म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Friday, April 26, 2024

 #आनंदीजीवन #रिटायरमेंटहोम #स्वनिर्णय #एकमत #कुटुंबसौख्य #वृद्धांचेपालकत्व

येत्या एक मे रोजी आमच्या बाबांना कोल्हापुरातून पुण्यात येऊन दोन वर्षे होतील. हा प्रवास आमच्या कुटुंबासाठी खूप शिकण्याचा आणि अखेरीस आनंद सापडण्याचा होता. तो आवर्जून शेअर करण्यासारखा आहे.
बाबांना अनेक वर्षे एकटं आणि स्वतंत्रपणे रहाण्याची सवय होती. मी थोड्या कालावधीसाठी कोल्हापुरात गेल्यानंतर एकत्र रहाताना त्यांना आमच्याशी बरंच जुळवून घ्यावं लागलं होतं. पण तिथे त्यांची खोली म्हणजे त्यांचा स्वतंत्र प्रांत असल्यामुळे त्यांनी सांभाळून नेलं. पुण्यात यायचं ठरल्यानंतर काही प्रश्न उभे राहिले. आम्हा दोन्ही मुलींची घरे वनबीएचके. त्यापैकी माझं घर तिसऱ्या मजल्यावर आणि लिफ्ट नाही, मुलाच्या मित्रांची अखंड वर्दळ, दंगा, पसारे, रस्त्यावरच्या वर्दळीचा गोंगाट. तर बहिणीकडे लिफ्ट असली तरी ती दिवसाचे तेरा तास घराबाहेर. त्यावर टूबीएचके घर भाड्याने घेऊन रहाण्याचा तोडगा काढून वर्षभर तसे राहिलो देखील. मात्र ते घर आम्हाला कुणालाच फारसं आवडेना. बाबा रमलेत असंही जाणवेना. त्या परिसरात ज्येनांचे असंख्य गट बसतात, पण माणसात रमणारे बाबा त्यांच्यात फारसे फिरकलेच नाहीत. सकाळ संध्याकाळ फिरून येऊन मुख्य रस्त्याच्या बसस्टॉपवर निवांत वारा खात बसणे, घरी येऊन टीव्ही बघणे, अधेमधे भावंडांकडे जाणे. बाकी वेळ ते, मी घरून काम करत होते तर नकळतपणे माझ्यावर अवलंबून रहायला लागले. आम्हीही गृहीत धरलं की त्यांना रुळायला थोडा वेळ द्यायला हवा. जेव्हा वाढीव भाडं द्यायची वेळ आली तेव्हा मात्र त्यांनी मी स्वतंत्र रहातो, तू तुझ्या घरी रहायला जा असा निर्णय घेतला. जो आम्हाला सगळ्यांना मान्य होता.
त्यानुसार प्रयत्न करून धाकट्या काकाने एक नवेकोरे रिटायरमेंट होम शोधून काढले आणि आधी आठ दिवस ट्रायल घेऊन बाबांना आवडल्यावर ते तिकडे रहायला गेले, मी माझ्या घरी परत आले. मुख्य रस्त्यापासून जवळ आणि आम्हा सगळ्यांना अगदी सोयीच्या अंतरावर असे त्यांचे सर्व सोयीयुक्त ठिकाण, पण अजून फारशा ऍडमिशन्स झालेल्या नसल्याने इनहाऊस सोयी काहीच नाहीत. सकाळच्या चहा नाश्त्यापासून जेवणाचे डबे वगैरे सगळंच बाहेरून. कपडे आम्ही घरून धुऊन द्यायचे. जेवलेले डबे आणि ताटवाटी बाबांनीच धुवायचे. टीव्ही रिचार्ज करण्यासाठी आठवण करावी लागायची. लिफ्ट रात्री बंद. फ्रीज वापरायचा नाही. सोयींच्या मानाने दर फार चढे. तेही देत होतो, पण कायम सदस्य कुणीच नसल्याने तीनेक महिन्यातच बाबा एकटे पडले. त्यात अवकाळी पावसानं जेव्हा रस्ते तुंबले तेव्हा आम्ही जवळ रहात असूनही चहा, जेवण वगैरे सुद्धा त्यांच्यापर्यंत पोचवता आलं नाही. अशातच जवळच्या आणखी एका रिटायरमेंट होमविषयी माहिती समजली, जिथे भरपूर सदस्य होते. मी आणि बाबा तिथे जाऊन बघून आलो. ती छोटेखानी व्यवस्था एकंदरीत सोयीस्कर वाटली, अंतरात फरक पडत नव्हता. मुख्य म्हणजे बाबांना सगळं आवडलं. त्याप्रमाणे आम्ही आधीच्या व्यवस्थापकांना कल्पना दिली आणि लगेच ते तिकडे रहायला गेले सुद्धा.
