म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Sunday, July 31, 2016

पुलंना एकदा एका मैफलीत एक गृहस्थ भेटले. ते सोबत आपल्या नऊ दहा वर्षांच्या मुलाला घेऊन आले होते. पुलंनी आस्थेनं त्या गृहस्थांना विचारलं, "अरे वा, गाण्याची आवड आहे वाटतं तुमच्या मुलाला!"
ते म्हणाले, "नक्की सांगता येणार नाही मला, पण लागावी अशी इच्छा आहे. गेल्या खेपेला कुमार गंधर्वांच्या गाण्याला घेऊन गेलो होतो. आज ह्या गाण्याला यायचंय का, असं विचारलं आणि 'हो' म्हणाला, म्हणून आणलं. त्याला लागलीच चांगल्या गाण्याची आवड तर आनंदाचा धनी होईल. दुसरी काय इस्टेट देणार मी त्याला? आयुष्यभर बरोबर बाळगील अशा चार चांगल्या आठवणी देतो"
'संस्कार' ह्याचा अर्थ ह्या बापाला कळला असे मला वाटते.

आज मी किंवा माझी बहीण मागे वळून पहातो तेव्हा बाबांबद्दल कृतज्ञता ह्याचसाठी दाटून येते. वडील म्हणून अनंत, अगणित ठेव्यांबरोबर बाबांनी आम्हाला गाण्याचा कान दिला. घरात आई गात असायची, दोघं काका सतत गुणगुणायचे, मधला काका बुलबुल, मेंडोलीन वाजवत बसलेला असायचा, रेडिओवर सिलोन स्टेशन सुरू असायचं, नाहीतर रेकॉर्ड प्लेअरवर आणि नंतर टेपरेकॉर्डरवर सतत गाणी तरंगत असायची. धाकटा मामा मेलडी मेकर्समध्ये गायचा. आईबाबा, आत्या, काका, काकू, मामा, अख्खं घरदार अखंड काही ना काही ऐकत असायचं. घराला भिंती असतात तशा आमच्या घरात हे सुरांचे पडदे असायचे. आज मागचं काहीही आठवताना पार्श्वभूमीला कॅनव्हाससारखी ही गाणी असतात. काल पं. वसंतराव देशपांडे आणि शंकर पाटलांचे स्मृती दिन होते. ह्यासुद्धा ओळखी बाबांनीच करून दिल्या, ती नाट्यगीतं आणि कथाकथनं आजही बहिणीला श्लोका-स्तोत्रांसारखी मुखोद्गत आहेत. मोठी सुटकेस भरून रेकॉर्ड्स आणि नंतर ढिगानं कॅसेट्स् जमवल्या होत्या आईबाबांनी. रोजच्या धडपडीत तुटपुंज्या पगारात आणि जागेच्या अभावात हा छंद त्यांनी कसा काय जोपासला ह्याचं आश्चर्य वाटतं. बाबांना विचारलं तर आज त्यांनाही ते धड सांगता येत नाही. ते सहज होत गेलेलं काहीतरी होतं, ठरवून केलं गेलेलं नव्हतं. इस्टेटी केल्या नाहीत की गाड्याघोडे नाहीत, मात्र आयुष्याला चव आहे, त्यांच्या आणि आमच्याही.

अर्थात मोहम्मद रफी हे नावसुद्धा आयुष्यातला अविभाज्य भाग बनण्यात बाबांचाच हातभार मोठा आहे. बाबांचा ह्या माणसावर भलताच जीव आहे. रफीबद्दल बोलताना किंवा त्यांची काही विशिष्ट गाणी ऐकताना ते हळवे होतात. रफींची हिंदी गाणी सर्वपरिचित आहेत, बहुतेक सगळी मराठीही. आज त्यांच्या स्मृतिदिनी, त्यांच्या दुर्मिळ मराठी गाण्यांपैकी एक, मला आवडणारं.

https://www.youtube.com/watch?v=ZMRyeX5Ni_s

Wednesday, July 27, 2016

उस पार साजन इस पार धारे - चोरी चोरी

गाणी सहसा नुसतीच ऐकली जात नाहीत. त्या गाण्याशी निगडीत अनेक कनेक्शन्स असतात, ती सगळी ते गाणं ऐकताना आपल्याभोवती आपोआप फेर धरतात. कित्येक वेळा असंही होतं, की त्या गाण्याशी ह्या ना त्या मार्गाने सांगड असणारी इतरही गाणी आठवतात. हे असं होत ते गाणं ऐकणं आणखी आनंदाचं होतं मग.

'चोरी चोरी'ची गाणी हा तसाच एक फार गहन विषय आहे. एकतर ह्यातले रोमँटिक मन्नादा अवीट आहेत. सिनेमा बघितलेला नाही, पण एरवी कधीही न आवडणारा राज कपूर मला ह्या गाण्यांमधे आश्चर्यकारकरित्या आवडतो. सगळीच गाणी एकसे एक सुंदर, त्यातही 'सवा लाख की लॉटरी' आणि 'ऑल लाईन क्लियर' तर हटकेच. जरा म्हणुन कुठेही मेलडी निसटत नाही, ही खरंच कमाल आहे. त्यातल्या प्रत्येकच गाण्याबद्दल निबंध लिहिता येईल. आमची काकू ऐकायची चोरी चोरीची गाणी सारखी. त्यामुळे ही गाणी ऐकताना मला हटकून काकूसुद्धा आठवते.

