खरं तर अगदी घासून घासून बोथट झालेला विषय आहे हा. पण एका पायलटच्या मराठी भाषेतल्या रिळांवर भाषेवरून आलेल्या प्रतिक्रिया बघून आश्चर्य वाटलं आणि राहवलं नाही. हीच गत फूड ब्लॉगर मधुराच्या क्लिप्सवरच्या प्रतिक्रिया बघून होते. मराठीतून, किंबहुना सगळ्याच प्रादेशिक भाषांमधून लाखो विषय मांडले जातायत सध्या. हे फार सुखद चित्र आहे. लाखो लोक आपापल्या विषयांवर उत्तम कंटेंट तयार करतायत. पण असं दिसतं की त्या कंटेंटकडे लक्षच नसतं बघणाऱ्यांचं. ते बोलतायत कसे, इथंच तटलेल्या असतात गाड्या. दुकानांवर लावलेल्या किंवा रस्त्यांवर उभ्या केलेल्या जाहिरातींच्या पाट्या हा तर अगदीच सर्रास टवाळीचा, हमखास रेवडी उडवला जाणारा प्रकार आहे. फेसबुकवर सुद्धा अशुद्ध भाषेला लोंबकळून केवढी प्रसिद्धी मिळवली जाते हे सर्वज्ञात आहे. हे सगळं ठीकच आहे.
भाषा सगळ्यांना उत्तम यावी, भाषेकडे लक्ष हवं, हा आग्रह चांगला आहे. काही विशिष्ट व्यवसाय आणि साहित्यिक, भाषिक व्यवहारात ते योग्य आणि आवश्यकच आहे. मात्र प्रत्येक व्यक्ती स्वतःबरोबर वेगवेगळी बुद्धिमत्ता घेऊन येते याकडे या प्रकारात अगदी दुर्लक्ष होताना दिसतं. बुद्धिमत्तेचे नऊ प्रकार आहेत. व्यक्तीमध्ये त्यातल्या वेगवेगळ्या बुद्धिमत्तांची मिश्रणं असतात. त्यामुळे सगळ्यांचीच भाषा उत्तम असू शकत नाही. यामधले कुणी कष्टपूर्वक भाषेवर प्रभुत्व मिळवणार असतील तर ती निराळी गोष्ट आहे, पण यच्चयावत सर्वांची भाषा उत्तमच असेल ही नैसर्गिकपणेच जरा अवघड बाब आहे.
माझा मुलगा जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत होता तेव्हा क्वचित अपवाद वगळता बहुतेक जणांना धक्का बसायचा. त्याचं कारण, शिक्षक न आणि ण मधला फरक न समजणारे असतात हे मुख्य. यातही विशिष्ट ज्ञातीची माणसे भाषा उत्तम बोलतात हा ग्रह मुख्यतः असे. पण भाषेवर प्रभुत्व असणारी माझ्या वर्तुळातली मित्रमंडळी सर्व ज्ञातींमधली आहेत. कारण ते उपजतच भाषिक बुद्धिमत्ता चांगली घेऊन आले आहेत. मुलासाठी शाळा निवडताना मला त्याच्या भाषेविषयी त्यामुळे अजिबातच चिंता नव्हती.
कारणे अनेक आहेत. एकतर मूल घरात जास्त काळ वावरतं, आपण घरी जसे बोलतो तसं ते जास्त बोलणार. मुलाच्या भाषेची जबाबदारी शाळेहून अधिक पालकांची असते. दुसरं, मुलाची परिसर भाषा जी असेल ती ते उचलणार. तिसरं, हाच मुद्दा शिक्षकांनाही लागू होणार, त्यांची स्वतःची जी परिसर भाषा असेल तीच ते बोलणार. भाषेच्या शिक्षकांनी थोडे अधिक कष्ट घ्यावेत ही अपेक्षा रास्त (त्यातसुद्धा इलाज नाही म्हणून शिक्षणशास्त्रात भाषा हा अभ्यास विषय घेणारे अनेक शिक्षक असतात, त्यांच्या बुद्धिमत्तेचा मूळ कल निराळा असू शकतो. त्यामुळे मी तिथेही हे निकष ठेवले नव्हते. सुदैवाने नीलचे सर्व भाषा शिक्षक, खरंतर सगळेच शिक्षक उत्तम होते), बाकी गणित-विज्ञान-चित्रकला-समाजशास्त्र-खेळाच्या शिक्षकांकडून ती अपेक्षा अनाठायी आहे. चौथं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, मुलाची बुद्धिमत्ता ज्या प्रकारची आहे त्या दिशेने ते मूल प्रवास करणार. ते मूल मोठं झाल्यावर त्याची बुद्धिमत्ता बदलणार नसते.
त्यामुळेच आपल्याला शिक्षण एका विषयात आणि पुढे व्यवसाय दुसऱ्या क्षेत्रात अशी उदाहरणे मोठ्या प्रमाणावर दिसतात. कारण कित्येकदा शिक्षण पूर्ण झाल्यावर किंवा अर्धं आयुष्य घालवल्यावर आपली आवड, कल लक्षात येतो आणि मग लोक त्या दिशेला वळतात, त्यात मनापासून रमतात. सख्ख्या भावंडांच्या आवडीनिवडींमध्ये जमीन अस्मानाची तफावत दिसते. म्हणून शाळेत जरी अनेक मर्यादांमुळे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन ठराविक प्रकारे केले जात असले तरी पालकांनी आपल्या मुलांची तुलना कोणत्याही बाबतीत इतर मुलांशी, स्वतःच्याच इतर अपत्यांशी देखील करू नये. अभ्यास विषय जरी कॉमन असले तरी एकीला कुंडीतल्या रोपांची जोपासना, इलेक्ट्रिकल काम, पक्षी निरीक्षण आवडत असेल तर एखाद्याला सुबकपणे मांडामांड करून अगत्यानं जेवायला वाढणं आणि पटापट आकडेमोड करणं. एखादा गायनात, शिवणकामात, व्यायामात वगैरे रमत असेल तर एखादा भटकण्यात, घर टापटीप ठेवण्यात, रुग्णसेवेत. व्यक्ती तितके कल.
