म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Thursday, April 4, 2024

 मी घरून काम करणारी आणि धाकटी बहीण मॉप लांबच्या हापिसात जाणारी. म्हणून बाबांची कामं, बॅंकांचे व्यवहार, फुटकळ खरेद्या, उगीचच उंडारायला वगैरेसाठी बहुतेकदा मी बाबांसोबत जात असते. सध्या मी काही दिवस बाहेरगावी असल्यामुळे धाकटी बहीण त्यांच्या बरोबर जातेय.

आज बॅंकेत पेंशनच्या नॉमिनेशन संदर्भात काही तरी काम होतं. त्याबद्दल काल मला सांगताना बहीण म्हणाली, तू नाहीस तोवर सगळं माझ्या नावावर करून घेते जाते बाई!
तर ती त्यांच्याबरोबर गेल्यावर अर्ध्या तासात जादूसारखं काम आटोपलं.
हूं म्हणून गर्दी होती म्हणे.
मी फणकारून - साहजिकच आहे. लाडकी लेक होती ना तुमची बरोबर, मग व्हायचंच की काम लगेच.
बाबा - सगळं तिला देऊन टाकून रिकामा झालो बघ आज. नंतर मला म्हणू नको तुला सांगितलं नाही म्हणून.
मी - आता खैर नाही तुमची. असं तसं सोडत नसते मी तुम्हाला. मला अंधारात ठेवून तुम्ही दोघांनी हा कारभार केल्याबद्दल मी तुम्हां दोघांना कोर्टात खेचते की नाही बघाच.
बाबा - म्हणजे आता मलाही कुणीतरी वकील शोधायला लागेल काय?
मी - ते काय मला विचारू नका. आता आपण काय ते थेट कोर्टातच बोलू!
बाबा - बरं ठीक आहे, पण कोर्टात जाताना मला घेऊन जायला येणार ना??
तर सध्या मी हसून ठार मेले आहे.

No comments:

Post a Comment