पण 'उस पार साजन इस पार धारे' हे अप्रतिम गाणं मला नेहमी वैशिष्ट्यपूर्ण वाटतं. नदी, नावाडी, किनारा, लाटा, ह्यावरच्या यच्चयावत गाण्यांमध्ये हे पहिल्या पाचात. ते कायम मला 'कशी काळनागिणी सखे गं वैरीण झाली नदी'ची आनंदी आवृत्ती वाटत आलंय. दोन्हीच्या काव्यातला आशय बराचसा जोड्या जुळवा प्रकारातला आहे. त्याची कोरिओग्राफी देखणी आहे. ही नटी कोण आहे तेही माहिती नाही. पण ती इतकी खेळकर आणि तोंड भरून हसरी आहे, की पडद्यावरचं गाणं प्रसन्न दिसतंय अगदी. ह्यातल्या वाद्यमेळाबद्दलही कुणी जाणकारानं काही उलगडून सांगितलं तर बरं होईल. गंमत म्हणजे, संगितकार शंकर जयकिशन असूनही हे गाणं ऐकताना मात्र मला ते सलील चौधरींचं असावं असं वाटतं, इतका तो लोकसंगीताचा, विशिष्ट एकसंध कोरसचा बाज आणि वापर हुबेहूब सलीलदांसारखा आहे. नाव जशी पाण्यावर हेलकावे खाते, तशाच किंचीत संथ लयीतलं, खालच्या पट्टीत सुरू होणारं. लता नेहमीसारखीच उठावदार आणि हसरत जयपुरींचे सुंदर शब्द वजनदार करणारी आहे. तिच्यासाठी वेगळं लिहिण्यासारखं काही शिल्लकच नाही आता. सगळ्या गाणंभर "हो टिम का टिंभा टिंभा, ओ कोडिया कोडिया कवलानी, गेंजी गेंजी गे़ंजी गेजळा" अशा काहीतरी त्या सुरेल कोरसच्या मजेशीर ओळी आहेत. हे शब्द कोणत्या भाषेतले आहेत की असेच वापरले आहेत कल्पना नाही. बारकाईनं ऐकताना वरवर तरी पूर्वोत्तर भारतातल्या एखाद्या भाषेतले वाटतात, कुणाला माहिती असेल तर सांगा, उत्सुकता आहे त्या शब्दांबद्दल. ह्या ओळीसुद्धा 'टिम टिम टिम तारों के', 'ताररी आररी आररी', 'घुंगर बोले चिकीमिकी चिकिमिकी', 'लारालप्पा लारालप्पा, आदीटप्पा आदीटप्पा', 'अपलम् चपलम्' या शब्दांच्या पंगतीतल्याच. कधी अर्थासकट, कधी उगीचच. पण नादमाधुर्य वाढवणा-या. असो. शोधावं तितकं कमीच.

https://www.youtube.com/watch?v=0xWepby-ioY

Monday, July 25, 2016

#वाचन परिक्रमा#
गोनिदांची दमदार व्यक्तिचित्रं, डोलवणारी बोली, रसाळ अमृतावाणी वर्णनं, सारा सह्याद्री, विंध्य, सातपुडे पालथे घालणारे भौगोलिक प्रदेश, आपल्यालाही नकळत विरघळवून टाकणारं अकृत्रिम निसर्गतादात्म्य, सगळंच भुरळ घालत आलंय. अगदी समग्र नसले, तरी 80% गोनिदा जमवले आहेत. ते पुन्हा पुन्हा उघडणं आणि कधीही, काहीही, कुठूनही वाचणं. बरं वाटतं. मात्र सर्वात जवळचा आपला बुधाच आहे. अनेकदा असं का म्हणुन एकट्यानं, कधी दुकट्यानं कारणं शोधायचा प्रयत्न केला, नक्की समजत नाही काही. त्याच्या पाऊलखुणात काही शोधलं जातंय का, कोण जाणे. आता तो फंद सोडलाय जवळजवळ. दरवेळी दरठिकाणी कारखाना (डोक्याचा कारखाना - साभार, चिरंजीव) लावलाच पाहिजे असं कुठाय! असो, अंबरनं Ambar Karveअनेकदा आठवण करूनही मागे राहून जाणारं आज करायचं ठरवलं. वाचनकट्ट्याला क्रमश: वाचताना हा बुधाआजोबा जितका समजला तितका चिरंजीवांनाही आवडला होता. तर हा प्रिय पुस्तकातला माझा आवडता उतारा. ह्यातला 'थंडीवेगळा शहारा' लक्षवेधक आहे. उतारा तुकड्यातुकड्यात..
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

पलिकडे भिव्या निसूर झोपला होता. पुन्हा बुधाच्या मनातलं दु:ख जागं झालं. थंडी तर होतीच. पण त्याला थंडीवेगळा शहारा फुटला. तो तटकन् अंथरुणावरून उठला. घोंगडी अंगावर पांघरून बाहेर आला.
........
अन् आता त्यातलं काहीच दिसत नाही! एक पलिकडला डोंगर, की एक अलिकडला. मध्ये सगळा धुईचा समुद्र जिवंत आहे. सगळी दरी त्या धुईनं भरून गेली आहे.
........
आकाशात ढग एकमेकांवर कोसळतात, तशी ही धुई आपल्याच अंगातून उठून आपल्याच एका बाजूवर कोसळत्ये आहे.
........
होता होता तो पडदा वितळू लागला. विरविरीत होऊ लागला. त्याच्या खालचं कोकण दिसू लागलं. जणू काही देवानं रात्री कोकणावर पांघरूण घातलं होतं. आता सकाळ झाल्यामुळे तो ते पांघरूण काढून घेऊ लागला.

तांबड्या कौलांनी शाकारलेली घरं दिसू लागली. मग झाडं. मग भाताच्या उडव्या. मग वाल. असं एकेक त्या पांघरूणातून बाहेर येऊ लागलं. म्हणू लागलं, मी आहे बरं का अजून!
........

बुधा,
तुझ्यावर जन्माचा लोभ जडलाय.