आता इथे रहायला येऊन जवळपास आठ महिने होतील. दोन मजली जागेमध्ये खालच्या मजल्यावर सर्व पुरुष आणि वरच्या मजल्यावर स्त्रिया आणि खुद्द केअरटेकर कुटुंब अशी व्यवस्था आहे. एक मदतनीस कुटुंब तिथेच रहाते. सगळे मिळून साधारण पंधरा सोळा जण आहेत. चहा, नाश्ता, जेवण, कपडे धुणे इनहाऊस, आठवड्यातून एकदा जनरल फिजिशियन आणि फिजिओ थेरपिस्ट व्हिजिट या सगळ्याचा मिळून वाजवी दर आहे. एकत्र जेवणे, टीव्ही बघणे, रोज योग वर्ग, नियमित फिरायला जाणे, देवघर आहे त्यामुळे आपापले देवाचे म्हणणे होते, सणवार, वाढदिवस साजरे होतात, सहली निघतात. बहुतेकांची मुलेमुली नियमित भेटायला येतात, ही मंडळी बाहेर जातात. सर्व पुरुष विधूर आहेत, त्यामुळे आपोआपच एक समदु:खी वातावरण आहे. केअरटेकर जोडपं वयानं लहान आहे आणि सिन्सिअरली या वडिलधाऱ्यांकडे त्यांचं लक्ष असतं. खरं म्हणजे एवढ्या लहान वयात त्यांनी हा व्यवसाय सुरू केला हे कौतुकास्पद आहे. नुकतीच त्यांना मुलगी झाली आहे, जी आता या सर्व वृद्धांचा विरंगुळा होईल असं दिसतंय. ऍडमिशन्स साठी सातत्याने विचारणा होत असते. त्यामुळे लवकरच खालचे दोन मजले घेऊन व्यवसाय विस्तार होतोय अशी चिन्हं आहेत.
हे सगळे सविस्तर सांगण्याचे कारण आहे. आता बाबांचं झकासपैकी रुटीन लागलेलं आहे. रोजचं फिरणं, योगवर्ग ते मुळीच चुकवत नाहीत. त्यांना एक छानसा बडी मिळाला आहे. आताशा कुठेही जायचं तर त्यांचा दोन तासांहून अधिकचा व्हिसा आम्हाला मिळेनासा झाला आहे. कोल्हापूरला जायचं नाव काढत नाहीत, इथे भावंडांकडे गेल्यावरही हातावर पाणी पडलं की चुळबुळ चालू होते. उलट आम्ही भेटायला गेलो की आम्हालाच तिथे जेवायला घालून पाठवतात. जवळजवळ एक दिवसाआड आम्ही मुली, बाकीची भावंडं भेटायला येतात, ते सगळ्यांकडे येतात. बाहेरगावची भावंडं त्यांना आवर्जून भेटायला जातात, नियमित चौकशी करतात. ते लाघवी आहेत त्यामुळे त्यांना नेहमीच वेगळी आपुलकी मिळते. सणावाराला ते आमच्याकडे यायचे म्हटल्यास केअरटेकर नाराज होते, नका जाऊ म्हणते. या २८ मार्चला त्यांना ८० पूर्ण झाली, जो त्यांनी करू दिलेला आजवरचा सगळ्यात दणक्यात साजरा झालेला वाढदिवस आहे. तो त्यांना स्वत:ला मनापासून आवडला. तिथे नाश्त्यापासून त्यांच्या आवडीचा बेत केला गेला. संध्याकाळी त्यांनी सर्वांना तिथेच मेजवानी दिली. आत्यानं आणि मुलींनी औक्षण केलं, नातू मित्रांसकट हजर होता. गेल्या दोन वर्षात कधी नव्हत्या इतक्या त्यांच्या शुगर लेव्हल्स आदर्श आहेत, एचबीएवनसी दृष्ट लागण्यासारखं आहे. तब्येतीचे सर्व पॅरामीटर्स उत्तम आहेत. याचाच अर्थ बाबा मनापासून खुश आहेत. माझ्या मधल्या काकाच्या शब्दात सांगायचं तर मन:स्वास्थ्य आणि शारीरिक स्वास्थ्य किती थेट जोडलेलं असतं त्याचं हे उत्तम उदाहरण आहे.
या सर्व प्रवासात बाबा आणि आमच्या सर्व कुटुंबाच्या एकमताचा प्रचंड वाटा आहे. त्यांचा आनंद आम्ही प्रमाण मानला. आणि ते योग्य झालं याचा आम्हाला सर्वांना आनंद आहे.

