहिली म्युझिक सिस्टीम विकत घेतली तेव्हा आवाज पूर्ण सोडून त्यांची गाणीही जोरदार ऐकली, अक्षरशः पारायणं केली. ती कायम होत राहतील.
या काही लोकांना आपण आपल्या आयुष्यातून वेगळं काढू शकत नाही, हे वापरून घासून बोथट झालेलं वाक्य असलं तरी १०००% तथ्य आहे त्यात.
https://www.youtube.com/watch?v=605oiN46vO8

Tuesday, July 25, 2023

 दिलखुलास माणूस गेलं.

सामान्य माणसाला खळखळून हसवणं खायचं काम नाही. गाठीशी जोरदार पुण्य बांधून नेलं कणेकरांनी.
जुन्या गाण्यांच्या दर्दी आवडीसाठी, वडिलांसाठीच्या हळवेपणासाठी, लताबद्दलच्या जिव्हाळ्यासाठी, खुसखुशीत किश्श्यांसाठी, तुमच्यातल्या सबंध खवचटपणासह आणि अतिशयोक्ती अलंकारासह तुम्ही कायम आवडत रहाल.


Sunday, July 23, 2023

 आजचा अतिशय महत्त्वाचा लेख.

बाकी सगळ्यापेक्षा या गळांच्या जाळ्यामुळे मुलांची काळजी फार वाटते. मी ऐन अभ्यासाच्या वयात असताना अशा गळांचे मोह ओलांडत कशी काय पार झाले असते, झाले असते का, याबद्दल साशंक आहे. त्यामुळे आजच्या शाळकरी मुलांपासून ते घडणाऱ्या वयाच्या सगळ्याच लोकांबद्दल अत्यंत आदर वाटतो.
https://www.loksatta.com/lokrang/vishram-dhole-write-on-google-facebook-instagram-social-media-gimmicks-for-attention-zws-70-3805992/?fbclid=IwY2xjawRKC0FleHRuA2FlbQIxMQBzcnRjBmFwcF9pZBAyMjIwMzkxNzg4MjAwODkyAAEe4TDa-8jqSVO2i-1hdEf99lxWd1uS3DMCS1NhrjfsEI-7IWMhW8-2XtK8LY0_aem_C5zUFZDBVX8CSXYH7voO9g

Saturday, July 8, 2023

 आवडीची माणसं एकत्र आठवण्याचा दिवस.

९५-९६ मधल्या एका वाढदिवसाला Sanjay Apteनं कुणा एकाची भ्रमणगाथा भेट दिलं. त्यापूर्वी फक्त शितू भेटली होती. पण यशोदेनं आणि नर्मदेनं मिळून गोनिदांच्याच शब्दात - मला कव घातली आणि त्यात गुरफटून बसायला नंतर जग आवाक्याबाहेर मोठं होत गेलं तरी अजूनही आवडतंय. आणि गणगोतातल्या ऋग्वेदींच्या लेखात पुलंनी पहिल्यांदा गात्या बोरकरांची गाठ घालून दिली होती ती केव्हा ते तर आठवतही नाही. गोनिदांची जात्याच पापभिरू, चांगुलपण आणि बाळबोधपण वागवणारी, जगाच्या जरा मागंच असणारी माणसं आणि बोरकरांची जगाकडं बघण्याची मधाळ, हेवा वाटण्याएवढी सुंदर नजर, देखण्या शब्दाशब्दातून ओढून घेणारी जगण्याची असोशी. हे हवंहवंसंच आहे. आयुष्यात आवडीच्या नव्या लोकांची भर पडत रहाते, पण एकीकडे आधीपासून आवडीची माणसं आणखी आणखी मुरत जातात. लता, व्यंकण्णा माडगूळकर, पुलं, कुमारांच्या मुरत चाललेल्या पंगतीतली ही दोघंजणं. चांगली ऐसपैस मांडलीये मी ही पंगत.