#आनंदीजीवन #रिटायरमेंटहोम #स्वनिर्णय #एकमत #कुटुंबसौख्य #वृद्धांचेपालकत्व
येत्या एक मे रोजी आमच्या बाबांना कोल्हापुरातून पुण्यात येऊन दोन वर्षे होतील. हा प्रवास आमच्या कुटुंबासाठी खूप शिकण्याचा आणि अखेरीस आनंद सापडण्याचा होता. तो आवर्जून शेअर करण्यासारखा आहे.
बाबांना अनेक वर्षे एकटं आणि स्वतंत्रपणे रहाण्याची सवय होती. मी थोड्या कालावधीसाठी कोल्हापुरात गेल्यानंतर एकत्र रहाताना त्यांना आमच्याशी बरंच जुळवून घ्यावं लागलं होतं. पण तिथे त्यांची खोली म्हणजे त्यांचा स्वतंत्र प्रांत असल्यामुळे त्यांनी सांभाळून नेलं. पुण्यात यायचं ठरल्यानंतर काही प्रश्न उभे राहिले. आम्हा दोन्ही मुलींची घरे वनबीएचके. त्यापैकी माझं घर तिसऱ्या मजल्यावर आणि लिफ्ट नाही, मुलाच्या मित्रांची अखंड वर्दळ, दंगा, पसारे, रस्त्यावरच्या वर्दळीचा गोंगाट. तर बहिणीकडे लिफ्ट असली तरी ती दिवसाचे तेरा तास घराबाहेर. त्यावर टूबीएचके घर भाड्याने घेऊन रहाण्याचा तोडगा काढून वर्षभर तसे राहिलो देखील. मात्र ते घर आम्हाला कुणालाच फारसं आवडेना. बाबा रमलेत असंही जाणवेना. त्या परिसरात ज्येनांचे असंख्य गट बसतात, पण माणसात रमणारे बाबा त्यांच्यात फारसे फिरकलेच नाहीत. सकाळ संध्याकाळ फिरून येऊन मुख्य रस्त्याच्या बसस्टॉपवर निवांत वारा खात बसणे, घरी येऊन टीव्ही बघणे, अधेमधे भावंडांकडे जाणे. बाकी वेळ ते, मी घरून काम करत होते तर नकळतपणे माझ्यावर अवलंबून रहायला लागले. आम्हीही गृहीत धरलं की त्यांना रुळायला थोडा वेळ द्यायला हवा. जेव्हा वाढीव भाडं द्यायची वेळ आली तेव्हा मात्र त्यांनी मी स्वतंत्र रहातो, तू तुझ्या घरी रहायला जा असा निर्णय घेतला. जो आम्हाला सगळ्यांना मान्य होता.
त्यानुसार प्रयत्न करून धाकट्या काकाने एक नवेकोरे रिटायरमेंट होम शोधून काढले आणि आधी आठ दिवस ट्रायल घेऊन बाबांना आवडल्यावर ते तिकडे रहायला गेले, मी माझ्या घरी परत आले. मुख्य रस्त्यापासून जवळ आणि आम्हा सगळ्यांना अगदी सोयीच्या अंतरावर असे त्यांचे सर्व सोयीयुक्त ठिकाण, पण अजून फारशा ऍडमिशन्स झालेल्या नसल्याने इनहाऊस सोयी काहीच नाहीत. सकाळच्या चहा नाश्त्यापासून जेवणाचे डबे वगैरे सगळंच बाहेरून. कपडे आम्ही घरून धुऊन द्यायचे. जेवलेले डबे आणि ताटवाटी बाबांनीच धुवायचे. टीव्ही रिचार्ज करण्यासाठी आठवण करावी लागायची. लिफ्ट रात्री बंद. फ्रीज वापरायचा नाही. सोयींच्या मानाने दर फार चढे. तेही देत होतो, पण कायम सदस्य कुणीच नसल्याने तीनेक महिन्यातच बाबा एकटे पडले. त्यात अवकाळी पावसानं जेव्हा रस्ते तुंबले तेव्हा आम्ही जवळ रहात असूनही चहा, जेवण वगैरे सुद्धा त्यांच्यापर्यंत पोचवता आलं नाही. अशातच जवळच्या आणखी एका रिटायरमेंट होमविषयी माहिती समजली, जिथे भरपूर सदस्य होते. मी आणि बाबा तिथे जाऊन बघून आलो. ती छोटेखानी व्यवस्था एकंदरीत सोयीस्कर वाटली, अंतरात फरक पडत नव्हता. मुख्य म्हणजे बाबांना सगळं आवडलं. त्याप्रमाणे आम्ही आधीच्या व्यवस्थापकांना कल्पना दिली आणि लगेच ते तिकडे रहायला गेले सुद्धा.