 टीन एज सन

🤣
Forever जपून जपून सांभाळून तोलून मापून mode on
आमच्या घरी एक आखाड सासरा आहे🤣
राशीचक्राच्या वृश्चिक भागात शरद उपाध्ये नागपंचमीला दारावर नागुबं घेऊन येणाऱ्या गारुड्यावर करवादणाऱ्या घरातल्या बाईचा किस्सा सांगायचे. 'पुढं हो रे बाबा, घरात आहे तेवढा पुरे आहे' म्हणे. घरातल्या वृश्चिक माणसाची मला त्यावरून जाम मजा घेता यायची. कारण आयरॉनिकली कन्या रास गुणधारक चिरंजिवांची वृश्चिकेपेक्षा मजा मजा असते हे दक्कलच नव्हतं मला तेव्हा🤣

Sunday, April 21, 2024

 #सोय #सर्वसमावेशकता #convenience #inclusionforall #UserFriendlyDesign #thinkingaboutall

हा बस स्टॉप आणि हे स्वच्छतागृह चेन्नईतल्या आय आय टी मद्रासच्या कॅंपसमधले आहेत. या दोन रचना आवर्जून शेअर कराव्याशा वाटल्या. अत्यंत बेसिक पण सुबक रचना आहे. बस स्टॉपचा रॅम्प सोपा, आटोपशीर उंचीचा, थोडासा खडबडीत साधासा कॉंक्रीट कोबा आहे आणि स्वच्छतागृह रस्त्याच्या पातळीवर आहे. तिथे एकही पायरी नाही. सर्व स्वच्छतागृहं आणि बससाठीची सर्व स्थानकं याच मोजमापाची आहेत. स्वच्छतागृहांची आणखीही डिझाईन्स आहेत, पण सगळ्यांचा ऍक्सेस याच पद्धतीचा आहे.
इमारतींमधली अपंग व्यक्तींसाठीची अंतर्गत स्वच्छतागृहं आणखी चांगली आहेत. सोप्या खिट्ट्या असलेले सरकते मोठे दरवाजे, व्हीलचेअरसाठी साजेशा उंचीवर असलेल्या नळजोडण्या, बेसीन्स आणि आरसे, उत्तम रंगसंगतीच्या टाईल्स, आणि व्हीलचेअरच्या हालचाली सोयीस्कर होतील अशा सुटसुटीत, पुरेशा ऐसपैस ऍस्थेटिक खोल्या. त्या बाथरुम्समध्ये इतरांना प्रवेश नसतो आणि हा नियम इतरांकडून कटाक्षाने पाळला जातो. कितीतरी दिवस मला त्या बंद दाराबद्दल कुतुहल होतं. तिथल्या स्वच्छता ताईंना विचारून मी मुद्दाम दार सरकवून ते बघितलं म्हणून मला समजलं.
मी इतर कोणत्याही आय आय टी कॅंपसमध्ये गेलेले नाही, त्यामुळे सगळीकडे अशा रचना असतात की वेगवेगळ्या ती कल्पना मला नाही. पण आयआयटीएमच्या प्रत्येक बांधकामात अपंग व्यक्तींचा विचार व्यवस्थित केलेला दिसत राहतो. Sonali Navangul सोनालीमुळं मी हळूहळू अपंग साक्षर होत आहे. शिवाय माझ्या बाबांनी ७५ पूर्ण केल्यापासून ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या सोयीस्कर बाबींकडेही लक्ष वेधलं जातं.
कुठेही गेलं की आपसूकच हे निरीक्षण चालू असतं. या पॅसेजमध्ये व्हीलचेअर वळू शकेल का, या लिफ्टमध्ये ती मावू शकेल का, या बटणांपर्यंत हात पोचेल का, एवढ्या खड्या रॅम्पवर व्हीलचेअर चढवता येईल का, दारांमधले लहान मोठे उंबरे जाणवतात, कोणतीही दारे पुरेशी मोठी आहेत का, लिफ्ट नीट ऍक्सेसीबल आहे का. खूप ठिकाणी लिफ्टही तीन चार पायऱ्यांच्या उंचीवर असते. एका पायरीचाही अडथळा होऊ शकणारी व्हीलचेअरना त्या अडचणीच्याच. आजारपण, इतर काही शारीरिक मर्यादांमुळे अनेकदा ज्येष्ठ नागरिकही तेवढ्या सुद्धा पायऱ्या चढण्याच्या परिस्थितीत नसतात. लॉबीजमध्ये, बाथरुममध्ये किंवा पायऱ्यांवर सर्रास लावलं जाणारं मार्बल भिती दाखवतं. गुळगुळीत चकचकीत पॅसेजेसमध्ये भिंतींना थोड्या थोड्या अंतरावर मजबूत दांडे हवेत असं वाटतं. काचेचे मोठाले दरवाजे त्रास देतात कारण ते ढकलायला ताकद लागते, नीट जोर लागला नाही तर उलटे अंगावर येऊ शकतात. बऱ्याचदा आतलं सगळं स्वच्छपणे दिसत रहावं म्हणून काचेच्या दारांवर केवळ हॅंडल्स किंवा ढकला / ओढा पाट्या असतात. काच लक्षात येण्यासाठी काही चिन्ह नसेल किंवा घाईत, तंद्रीत असतील तर त्यावर धडधाकट माणसंसुद्धा धडकू शकतात. मी धडकले आहे, पण तो माझा धांदरटपणा म्हणू एकवेळ, पण मी अनेकांना असं धडकताना बघितलं आहे. खूप वर्षांपूर्वी अशाच धडकेनंतर एका सहकाऱ्याच्या नाकाच्या हाडाला हेअरलाईन क्रॅक आला होता.
या बाबी ध्यानात घेऊन रचना करणं फार कठीण नसावं. शहरांमध्ये असे बस स्टॉप फारतर मोठ्या आकाराचे लागतील, पण ही रचना फार खर्चिक वाटत नाही. बस स्टॉपचं जे नुकसान केलं जातं किंवा सीट्स उचकटणे, पूर्ण स्टॉपच चोरीला जाणे किंवा कधी कधी भुईसपाट होणे, अशा शक्यता अशा रचनांमध्ये कमी वाटतात.
मित्र यादीत या क्षेत्रांमध्ये काम करणारे जे जे आहेत, त्यांनी यासंदर्भात थोडा प्रकाश टाकला तर बरं होईल.