भाषेवरून प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष अक्कल काढणे, व्यक्तिमत्त्व जोखणे, तुच्छ लेखणे, हे प्रकार आता तसेही सगळ्याच बाबतीत टोक गाठण्याच्या काळात अती प्रमाणात दिसतात. हे ठळकपणे, भाषिक बुद्धिमत्ता उत्तम असली तरी आपली इंटरपर्सनल बुद्धिमत्ता कमी असल्याचे लक्षण आहे. लोकांना भाषेवरून टोमणे मारताना एकीकडे स्वतःतल्या या वैगुण्याकडे भाषाप्रेमींनी, व्याकरण नाझींनी अवश्य लक्ष द्यावे. यासाठी आपल्याकडे एक उत्तम म्हण आहे, कोणती ते भाषाप्रेमी नक्की सांगतील.
खलबत्ता ब्लॉगवरचे लोक भाषा संवर्धनासाठी चांगले काम करत आहेत पण त्यांच्या अनेक क्लिप्स मध्ये बोलण्यात जी हेटाळणी दिसते, ती अगदी निषेधार्ह आहे. मला अनेक जण भाषेच्या चुकांवरचे विनोद पाठवतात, तेव्हा त्यातली गंमत आणि घोटाळे बघून मी मनापासून हसते. पण ती नुसती गंमत नसेल आणि ते पाठवताना त्यावर काही तरी शेरेबाजी असेल तर त्या लोकांबद्दलचं माझं मत नाही म्हटलं तरी जरा बदलतंच.
माझा भाषेसंदर्भात कोणताही विशेष अभ्यास नाही. दहावी झाल्यावर तर मराठीच्या तांत्रिक स्वरुपाशी पुन्हा गाठभेट नाही. ऱ्हस्वदीर्घात आजही भयंकर चाचपड होते. सध्यापुरतं तरी मी भाषेसंबंधीच थोडंसं काम करते आहे आणि भाषेचाही थोडाफार लळा असल्यामुळे भाषेबद्दलचं निदान तुका म्हणे त्यातल्या त्यात गांभीर्य आहे, असं म्हणू धजावते. अलीकडेच इंग्रजीतलं एक क्रियापद अडल्यावर माझ्या एका सहकाऱ्यांनी माझ्या शिक्षणावरून मला टोमणा मारून घेतला. तेव्हा मला जाम मजा वाटली. कारण तुम्ही एखाद्या विषयात मास्टर्स करता, म्हणजे मारे तसे म्हणवले जाता, तेव्हा तो संपूर्ण विषय तुम्हाला अवगत व्हावा, हे अपेक्षित जरी असलं तरी ती अशक्य कोटीतली बाब असते. भाषा हासुद्धा इतर विषयांसारखाच अमर्याद, अथांग विषय आहे. भाषेसाठी आयुष्य वाहून घेतलं तरी आवाक्यात येणारा प्रांत नाही तो.
माझ्या सध्याच्या नोकरीसाठी मी ज्या लिखित आणि तोंडी परीक्षा दिल्या, इंटरव्ह्यू दिला, त्याची काठीण्यपातळी बघितल्यावर मी माझ्या प्रोजेक्ट हेडना इंटरव्ह्यू मधेच सांगितलं की माझी निवड होवो अगर न होवो, यापुढे मी 'मला मराठी येतं' हे वाक्य उच्चारणार नाही. आणि खरोखरच मी पुन्हा तसं स्वत:शी देखील म्हणू धजलेले नाही. भाषा येत असल्याबद्दल कधी भाव खाल्ला नव्हता तरी इंटरव्ह्यू झाल्यावर न राहवून हनुमानाची शेपटी उचलायला न जमलेल्या भीमाचा काळवंडलेला चेहरा आठवलाच. खास सांगायची गोष्ट म्हणजे आय आय टी मुंबईत शिकलेले, आय आय टी एम मध्ये कंप्युटर सायन्स शिकवणारे प्रोजेक्ट हेड गुजराती आहेत आणि त्यांनी इंटरव्ह्यू मराठीसाठी घेतला. कारण तेच, त्यांच्या ठायी असलेला अफाट तांत्रिक आणि भाषिक बुद्धिमत्तेचा मिलाफ.
माझ्या मुलाचं शिक्षण सुरू करताना मला आठवड्याभराची पालक कार्यशाळा करता आली. तेव्हा त्यामध्ये इतर अनंत महत्त्वाच्या बाबींप्रमाणेच बुद्धिमत्तांचे प्रकार आणि प्रत्येक मूल कशा प्रकारे वेगळं असतं हे शिकता आलं आणि मला आयुष्यभर उपयोगी पडणारा महत्त्वाचा दृष्टीकोन मिळाला. भाषेवरून कुणाला न्यूनगंड देणं चुकीचं आहे, हे मी शास्त्रशुद्ध पद्धतीने समजू शकले. अन्यथा मीही आज तेच करत राहिले असते, ज्याबद्दल आत्ता हे लिहितेय.
No comments:
Post a Comment