"लौकीक आणि अलौकीक" ऐकून आले. हे डॉ. ढे-यांच्या जन्मदिनानिमित्त केलं गेलेलं त्यांच्या निवडक साहित्यवेच्यांचं अभिवाचन असून, श्रोत्यांसाठी एक अतिशय दर्जेदार, आनंददायी अनुभव आहे.
चिन्मयनं डॉ. ढे-यांच्या साहित्यसमुद्रातून जाणतेपणानं आणि जबाबदारीनं असे काही वेचक तुकडे गोळा केलेत, की ऐकताना श्रोत्यांनी डॉक्टरांच्या व्यासंगाला आणि सुलभ मांडणीला दादही द्यावी अन् तेव्हाच त्यांना त्यांच्या साहित्यवाचनाची उत्सुकता, ओढदेखिल निर्माण व्हावी. इतक्या कमी कालावधीत डॉ. ढे-यांच्या अवाढव्य संशोधनाचा संपूर्ण आढावा घेऊन, त्यांच्या अभ्यासाच्या शक्यतो सा-या महत्त्वाच्या विषयांना स्पर्श करणारे योग्य ते संकलन करून, त्याची बांधीव संहिता बनवणं हे अतिशय कठीण काम होतं, ते त्यानं उत्कृष्ट आणि सहजपणे केलं आहे. डॉक्टरांच्या भगिनींचा, मी साहित्यकार नाही असे म्हणत म्हणत पण त्याही डॉक्टरांचीच भगिनी असल्याचे सिद्ध करणारा, सुरेख शब्दात उतरवलेला दोघा भावंडांच्या सुरुवातीच्या दिवसांवरचा, निगड्यातल्या भक्तीपूर्ण सुसंस्कृत वातावरणाचा, पुणे स्थलांतराचा आणि डॉक्टरांचा शिक्षणाचा खडतर प्रवास सांगणारा लेख श्रोत्यांना हळवं करून गेला. त्यात आलेलं स्वाभिमानी आणि सजग पालक असलेल्या आजीचं व्यक्तिचित्रण लोभस आहे. डॉक्टरांनी केलेलं लज्जागौरीचं, लंकापार्वतीचं थोडक्यात विश्लेषण, बाशिंगाचे महत्त्व, मूलदेवाचे चौर्यकर्माचे शास्त्र आणि प्रतिष्ठा, खलील जिब्रानवरील भाष्य, डॉ. तारा भवाळकरांनी घेतलेल्या डॉक्टरांच्या मुलाखतीचं शब्दांकन, कुरुंदकरांनी डॉक्टरांना दिलेली खणखणीत पावती, डॉक्टरांनी दाखवलेला पंतांचा सोवळा आणि संतांचा ओवळा विठ्ठल, आणि शेवटी डॉक्टरांच्या मनोगताने हृद्य समारोप. हा सगळा आढावा श्रोत्याला गुंतवून ठेवणारा आहे.
ह्या वाचनासाठी उत्तम अभिवाचक निवडून, त्या अभिवाचकांच्या प्रकृतीनुसार उतारे वाचून घेणे हे उमेश कुलकर्णींचं दिग्दर्शकीय कौशल्य वाखाणण्यासारखं आहे. ज्योती सुभाष, माधुरी पुरंदरे, ओम भूतकर आणि हर्षल राजपाठक, सर्वांनीच प्रभावी वाचन केलं. वाचताना डॉक्टरांच्या भाषेचं सौष्ठव आणि लालित्य जपणं नक्कीच कसरतीचं असणार, मात्र ते सर्वांनीच ताकदीनं पेललं आहे. कल्याणी देशपांडेंनी छेडलेली सुरुवातीची कुमारांच्या 'मुख तेरो कारो'ची धून पुढे येणा-या सुरेख अनुभवाची चाहूल होती. वाचनाचे उतारे असे सतारीच्या लाईव्ह सुरेल तुकड्यांनी जोडण्याची कल्पकता अभिवाचनाची रंगत वाढवून गेली. एक सुंदर कार्यक्रम सादर झाला.
लेखात स्वानंद वडकेंच्या 'लज्जागौरी' ह्या हस्तचित्राचा महत्त्वाचा उल्लेख राहिला. मी ते एखाद्या प्रत्यक्ष शिल्पाचं घेतलेलेलं प्रकाशचित्रच समजले होते, इतकं सुरेख काढलंय ते चित्र.
आम्हाला दिलेल्या ह्या सुंदर अनुभूतीसाठी आणि डॉ. ढेरेंना इतक्या सुंदर रितीने वाहिलेल्या आदरांजलीसाठी उमेश कुलकर्णी, चिन्मय दामले, समर नखाते आणि सर्व चमूला मनःपुर्वक धन्यवाद.
ह्या अभिवाचनाचे आणखी प्रयोग व्हायला हवेत आणि जास्तीत जास्त श्रोत्यांना आनंद घेता यायला हवा.
अनेकदा पुण्यात रहाणे आणि त्यासाठी कराव्या लागणा-या अव्याहत तडजोडींमुळे मनात उलघाल होते. मात्र असे काही कार्यक्रम ती उलघाल सुसह्य करतात. पुलंच काहीतरी म्हणाले होते ना, की भाकरी तुम्हाला जगणं तर गुलाबाचं फूल कसं जगायचं शिकवते? तपशीलात गडबड असेल माझ्या, पण धावतपळत वेळ गाठून असं लोकांनी जीव ओतून काहीतरी सादर केलेलं ऐकताना पुलंच्या म्हणण्याचा मथितार्थ हातात सापडत जातो एवढं नक्की.
No comments:
Post a Comment