Saturday, April 20, 2024

 तिकीट टू पॅराडाईज

मला हलकेफुलके रोमॅंटिक आणि सुखांत असणारे सिनेमे मनापासून आवडतात. 'तिकीट टू पॅराडाईज' त्या कॅटेगरीतला आहे. नेटफ्लिक्समुळं असे फीलगुड सिनेमे शोधणं सोपं झालं आहे.
नात्यांचा गोड-कडू-गोड असा यु टर्न घेतलेला प्रवास बघताना बरं वाटलं. सिनेमाचा संपूर्ण बॅकड्रॉपच मुळात नयनरम्य आहे, त्यात सिनेमात असलेली एकजात सगळी देखणी माणसं आपापल्या वावरानं चांगली भर घालतात.
मागे 'अ टुरिस्ट्स गाईड टू लव्ह'मधून पहिल्यांदाच अतिशय सुंदर व्हिएतनामचं दर्शन घडलं होतं. तसं यात सुरेख बाली दाखवलंय, पण प्रत्यक्षात ते चित्रीकरण ऑस्ट्रेलियातलं आहे. सी वीडची सुबक शेती, अप्रतिम रिसॉर्ट्स, रमणीय निसर्गदृश्यांची रेलचेल आहे. गोष्टीत सुंदर अर्थपूर्ण बालीनीज विवाह विधी बघायला मिळतात. मध्यंतरी 'मेड इन हेवन'च्या दुसऱ्या सीझनमध्ये बौद्ध विवाह बघायला मिळाला होता, अलीकडे रणदीप हुडाच्या लग्नाचे मणीपुरी पारंपरिक विधी बघायला आवडले होते. आता हे बालीनीज लग्न सुद्धा बघण्यासारखं आहे. ते छानपैकी गोष्टीचा भाग म्हणून येतं आणि त्या अनुषंगाने जुळवून आणलेल्या सगळ्या भानगडी सिनेमाची मजा वाढवतात. संवादांंमध्ये, प्रसंगांमध्ये सहज येणारा नर्मविनोद आहे.
सिनेमाला एक चिमुकलीशीच प्रेडिक्टेबल कथा आहे, पण ती चांगली मांडली आहे. या सगळ्या छान छान पसाऱ्यात तिच्याकडे दुर्लक्ष झालेलं नाही. अंडरटोन किंचित वेगळा आणि भ्रमंती वगळता जातकुळी ईट, प्रे, लव्हची आहे.
ज्युलिया खूपच आवडते, पण यात मला जॉर्ज क्लुनीचा बाबा जास्त भावला, तो दिसलायही मस्त. त्याच्या व्यक्तिमत्वातले दोन पापुद्रे उत्तम आणि ज्या प्रकारे घाई न करता उलगडून दाखवलेत, ते बघताना सुखद वाटतं. भांडखोर नवरा बायको वठवताना त्या दोघांनी मिळून जाम धमाल केली आहे. बीअर पॉंगच्या वेळी एक टीम झाल्यावरचा त्यांनी केलेला दंगा आणि शेवटी दोघं तोंड भरून सूचक हसत बघत राहतात ते छान वाटतं बघताना. ज्युलिया-जॉर्जचा होणारा जावई गेडे झालेल्या मॅक्झिम बुतिएच्या खळ्या तर भलत्याच गोड.
मला फार आवडला. कदाचित तुम्हालाही आवडेल.