आता इथे रहायला येऊन जवळपास आठ महिने होतील. दोन मजली जागेमध्ये खालच्या मजल्यावर सर्व पुरुष आणि वरच्या मजल्यावर स्त्रिया आणि खुद्द केअरटेकर कुटुंब अशी व्यवस्था आहे. एक मदतनीस कुटुंब तिथेच रहाते. सगळे मिळून साधारण पंधरा सोळा जण आहेत. चहा, नाश्ता, जेवण, कपडे धुणे इनहाऊस, आठवड्यातून एकदा जनरल फिजिशियन आणि फिजिओ थेरपिस्ट व्हिजिट या सगळ्याचा मिळून वाजवी दर आहे. एकत्र जेवणे, टीव्ही बघणे, रोज योग वर्ग, नियमित फिरायला जाणे, देवघर आहे त्यामुळे आपापले देवाचे म्हणणे होते, सणवार, वाढदिवस साजरे होतात, सहली निघतात. बहुतेकांची मुलेमुली नियमित भेटायला येतात, ही मंडळी बाहेर जातात. सर्व पुरुष विधूर आहेत, त्यामुळे आपोआपच एक समदु:खी वातावरण आहे. केअरटेकर जोडपं वयानं लहान आहे आणि सिन्सिअरली या वडिलधाऱ्यांकडे त्यांचं लक्ष असतं. खरं म्हणजे एवढ्या लहान वयात त्यांनी हा व्यवसाय सुरू केला हे कौतुकास्पद आहे. नुकतीच त्यांना मुलगी झाली आहे, जी आता या सर्व वृद्धांचा विरंगुळा होईल असं दिसतंय. ऍडमिशन्स साठी सातत्याने विचारणा होत असते. त्यामुळे लवकरच खालचे दोन मजले घेऊन व्यवसाय विस्तार होतोय अशी चिन्हं आहेत.
हे सगळे सविस्तर सांगण्याचे कारण आहे. आता बाबांचं झकासपैकी रुटीन लागलेलं आहे. रोजचं फिरणं, योगवर्ग ते मुळीच चुकवत नाहीत. त्यांना एक छानसा बडी मिळाला आहे. आताशा कुठेही जायचं तर त्यांचा दोन तासांहून अधिकचा व्हिसा आम्हाला मिळेनासा झाला आहे. कोल्हापूरला जायचं नाव काढत नाहीत, इथे भावंडांकडे गेल्यावरही हातावर पाणी पडलं की चुळबुळ चालू होते. उलट आम्ही भेटायला गेलो की आम्हालाच तिथे जेवायला घालून पाठवतात. जवळजवळ एक दिवसाआड आम्ही मुली, बाकीची भावंडं भेटायला येतात, ते सगळ्यांकडे येतात. बाहेरगावची भावंडं त्यांना आवर्जून भेटायला जातात, नियमित चौकशी करतात. ते लाघवी आहेत त्यामुळे त्यांना नेहमीच वेगळी आपुलकी मिळते. सणावाराला ते आमच्याकडे यायचे म्हटल्यास केअरटेकर नाराज होते, नका जाऊ म्हणते. या २८ मार्चला त्यांना ८० पूर्ण झाली, जो त्यांनी करू दिलेला आजवरचा सगळ्यात दणक्यात साजरा झालेला वाढदिवस आहे. तो त्यांना स्वत:ला मनापासून आवडला. तिथे नाश्त्यापासून त्यांच्या आवडीचा बेत केला गेला. संध्याकाळी त्यांनी सर्वांना तिथेच मेजवानी दिली. आत्यानं आणि मुलींनी औक्षण केलं, नातू मित्रांसकट हजर होता. गेल्या दोन वर्षात कधी नव्हत्या इतक्या त्यांच्या शुगर लेव्हल्स आदर्श आहेत, एचबीएवनसी दृष्ट लागण्यासारखं आहे. तब्येतीचे सर्व पॅरामीटर्स उत्तम आहेत. याचाच अर्थ बाबा मनापासून खुश आहेत. माझ्या मधल्या काकाच्या शब्दात सांगायचं तर मन:स्वास्थ्य आणि शारीरिक स्वास्थ्य किती थेट जोडलेलं असतं त्याचं हे उत्तम उदाहरण आहे.
या सर्व प्रवासात बाबा आणि आमच्या सर्व कुटुंबाच्या एकमताचा प्रचंड वाटा आहे. त्यांचा आनंद आम्ही प्रमाण मानला. आणि ते योग्य झालं याचा आम्हाला सर्वांना आनंद आहे.