म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Sunday, April 7, 2024

 #असोसिएशन्स #हेजीवनसुंदरआहे #गजरा

सकाळी कॅंटीनच्या लाऊंजमध्ये हा मोगऱ्याचा दाट गुंफलेला गजरा जमिनीवर पडलेला दिसला. अगदी ताजा. कुणाच्या तरी केसांतून घरंगळून पडलेला आणि त्या ललनेला ते समजलंही नसावं हे सांगणारा. खरंतर आजुबाजूला चिक्कार वर्दळ होती. मी चटकन तो उचलला आणि भोवती, बाहेर जाऊन सगळ्यांच्या पुढ्यात तो गजरा नाचवत विचारलं, हा कुणाचा आहे? तर कुणाचाच नव्हता तो. बरं, मग माळायला तरी हवाय का कुणाला? तर त्यासाठीही कुणीच हो म्हणालं नाही. म्हणजे तो खास माझ्याकरताच तिथं गळून पडला होता जणू! ही म्हणजे लॉटरीच लागली मला!
तो तसाच घेऊन आत गेले. तिथं एक सहकारी गाठ पडली. गजरा हवाय का विचारल्यावर हो म्हणाली. मग तिला अर्धा घ्यायला सांगून नाश्ता वाढून घ्यायला पळाले. तिनं तो कॅंटीनदादाच्या कात्रीनं अर्धा अर्धा करून एक भाग मला आणून दिला आणि ती गेली. ताटली घेऊन वळले तर लांब दारातून आत येणाऱ्या, कालही नाश्त्यालाच भेटलेल्या एक विदुषी दिसल्या. प्रसन्न आकाशी रंगावर बारीक चौकड्यांची जिथल्या तिथे नेसलेली खळ घातलेली सुती साडी, पूर्ण गळ्याचं राखाडी बारीक चौकड्यांचं पोलकं, साधारण षटकोनी फ्रेमचा चष्मा आणि निळसर करडे घारे डोळे. त्या काल एवढ्या भारदस्त दिसत होत्या की मी मुद्दाम जाऊन त्यांना तसं सांगून आले. खरं म्हणजे कालचं त्यांचं कॉंबिनेशन जर मी साडी खरेदीला गेले असता मला दिसलं असतं तर गणवेशाचं कापड म्हणून मी ढुंकूनही बघितलं नसतं त्या साडीकडे. पण त्यांच्या अंगावर तिचा एलेगन्स खुलला होता. एकंदरीत पारख हवी माणसाला हेच खरं.
आत्ता त्या कुणाशी तरी बोलत उभ्या होत्या तोवर माझं खाऊन झालं. आजही त्यांनी सोनसळी पिवळा, उन्हाळा हलका होईलसा चिकनच्या कापडाचा सलवार सूट घातला होता. त्याच रंगाची तलम पोताची (ओरिसातलं हातमागावरचं कापड होतं ते, असं त्यांनी सांगितलं नंतर) परीटघडीची जिथल्या तिथे राहणारी ओढणी घेतली होती. त्यांचं घर म्हणजे अगदी नीटनेटकेपणाचा कळस असणार. मला अगदीच घाई होती, पण तरीही न राहवून पुन्हा त्यांना हटकून मी कॉंप्लिमेंट दिलीच. त्या खुश होऊन चक्क मराठीतच म्हणाल्या, अगं तू काय रोज माझा दिवस साजरा करायचं ठरवलं आहेस का? मी म्हटलं, मी माझा दिवस सुंदर करतेय, जाता जाता तुमचा होत असेल तर चांगलंच आहे. पण माझ्याकडे अभिप्रायाइतकंच चांगलं आणखी काहीतरी आहे आत्ता. मी हातातला गजरा त्यांच्यासमोर धरला. त्यांचे डोळे लकाकलेच. मी लगेच म्हटलं, पण मी यातला निम्माच देणारे तुम्हाला! मला निम्मा ठेवणारे. टेबलवर ठेवून घमघमाट तर पसरतोच, शिवाय काम करता करता मधेच तो हुंगायला फार आवडतं मला. त्या म्हणाल्या, अगदी निम्माही चालेल, पण दे. मीही कॅंटीनदादाकडूनच पुन्हा अर्ध्या गजऱ्याचे दोन भाग करून घेतले, एक त्यांना देऊन एक माझ्या पिशवीत ठेवला आणि त्यांना त्या गजऱ्याची इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली.
मग आमची उभ्याउभ्याच घाईघाईत नावगावफूलफळ वगैरे चौकशी होऊन नंबरांची देवाणघेवाण झाली, कामाची स्वरुपं समजली. त्या मुंबईच्या आहेत, ज्येष्ठ प्रोजेक्ट कंसल्टंट म्हणून आय आय टी एम मध्ये रुजू झाल्यात आणि आधी त्या भारत सरकारच्या प्रिंसिपल सायंटिफिक ऍडव्हायजर होत्या. आमच्या बोलण्यात कुठेही त्यांचं हे मोठेपण त्यांनी जाणवू दिलं नाही. त्या म्हणाल्या, मी हे सुप्रीम संकेत मानते, अन्यथा आपली ओळख होण्याचं काही प्रयोजनच नव्हतं. मलाही ते पटलं. कोणाचा तरी गजरा, त्यांनी हौसेनं माळला असेल पण पुढे त्याचा कसा प्रवास होऊन तो कुणाकुणाला मिळाला आणि त्यानिमित्तानं कुणाच्या कशा ओळखी झाल्या. सगळा मजेदार प्रकार.
उद्या कदाचित नाश्त्याला आमची कालहून निवांत भेट होईल, उद्या पुन्हा त्या सुखद रंगसंगतीचं काही घालून येतील. किंवा यातलं काहीच होणार नाही, नुसतंच फोनवर बोलणं होईल, पुन्हा भेट होईल न होईल, पुढे संपर्क वाढेल, न वाढेल. पण त्यांच्याबरोबर झालेल्या ओळखीचं हे असोसिएशन कायमस्वरूपी छानच राहील. 'दाने दाने पे' वाली कहावत तो सुनी थी, मगर गजरे गजरे पे भी लगानेवाले का नाम होता है, ये आजही पता चला |
पोस्ट एडीट - आज नाश्त्याला ठरवून भेटलो आणि प्रचंड गप्पा मारल्या. मी फारच प्रभावित झाले आहे. त्या गजऱ्यानं अशक्य योगायोगानं मला एका प्रचंड कर्तृत्ववान व्यक्तीशी जोडून दिलं आहे. माझी नवी छोटी बॉंग मैत्रीण पुश्पिता पात्रा सुद्धा आज आमच्यात सामील झाली, खूप कॉमन गोष्टी निघाल्या आणि आनंद त्रिगुणित झाला.
ता.क. आज फोटोंमध्ये त्याच दिवशी पुश्पिताच्या केशसंभारात लपेटलेल्या उन्हाळी फुलांची भर घातली आहे.







No comments:

Post a Comment