Friday, April 19, 2024

 #आकाशवाणीपुणेपरिवार #आकाशवाणी #स्वमदतगट #parkinsonssupport #parkinsonsawareness #पार्किन्सन्समित्रमंडळ

आज सकाळी आकाशवाणी पुणे केंद्रावरून पार्किन्सन्स मित्र मंडळाच्या स्व-मदत गटाच्या कामासंदर्भात मंडळाच्या अध्यक्ष शामलाताई, उपाध्यक्ष डॉ शोभनाताई आणि कार्यवाह मृदुला कर्णींची उत्तम मुलाखत प्रसारित झाली. या मंडळाचं काम कित्येक वर्षं चालू आहे आणि कोरोनोत्तर काळानंतर तर सर्व प्रकारच्या माध्यमांचा अतिशय कल्पक मार्गांनी, फार प्रभावीपणे वापर करत मंडळ अधिकाधिक रुग्णांपर्यंत पोचत आहे. या प्रचंड कामाचा आवाका जेमतेम अर्ध्या तासात मांडणं ही अवघड गोष्ट आहे. तरीही शामलाताई आणि शोभनाताईंनी शक्य होईल तितकी माहिती देण्याचा पूर्ण प्रयत्न केला. अर्थात त्यांच्यासारख्या झोकून देऊन काम करणाऱ्या लोकांनी तेही कौशल्य आत्मसात केलेलं असतं, म्हणून ते जमतं. मात्र असं जाणवलं की अशा प्रकारच्या मुलाखतींसाठी निदान दोन भाग तरी ठेवले जावेत. अर्ध्या तासात काही वर्षांचा आढावा माववणं का करायला लावायचं, एकवेळ मानधन नाही दिलं तरी चालेल, पण ते काम जास्तीत जास्त पोचलं तर त्या माध्यमाचा खऱ्या अर्थाने त्या कामासाठी लाभ होईल.
अगदीच कल्पना आहे की सरकारी प्रसारमाध्यमांचे नियम, कार्यक्रमांची स्वरुपं, परवानग्या, मानधन वगैरे सगळं काटेकोर असतं. पण जेव्हा सेलिब्रिटी लोकांच्या मुलाखतींचे चार चार सहा सहा भाग प्रसारित होतात, तेव्हा त्याला श्रोतृवर्ग जास्त असतो म्हणून निराळे निकष असतात का, तेव्हा मानधनाचं वगैरे कसं करतात ते समजत नाही.
आकाशवाणीवर खरंतर सर्वच प्रकारच्या मुलाखती मोठ्या प्रमाणावर होतात. शेती, उद्योग, व्यवसाय, शिक्षण, आरोग्य, शहरी-ग्रामीण समस्या, सरकारी योजना, अनंत जीवनावश्यक विषय केवळ आकाशवाणीवरच ऐकायला मिळतात. पण तरीही सेलिब्रिटींना जरा अधिक स्लॉट्स मिळतात. मनोरंजन दिलं पाहिजे लोकांना, हे बरोबरच. पण अनेकदा स्पष्टपणे समजतं की हे लोक पुरेशी तयारी सुद्धा करून आलेले नसतात. तेच तेच घोळत सांगतात किंवा त्यांचं काम किंवा अनुभवच अजून एवढा तोकडा आहे, की वायफळ बडबडत बसलेत. निव्वळ खूप वर्षं कामं केली म्हणजे सांगण्यासारखं काही साठतंच असं मुळीच नाही. गाण्यांची निवडही फार श्रवणीय नसते. एकंदरीत उजेड असतो. आणि हे खात्रीनं माझ्यापेक्षा आकाशवाणीच्या मुलाखतकर्त्यांना तर फारच खटकत असेल. पण नावं लोकांना सुपरिचित असतात, त्यांचाही इलाज चालत नसेल. तेव्हा असा प्रश्न हमखास पडतो, यांना का म्हणून इतका प्रचंड वेळ अलॉट होतो? की करमणूक क्षेत्रात काम करणारे लोकच सगळीकडे भाव खाऊन जाणार? अशानं इतर महत्त्वाची कामं तपशीलवार स्वरूपात लोकांपर्यंत पोचणार कशी? त्यातही ही अपेक्षा सरकारी प्रसारमाध्यमांकडूनच करता येणं शक्य आहे. खाजगी रेडिओ स्टेशन्स तर करमणुकीचे कार्यक्रम सुद्धा सलग पाच मिनिटं वाजवू शकत नाहीत, काय त्यांच्या अडचणी असतील त्या असोत.
आकाशवाणीवर अलीकडे गायक, कवी, अभिनेत्यांच्या आई-मुलगी, बहिणी-बहिणी, मैत्रिणी-मैत्रिणी अशा जोड्या बोलावतात. त्यातल्या त्यात जरा नाविन्य म्हणून काही हरकत नाही. पण किती भाग असावेत? अनिता दाते आणि तिची मैत्रीण यांचे चार भाग झाले. एक सेलिब्रिटी जोडपं आलं होतं काही महिन्यांपूर्वी. त्यांचे तर सहा भाग तरी नक्की एअर झाले! अर्थात त्यात गाणी असतात, आणि त्यांनी कामही केलेलं आहे, नाही असं नाही, पण सहा भाग अतीच वाटले. हेच उदाहरण ठळक देण्याचं कारण म्हणजे त्या बाईच जादा आणि चांगलं ठाशीव बोलत होत्या, पण काम बुवांनी जास्त केलंय हे माहीत असल्यामुळे मी वैतागून दोन तीनदा रेडिओच बंद करून टाकला.
त्या पार्श्वभूमीमुळे आज शामलाताई आणि शोभनाताई ज्या प्रकारे एकमेकींना अगदी पूरक बोलत, माहिती उलगडून सांगत होत्या, आजारपणाशी संबंधित विषय असूनही त्याचा जो एक सहज आणि आश्वस्त टोन त्यांनी पोचवला, ते ऐकताना यांना आणखी वेळ मिळायला पाहिजे होता असं फारच प्रकर्षानं वाटलं. आधीच्या भागात जी माहिती आली ती सोडून राहिलेले मुद्दे घेता येतात, कामा संबंधीचे अनुभव आणि स्व-मदत मिळाल्यामुळे गरजूंच्या आयुष्यात झालेले बदल आणि परिणाम, मिळालेले अभिप्राय आणि पावत्या, असं पुष्कळ कव्हर करता येऊ शकतं. आणि समाजोपयोगी कामांच्या बाबतीत त्या संबंधित सर्व पैलू व्यवस्थित चर्चिले जाणं, हे महत्त्वाचं आहे. बराच काळ जाणवत राहिलेली ही गोष्ट पार्किन्सन्स मित्र मंडळाच्या निमित्ताने आज मला व्यक्त करावीशी वाटली. आकाशवाणीला पत्र लिहून हे सुचवायचा विचारही आला. मी आधी म्हणाले तसं, वाटल्यास मानधन नका देऊ. पण कामाच्या विस्तारानुसार पुरेसा वेळ द्या. वीस वीस वर्षांचं सर्वदूर पसरलेलं कंस्ट्रक्टिव्ह काम अर्ध्या तासात कोंबणं हे काही बरोबर नाही, गड्या हो. आकाशवाणीची चाहती म्हणून इतना तो कहना बनता है, बॉस!